Goa Kala Academy: अब्रूचे धिंडवडे, संपादकीय

Goa Artists Demand Action Kala Academy: कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची नूतनीकरणानंतर दयनीय अवस्था झाली आहे. गैरव्यवहाराचे ते लाजिरवाणे प्रतीक! स्थानिक कलाकार हे जाणून होते, ते अधूनमधून आपला रागही व्यक्त करीत; मात्र, रविवारी ‘पुरुष’ नाटकावेळी झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी म्हणूनच सरकारच्या अब्रूचे धिंडवडे काढणारा आहे.
Goa Artists Demand Action Kala Academy
Goa Kala AcademyDainik Gomantak
Published on
Updated on

Dinanath Mangeshkar Theatre Kala Academy Renovation Failure Exposed

पणजी: कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची नूतनीकरणानंतर दयनीय अवस्था झाली आहे. गैरव्यवहाराचे ते लाजिरवाणे प्रतीक! स्थानिक कलाकार हे जाणून होते, ते अधूनमधून आपला रागही व्यक्त करीत; मात्र, रविवारी ‘पुरुष’ नाटकावेळी झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी म्हणूनच सरकारच्या अब्रूचे धिंडवडे काढणारा आहे. हे अत्यंत नावाजलेले व्यावसायिक नाटक कला अकादमीत अनुभवण्यासाठी संपूर्ण गोव्यातून प्रेक्षक आले होते, परंतु मध्येच प्रकाशयोजनेचा खेळखंडोबा सुरू झाला.

कलावंतांची तारांबळ उडाली. पडदा पाडून अर्धा तास नाटक खोळंबले. हा सर्व प्रकार पाहताना प्रेक्षकांनी निषेध व्यक्त केला. अभिनेते शरद पोंक्षे यांना रंगमंचावरून माफी मागावी लागली. परंतु बाहेर येऊन त्यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. संपूर्ण देशात नावाजलेला आणि गोव्याच्या (Goa) संस्कृतीचा वारसा मिरविणारा कला अकादमी प्रकल्प, सरकारी अनास्था आणि बेफिकिरी यामुळे पुन्हा प्रकाशझोतात आला. संपूर्ण देशभर या प्रकाराची दखल घेण्यात आली. गोव्यातील कलाकारही खवळले आहेत.

कला अकादमी (Kala Academy) सुमारे अडीच वर्षे नूतनीकरणाच्या नावाखाली बंद ठेवण्यात आली. त्यानंतरही संपूर्णपणे कोलमडलेल्या अवस्थेत तिची वाटचाल सुरू आहे. तेथील ध्वनियंत्रणा काम करत नाही. कोट्यवधी रुपये खर्च केलेली ध्वनिव्यवस्था सांस्कृतिक कार्यक्रमांना साजेशी नाही. कार्यक्रमांच्या आयोजकांना स्वतःची व्यवस्था बाहेरून आयात करावी लागते. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहातील प्रकाशयोजनाही कुचकामी आहे. तेथे पाणी गळते, रंगपटातही अनेक त्रुटी आहेत. शिवाय या संकुलातील इतर व्यवस्थाही दर्जेदार नाहीत. या संदर्भात भ्रष्टाचाराचे खुले आरोप झाले आहेत. गोवा विधानसभेत त्या विषयावर सरकारला धारेवर धरण्यात आले होते. प्रसारमाध्यमांनीही कला संस्कृती मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रश्नावर कलाकारांनी ‘कला राखण मांड’ची स्थापना करून आंदोलन केले.

Goa Artists Demand Action Kala Academy
Kala Academy: शरद पोंक्षेंच्या 'पुरुष'मुळे कला अकादमीतील दोष उघडा पडला; सरकारचे माैन, विरोधक, कलाकारांचा मात्र हल्लाबोल

त्यानंतर सरकारला जाग येऊन कलाकार-तंत्रज्ञांचा समावेश असलेल्या कृती दलाची स्थापना करण्यात आली. सरकारच्याच पुढाकाराने या दलाचे प्रमुख म्हणून विजय केंकरे यांची नेमणूक केली. त्यांनी काही बैठकाही घेतल्या. दुर्दैवाने या कृती दलाचे घोडे पुढे सरकेना, तेव्हा त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची गरज वाटू लागली. परंतु मुख्यमंत्री भेट देईनात, असा आरोप कृती दलाच्या सदस्यांनी केला आहे.

कला अकादमीच्या प्रश्नात राजकारण आणण्याचे कारण नाही. हा कलेचा विषय आहे. गोव्यातील कलाकारांना कला अकादमी ही राज्यातील कला विषयक शिखर संस्था वाटते. या प्रांगणामध्ये अनेक कला बहरल्या, मनस्वी कलाकार तयार झाले आणि कला संकुल ही त्यांच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय बनली. कृती दलातही असलेले सदस्य ही वास्तू पुन्हा त्याच वैभवाने उभी राहावी, पुन्हा तेथे कला व संस्कृतीचे बीजारोपण व्हावे, अशी अपेक्षा बाळगून आहेत. सरकारने त्यांच्या या भावनेचा आदर करावा. कोणाला तरी वाचवण्याच्या इराद्याने या संस्थेचे आणखी अब्रूहरण टाळावे!

अडीच वर्षांच्या कालखंडानंतरही कला अकादमीतील दोष व त्रुटी दूर करण्यात सरकारला अपयश यावे, ही शोकांतिकाच. कृती दलाची स्थापना करण्यापूर्वी सरकारने स्वतःच तीन सदस्यीय तांत्रिक समितीची नेमणूक केली होती. सार्वजनिक बांधकाम खात्याने या संदर्भात चौकशी केली आहे. एका अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थेनेही एकूणच स्ट्रक्चरल तपासणी केली आहे. यातील अनेक अहवाल सरकारकडे पोहोचले आहेत.

Goa Artists Demand Action Kala Academy
Goa Kala Academy: कला अकादमीतील ‘त्‍या’ लाईट्‌स डान्स बार, डिस्कोत वापरण्‍याच्‍या दर्जाच्‍या; कृती दल समितीच्या सदस्याने स्पष्टच सांगितले

शिवाय कला अकादमीत नूतनीकरणावेळी काय घडले असावे आणि त्रुटी काय आहेत, त्या का राहिल्या, याची जाणीव सरकारला आहे. त्या ताबडतोब दुरुस्त करण्यास सरकारला कोणी अडवलेले नाही. सरकार आणखी किती काळ वाट पाहणार आहे? प्रतिदिनी नवा गोंधळ आणि अब्रू वेशीवर टांगण्याचे प्रकार किती काळ उघड्या डोळ्यांनी पाहत बसणार? सरकारच्या इतर रवींद्र भवनादी संकुलांमध्येही अशाच प्रकारचा खेळखंडोबा चालू असल्याचा आरोप आहे. चालले आहे ते सारे शोचनीय आहे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com