Gold  Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Gold Rate: सोन्याची झाकली मूठ... - संपादकीय

Gold prices India: जगातील भू-राजकीय परिस्थितीत निर्माण झालेली अनिश्चितता, चिघळणारे संघर्ष, अमेरिकेची दोलायमान आर्थिक धोरणे यामुळे जे सर्वव्यापी परिणाम अनुभवाला येत आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

जगातील भू-राजकीय परिस्थितीत निर्माण झालेली अनिश्चितता, चिघळणारे संघर्ष, अमेरिकेची दोलायमान आर्थिक धोरणे यामुळे जे सर्वव्यापी परिणाम अनुभवाला येत आहेत, त्यातीलच एक म्हणजे सोन्याची वाढती महती. हा तेजस्वी धातू आपल्याकडे प्रचंड ‘भाव’ खातोय. दहा ग्रॅमचा भाव आता सव्वा लाखाच्या घरात गेला आहे. केवळ संपत्तीचे प्रतीक म्हणूनच नव्हे तर धार्मिक -सांस्कृतिक महत्त्व असल्याने सोन्याविषयीची आस भारतात खूप आहे.

आपल्या देशात घरोघरी असलेले सोने विचारात घेतले तर ते एका अंदाजानुसार, किमान पंचवीस हजार टन असेल. गाठीशी सोने असले की सर्वसामान्य माणसाला सुरक्षित वाटते. परंतु सध्या भावाचा जो चढता आलेख दिसतो, त्याला देशांतर्गत नव्हे तर जागतिक परिस्थितीचा संदर्भ आहे. देशोदेशीच्या मध्यवर्ती बॅंकांनाही सोन्याचा साठा वाढवणे आवश्यक वाटते आहे. अनेक देशांनी डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ही खरेदी सुरू केली आहे.

व्याजदर घटल्याने गुंतवणुकीचे एक विश्वासार्ह माध्यम म्हणून सोन्याचा पर्याय आकर्षित करतो आहे. डॉलर कमकुवत झाला, की डॉलरच्या दरातील वस्तूंची किंमत म्हणजे सोन्याचे भाव वाढतात. भूराजकीय अस्थिरता व युद्धस्थितीच्या काळात सुरक्षिततेसाठी गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. महागाईच्या दबावामुळे चलनाची खरेदी करण्याची शक्ती घटल्यामुळे लोक सोन्यात संपत्ती सुरक्षित ठेवतात.

सोन्याच्या खाणींमधील उत्पादन मर्यादित असल्यामुळे पुरवठा घटल्याने दर वाढले. पेन्शन फंड, विमा कंपन्या सोन्यातच गुंतवणूक वाढवत आहेत. सांस्कृतिक परंपरा आणि लग्नसराईमुळे भारत, चीनमधील मागणी कायम आहे. परंतु सोन्याच्या भावातील सध्याची तेजी ही दागिने किंवा छोट्या ग्राहकांच्या वाढलेल्या मागणीमुळे नाही, तर ती पूर्णपणे आंतरराष्ट्रीय आर्थिक बाजारावर अवलंबून आहे आणि त्या बाजाराला फंड हाउस किंवा मध्यवर्ती बँकांनी लावलेल्या सोनेखरेदीच्या सपाट्याने चालना मिळत आहे.

या खरेदीमागे अमेरिकेने रशियावर लादलेले निर्बंध हे एक प्रमुख कारण आहे. म्हणजे संपत्तीचे प्रतीक याबरोबरच सोने हे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य जपण्याचेही एक साधन ठरते आहे. भारत, चीन, पोलंड यांसारख्या देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सोन्याच्या खरेदीवर भर दिला आहे. अमेरिकेने रशियावर जे निर्बंध लादले आहेत, त्यामुळे रशियाला अमेरिकी डॉलरमध्ये व्यवहार करता येत नाहीत. त्यामुळे डॉलरची कमतरता निर्माण झाली आहे. अशीच परिस्थिती ओढवण्याची भीती असल्याने, सर्व देशांनी, विशेषतः चीनने मोठ्या प्रमाणात सोनेखरेदी करण्यास सुरुवात केली आहे.

भारतात सोन्याला प्रत्येक पिढीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून मान्यता लाभली आहे. भारतातील सोने आणि चांदीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेक्षा अधिक असण्यामागे चलनातील चढउतार, कररचना, स्थानिक खर्च तसेच सांस्कृतिक मागणी हे सर्व घटक कारणीभूत आहेत. भारत हा जगातील सर्वांत मोठा सोन्याचा वापरकर्ता / ग्राहक असल्याने भारतातील मागणी जागतिक दरांवरही प्रभाव टाकते.

गेल्या काही वर्षांत भारतीय बाजारातील सोन्या–चांदीचे दर आंतरराष्ट्रीय दरांपेक्षा जास्त दिसतात. भारत स्वतः सोन्या–चांदीचे उत्पादन करत नाही. देशांतर्गत मागणी जवळजवळ पूर्णपणे आयातीतून भागवली जाते. भारतातील सोन्याचा दर डॉलर–रुपया विनिमय दराशी थेट जोडलेला आहे. भारतीय रुपयात रूपांतरित करताना डॉलरची किंमत जास्त असल्यास त्या प्रमाणात सोन्याचे भावही वाढतात. त्यामुळे चलनबाजारातील अस्थिरता सोन्याच्या बाजारात त्वरित प्रतिबिंबित होते. रुपया कमजोर झाला, की सोने महाग होते.

डॉलरचा दर ८३ वरून ८५ झाला, तर दहा ग्रॅम सोने सुमारे १,४०० रुपयांनी महाग होते. भारतीय रिझर्व्ह बँकेचा हस्तक्षेप, आयातदारांचे ‘हेजिंग’ व्यवहार, आणि सणासुदीच्या काळातील मागणी या तिन्ही गोष्टींमुळे सोन्याच्या भावातील चढउतार निश्चित होतात. केंद्र सरकारकडून सध्या सोन्यावर सुमारे सहा टक्के आयातशुल्क आणि तीनटक्के ‘जीएसटी’ आकारला जातो. काही वर्षांपूर्वी हे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत होते. त्यामुळे अलीकडच्या कपातीनंतर थोडा दिलासा मिळाला असला तरीही या दोन्ही करांचा भार ग्राहकावरच पडतो.

आयात कमी करून परकी चलनावरचा ताण घटवणे आणि अनधिकृत आयात रोखणे, हे या शुल्कांचे उद्दिष्ट आहे. मात्र भारतीय बाजारातील आयातीनंतरची एकूण वाढलेली किंमत थेट ग्राहकदरात परावर्तित होते. सोने दागिन्यांच्या रूपात विकले जाते, त्यामुळे मेकिंग चार्जेस आणि हॉलमार्किंग खर्च किंमतीत महत्त्वाची भूमिका बजावतात.

दागिने बनवताना होणारा मजुरीखर्च, डिझाईनिंग, शुद्धतेची तपासणी आणि दुकानदाराचा नफा या सगळ्यामुळे अंतिम किरकोळ किंमत आंतरराष्ट्रीय भावापेक्षा १६ ते २० टक्क्यांनी जास्त असते. पण या प्रश्नांपेक्षाही महत्त्वाचा प्रश्न आहे, तो सोन्याच्या भावातील चढउतार अर्थव्यवस्थांच्या भवितव्याविषयी काही सांगू पाहात आहेत का, हाच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lokayukta Goa: गोव्याला मिळणार नवे लोकायुक्त! न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

स्पोर्ट्स बाईक प्रेमींसाठी खास! दमदार लूक आणि पॉवरफुल इंजिनसह 'KTM RC 160' लाँच, Yamaha R15 ला देणार टक्कर, किंमत फक्त...

WPL 2026 चा श्रीगणेशा! पहिल्याच सामन्यात स्मृती-हरमन आमने-सामने; कुठे अन् कधी पाहता येणार मुंबई विरूध्द बंगळुरू सामना? जाणून घ्या सर्व

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर 'Drishti'च्या जीवरक्षकांचे 'रेस्क्यू ऑपरेशन'; 22 पर्यटकांचे वाचवले प्राण

Goa Crime: खाकी वर्दीचा धाक दाखवून वृद्धांना लुटायचे, डिचोलीत तोतया पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश! दोघे अटकेत

SCROLL FOR NEXT