Sholay golden jubilee Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Sholay Re Release: ..शेवटी अमिताभ बच्चन यांना जिवंत करण्याचे ठरवले, सलीम- जावेदनी विरोध केला; साधी सूडकथा ते सुपरडुपर हिट फिल्म

Sholay 50 Years: गेल्या ५० वर्षांत कुणीही नवा शोले निर्माण करू शकलेला नाही. रमेश सिप्पीनी त्यानंतर निर्माण केलेली ‘शोले’ची आधुनिक आवृत्ती ’शान’सुद्धा ‘शोले’च्या जवळपास फिरकू शकला नाही.

Sameer Panditrao

मिलिंद म्हाडगुत

‘शोले’ हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीतील ’मैलाचा दगड’ म्हणून ओळखला जातो. १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ला यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. त्या दिवशी मुंबईच्या मिनर्वा चित्रपटगृहात ‘शोले’चा पहिला शो सुरू झाला होता तो तब्बल १२ डिसेंबर १९८०पर्यंत म्हणजे पाच वर्षे चार महिने सलग ठाण मांडून होता.

या दिवशी गर्दी असूनही ‘शोले’ चित्रपटाचे निर्माते रमेश सिप्पी यांच्याच ‘शान’ या चित्रपटाला वाट करून देण्याकरता ‘शोले’ला आपला मुक्काम हलवावा लागला होता. त्यात विशेष म्हणजे पहिली तीन वर्षे या चित्रपटाची तिकीट विक्री आगाऊ बुकिंगलाच फुल्ल होत असे. दीड कोटी रुपयात तयार झालेल्या या चित्रपटाने त्या काळात जवळजवळ २५ कोटींचा व्यवसाय केला होता.

७० एमएममध्ये निर्मिती असूनसुद्धा मुंबईच्या ‘मिनर्वा’ व ‘न्यू एक्सेलसियर’ या दोन चित्रपटगृहांचा अपवाद वगळता इतर सर्व ठिकाणी शोले ३५ एमएममध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामुळे आम्हा पुण्यातील लोकांना मुंबईत जाऊन ‘शोले’ चित्रपटाचा खरा थरार अनुभवावा लागला होता.

तसे पाहायला गेल्यास ‘शोले’ म्हणजे एक साधी सूडकथा. ठाकूर बलदेव सिंग आपल्या कुटुंबाला नामशेष केलेल्या डाकू गब्बरसिंगचा विरू व जय या दोन भुरट्या चोरांच्या साहाय्याने कसा सूड घेतो याची ही कथा. पण हा चित्रपट एवढा गाजला तो त्यातील व्यक्तिचित्रणामुळे. विरू, जय, ठाकूर, बसंती, राधा व डाकू गब्बर ही या चित्रपटातील प्रमुख पात्रे.

यातली प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भिडते. पण या चित्रपटाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यातल्या छोट्या छोट्या भूमिकासुद्धा यादगार ठरल्या. मग तो सुरमा भोपाली झालेला जगदीप असो, इंग्रजांवेळचा जेलर झालेला असरानी असो, बसंतीची मावशी झालेली लीला मिश्रा असो, इमाम चाचा झालेला ए. के. हंगल असो, अहमद झालेला सचिन असो, खबऱ्या केश्टो मुखर्जी असो, कालिया झालेला विजू खोटे असो वा सांबा झालेला मॅक मोहन असो; ‘शोले’ने या सर्वांना अजरामर करून टाकले!

यातल्या सांबाच्या तोंडी तर पुऱ्या चित्रपटात फक्त एकच वाक्य होते; ’पुरे पचास हजार’ हे ते वाक्य. पण तरीसुद्धा सांबा एवढा लोकप्रिय झाला की त्या काळात गल्लोगल्ली ‘अरे ओ सांबा!’ हे वाक्य ऐकू येत असे.

खरे तर त्या काळात ‘शोले’च्या संवादाच्या ध्वनिफिती एवढ्या लोकप्रिय झाल्या होत्या, की त्या प्रत्येक समारंभात, रस्त्यावर ऐकू यायच्या. गाण्याच्या फितीपेक्षा संवादाच्या फिती लोकप्रिय होणारा ‘शोले’ हा बॉलिवुडातला एकमेव चित्रपट. त्या काळात ‘शोले’चे सगळे संवाद पाठ असणारे अनेक रसिक सापडायचे.

मजा म्हणजे डाकू गब्बरसिंग म्हणजेच अमजद खानच्या तोंडी असलेले संवाद सर्वांत जास्त लोकप्रिय ठरले होते. खरे तर अमजद खानला ही भूमिका अपघातानेच मिळाली होती. ही भूमिका दिली गेली होती ती डॅनी डँन्जोपा यांना. पण त्यावेळी डॅनी ‘धर्मात्मा’ या फिरोज खानच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाकरता अफगाणिस्तानमध्ये असल्यामुळे रमेश सिप्पींना ही भूमिका नवोदित अमजद खानला द्यावी लागली.

आणि सुरुवातीला या भूमिकेबाबत नकारात्मक प्रतिक्रिया अधिक उमटत होत्या. त्यामुळे पहिले तीन दिवस या चित्रपटाला ‘ठंडा’ प्रतिसाद मिळाला होता. हे पाहून रमेश सिप्पीनी चित्रपटाच्या शेवटी जय म्हणजे अमिताभ मरतो ते बदलून त्याला जिवंत करण्याचे ठरविले होते. पण लेखक सलीम- जावेद यांनी हरकत घेतल्यामुळे रमेशना आपला निर्णय बदलावा लागला.

हा चित्रपट नक्की हिट होणार असा विश्वास त्यावेळी सलीम जावेद जोडीने व्यक्त केला होता आणि त्यांचा विश्वास तंतोतंत खरा ठरला. चौथ्या दिवसापासून या चित्रपटाची जी गर्दी वाढायला सुरुवात झाली ती नंतर वाढतच गेली.

यावेळी आणीबाणी असल्यामुळे यातले काही हिंसाचाराचे प्रसंग बदलावे लागले होते. ठाकूर गब्बरला पायाने मारतो तो प्रसंग, ठाकूरच्या लहान मुलाचे प्रेत दाखविण्याचा प्रसंग, गब्बर अहमदला मारतो तो प्रसंग यांसारख्या अनेक प्रसंगांना सेन्सॉरने कात्री लावल्यामुळे ते बदलावे लागले होते. आता सहा सप्टेंबर रोजी या चित्रपटाची ‘फोर के’ आवृत्ती जगभर प्रदर्शित होत आहे.

त्यात या कात्री लावलेल्या प्रसंगांचा समावेश केला आहे. या चित्रपटातील काही प्रसंग तर खरोखर अविस्मरणीय ठरले आहेत. जय बाजा वाजवीत असताना राधाचे वाड्यातील दिवे विझविणे, गब्बर ठाकूरच्या लहान मुलाला मारताना रेल्वेच्या शिट्टीचा आवाज, गब्बरचे गालावर बसलेल्या माशीला मारताना अहमदचे प्रेत दाखविणे, यासारख्या अनेक प्रसंगातून ‘शोले’ फुलत जातो. त्याचबरोबर सुरुवातीचा डाकू गाडी लुटतात तो प्रसंग, विरूचा टाकीवरचा प्रसंग, जय व बसंतीच्या मावशीची ती धमाल जुगलबंदी, जय मरतो तो भावनिक प्रसंग, असे अनेक प्रसंग आजसुद्धा तेवढेच ‘हिट’ आहेत.

आता या चित्रपटातील सर्वांत महत्त्वाची भूमिका कोणती, असा प्रश्न विचारला जातो. तशा सर्वच भूमिका महत्त्वाच्या असल्या तरी सर्वांत कठीण भूमिका होती ती म्हणजे राधाची.

वाट्याला अतिशय कमी संवाद आल्यामुळे ही भूमिका मुद्राभिनयाद्वारे साकार करणे आवश्यक होते आणि ते एक मोठे आव्हानच होते. पण जया भादुरी (बच्चन) यांनी हे आव्हान पेलताना मुद्राभिनयातून जयवर असलेल्या आपल्या प्रेमाचा जो आविष्कार सादर केला आहे तो खरोखर लाजवाबच! तीच गोष्ट ठाकूर झालेल्या संजीव कुमार यांची.

हात नसल्यामुळे त्यांनाही मुद्राभिनयाद्वारे आपल्या भावना व्यक्त कराव्या लागल्या. त्यात ते कमालीचे यशस्वी ठरले. गब्बर झालेला अमजद खान, विरू झालेला धर्मेंद्र, जय झालेला अमिताभ आणि बसंती झालेल्या हेमा मालिनी यांनीही आपल्या अभिनयाने ‘चार चांद’ लावल्यामुळे शोले आजही तेवढाच ‘फ्रेश’ वाटतो.

खरे तर आजचे चित्रपट एका आठवड्यात विस्मृतीच्या पडद्याआड जात असताना पन्नास वर्षानंतरसुद्धा चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा लक्षात राहणे यातच ‘शोले’ची महानता अधोरेखित होत आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या ५० वर्षांत कुणीही नवा शोले निर्माण करू शकलेला नाही. रमेश सिप्पीनी त्यानंतर निर्माण केलेली ‘शोले’ची आधुनिक आवृत्ती ’शान’सुद्धा ‘शोले’च्या जवळपास फिरकू शकला नाही. म्हणूनच आता पन्नास वर्षानंतर ‘शोले’ एका नव्या स्वरूपात प्रदर्शित केला जाणार आहे. ही लोकप्रियता पाहता ‘शोले’तील ते जबरदस्त टेकिंग असलेले ‘एव्हरग्रीन’ गाणे याद येऊ लागते;

ये दोस्ती हम नही तोडेंगे,

तोडेंगे दम मगर, तेरा साथ ना छोडेंगे...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Govind Gaude: "स्लॅब पडणे आणि छत कोसळणे यात फरक असतो", कला अकादमीच्या वादावरून आमदार गावडेंची 'माध्यमांवर' टीका

World Cup 2025: वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! ‘या’ खेळाडूंकडे मोठी जबाबदारी; अनुभवी अन् युवा खेळाडूंचा मिलाफ

Goa Rain Alert: सावधान! मच्छिमार, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन; हवामान खात्याकडून सूचना जारी

Asia Cup 2025: आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा, सूर्याकडे संघाची कमान; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Goa Live News: दुधसागर नदीच्या पाण्याची पातळी वाढली

SCROLL FOR NEXT