AI Image trends Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

AI Image trends: 'फोटो ट्रेंड्स'च्या मायाजाळात हरवू नका; वैयक्तिक स्वातंत्र्याचा विचार करा!

Cyber security challenges AI: प्रतिमा अन् माणूस यांच्यातील नातेसंबंध तसे आदिम, मानवी बुद्धिमत्तेच्या विकासाबरोबरच प्रतिमानिर्मितीचे शास्त्रही विस्तारत गेले.

Sameer Amunekar

प्रतिमा अन् माणूस यांच्यातील नातेसंबंध तसे आदिम, मानवी बुद्धिमत्तेच्या विकासाबरोबरच प्रतिमानिर्मितीचे शास्त्रही विस्तारत गेले. पृथ्वीतलावरील अन्य प्राण्यांपेक्षा आपणच कसे आखीव-रेखीव आणि बांधेसूद दिसू यासाठी माणसाने अविरत प्रयत्न केल्याचे इतिहासात आपल्याला दिसते. मानवी अस्तित्वाच्या प्राचीन पाऊलखुणा या त्याच्या ‘असण्या’पेक्षा त्याचे ‘दिसणे’ अधोरेखित करतात, असे आपल्याला जाणवते.

आता एकविसाव्या शतकाची अडीच दशके उलटल्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अवतरली अन् पाहता पाहता सगळे चित्र बदलून गेले. ज्या बुद्धिमत्तेच्या आधारावर मानवी प्रतिमेचा विकास झाला तिलाच आव्हान देत ‘एआय’ नावाचे वादळ सर्वव्यापी बनत चालले आहे. पूर्वी चित्र काढायला मोकळा वेळ, कॅनव्हास, रंग, कुंचला आणि मुख्य म्हणजे कल्पनाशक्तीचा आधार घ्यावा लागायचा. मूर्ती अन् पुतळे घडविताना धातुशास्त्र, अभियांत्रिकीची समीकरणे आधी सोडवावी लागत असत.

यासाठी पूर्वसूरींच्या कलाकृती आणि संबंधित व्यक्तिरेखा अथवा स्थळांचाही खूप गांभीर्याने अभ्यास करावा लागत असे. आता संगणकीय टूल्स आणि ‘एआय’मुळे हे काम चुटकीसरशी होऊ लागले आहे. मुख्य म्हणजे मानवी मेंदूतील न्यूरॉनपेक्षाही ‘एआय’चे ‘लार्ज लँग्वेज मॉड्यूल’ (एलएलएम) प्रभावी ठरू लागले.

अवाढव्य ‘डेटा’ची त्याला जोड मिळाल्याने ज्या प्रतिमा आणि कलाकृतींच्या निर्मितीसाठी संबंधित कलाकारास काही वर्षे खर्च करावी लागायची तेच काम आता काही दिवसांत होऊ लागले. क्षणभरातील खंडीभर प्रतिमांचा जन्म... नवनिर्मितीच्या आनंदापेक्षा बुद्धिभ्रंश वाढविणारा ठरू लागला. आधीचा ‘घिबली आर्ट’ आणि आताचा ‘नॅनो बनाना ट्रेंड’ हा फक्त प्रतिमांचा खेळ राहिलेला नाही. या ट्रेंडने नेटिझन्सच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर घाव घालत सायबर जगतामधील त्याची सुरक्षितता धोक्यात आणली.

आपली प्रतिमा दुसरा कुणी तरी भलत्याच ठिकाणी भलत्याच कारणासाठी वापरू लागला तर त्यामुळे गोंधळ उडणे साहजिक आहे. ‘घिबली आर्ट ट्रेंड’चा जन्म ‘चॅटजीपीटी’वर झाला, आता ‘नॅनो बनाना’चा खेळ ‘गुगल जेमेनी’ या ‘एआय’ने सुरू केला आहे. तुमच्या प्रतिमांचा वापर करून तिचे रूपांतर सूक्ष्माकृतीमध्ये केले जाऊ लागले. \

अर्थात ती छोटेखानी मूर्तीची दृश्य प्रतिमाच... केवळ काही ‘प्रॉम्प्ट’च्या साहाय्याने तिला हवे तसे वळण देता येणे शक्य झाले. थ्री-डी इम्पॅक्टची जोड मिळाल्याने तिचा प्रभाव आणखी वाढला. पाहतापाहता या ट्रेंडने अनेकांचे व्हॉट्सअॅप स्टेट्स आणि फेसबुक पेज व्यापली. ‘तुम्हाला नॅनो इमेज तयार करायची आहे? मग हे प्रॉम्प्ट वापराच,’ अशा सल्ल्यांचा संकेतस्थळांवर अक्षरशः महापूर आला. त्यात आणखी भर पडली ती ‘रेड साडी’, ‘पेपरबॅक बेस्ट सेलर कव्हर’, ‘सिरॅमिक मग लाइकनेस’, ‘ग्राफिटी म्युरल’ आणि ‘अॅमीगुरूमी डॉल’ या ट्रेंडची.

‘सेलेब्रेटींसोबतच्या सेल्फी’ ट्रेंडमुळे तर चंदेरी दुनिया यूजरच्या हातात आली. कुणी किंग खान शाहरुखच्या गळ्यात हात टाकून उभे राहू लागला, तर कुणी आलिया भटला मिठी मारू लागला. (अर्थात हे सगळे काही ‘इमेज’च्या जगामध्ये) काही क्षणांसाठी एका वेगळ्याच आभासी विश्वामध्ये घेऊन जाणारे हे ट्रेंड घटकाभर मनोरंजन करू लागले असले तरीसुद्धा त्यामुळे सायबर सुरक्षेचा आणि प्रतिमांच्या गैरवापरांचे आव्हान निर्माण झाले आहे.

अनेकांनी याच प्रतिमांचा आधार घेत ट्रोलिंगच्या माध्यमातून इतरांना टोचायला सुरुवात केली, तर काहींची खरी माहिती समाजमाध्यमांत व्हायरल झाल्याने सायबर चोरट्यांनी त्याचा गैरफायदा घेतला. भविष्यात ‘एआय’च्या विकासाबरोबर हे ट्रेंडचे भूत फोफावत जाणार, हे निश्चित; पण या ट्रेंडला बळी पडून स्वप्रतिमा आणि गोपनीय माहिती शेअर करताना प्रत्येकाला आपला विवेक शाबूत ठेवावा लागेल. सर्व खासगी माहिती आपण उघड तर करीत नाही आहोत ना, याचे भान ठेवले पाहिजे, या तंत्रज्ञानाचा हा वेग पाहता त्याची ‘साक्षरता’ वाढविण्यासाठी शालेय अभ्यासक्रमातही या विषयाचा अंतर्भाव करावा लागेल.

एक जबाबदार नागरिक आणि नेटिझन्स या नात्याने आपणही इतरांची अभिव्यक्ती आणि त्यांच्या स्वातंत्र्याचा गांभीर्याने विचार करणे कसे आवश्यक आहे, हे प्रत्येक पातळीवर शिकवावे लागेल. पारंपरिक संस्कारांना आता हा आधुनिक स्पर्श व्हायला हवा. आपल्या लाइक, शेअर अन् कमेंटमुळे दुसऱ्याच्या जीवनात विष मिसळता कामा नये, याची काळजी घ्यायला हवी.

खरेतर या प्रतिमांच्या ट्रेंड्सच्या मुळाशी गेल्यावर आपल्याला ‘एआय’चे शक्तिकेंद्र सापडते. ते आता एखादी व्यक्ती अथवा देश यांच्या नियंत्रणामध्ये राहिलेले नाही. बुद्धिमत्तेच्या पातळीवरून त्याची आता चैतन्यशक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असल्याचा दावा करणारे अनेक संशोधक आहेत. माणसाचा भविष्यकाळ हा अशाच ‘एआय’च्या धक्क्यांनी भरलेला असेल, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही.

पण या ‘एआय’च्या वापराला विवेकी नागरिकशास्त्राची चौकट नसेल तर मात्र आपण अराजकाच्या खाईत लोटले जाऊ. सरकारी यंत्रणा नियमनाचे मार्ग शोधत राहीलच. पण त्याची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वयंस्फूर्तीने ‘एआय’चे नागरिकशास्त्र विकसित करायला हवे. डिजिटल विश्वात त्याची अंमलबजावणी विवेकाने व्हायला हवी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bull Attack in Majorda: माजोर्डा येथे बैलाच्या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू, काहीजण जखमी; कोलवा पोलिसांकडून तपास सुरु

Air India Flight: एअर इंडियाच्या विमानात 'हायजॅक'चा थरार! प्रवाशाने कॉकपिटमध्ये घुसण्याचा केला प्रयत्न; बंगळूरु-वाराणसी विमानात गोंधळ

Pakistan Khyber Airstrike: खुळ्यांची जत्रा! पाकिस्तानने आपल्याच लोकांवर टाकले 8 बॉम्ब; महिला, मुलांसह 30 जण ठार Video, Photo

Opinion: पोर्तुगीजांनी 'तिठे' उभारून बाजार भरवला, पण आज करोडो खर्चूनही विक्रेते रस्त्यावर का बसतात?

Opinion: गोव्यात 'भिवपाची गरज ना', असं गुंडांना वाटतंय; सामान्यांच्या मनात मात्र भीती!

SCROLL FOR NEXT