आमोद कुलकर्णी
वांगचूक उपोषणाला बसतात. काही दिवस माध्यमांमध्ये चर्चा रंगते, सोशल मीडियावर सहानुभूतीच्या पोस्ट झळकतात आणि नंतर सारे काही पूर्ववत होते. कॅमेरे दुसरीकडे वळतात, समाज आपल्या दिनचर्येत रमतो आणि व्यवस्था नेहमीप्रमाणे मौन धारण करते. मग प्रश्न पडतो, उपोषण करणारा आजारी आहे की त्याच्या वेदनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारी व्यवस्था?
लोकशाहीत उपोषण हा संघर्षाचा पहिला नव्हे, तर शेवटचा मार्ग असतो. संवाद, निवेदने, आंदोलने, लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा आणि न्यायाची सातत्याने मागणी, हे सारे मार्ग निष्फळ ठरल्यावरच एखादा नागरिक स्वतःचे शरीरच आंदोलनाचे साधन बनवतो. अशा वेळी त्याच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा त्याला त्या टोकाच्या निर्णयापर्यंत पोहोचवणाऱ्या व्यवस्थेला जाब विचारणे अधिक आवश्यक आहे.
आज आपल्या लोकशाहीसमोरची सर्वात मोठी समस्या भ्रष्टाचार नाही; ती म्हणजे वाढती संवेदनाहीनता. प्रश्न ऐकून घेण्याची इच्छाच उरलेली नाही. आश्वासने दिली जातात, समित्या नेमल्या जातात, निवेदने स्वीकारली जातात; पण निर्णय मात्र सतत पुढे ढकलले जातात. लोकांचा आवाज ऐकण्याऐवजी त्यांना थकवण्याची प्रवृत्ती बळावत आहे. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे.
याहून मोठी शोकांतिका म्हणजे समाजाची उदासीनता. आपण सोशल मीडियावर दोन ओळी लिहून आपले सामाजिक कर्तव्य पूर्ण झाल्याचे समजतो. एखादा नागरिक न्यायासाठी प्राण पणाला लावत आहे, यापेक्षा कोणता व्हिडिओ व्हायरल झाला किंवा कोणत्या सेलिब्रिटीने काय पोस्ट केले, यालाच अधिक महत्त्व दिले जाते. संवेदनशील समाज हळूहळू केवळ प्रेक्षकांच्या समाजात बदलत चालला आहे.
या चित्रात साहित्यविश्वाची भूमिकाही आत्मपरीक्षण करण्यासारखी आहे. साहित्यिक हा समाजाचा सजग विवेक असतो. अन्याय, विषमता आणि सत्तेच्या दडपशाहीविरुद्ध त्याची लेखणी निर्भयपणे चालली पाहिजे. पण आज अनेक ठिकाणी साहित्यापेक्षा गटबाजी, पुरस्कारांची राजकारणे, वाङ्मयीन चोरी, संपादकीय पदांचा गैरवापर, फोटोसेशन्स आणि राजकीय आश्रयातून प्रतिष्ठा मिळवण्याची स्पर्धा अधिक दिसते.
काही जण प्रसिद्धीसाठी सोशल मीडिया, वर्तमानपत्रे आणि व्यासपीठांकडे धाव घेतात. प्रत्येक छोट्या कृतीचे प्रदर्शन करण्यात ते आघाडीवर असतात. पण समाजासमोर अन्यायाचा प्रश्न उभा राहिला की, ‘इदं न मम’ म्हणत सोयीचे मौन धारण करतात.
कारण त्यांची नजर राजकीय अनुदाने, पुरस्कार, समित्यांवरील नियुक्त्या आणि सत्तेच्या कृपादृष्टीवर खिळलेली असते. सत्ताधाऱ्यांना नाराज होईल असा एक शब्द बोलण्याचे धाडस अनेकांकडे दिसत नाही. अशा वेळी त्यांच्या लेखणीचा सामाजिक उपयोग काय, हा प्रश्न विचारल्याशिवाय राहवत नाही. साहित्य हे सत्तेच्या दरबारात टाळ्या वाजवण्यासाठी नसते; ते सत्तेला अस्वस्थ करणारे प्रश्न विचारण्यासाठी असते.
लेखक हा दरबारी नसतो; तो समाजाचा विवेक असतो. अन्यायाच्या वेळी मौन स्वीकारणारी लेखणी कितीही अलंकारिक असली तरी तिचे नैतिक मूल्य संपते. जो साहित्यिक केवळ प्रसिद्धी, पुरस्कार आणि सन्मानांसाठी लिहितो, तो साहित्याची नव्हे तर स्वतःच्या प्रतिमेची सेवा करत असतो.
सोनम वांगचूक यांच्या प्रत्येक मागणीशी सहमत असणे आवश्यक नाही. मतभेद लोकशाहीचे सौंदर्य आहे. पण एखाद्या नागरिकाला शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वतःचे प्राण धोक्यात घालावे लागत असतील, तर आजारी ती व्यक्ती नसते; आजारी लोकशाही असते.
आज प्रश्न केवळ सोनम वांगचूक यांचा नाही. प्रश्न आपल्या सामूहिक विवेकाचा आहे. आजारी आहे ती वेदना ऐकण्याची क्षमता गमावलेली व्यवस्था, अन्यायाकडे डोळेझाक करणारा समाज आणि सत्याच्या क्षणी मौन धारण करणारा बुद्धिजीवी वर्ग. लोकशाहीचे आरोग्य विरोध दडपण्यात नसते; तर विरोधाचा आवाज ऐकण्यात असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.