छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४६ पासूनच्या धोरणात्मक मुत्सद्देगिरीतून १६५६ मध्ये जावळी जिंकून मोऱ्यांचा बिमोड केला; यातूनच घाटवाटांचे नियंत्रण, प्रतापगडाची निर्मिती आणि स्वराज्याचा कोकण प्रवेश साध्य झाला. ज्यामुळे पुढे सिद्दी व आदिलशाही या प्रबळ सत्तांशी संघर्षाचा एक नवा आणि तेजस्वी ऐतिहासिक अध्याय सुरू झाला.
जावळीची पार्श्वभूमी ः ‘जावळी’ (जयवल्ली) संस्थानची स्थापना करणाऱ्या पुरुषाचे मूळ नाव चंद्रराव असे होते. या चंद्रराव मोऱ्यांना ६ मुले होती. त्यातल्या थोरल्याला त्याने स्वतःजवळ ठेवले व त्यालाच पुढे ‘चंद्रराव’ हा किताब मिळाला. इतर ५ जणांना जोर येथे ‘हणमंतराव’, जांभळी येथे ‘गोविंदराव’, कोंढवी परगण्यातील वाकण येथे ‘बागराव’ (भिकाजीराव), आटेगाव प्रांतातील देवळी येथे ‘सूर्यराव’, बिरवाडी प्रांतातील शिवथर येथे ‘यशवंतराव’ अशी स्थाने मिळाली. त्या शाखेच्या मूळ पुरुषांची नावेच पुढे त्यांचे किताब म्हणून रूढ झाली. थोरल्या शाखेत मूळ चंद्ररावापासून पुढे ८ पिढ्या झाल्या. चंद्रराव (संस्थापक)-चयाजी-भिकाजी-शोदाजी-येसाजी-गोंदाजी-बाळाजी-व दौलतराव. (ग. भा. मेहेंदळे, पृ.६५५).
जावळीचा भूगोल ः कोकण व घाटमाथा या दोन्ही प्रदेशांना जोडणारा जावळीचा प्रांत सुमारे १५०० चौ. कि.मी. पसरलेला होता. यामध्ये मंगळगड (५ तर्फा व २०७ गावे), जावळी (७ तर्फा व १९५ गावे), व्याघ्रगड (५ तर्फा व १५१ गावे) व महिपतगड (१ तर्फ व १८ गावे) असे प्रमुख विभाग व सुमारे ५७१ छोटी-मोठी गावे मोडत होती (शाहू दप्तर). महाबळेश्वरचे पठार; कृष्णा (जोर खोरे), वेण्णा, कांदाटी, कोयना, सावित्री, सोळशी व वाळकी (जांभूळ खोरे) या नद्यांच्या उगमस्थळांचे डोंगरमाथे व खोरी; पाचगणी; सोळशी नदीच्या पश्चिम तीराजवळून तापोळे; कांदाटी व जगबुडी नद्यांचे उत्तर तीराजवळून पोलादपूर; सावित्री नदीच्या पूर्व तीराजवळून महाड; काळ नदीच्या उगमस्थळाजवळील रायरी (रायगड) व पाचाड; काळ नदीच्या तीराजवळून वरंध येथपर्यंत जावळीच्या सीमा होत्या.
शिवकाळात जावळीवर मोरेंची तर जावळीस लागून असलेल्या प्रभावळीवर शृंगारपूर येथे सुर्व्यांची सत्ता होती व शिर्के त्यांचे प्रधान होते. काळ व सावित्री नदीच्या खोऱ्यातील रायरी व महाड या भागांसाठी सिद्दी व मोऱ्यांमध्ये संघर्ष होत असे. तसेच जोर खोरे, बीरवाडी प्रांत इत्यादींवरून आदिलशाहा व मोऱ्यांमध्ये वाद होते.
शिवरायांचा जावळीत हस्तक्षेप (जून १६४६) ः मूळ शाखेतला आठवा पुरुष दौलतराव निपुत्रिक वारल्यावर त्याची आई माणकाई हिने येसाजी (कृष्णाजी बाजी) यास दत्तक घेतले. त्याला दत्तक घेण्यास मोऱ्यांच्या अन्य भाऊबंदांचा विरोध होता, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहकार्याने मोडून काढण्यात आला. आणि येसाजीला १६४६मध्ये ‘चंद्रराव’ म्हणून जावळीच्या गादीवर बसविण्यात आले. नाराज झालेल्या भाऊबंदांनी आदिलशाहाकडे तक्रारी केल्या. तेव्हा आदिलशाहाने पारघाटाच्या बाजूने बाजी शामराज व खंडोजी खोपडे यांना जावळीवर पाठविले. तेव्हा शिवाजीराजे चंद्ररावाच्या मदतीला धावून गेले व त्यांनी शत्रूस परतवून लावले.
अफजलखानाची नियोजित स्वारी (१६४९) ः जावळीस लागून असलेल्या वाई परगण्याचा मुकासा १६४८पासून अफजलखानाकडे होता. त्याअगोदरपासूनच आदिलशाह व मोऱ्यांच्या सीमेवरून वाद होता. त्यातच आदिलशाहास विश्वासात न घेता चंद्ररावाची नेमणूक केल्याने योग्य व्यक्तीस गादीवर बसविणे, हणमंतरावाने ताब्यात घेतलेले जोरखोरे परत घेणे तसेच चंद्ररावाने कब्जा केलेला रायरीचा किल्ला व त्याखालचा बीरवाडी प्रांत त्याच्याकडून परत घेणे या उद्देशपूर्तीसाठी १६४९मध्ये अफजलखान जावळीवर स्वारी करण्याच्या तयारीत होता. मात्र दक्षिणेकडील राज्यविस्तार, अंतर्गत कलह व मुघलांचे आक्रमण यामध्ये आदिलशाह गुंतून पडल्यामुळे जावळीकडे त्याचा कानाडोळा झाला. आणि त्याचाच फायदा शिवाजीराजांनी उचलला. (खानाची १६४९मधील ही मोहीम रद्द झाली आणि १६५६मध्ये महाराजांनी जावळी घेतल्यावर १६५९मध्ये झाली).
शिवरायांची जावळीवर स्वारी (१६५६)
शिवाजीराजांच्या सहकार्याने ‘चंद्रराव’ म्हणून गादीवर बसलेल्या येसाजीने काही वर्षे राज्य केले. त्यानंतर विविध कारणांनी त्याचे महाराजांशी वितुष्ट येऊ लागले. चंद्ररावाचे आदिलशाहाशी देखील संबंध बिघडलेले असल्यामुळे व आदिलशाहादेखील अन्य मोहिमांमध्ये गुंतलेला असल्याने, या परिस्थितीचा फायदा घेऊन राजांनी त्वरेने जावळी जिंकण्याचे ठरविले. सर्वप्रथम संभाजी कावजींच्या नेतृत्वाखाली सैन्याची एक तुकडी जावळीला पाठवून तिच्याकरवी सर्व बित्तंबातमी काढण्यात आली. त्यानुसार महाराजांनी मोहिमेचा सुनियोजित आराखडा मांडला.
प्रथम जांभूळ व जोर खोऱ्यावर कब्जा ः शिवाजीराजांच्या ताब्यातील प्रांतातून म्हणजेच रोहिड खोरे व हिरडस मावळातून जावळीकडे जाताना सर्वप्रथम ‘जांभूळ/जांभळी’ व नंतर ‘जोर’ खोरे लागते. जोर खोऱ्यातून महाबळेश्वरच्या पठारावर जाण्यासाठी एक वाट गणेशदऱ्यातून तर एक तायघाटातून जाते. तायघाट हा आदिलशाहीच्या ताब्यातील वाई परगण्यात असल्यामुळे ती वाट टाळण्यात आली. ठरले तर मग, जावळी जिंकण्याआधी सर्वप्रथम गोविंदराव मोऱ्यांच्या ताब्यातील जांभूळ खोरे व हणमंतराव मोऱ्यांच्या ताब्यातील जोर खोरे जिंकायचे.
त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज डिसेंबर १६५५च्या सुमारास पुरंदरहून १० हजार सैनिकांसह नैऋत्येकडील सुमारे ३५ कि.मी. अंतरावरच्या रायरेश्वराकडे निघाले. वाटेत त्यांनी नीरा नदी ओलांडली. रायरेश्वराजवळ येताच सैन्याच्या दोन तुकड्या पुढे पाठविण्यात आल्या. त्यापैकी कान्होजी जेधे यांच्या तुकडीने रायरेश्वराहून वाळकी नदीच्या खोऱ्यात उतरून तेथील गोविंदराव मोऱ्यांवर विजय मिळविला आणि ३१ डिसेंबर १६५५ च्या सुमारास जांभूळ खोऱ्याचा ताबा घेतला. त्यापाठोपाठ रघुनाथ बल्लाळ सबनीस यांच्या तुकडीने जांभळीच्या पुढे कोळेश्वर डोंगरापलिकडील कृष्णा नदीच्या खोऱ्यात उतरून, तेथील हणमंतराव मोऱ्यांना ठार मारले व जोर खोरे जिंकून घेतले. मागोमाग आलेल्या राजांनी जांभूळ व जोर खोऱ्याची व्यवस्था लावली.
जावळीवर ताबा (१५ जानेवारी १६५६) ः जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावण्यात महाराजांचा काही काळ गेला. पुन्हा एकेदिवशी पहाटे सर्व सैन्य गणेशदऱ्यातून महाबळेश्वराच्या पठारावर चढले. महाबळेश्वराच्या मंदिराजवळ आल्यावर सैन्याला दोन तुकड्यांत विभागण्यात आले. मोठ्या तुकडीने ८००० सैन्यानिशी (सध्याचे महाबळेश्वर/माल्कम पेठ येथून) रडतोंडी घाटामार्गे जावळीत उतरून चंद्ररावावर हल्ला करण्यास पाठविले. या सैन्याची रडतोंडी घाटात वाट पाहत बसलेल्या चंद्ररावाशी गाठ पडली आणि घनघोर युद्धास सुरुवात झाली.
इकडे २००० सैन्यानिशी स्वतः शिवाजी महाराज निसणीच्या वाटेने कोयना नदीच्या खोऱ्यातील दरे गावात उतरले. आणि त्यांनी दुसऱ्या बाजूने जावळीवर हल्ला केला. निसणीच्या अवघड वाटेने महाराज उतरतील याची चंद्ररावास कल्पना न आल्याने, या बाजूने महाराजांना कोणताही प्रतिकार झाला नाही. दुपारपर्यंत रडतोंडीच्या घाटातला प्रतिकारही संपला आणि मराठ्यांनी जावळी सर्व बाजूंनी घेरून मोऱ्यांचा प्रतिकार मोडून काढला.
जावळी गावाजवळच्या डोंगरावर जसवंतगड (हशमगड) नावाचा मोऱ्यांचा किल्ला होता, तो ताब्यात घेण्यात आला. मकरंदगड व त्याजवळील चतुर्बेट येथील मोऱ्यांचे लष्करी ठाणे जिंकण्यासाठी संभाजी कावजी यांना पाठविले. तिथे झालेल्या लढाईत मोऱ्यांचे एक भाऊबंद मारले गेले. शिवथर खोऱ्यात असलेल्या मोऱ्यांना युद्धात कैद करून त्यांचे डोळे काढण्यात आले. प्रतापराव मोरे पळून विजापूरला आदिलशाहाकडे गेला. अनेकांना कैद केले गेले. जे महाराजांच्या सेवेत येऊ इच्छित होते त्यांना स्वराज्यकार्यात रुजू केले. मुरारबाजी देशपांडे, त्यांचे भाऊ व अनेक कसलेले वीर जावळीच्या खोऱ्यातून महाराजांना मिळाले. अशा प्रकारे १५ जानेवारी १६५६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर पूर्णपणे ताबा मिळविला.
चंद्ररावाने पळून जाऊन सुमारे ४० कि.मी. वायव्येस असलेल्या व त्याच्या राज्याच्या सीमेवर असणाऱ्या रायरीच्या किल्ल्यात आश्रय घेतला. महाराजांनी तातडीने हैबतराव शिळीमकरांना त्याच्या पाठलागावर पाठविले. आणि स्वतः जावळीची प्रशासकीय व लष्करी व्यवस्था लावण्यासाठी अडीच महिने जावळीतच राहिले. पुढे जावळीची सुभेदारी कृष्णाजी बाबाजी यांना तर मुजुमदारी विरो राम यांच्यावर सोपविली.
रायरी जिंकली ः सर्व प्रतिकार मोडून काढून जावळीची व्यवस्था लावल्यावर ३० मार्च १६५६ रोजी महाराज जावळीहून चंद्ररावाच्या समाचारासाठी निघाले. कमळगड, ढवळ्या (चंद्रगड), कांगोरी (मंगळगड), कौल्या (कावळ्या) इ. किल्ल्यांच्या व्यवस्थेचा आढावा घेत वरंधा घाट उतरून ते काळ नदीच्या खोऱ्यात आले. आणि ६ एप्रिल १६५६ रोजी रायरी व लिंगाण्याजवळ येऊन पोहोचले. आता रायरीचा वेढा आवळण्यात आला. अखेर हैबतराव व बाळाजी नाईक शिळीमकर यांच्या मध्यस्थीने १५ एप्रिल ते १४ मे १६५६च्या दरम्यान चंद्रराव शरण आले. (रायरीचा बंदोबस्त करून १६५८मध्ये गडाच्या इमारतीवर आबाजीपंत व रामराव प्रभू यांची व नंतर हिरोजी इंदलकर यांची नेमणूक करण्यात आली.)
चंद्ररावाला आणि त्याच्या कृष्णाजी व बाजी या मुलांना कैदेत ठेवण्यात आले. २७ ऑगस्ट १६५६च्या दरम्यान चंद्ररावाने पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याला व त्याचा मुलगा कृष्णाजी यांस ठार मारण्यात आले. दुसरा मुलगा बाजी मात्र पळून गेला. (हा बाजी पुढे १६६५ पर्यंत जिवंत होता. आणि तो मुघलांच्या सेवेत व जयसिंहाच्या स्वारीवेळी उपस्थित होता.)
जावळीचे महत्त्व
जावळी जिंकल्यामुळे या भागातील जावळी, जोर, जांभूळ ही खोरी; कोंढवी परगणा याशिवाय रायरी व लिंगाणा हे किल्ले; सावित्री व काळ नद्यांची खोरी; महाडचा रक्षणकर्ता सोनगड व चामार/चांभारगड (महेंद्रगड); ढवळी नदीच्या खोऱ्यातील ढवळे घाटाचा रक्षणकर्ता ढवळगड (चंद्रगड); काळ नदीच्या काठावरील बिरवाडी प्रांत; वरंधा घाट व त्याचा रक्षणकर्ता कौल्या दुर्ग (कावळ्या); अस्वलखिंडीचा रक्षणकर्ता कांगोरी (मंगळगड); तायघाट व त्याचा रक्षणकर्ता कमळगड, महाबळेश्वर व पाचगणीचे पठार, मकरंदगड, महिपतगड, सुमारगड, रसाळगड इत्यादी महत्त्वाची स्थाने स्वराज्यात आली.
आपले मूळ राज्य व जिंकलेला प्रदेश ताब्यात ठेवण्याच्या दृष्टीने घाटरस्त्यांवर पूर्णपणे ताबा मिळविणे आवश्यक होते. त्यासाठी शिवाजी महाराजांनी शेवत्या, मढे, उपांड्या, आंबेनळी, गोप्या, सुपे नाळ, भोवऱ्या, खुंट्याची वाट, पाळदार, न्हावंदीण वाट, पारमाची, वरंध, वाघजाई, कुंभेनळी, चिकणा, चोरकणा, अस्वलखिंड, ढवळे, सापळखिंड, सावित्री, दाभिळटोक, रानकडसरी, आंबेनळी, केवनाळे, पारघाट, काळधोंड, कुडपण, हातलोट, कोंडनाळ, अंगठेसरी, नळी, तेल्या, मारखिंड, अस्तानसरी, कांदाट इत्यादी घाटमार्ग, चौक्या व खिंडी ताब्यात आणले. या रस्त्यांवरून होणाऱ्या व्यापारामुळे मोऱ्यांना विपुल जकात मिळत असे. त्यातूनच जावळीचे मोरे हे एैश्वर्यसंपन्न झाले होते. या सर्व चौक्या हातात आल्यामुळे महाराजांचा मोठा लष्करी विजय झाला.
किल्ल्यांची आवश्यकता ः वेळ पडल्यास संरक्षण अन्यथा आक्रमण या दोन्ही बाबतींत किल्ले महत्त्वाची भूमिका बजावत असत. आक्रमण करणाऱ्या शत्रूसैन्यास रसद किंवा अन्नधान्य पोहोचविणाऱ्या वाटांवर अडथळा निर्माण करणे, शत्रूचे आक्रमण रोखणे व आक्रमणाची गती मंद करणे हा किल्ल्यांचा मुख्य हेतू असतो. म्हणूनच महत्त्वाच्या वाटांवर किंवा अशा वाटांवर सहज छापे घालता येतील इतपत अंतरावर किल्ले असणे जरुरीचे असे. म्हणून केवळ जावळी जिंकून महाराज स्वस्थ बसले नाहीत. तर जावळीच्या खोऱ्यातील महत्त्वपूर्ण घाटवाटांवर टेहळणीच्या चौक्या बसविणे. आवश्यक त्या ठिकाणी नव्याने किल्ला उभारणे अथवा असलेल्या किल्ल्यांची दुरुस्ती करणे इत्यादी कार्यास महाराजांनी त्वरेने सुरूवात केली.
प्रतापगडाची बांधणी ः पारघाट, रडतोंडीचा घाट (अश्रुमुखी), आंबेनळी घाट (फिट्झगेराल्ड) व जावळीचे खोरे यांवर लक्ष ठेवण्यासाठी भोरपा (रानआडवा गौड/ढोळपाळ) डोंगरावर मोऱ्यांची टेहळणीची चौकी होती. त्याचे भौगोलिक महत्त्व ओळखून महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांना किल्ला उभारण्याची आज्ञा केली. अर्जोजी यादव यांस किल्ल्याच्या इमारत खात्याचे हवालदार नेमून दुर्गउभारणीस सुरुवात झाली. ४ सप्टेंबर १६५६ रोजी किल्ल्याचे नाव ‘प्रतापगड’ ठेवण्यात आले, याशिवाय जावळीतील व ताब्यात असणाऱ्या किल्ल्यांचीही नावे याचदिवशी ठेवण्यात आली (शिवापूर दप्तर यादी). गणोजी गोविंद यांची प्रतापगडाचे किल्लेदार म्हणून नेमणूक करण्यात आली.
सीमावर्ती आव्हाने ः जावळीचे राज्य ताब्यात आल्याने महाराजांचा कोकणात प्रवेश झाला. त्यामुळे या प्रदेशास लागून असलेल्या दंडाराजपुरीच्या सिद्दींशी संघर्ष वाढू लागला. तर प्रभावळीचे सूर्यराव सुर्वे व वाडीचे लखम सावंत यांनी महाराजांचे प्रभुत्व (तात्पुरते) मान्य केले.
आदिलशाहाची प्रतिक्रिया
अफजलखानाची नेमणूक ः नोव्हेंबर १६५६मध्ये मसूरवर स्वारी व ऑक्टोबर १६५७मध्ये आदिलशाहीच्या ताब्यातील निजामशाही कोकण काबीज करून महाराजांनी आदिलशाहीशी शत्रुत्व पत्करले होते. परंतु मुहम्मद आदिलशाहाचा ४ नोव्हेंबर १६५६ रोजी झालेला मृत्यू, संशयास्पद वारस असणाऱ्या अलीचे राज्यारोहण, त्यामुळे माजलेला अंतर्गत कलह आणि औरंगजेबाचे आक्रमण इत्यादी कारणांमुळे शिवाजीराजांविरुद्ध कारवाई करणे आदिलशाहाला शक्य झाले नव्हते. १६५८च्या अखेरीपर्यंत मोकळीक मिळताच बडीसाहिबा हिच्या सल्ल्याने अली आदिलशाहाने शिवाजी महाराजांविरुद्ध अफजलखान मुहम्मदशाही याची नेमणूक केली.
त्याच्यासोबत १२ हजार घोडेस्वार, २० हजार पदाती (पायदळ), सामान वाहतुकीसाठी बैल, उंट, हत्ती, सैन्यसामुग्री, लहान-मोठ्या तोफा, शस्त्रसाठा व अन्य लवाजमा देण्यात आला. सहा प्रकारच्या त्याच्या सैन्यदलामध्ये अंबरखान, याकुतखान, मुसेखान, हसन पठाण, धाकटा रनदुल्लाखान (रनदौलाखान), अंकुशखान, सिद्दी हिलाल, (बाजी) घोरपडे, नाईकजी पांढरे, नाईकजी खराडे, कल्याणजी यादव (जाधव), मंबाजी भोसले (शाहजीराजांचे चुलतभाऊ), राजाजी घाटगे (झुंजारराव), काटे, याशिवाय फाजिलखान व अफजलखानाची इतर मुले, जावळीचा प्रतापराव मोरे, पिलाजी मोहिते, शंकराजी मोहिते हे प्रमुख सरदार होते. रोहिडखोऱ्यातील केदारजी खोपडे, खंडोजी खोपडे व अन्य आदिलशाही मुलूखातील देशमुख व सरदार हे आदिलशाहाच्या फर्मानावरून खानास सामील झाले. याशिवाय पन्हाळा, खेळणा (विशाळगड), चंदन, वंदन इत्यादी किल्ल्यांवरील सैनिक असे २-३ हजाराचे अतिरिक्त सैन्यही सहभागी झाले.
ही मोहीम उन्हाळ्यात सुरू होणार असल्याने, पुढे येणाऱ्या पावसाळ्यामुळे मोहिमेत खंड पडू नये तसेच विजापूर ते वाई व दाभोळ ते जावळी या मार्गावरील दळणवळण सुरळीत रहावे याकरीता या मार्गातील नद्यानाल्यांवर पुरेशा नौकांची सोय करण्यात आली. एवढी युद्धसज्जता करून अफजलखानाने एप्रिल १६५९मध्ये विजापूरहून कूच केले.
अनिकेत यादव
इतिहास अभ्यासक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.