या राजकीय हंगामात विरोधी आणि चाहते या दोघांसाठीही जर राहुल गांधी केंद्रबिंदू असतील, तर त्यांच्या भवितव्याविषयीच्या सर्व चर्चांमध्ये दोन रंजक प्रवाह वारंवार दिसून येत आहेत. हे दोन्ही प्रवाह परस्परविरोधी आहेत.
एकीकडे, राहुल यांच्या क्षमतेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा मोठा पाठीराखा वर्ग यांच्यात मतभेद आहेत, ही गोष्ट बरीच उल्लेखनीय आहे. दुसरीकडे, या विषयावर राहुल आणि त्यांचा पाठीराखा वर्गाचे पूर्णपणे एकमत आहे. भाजपचे समर्थक राहुल यांना गांभीर्याने घेत नाहीत. त्यांच्यासाठी ते ''पप्पू'' किंवा टवाळीचा विषय आहेत. अनेकदा तर भाजपचे (BJP) वरिष्ठ नेतेही बढाई मारतात की, ते काही धोका नसून त्यांची सर्वांत मोठी ताकद आहेत. मात्र, मोदींचे मत नेहमीच याउलट राहिले आहे. ते राहुल आणि गांधी कुटुंबाला एकमेव संभाव्य धोका मानतात.त्यामुळेच त्यांचा प्रचार नेहमी राहुल यांच्यावर केंद्रित असतो.
काँग्रेसचे नाममात्र अस्तित्व असलेल्या राज्य निवडणुकीतही मोदी त्यांच्यावर निशाणा साधतात. या आठवड्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ''कौटिल्य'' अमित शहा यांनाही राहुल यांच्यावर जोरदार हल्ला चढवण्यासाठी मैदानात उतरवले. समर्थक वर्ग याला हसण्यावारी नेत असला, तरी खरा धोका कोण आहे हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना ठाऊक आहे. नेता आणि समर्थक यांच्यातील हा एक दुर्मीळ विरोधाभास आहे.
काँग्रेसच्या बाबतीत सांगायचे तर, जर निवडणुका निष्पक्ष झाल्या तर सत्ता आपलीच आहे, यावर राहुल आणि त्यांचा समर्थक वर्ग ठाम आहे. २००९ नंतरच्या सर्व निवडणुका भाजपने ‘चोरल्या’ असा आरोप यामागे आहे. पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार करून आणि आताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार व एसआयआरच्या माध्यमातून हे केल्याचे त्यांचे मानणे आहे. फक्त या गोष्टी दुरुस्त करा आणि पुढची निवडणूक आपलीच आहे, असा त्यांचा विचार आहे.
त्यांच्या निष्ठावंत समर्थकांपेक्षा वेगळे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राहुल गांधी यांच्याबद्दल वास्तववादी आहेत, कारण त्यांना आपले राजकारण चांगले ठाऊक आहे. राहुल यांचे पाठीराखे आणि मोदी एका गोष्टीवर सहमत आहेत, आणि ते दोन्ही बरोबर आहेत. ती गोष्ट म्हणजे - राहुल यांनी भूतकाळात कितीही चुका केल्या असल्या, तरी त्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस हाच भाजपसमोरील एकमेव आव्हान आहे.
या सर्व गोष्टींकडे आणखी एका दृष्टिकोनातून पाहता येऊ शकेल. २०१४ मधील ४४ या सर्वांत कमी लोकसभा जागांवरून २०१९ मध्ये ५२ आणि २०२४ मध्ये ९९ जागांपर्यंत पोहोचताना काँग्रेसचा मतांचा टक्का १९ ते २१ टक्क्यांच्या दरम्यान स्थिर राहिली आहे. म्हणजेच दर पाचपैकी एका भारतीय नागरिकाने ''हात'' या चिन्हाला स्वाभाविकपणे मतदान केले आहे. १९९६ पासून १९९८, १९९९ ते अगदी २००९ पर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास भाजप २५ टक्क्यांच्या आसपास रेंगाळत होता. म्हणजेच दर चारपैकी एक मतदार. तो सर्व आघाडी सरकारांचा काळ होता.
मोदींनी २०१४ मध्ये हे समीकरण बदलले. तेव्हापासून भाजप ३७ ते ४० टक्क्यांच्या दरम्यान आहे. बहुपक्षीय व्यवस्थेत मूळ आधारापेक्षा १२ ते १५ टक्क्यांची ही वाढ प्रचंड आणि धक्कादायक आहे.
नजीकच्या भविष्यात काँग्रेसची मतटक्केवारी ३७ टक्क्यांपर्यंत राहुल गांधी नेतील अशी कल्पना करणे अवास्तव आहे. परंतु, त्यांनी त्यांच्या मूळ मतांमध्ये फक्त ५-६ टक्के मतांची भर घातली, तरी देशाचे राजकारण बदलेल. भाजपसोबतच्या थेट लढतींमध्ये ते दहा पैकी नऊ वेळा पराभूत झाले आहेत. नेहमी ज्या जागांवर भाजपला विजय मिळतो, तेथे त्यांना जास्त मते मिळतात, असे आपण सहजपणे म्हणू शकतो. गेली सार्वत्रिक निवडणूक म्हणजे, २०२४ ची निवडणूक हा आघाडीचा एक मर्यादित अपवाद होता. विरोधी पक्षांची मते जशी एकवटली, तसा भाजपचा जिंकण्याचा दर घटला. काँग्रेसविरुद्धच्या थेट लढतींमध्ये भाजपला दहा पैकी फक्त सात जागांवरच विजय मिळवता आला.
भाजप ३२ टक्के मते मिळवून पहिल्यास स्थानावर राहील, पण त्यांच्या लोकसभेच्या जागा २०० च्या आसपास किंवा त्याहूनही खाली येऊ शकतात. भाजप अजूनही सरकार स्थापन करू शकेल, परंतु सर्व आव्हानांसह ते एक खरेखुरे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार (एनडीए)सरकार असेल. या धोक्याला मोदी व शहा यांनी कधीही कमी लेखलेले नाही. एक पंचमांश मते मिळवणारी काँग्रेस हीच त्यांची एकमेव स्पर्धक आहे, हे त्यांना माहिती आहे. कोणाला आवडेल अथवा नाही, परंतु, गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेस एकसंध राहू शकत नाही.
या सर्वांमध्ये राहुल यांचे स्थान काय असेल किंवा या सर्व प्रवासात राहुल गांधी कुठे असतील हा मुद्दा आहे. या घडीला, त्यांचे संपूर्ण लक्ष रस्त्यावर उतरून मोदींविरुद्ध आंदोलन उभारण्यावर आहे. अत्यंत अराजकीय असलेल्या कॉक्रोज जनता पक्षापासून ते कट्टर-डाव्या एआयएसए पर्यंत, अभिजित दीपके यांच्यापासून ते नेहा बोरा यांच्यापर्यंत कोणासोबतही हातमिळवणी करायला ते तयार आहेत.
राजकारणामध्ये २००४मध्ये आल्यापासून राहुल गांधी यांनी अनेक कठीण प्रसंगांतून मार्ग काढला आहे. त्यांनी ही लक्षात घेतले पाहिजे की भारतातील राजकीय बदल हा एकतर निवडणूक जिंकणाऱ्यांमुळे होतो, किंवा सत्ताधाऱ्यांचा पराभव करण्यासाठी इतरांशी आघाडी करणाऱ्यांमुळे होतो. रस्त्यावर उतरून ‘सत्तापालट’ करणे ही कट्टर डाव्यांची एक पोकळ कल्पना आहे, कारण ते कधीही निवडणूक जिंकू शकत नाहीत.
जयप्रकाश नारायण (नवनिर्माण आंदोलन) आणि जॉर्ज फर्नांडिस (रेल्वे संप) यांची संयुक्त ताकद, ज्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि लोहियावादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांचे पाठबळ होते, आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाचे बळ होते, तरीही ते इंदिरा गांधींना पदच्युत करू शकले नाहीत. त्यांना १९७७ च्या निवडणुकीची वाट पहावी लागली. २०१०-१२ मध्ये, अत्यंत कमकुवत झालेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारला अण्णा हजारे आंदोलन आणि आरएसएस/भाजप सत्तेवरून हटवू शकले नाहीत. हा मुद्दा निकाली काढण्यासाठी २०१४ च्या निवडणुकीचीच गरज लागली.
पुढील सार्वत्रिक निवडणूक, म्हणजेच २०२९ मधील निवडणुकीच्यावेळी राहुल गांधी यांची राजकारणातील २५ वर्षे पूर्ण होतील. त्यावेळी ते अवघ्या ५९ वर्षांचे असतील. भारतीय राजकारणाच्या मानकांनुसार ते तरुणच असतील. परंतु, विचारसरणीनुसार ठाम असलेले काँग्रेस आणि भाजपचे मतदार तसेच राहतील असे गृहीत धरले, तर मोदींचे अतिरिक्त मतदार राहुल यांच्याकडे निव्वळ कंटाळले म्हणून वळणार नाहीत.
१ निवडणूक आयुक्तांची निवड कशी व्हावी आणि निवडणूक आयोगाची निष्पक्षता कशी बहाल करण्यात यावी? काँग्रेस/यूपीए च्या काळात मागे जाणे उत्साहवर्धक असणार नाही. त्यांच्या वडिलांनी १९८९ मध्ये निवडणूक आयोग तीन सदस्यांचा करून त्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय, बिगर-नागरिक (ज्यांना भाजपने घुसखोर म्हटले आहे) हे मतदार बनणार नाहीत, हे ते कसे सुनिश्चित करतील?
२ न्यायव्यवस्था, सीबीआय आणि इतर महत्त्वाच्या तपास यंत्रणांबाबत त्यांचे काय धोरण असेल?
३ ट्रम्प यांच्यासारख्या आव्हानाला ते कसे हाताळतील? अमेरिकेबाबतचे त्यांचे धोरण सध्याच्या धोरणापेक्षा वेगळे कसे असेल?
४ चीनशी सामना करण्यासाठी त्यांची काय योजना आहे? पाकिस्तान आणि तिथून पसरविण्यात येणाऱ्या दहशतवादाबाबत त्यांची भूमिका कशी असेल? मोदींपेक्षा मवाळ, की अधिक कडक?
५ पश्चिम आशिया आणि इस्राईलबाबतचा त्यांचा दृष्टिकोन मोदींपेक्षा कसा वेगळा असेल?
६ भारतासमोरील ऊर्जा, भांडवल आणि सोने या तिहेरी टंचाईचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांचा काय दृष्टिकोन आहे? आता यात आपण एआय / सॉफ्टवेअर सेवांचीही भर घालू शकतो. गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून ते भारताला आकर्षक केंद्र कसे बनवतील?
७ ''छात्रों की गूंज'' या कार्यक्रमाचा बोलबाला आहे. पण ते रोजगाराच्या अधिक संधी कशा निर्माण करतील? शिवाय, कमी शिकलेल्यांसाठी ते `मनरेगा` योजना सुरू ठेवतील की तिची ''नवी आणि सुधारित'' आवृत्ती आणतील? ते मोफत अन्नधान्य देणे सुरू ठेवतील का?
८ जातिनिहाय जनगणना ही अजूनही त्यांची सामाजिक न्यायाची कल्पना आहे का? यामुळे अधिक नोकऱ्या कशा निर्माण होतील? रेवंत रेड्डी यांना त्यांच्या जातिनिहाय जनगणनेचे काय करावे हे सुचत नाहीये. ते डी. के. शिवकुमार यांना किमान त्यांच्या जातिनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करायला सांगतील का?
९ भ्रष्टाचाराचा आणि नफेखोरीचा अंत करण्यासाठी, गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि तरुणांना रोजगाराभिमुख बनवण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत ते कोणते बदल घडवून आणण्याचा विचार करत आहेत?
१० ते म्हणतात की ते उद्योग किंवा भांडवलशाहीच्या विरोधात नाहीत. त्यांना फक्त मक्तेदारी नको आहे आणि सर्वांना समान संधी हवी आहे. ते हे कसे सुनिश्चित करतील? आर्थिक सुधारणांची त्यांची संकल्पना काय आहे?
११ ते आणि त्यांचे ''धर्मनिरपेक्ष'' भागीदार अल्पसंख्याकांना बाजूला फेकल्याची तक्रार करत असल्याने, ते त्यांना मुख्य प्रवाहात कसे आणतील?
१२ आणि शेवटी, त्यांच्या टीममध्ये (गटात) कोण आहे किंवा कोण असेल?
एक विश्वासार्ह प्रतिस्पर्धी दिसण्यासाठी आणि केवळ आंदोलक न वाटण्यासाठी, राहुल यांना या प्रश्नांची उत्तरे देणे आणि मतदारांना नवीन कल्पना देणे आवश्यक आहे. मोदींनी २०१२ च्या अखेरीस "अच्छे दिन" चे आश्वासन देण्यास सुरुवात केली होती. २०२९ पासून तितक्याच दिवसांवर असताना, राहुल गांधी काय आश्वासन देत आहेत?
जर त्यांनी वेगळा विचार करायचा ठरवला, तर ते ब्रिटनच्या धर्तीवर एक ''शॅडो कॅबिनेट'' स्थापन करू शकतात. मग त्यांचे ''मंत्री'' आपापल्या क्षेत्रात या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील. अर्थात, थोड्या गमतीने म्हणायचे झाल्यास, या बिनकामाच्या पदांसाठीही मोठी अंतर्गत गटबाजी सुरू होऊ शकते. राहुल गांधी काहीही निवडोत, परंतु केवळ मोदींच्या घटत्या लोकप्रियतेवर स्वार होऊन ते २०२९ च्या निवडणुकीला सामोरे जाऊ शकत नाहीत. अशाच प्रकारची रणनीती याआधी तीनदा अपयशी ठरली आहे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.