Khazan Farming Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Khazan Land Goa: पोर्तुगिजांनी सासष्टी महाल जिंकून घेतला, धर्मांतरण केले; गावकऱ्यांनी 'खाजन शेती' चालू ठेवली..

Khazan farming in Goa: खाजनशेतीचे तंत्रज्ञान आणि खाजनभूमीचा आज गोवेकरांनाच विसर पडत चालला आहे. जाणीवपूर्वक प्रयत्न केले नाहीत तर हा भूगोग, ही संस्कृती आणि ही खाजन भूमी इतिहासजमा होईल.

राजेंद्र केरकर

सागर आणि सह्याद्री यांनी लाखो वर्षांपासून समृद्ध केलेल्या गोव्याला काणकोण ते पेडण्यापर्यंत अरबी सागराने युक्त किनारपट्टी लाभली आहे. एका बाजूला सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वतरांगा आणि दुसऱ्या बाजूला पश्चिम किनारपट्टी. अशा या छोटेखानी राज्यात आदिमानवाची पावले सर्वप्रथम मांडवी, जुवारी नदी खोऱ्यात उमटली होती.

आज गोव्यात गावडा कुणबी आणि वेळीप या तीन जमातींनी आदिवासी संस्कृतीचा पाया घातल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रोटो एस्ट्रोलॉइड या वांशिक गटात समाविष्ट होणाऱ्या या तीन आदिवासी जमातींनी गोव्यातील शेती, मच्छीमारी आणि अन्य पारंपरिक व्यवसाय यांच्या माध्यमातून उदरनिर्वाह करत असताना निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याची संकल्पना रुजवली होती.

अरबी सागराचे खारे पाणी भरती ओहोटीच्या माध्यमातून मांडवी, जुवारी बरोबर अन्य नदी नाल्यात येत असते. मान्सूनचा पाऊस जेव्हा सह्याद्रीच्या पर्वतरांगात कोसळतो तेव्हा इथल्या खाऱ्या पाण्याच्या नद्यांत गोड्या पाण्याचे प्रमाण वाढत असते.

याचे पारंपरिक ज्ञान सूक्ष्म निरीक्षणाद्वारे गावडे जमातीला लाभले होते. खारे पाणी मोठ्या प्रमाणात जमिनीला क्षारतेद्वारे प्रभावित करते. इथल्या गावडा जमातीने ठिकठिकाणी चिखलाचे बांध घालून भरती ओहोटीच्या पाण्याला नियंत्रित करण्यासाठी पारंपरिक तंत्रज्ञान विकसित केले आणि त्याच्या माध्यमातून ‘मानस’ आणि ‘पोय’ ही संरचना निर्माण केली.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात नदी नाल्यांच्या किनारपट्टीवर लागवडीसाठी सुपीक जमीन उपलब्ध झाली. आज इतिहासजमा होण्याच्या वाटेवर असलेली ही शेतीची जमीन ‘खाजन भूमी’ म्हणून गोव्यात नावारूपाला आली आहे. खार भूमी क्षेत्र भातशेतीसाठी पोषक असल्याची जाणीव गावडा जमातीला प्राप्त झाली.

पाण्यात क्षारतेच्या आकस्मिक वाढीमुळे लावलेल्या शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी खाजन भूमीत मोठ्या प्रमाणात भाताची पैदास करणाऱ्या पारंपरिक प्रजाती विकसित केल्या. त्यामुळे त्यांना पौष्टिक अन्नाचे स्रोत उपलब्ध झाले.

मान्सूनच्या पावसाळ्यात देशभर शेतीची लगबग सुरू होते. गोव्यातही पूर्वीच्या काळी शेतकरी या मोसमात भातशेती करायचा. त्यात खाजन भूमीचे प्रमाण महत्त्वपूर्ण आहे. कोरगुट, आसगो, दामगो, खोचरी, काळो बेळो, तांबडो बेळो अशा क्षारतेला सहन करणाऱ्या भाताच्या प्रजातींमुळे खाजन भूमीत अन्नाची मुबलक पैदास होत होती. एकेकाळी खाजन शेतीतून इथल्या लोकमानसाला आवश्यक अन्नाची रसद मिळायची.

गोव्यावरती राज्य करणाऱ्या कोकण मौर्य, बदामी चालुक्य, कोकण शिलाहार, गोवा कदंब, विजयनगर यांच्या राजवटीत खाजन शेती करणाऱ्या शेतकऱ्याला प्रोत्साहन दिले जायचे. गोव्यातील शेतकरी, कष्टकरी लोकसमूहाने केवळ शेतीचे तंत्रज्ञानच विकसित केले असे नव्हे तर त्यासाठी लागणारी साधनसुविधा व विविध प्रकारच्या जमिनींचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामसंस्था निर्माण केल्या.

त्यात त्यांनी खाजन शेती करणाऱ्या कष्टकऱ्यांना आवश्यक सहकार्य दिले होते. दक्षिण गोव्यात असलेला माकाजन हा गाव खार भूमीसाठी नावारूपाला आला होता. माकाजन हे ग्रामनाम महाखाजन या शब्दाचा अपभ्रंश आहे.

पूर्वीच्या काळी आदिवासी गावडा जमातीने चिखलाचे बांध घालून खाऱ्या पाण्याला नियंत्रित करून आपली खाजन शेती समृद्ध केली होती. जेव्हा सासष्टी महाल पोर्तुगिजांनी जिंकून घेतला तेव्हा त्यांनी व ख्रिस्ती मिशनऱ्यांनी गावातील लोकांना आपला धर्म आणि पारंपरिक संस्कृती त्याग करण्यास भाग पाडले. ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतल्यानंतरही ‘कोमुनिदाद’ या संस्थेतर्फे खाजन शेती माकाजन येथे चालू ठेवली. गोवा मुक्तीनंतर प्रदीर्घ काळ इथली खाजन शेती कष्टकऱ्यांना मुबलक अन्नाचा स्रोत होती. परंतु आज गोव्याच्या उर्वरित भागाप्रमाणे माकाजन येथील पारंपरिक शेती विस्मृतीत जाण्याच्या वाटेवरती आहे.

पेडणे तालुक्यातील धारगळजवळील महाखाजन भूमी तिथल्या असंख्य जाती जमातींना अन्नाची रसद पुरवत होती. कोरगावहून पालयाला जाताना वाटेत म्हालखाजन हा वाडा लागतो.

तेरेखोल नदीच्या मुखाजवळच्या भालखाजन येथील कष्टकऱ्यांनी खाजन शेतीद्वारे आपले जगणे समृद्ध केले होते. तेथील पारंपरिक बांधावरचा अदृश्य रूपात वावरणारा बांदेश्वर देव आणि संपूर्ण गावाला संरक्षक कवच पुरवणारे खारफुटीचे जंगल क्षेत्र आजही भालखाजनचे वैभव ठरलेले आहे.

महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्गमध्ये वेंगुर्ला तालुक्यात मानस आणि खाजन शेतीची परंपरा असून तेथे असणारा मानसेश्वर देव या परंपरेचे प्रतीक आहे. खाजन शेतीशी निगडित असणाऱ्या कष्टकऱ्यांनी खाजना देवीची स्थापना करून या भूदेवतेचा आदर सन्मानच केला आहे. बार्देश तालुक्यातील कोलवाळ नदीच्या कुशीत विसावलेला शिवोली गाव आज बेशिस्त सागरी पर्यटनाची शिकार झाला आहे.

बार्देशातील लोकनाट्य जागराची परंपरा डिसेंबरमध्ये इथे पाहायला मिळते. या भागात खाजन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भातशेतीची पैदास करताना आपणाला ही भूमी अन्नदात्री आहे याचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी निसर्गातल्या परमतत्त्वांना देवरूपात पुजले. कोलवाळ (शापोरा) नदीच्या किनारी गुडे येथे असलेला खाजनेश्वर देव इथल्या खाजन शेतीची गतकाळातील समृद्ध परंपरा सूचित करतो.

गोव्यात कष्टकरी गावडा जमातीने खाजन शेतीला वैभव प्रदान केले. पोर्तुगीज अमदानीत त्यांना ख्रिस्तीकरणाचा सामना करावा लागला. मडगावजवळ असणाऱ्या राय गावाची अधिष्ठात्री देवता म्हणून कामाक्षी ओळखली जात होती. तिथे असणारे गावडा, भंडारी, खारवी अशा विविध जाती-जमातीने या गावाला मोठा लौकिक मिळवून दिला. जुवारी नदीकाठावरचा हा गाव विजयनगरच्या कालखंडात विशेष नावारूपाला आला होता आणि त्यामुळेच त्याचा नावलौकिक रायतूर असा झाला होता.

आज हेच रायतूर, राशोल म्हणून ओळखले जाते. इथल्या किल्ल्यात बसून दियागो रोड्रिगीस याने ख्रिस्तीकरणाचा वरवंटा फिरवला होता. शेकडो मंदिरे जमीनदोस्त केली होती. याच राय गावात मूर्तिभंजकांनी मांडलेला कहर पाहून कामाक्षीच्या भाविकांनी आपल्या दैवताचे स्थलांतर फोंडा तालुक्यातील शिरोडा या गावी केले. सोळाव्या शतकात राय गावातील स्थायिक झालेल्या समस्त लोकांना बळजबरी करून ख्रिश्चन करण्यात आले.

सासष्टीतील हा पहिला ख्रिस्ती गाव. आजही जुवारी नदीकाठच्या या गावात कित्येक एकर खाजन शेती आहे. मानस, पोय, बांध या माध्यमातून केलेली खाजनाची व्यवस्था इथे पाहायला मिळते. जांभ्या खडकांचा वापर करून उभारलेल्या मानसी इथली शेती शेकडो वर्षांपासून कष्टकऱ्यांना अन्नदात्री ठरली याची प्रचिती देते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT