एक प्रश्न राहतोच; गोव्याची, इथल्या कला व संस्कृतीची अशी क्रूर थट्टा करणाऱ्यांना काहीच शिक्षा होणार नाही का?
शरद पोंक्षे धन्यवाद. झोपी गेलेल्या शहनशाहांना जागे केलेत त्याबद्दल. ताजमहाल बांधायला टेंडर काढावे लागले नव्हते, हे जरी खरे असले तरी तो अद्याप शिल्लक आहे, त्याचा स्लॅब कोसळला नाही कला अकादमीसारखा, हेही खरेच. हा स्लॅब कोसळला तेव्हा एक कृतीदल स्थापन केले होते. त्या दलाला अजिबात कृती करू न देण्याचे काम मात्र न चुकता करण्यात आले. स्लॅब कोसळण्यामागचे कारण कितीही लपवून ठेवले तरी ते उघड झालेच. त्यावर पोटे भरलेले सगळे उघडे पडले. त्याचवेळी खरी कारणे शोधून चुका दुरुस्त केल्या असत्या तर पोंक्षेंचे खडे बोल ऐकून घ्यावे लागले नसते.
झालेल्या चुकीचे निदान वेळेत केले असते तर आता लाईट, साउंड, वायर, स्पीकर, कार्पेट, एसी यासाठी नामुष्की सहन करावी लागली नसती. जिथे खायला मिळेल तिथे खायची सवय लागलेल्यांना कला कशाशी खातात, हे माहिती नाही; तशी त्यांची संस्कृतीही नाही. कला हीच संस्कृती असती तर कला अकादमीचे बांधकाम आणि अन्य बांधकामे यातला फरक लक्षांत आला असता.
कला अकादमी (Kala Academy) ही अशी वास्तू आहे, जिथे कलाकारांनी आपल्या भावना, विचार, अनुभवाने तिला नटवले. इथल्या प्रत्येक ठिकाणी अनेकांच्या अनंत आठवणी आहेत. इथे कलाकार घडले आहेत. या वास्तूत कलेचे सृजन, निर्माण व लोकार्पण झाले आहे. कला अकादमी नामक या वास्तूला स्वत:चा देदिप्यमान इतिहास, परंपरा, मूल्ये आहेत. इथे कला आणि संस्कृती यांची वीण एकमेकांत घट्ट विणली गेली. हे नाते वृद्धिंगत करण्यासाठी अनेक कलाकार झटले, हातभार लावला. संगीत, नृत्य, नाटक, एकांकिका आणि स्थापत्य हे कला अकादमीचे मर्म आणि सौंदर्य आहे.
इथे कलासृजन करण्याला भौगोलिक मर्यादा कधीच नव्हत्या व नाहीत. म्हणूनच कला अकादमीशी गोव्याचेच नाही तर महाराष्ट्राचे व अन्य राज्यांतील कलाकारही जोडले गेले. त्यांची वाटचाल प्रगतिपथावर नेण्यासाठी कला अकादमीचा मोठा वाटा आहे. नाटक, संगीत, एकांकिका यातून कलाकारांनी आपली मूल्ये, भाषा, परंपरा, रीतिरिवाज आपल्या अभिनयातून सादर केले. समाज, संस्कृती याची ओळख त्यांनी पडदा उघडताच दाखवून दिली. जिथे कलाकार प्रकाशझोतात आले, तिथे प्रकाश यंत्रणा बिघडल्यामुळे पडदा पाडावा लागणे, हे लाजीरवाणेच आहे.
आम्ही प्रेक्षक होतो. तिकीट घेऊन गोव्याचे धिंडवडे पाहिले. प्रयोग करणाऱ्याला ध्वनियंत्रणा घेऊन यावे लागते. आलेल्या पाहुण्याला स्वत:च्या कपबश्या घेऊन यायला लावून त्यात चहा ओतण्याचा प्रकार पाहिला. आदरातिथ्याची संस्कृती असलेल्या गोव्यासाठी हे अशोभनीय होते. अकादमी भाडे घेते ते कसले? नाटक करण्यासाठी लागणारी सर्व व्यवस्था पुरवण्याचे की, तांत्रिक बिघाड सहन करायला लावण्याचे? झालेला प्रकार पाहून माझी मान शरमेने खाली गेली. कला अकादमीची वास्तू स्वत:लाच दोष देत असेल. तिलाही तिचे स्वत:चेच चाललेले धिंडवडे पाहवत नसतील. जिने आपल्या ‘अॅकॉस्टिक’साठी जगन्मान्यता मिळवली तिचा आवाज पुढल्या रांगेतही नीट ऐकू येईनासा झाला.
पैसा, भ्रष्टाचार, आपल्या अपात्र लोकांची सोय करणे यासाठी कला अकादमी आहे का? ‘कला आणि संस्कृती खाते’, असे नाव असले तरी इतके खायचे? भ्रष्टाचार कसा करावा, पैसे कसे खावे याची कला ही आमची संस्कृती नाही. शरद पोंक्षेंनी खरडपट्टी काढल्याला इतके दिवस झाले तरी, जबाबदारी ढकलण्याचाच निर्लज्जपणा सुरू आहे. निकृष्ट काम झाले, स्लॅब पडला, ध्वनियंत्रणा-प्रकाशयंत्रणा कुचकामी ठरते आणि तरीही याला कुणीच जबाबदार नाही? कुणाला अवाक्षर बोलावेसेही वाटत नाही. जो तो आपला पदर झटकतोय.
गोव्यात आता कलेला कुणी वाली उरला नाही. या गोमंतकीय कला आणि संस्कृतीची कुणी राखण करेल, तर ‘कला राखण मंच’ करेल, कलाकार करतील. कला जोपासणारे हातच आता अकादमीही जोपासतील. पण, एक प्रश्न राहतोच; गोव्याची, इथल्या कला व संस्कृतीची अशी क्रूर थट्टा करणाऱ्यांना काहीच शिक्षा होणार नाही का? या मुजोर भ्रष्टाचार्यांना असेच पाठीशी घालत राहिल्यास त्याचे दुष्परिणाम गोव्याला भोगावे लागतील. शरद पोंक्षे यांनी दाखवलेले धाडस आम्हा गोमंतकीयांनाही दाखवावे लागेल. व्यक्त व्हावे लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.