Heatwave in India 2026: Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

तपत्या झळा उन्हाच्या...: संपादकीय

Heatwave in India 2026: सध्या देशभरात उष्णतेच्या झळा वाढल्या असून, अनेक ठिकाणी तापमानाने ४२ ते ४४ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. गोव्‍यातही उष्‍मा वाढला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

सध्या देशभरात उष्णतेच्या झळा वाढल्या असून, अनेक ठिकाणी तापमानाने ४२ ते ४४ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. गोव्‍यातही उष्‍मा वाढला आहे. आर्द्रतेमुळे त्‍याची तीव्रता अधिक जाणवते. अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज अलिकडे हवामान विभाग दर दोन दिवसांनी देत आहे; पण पावसाने हुलकावणीच दिलीय. हवामान विभागालाही त्‍याचे कोडे पडले असावे. गोवा वगळता बेळगाव, हुबळी भागात दोनदा गारांचा पाऊस झालाय.

पेडणेला लगत असलेल्‍या सावंतवाडी तालुक्‍याला चार दिवसांपूर्वी चक्रीवादळाने तडाखा दिला आहे. यंदा सिंधुदुर्गात आंबा पिकाची तर पुरती दयना झाली आहे. हे बदलत्‍या निसर्गाचे फटके आहेत, ज्‍याचा आम्‍ही गांभीर्याने कधीच विचार करत नाही. सध्‍या सूर्याचे आग ओकणे म्हणजे काय, याचा दाहक प्रत्यय अनेक राज्‍यांत येत आहे. याचे परिणाम केवळ एका क्षेत्रावर नव्हे तर सर्वच क्षेत्रांवर घडतात. त्याचे आरोग्यावर परिणाम होतात. पशुपक्ष्यांनाही त्रास होतो. शेतीउत्पादन खालावते. पाणीटंचाई तीव्र बनते.

हवामानबदलाचा आणि त्याला कारणीभूत असलेल्या वाढत्या कार्बन उत्सर्जनाचा हा परिपाक. खरे तर या पापाचे खरे धनी ही विकसित राष्ट्रे आहेत; पण त्याचा सर्वाधिक फटका हा मात्र गरीब, विकसनशील देशांना सहन करावा लागतो आहे. कार्बनचे उत्सर्जन रोखण्यासाठी अमेरिकेसारखा देश बांधिलकी स्वीकारण्यास तयार नाही. दरडोई ऊर्जावापर जास्त असलेल्या देशानेच जर याबाबतीत असे हात झटकले तर पृथ्वीला अनिष्ट परिणामांपासून वाचवण्याच्या उद्दिष्टात अडथळा निर्माण होईल. त्यामुळे विकसनशील देशांनी पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आणायला हवा.

डोईवर तळपणाऱ्या सूर्याच्या प्रकाशामध्ये आपल्या ज्या चुका ठळकपणे दिसत आहेत, त्या दुरुस्त करायला हव्यात. या दीर्घ पल्ल्याच्या व्यापक उपाययोजनांबरोबरच तातडीचे उपायही करायला हवेत. गोव्‍यात समुद्राचे तापमानही वाढत आहे. त्‍याचा परिणाम मत्‍स्‍य उत्‍पादनावर होत आहे. दुसरीकडे मोठी शहरे उष्णतेची बेटे बनत चालली असतानाच नागरीकरणाच्या मार्गावर बेफाम धावणाऱ्या गावांची अवस्था ही ‘आगीतून आणखी आगीत’ अशी होत चालली आहे. पेयजलाच्या टंचाईचा प्रश्न गंभीर रूप धारण करत चालला आहे.

गोव्‍यात सत्तरीसारख्‍या तालुक्‍यात सध्‍या काही गावे टँकरवर अवलंबून आहेत. सुदैवाने धरणांतील पाणी सध्‍या तरी पुरेसे आहे. देशाचा विचार करता, १६६ मोठ्या जलाशयांमध्ये केवळ ४१ टक्के एवढाच साठा शिल्लक राहिला आहे. राजस्थान, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांत या समस्येने अधिक उग्र रूप धारण केले आहे. शहरांतील टंचाईच्या व्यथा या किमान माध्यमांपर्यंत पोचतात तरी. पण दुर्गम भागांतील गावे अन् पाड्यांचे काय? घोटभर पाण्यासाठी ज्यांची अनेक मैल पायपीट सुरू असते अशा आदिवासी महिलांच्या वेदनांचे काय? अनेक मुलांना या वाढत्या उष्णतेपायी शिक्षण सोडावे लागते. वाढत्या उन्हामुळे शेतीची अवस्था आणखी बिकट होईल, यात शंकाच नाही. आधीच ‘एल-निनो’चे सावट.

युद्धामुळे खतांची टंचाई, इंधनाच्या किमती कधीही वाढतील, अशी स्थिती. यासंदर्भात आतापासूनच युद्धपातळीवर काही गोष्टी कराव्या लागतील. जलपुनर्भरणासारख्या गोष्टींवर विशेष लक्ष द्यावे लागेल. संकट कोणतेही असो, त्यावर मार्ग हा सापडतोच; फक्त त्याबाबत प्रामाणिकपणे काम करण्याची गरज असते. ‘संयुक्त राष्ट्रांची अन्न व कृषी संघटना’ आणि ‘जागतिक हवामान संघटना’ यांनी संयुक्तरीत्या एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. वारंवार उद्‍भवणाऱ्या उष्णतेच्या लाटांनी भारतीय शेतीचे नुकसान केले असून, उपाययोजनांबाबतच्या उदासीनतेवर बोट ठेवले आहे.

‘अतिउष्णता आणि शेती’ या विषयावरील हा पहिलाच संयुक्त अहवाल आहे. त्यात भारतातील कृषी संशोधन संस्थांच्या आकडेवारीचा उपयोग करण्यात आला आहे. अतिउष्णतेमुळे संपूर्ण कृषिव्यवस्था कशी विस्कळीत होऊ शकते, हे या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. मागील काही वर्षांत जागतिक तापमानात सातत्याने वाढ झाली असून ती औद्योगिक अवस्था पूर्वपातळीपेक्षा सुमारे १.४८ अंशांनी जास्त आहे. तसेच, या वाढीचा वेगही अभूतपूर्व आहे, असे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे.

शेवटी, वाढत्या उष्णतेचा हा इशारा केवळ हवामानातील बदल म्हणून पाहून चालणार नाही, तर तो मानवी अस्तित्वालाच दिलेला गंभीर इशारा आहे. निसर्गाशी केलेल्या बेफिकीर वागणुकीची किंमत आपण आज मोजत आहोत. त्यामुळे सरकार, प्रशासन आणि नागरिक या तिन्ही स्तरांवर तातडीने आणि प्रामाणिकपणे पावले उचलणे अत्यावश्यक आहे. उन्‍हाळ्याने नाकी दम आणला आहेच; पुढे पाऊसही आहेच!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT