Goa Liberation Story :
स. १५१० मध्ये पोर्तुगिजांनी गोवा ताब्यात घेतला. त्यावेळी आदिलशहाचे सरदार गोव्यावर अंमल चालवित होते. परंतु आपल्या सैनिकी बळावर हजारो सैनिकांना ठार करून पोर्तुगीज अधिकारी अल्बुकेर्क याने मुस्लीम सरदारांना पिटाळून लावले. गोवा, दमण, दीव याबरोबरच अंजदीव बेटावरही त्याने ताबा मिळविला.
धर्म, व्यापार उदीम आणि राज्य विस्तार हे तीन हेतू डोळ्यांसमोर ठेवून पाेर्तुगीज गोव्यात आले. अशिक्षित, अडाणी, कष्टकरी गोमंतकीय जनतेवर ताबा मिळविणे त्यांना सोपे होते. इथली हिंदू मंदिरे आणि संस्कृती नष्ट करून ख्रिश्चन धर्माचा विस्तार करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. ठिकठिकाणची मंदिरे उद्ध्वस्त करून चर्च बांधणीसाठी त्यांचे पाद्री लोक आणि सैनिक गावोगावी फिरू लागले. त्याचवेळी इथले दारिद्र्य, अज्ञान यांचा फायदा घेऊन असाहाय्य जनतेचे मतपरिवर्तन व जबरदस्ती करून धर्म परिवर्तन करण्याचे षडयंत्र त्यांनी सुरू केले. शेकडो वर्षांच्या आपल्या पूजनीय देवदेवतांच्या मूर्ती-ग्रंथ घेऊन लोक परप्रांतात निघून जाऊ लागले.
दक्षिण गोव्यात कुंकळ्ळी येथे चर्च बांधण्यासाठी एक पाद्री पोर्तुगीज सैनिकांच्या संरक्षणात चर्च बांधण्यासाठी परिसराचा शोध घेत होता. चर्च बांधण्यासाठी हे पाद्री लोक मंदिरे मोडून चर्च बांधणार होते. इतर ठिकाणी त्यांनी मंदिराचा विध्वंस करून आपली प्रार्थना स्थळे उभारली आहेत, हे लोकांना माहीत होते. धर्माभिमानी, तसेच क्षत्रिय वृत्तीच्या कुंकळ्ळीच्या जनतेला हे सहन झाले नाही. त्यांनी त्या परिसरात दमदाटी करणाऱ्या पाच पाद्रींना ठार मारले आणि दहशत निर्माण केली. पोर्तुगीजमध्ये त्यावेळी सालाझार हुकूमशाही राजवट होती.
त्यांनी या घटनेचा वचपा काढण्यासाठी गनिमी काव्याचा वापर केला. सरळ चढाई करण्याऐवजी तिथल्या प्रमुख पुढाऱ्यांना सामंजस्याची बोलणी करण्यासाठी कुंकळ्ळीच्या एका प्रार्थना मंदिरात बोलावले आणि तिथे बोलणी सुरू असताना त्या १५ लाेकांवर थेट गोळीबार केला. त्यातील एकजण स्वत:ची सुटका करून पळण्यात यशस्वी झाला म्हणून वाचला. पोर्तुगिजांविरुद्ध लढा देऊन उठाव करण्याचा पहिला प्रयत्न कुंकळ्ळीमध्ये प्रथम झाला तो दिवस होता १५ जुलै १५८३. ‘कुंकळ्ळीच्या देसायांचा विद्रोह’ अशी त्याची इतिहासात नोंद आहे.
धर्मांतरानंतर ख्रिश्चन झालेल्या इथल्या स्थानिकांना पोर्तुगीज सरकार उदारतेने वागवित होते. त्यांना जमिनी, चर्चमध्ये अधिकाऱ्यांच्या जागा यांची प्रलोभने देत; परंतु पोर्तुगालमधून आलेले पाद्री इथे पाद्री बनलेल्या स्थानिक धर्मांतरित ख्रिश्चनांचा दु:स्वास करीत. कमी लेखत अन्यायाने वागवीत. अशाच एका पिंटो नावाच्या फादरने चर्चविरुद्ध विद्रोहाचे हत्यार उपसले. १७८७ मध्ये ‘इनासियो पिंटोचे बंड’ म्हणून इतिहासामध्ये त्याची नाेंद आहे.
१९१० मध्ये पोर्तुगालमध्ये राजकीय क्रांती झाली आणि राजेशाही संपुष्टात येऊन लोकशाहीप्रणित राज्य व्यवस्था आली. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी पाेर्तुगालच्या वसाहती होत्या, तिथे उदार धाेरण स्वीकारायचे ठरले. पोर्तुगीज भाषेला प्राधान्य. ख्रिश्चन धर्माचा प्रसार या आणि अन्य वसाहतवादी दृष्टीकोनात मात्र फारसा बदल झाला नाही. पोर्तुगीज वार्तापत्रे, मासिके यांना मोकळीक होती, तर अन्य भाषांमध्ये वार्तापत्र छापायला बंदी होती. लग्नाच्या निमंत्रण पत्रिकाही छापण्यावर बंदी होती.
मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणलेली बंदी स्वाभिमानी गोमंतकीयांना सहन झाली नाही. लुईस दी मिनेझिस या तरुणाने ‘हेरालो’ नावाचे वार्तापत्र सुरू केले. पोर्तुगीज भाषेतून असले तरी सरकारविरोधी कृत्याबद्दल त्यामध्ये वार्तापत्र प्रसिद्धीस देत असत. आपल्याविरुद्ध बातमी देणाऱ्या या वार्तापत्रावर सरकारने बंदी आणली.
सत्तरी इलाख्यातील क्षत्रिय वंशाच्या राणे घराण्याने १९१२ पर्यंत पोर्तुगीज सत्तेविरुद्ध बावीसवेळा सशस्त्र लढा दिला. या स्वातंत्र्य संग्रामाला ‘राण्यांचे बंड’ असा चुकीचा अन्वयार्थ लावून त्याचे महत्त्व कमी होऊ नये. तो आत्मसन्मानातून, राष्ट्रभावनेतून, अस्मिता आणि आपली संस्कृती टिकविण्यासाठी दिलेला लढा होता. १९८१ मध्ये सत्तरी प्रांतातील शेतसारा वाढविण्यात आला. स्त्रियांवर अत्याचार होऊ लागले. घरासमोर तुळशी वृंदावन उभारण्यास बंदी घातली. हे सर्व असह्य झाल्याने दीपाजी राणे यांनी पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेल्या ‘नाणूस’ किल्ल्यावर तलवारी-बंदुका घेऊन हल्ला चढविला. याच घराण्याने पोर्तुगीज सत्तेला तह करण्यास भाग पाडले आणि आपली इनामे, वतने शाबूत ठेवली.
१९२८ साली कलकत्ता येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात त्रिस्ताव ब्रागांझा यांनी गोवा राष्ट्रीय काँग्रेसला मान्यता देण्याचा ठराव संमत करून घेतला आणि गोमंतकीय जनतेला हक्क आणि अन्यायाविरुद्ध उठाव करण्यासाठी जागे करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. १९३० साली पोर्तुगीज सरकारने वसाहतवाद कायदा पास करून घेतला. त्यानुसार पोर्तुगीज वसाहती ज्या देशामध्ये आहेत, त्या सर्व पाेर्तुगालच्या अविभाज्य भाग आहेत, असे समजून कोणत्याही प्रकारच्या सरकारविरोधी मिरवणुका, बैठका, वार्तापत्रे यांवर बंदी घालण्यात आली.
१९४६ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समितीमध्ये बाणेदारपणा, अभ्यासू वृत्ती आणि विद्वत्तेबद्दल प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी विचारांचे राम मनोहर लोहिया हे काही काळ विश्रांतीसाठी आपले मित्र ज्युलियो मिनेझिस यांच्याकडे आले होते. त्यावेळी गोव्यामध्ये सुरू असलेल्या दडपशाहीविरुद्ध स्थानिकांना त्यांनी माहिती दिली. संतप्त बनलेल्या डॉ. लोहिया यांनी मडगावच्या मैदानावर जाहीर मेळाव्याला बंदी असतानाही सभेचे आयोजन केले.
लोहिया यांचे नाव ऐकून सभेला बंदी असतांनाही लोकांनी फार मोठी हजेरी लावली. पुरुषाेत्तम काकाेडकर, ब्रागांझा व इतर कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सभेला सुरुवात झाली. पाेर्तुगीज अधिकारी मोंतेराे याने लोहिया यांच्या छातीवर पिस्तूल रोखून जमावबंदीचा कागद दाखविला; परंतु एका हाताने पिस्तुलाचा हात बाजूला करून लोहिया यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. उपस्थित लोकांनी ‘जयहिंद’चा नारा सुरू केला.
घोषणांनी मैदान दुमदुमून गेले. तो दिवस होता १८ जून १९४६. आज ते मैदान ‘लोहिया मैदान’ म्हणून प्रसिद्ध आहे. याचवेळी ब्रागांझा, टी.बी. कुन्हा, पुरुषोत्तम काकोडकर, लक्ष्मीकांत भेंब्रे यांना पोर्तुगालच्या तुरुंगात बंदिस्त करण्यात आले. या सभेने गोमंतकीय जनतेला धर्म, राष्ट्रभावना, स्वाभिमान, राष्ट्रवाद म्हणजे काय, याची जाणीव करून दिली. आपण उठाव करू शकतो, आपला आवाज कोणीही दाबू शकत नाही, हे त्यांना कळून आले. १९४६ च्या ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून सत्याग्रह, मोर्चे, छोट्या-मोठ्या प्रमाणात सर्व गोवाभर सुरू झाले. १९४७ च्या भारतीय स्वातंत्र्यानंतर पोर्तुगिजांनीही गोव्यातून निघून जावे, असा ठराव पोर्तुगीज संसदेत गोव्याचे प्रतिनिधित्व करणारे फ्रोदीयानी डिमेलो यांनी आणला होता; परंतु तो नामंजूर करण्यात आला.
पोर्तुगाल हे ‘नाटो’ युरोपियन देेशांच्या संघटनेचा एक सभासद असल्याने पोर्तुगालच्या गोवा वसाहतीला छुपा पाठिंबा राहिला होता. शिवाय अमेरिका आणि इंग्लंड यांचाही उघड पाठिंबा पोर्तुगालला होता. कॉमनवेल्थ राष्ट्रांमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘पंचशील तत्त्व’ मान्य केले होते. तसेच कोणत्याही राष्ट्रावर हिंसात्मक मार्गाने शस्त्र वापरून अधिकार सांगणार नाही, हे तत्त्व बाळगल्यामुळेच गोवा मुक्तीला १४ वर्षे इतका प्रदीर्घ काळ लागला.
गोवा मुक्ती चळवळीला चालना देण्यासाठी लढा उभारणारे विविध पक्ष, संघटना, गट निर्माण झाले. त्यामध्ये ‘आझाद गोमन्तक दल’ गोवा मुक्ती सेना, गोवा विमोचन साहाय्यक समिती, युनायटेड फ्रंट, चले जाव गोवा यांसारखे गट कार्यरत होते. या सर्वांनी संघटितपणे लढा द्यावा, असे महात्मा गांधी यांचे मत हाेते. भारतीय स्वातंत्र्यानंतर झालेली महात्मा गांधी यांची हत्या, पाकिस्तान देशाची निर्मिती, निर्वासितांचा प्रश्न, हैदराबाद संस्थान, जुनागढ संस्थानांचे विलिनीकरण, काश्मीर प्रश्न यांमध्येच दंग असलेले भारत सरकार आणि विविध पक्षीय संघटनांचे गोवा प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले, यात शंका नाही; परंतु याचवेळी विद्रोही कार्यामध्ये गुंतल्याने डॉ. पी. डी. गायतोंडे यांना कारावास झाला.
लिस्बनच्या तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी विविध देशांमध्ये जाऊन गोवा विमोचन, पोर्तुगाल सत्तेची दडपशाही याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर व्याख्याने दिली. त्रिस्तांव ब्रागांझा यांनीही परदेशी वृत्तपत्रांमध्ये लेख लिहून जनजागृती केली. अनंत काकबा प्रियोळकर यासारख्या इतिहास संशोधकाने ग्रंथरूपाने गोव्याची संस्कृती आणि भारतीय, मराठी संस्कृती यांचा पूर्वेइतिहास, प्रादेशिक अस्मिता यांसारख्या विषयांवर गोवा हा हिंदुस्थानशी भाषा, परंपरा, संस्कृती, वंश यांनी कसा जोडला आहे, यासंबंधी संशोधनपर लेख लिहून जनजागृती केली.
म्हणूनच गुजरात, पंजाब, कर्नाटक, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र येथे गोवा मुक्तीसाठी चळवळी उभ्या राहिल्या. गोव्याच्या आझाद गोवा, मुक्तिसेना यासारख्या संघटनांना बाहेरून भरघोस पाठिंबा मिळाला. भारतीय प्रजासमाजवादी पक्षाचे महाराष्ट्र आणि गुजरातच्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी गोवा मुक्तीसाठी फार मोठे योगदान दिले आहे. १९५५ साली तत्कालीन संघ कार्यकर्ते कर्नाटक केसरी जगन्नाथराव जोशी हजारो कार्यकर्त्यांना घेऊन गोवा सीमेवर सत्याग्रहात उतरले. यात महिला, मुले यांचाही समावेश होता. शांतपणे चालणाऱ्या या कार्यकर्त्यांवर लाठीमार, गोळीबार करण्यात आला. कित्येकांंचे बळी गेले. १०० हून अधिक कार्यकर्ते जखमी झाले.
१९५५ साली झालेला सत्याग्रह अभूतपूर्व होता. कारवार, बेळगाव आणि महाराष्ट्राची पत्रादेवी या सीमा पार करून गोव्यात शांतपणे सत्याग्रह करण्याचे ठरले. सत्याग्रहींचे जत्थे एकामागून एक, घोषणा देत शांतपणे सरहद्दी ओलांडून प्रवेश करीत हाेते. अचानक गाेळीबार सुरू झाला. पत्रादेवी येथे ३१ लोकांना गोळ्या लागल्या. त्यामध्ये सहादरादेवी, कर्नालसिंग, बेनिपाल आणि वीस-पंचविशीतील तरुण मुले हुतात्मा झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या अमेरिकन ब्रिटीश वार्ताहरांनी सीमेवरून आत प्रवेश करून हुतात्म्यांचे देह अलीकडे आणले.
दुसरीकडे ‘किरणपाणी’ सीमेवर तेरेखोल भागात हिरवे गुरुजी हुतात्मा झाले. कारवार सीमेवरही गोळीबार होऊन अनेक कार्यकर्त्यांचा बळी गेला. यावेळी आंतरराष्ट्रीय ‘युनो’ संघटनेमध्ये पाेर्तुगालची नाचक्की झाली; परंतु निर्लज्ज पोर्तुगाल सरकारने ‘नाटो’ आणि अन्य देशांना आवाहन केले. गोव्यात प्रवेश करून सत्याग्रहींनी नियमांचा भंग केला, असा आरोप करून अमेरिका, ब्रिटन यांसारख्या मतलबी देशांचे समर्थन घेतले. युरोपियन देशांनी तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांच्यावर दबाव आणला. पंतप्रधानांच्या जाहीर वक्तव्यामुळे त्यावेळी सत्याग्रही चळवळीचे नुकसान झाले. त्यामुळे पुढे सत्याग्रही चळवळ चिरडून टाकण्यास पाेर्तुगाल सरकारला बळ आले. डॉ. गायतोंडे, देशपांडे, मोहन रानडे यांना पोर्तुगालच्या तुरुंगात बंदी बनविले.
सांगलीहून शिक्षक म्हणून गाेव्यात कार्यरत असलेल्या मोहन रानडे यांचा ‘आझाद गोमन्तक दल’ संघटनेत प्रत्यक्ष सहभाग होता. त्यांनी बेती पोलिस स्टेशनवर कार्यकर्त्यांसह हल्ला केला. या आंदोलनात त्यांना अटक होऊन लिस्बन येथे तुरुंगात आठ वर्षे कारावास सहन करावा लागला. १९५५ मध्ये शिक्षा ठोठावलेल्या मोहन रानडे यांना गोवा मुक्तीनंतरही पोर्तुगाल सरकारने सोडले नाही. त्यासाठी व्हॅटीकन चर्चच्या पोपना विनंती करावी लागली. संगीतकार सुधीर फडके यांना ‘मोहन रानडे विमोचन समिती’ स्थापन करावी लागली. सरते शेवटी वाजपेयी यांना विरोधी पक्षात असताना लोकसभेत ठराव आणावा लागला. अखेर १९६९ साली त्यांची सुटका झाली. त्यामुळे गोवा मुक्तीच्या आनंद सोहळ्यात या मुक्तिवीराला सहभागी होता आले नाही.
गोवा मुक्ती लढ्यात महिलाही मागे नव्हत्या. १९४६ साली झालेल्या लोहिया मैदानावरील सभेत ‘जय हिंद’ ही घाेषणा दिल्याने वत्सला कीर्तने या तरुण महिलेला कारावास सहन करावा लागला.
‘‘चलो चलो गोवा चलो
लाठी गोली खायेेंगे
फिर भी गोवा जायेंगे’’
अशा घोषणा देत सुधाताई जोशी, कमला उपासनी, प्रभा साठे, शांताराव यांनी लाठीमार, तुरुंगवास सहन केला. अहिंसक मार्गाने चाललेली चळवळ दडपून टाकण्यासाठी पोर्तुगाल सरकारने विश्वनाथ लवंदे, दत्ताराम देशपांडे, बेतू नाईक, तुकाराम काणकोणकर, जयवंत कुंदे, नारायण नाईक यांना अटक करून तुरुंगात डांबले.
गोवा मुक्ती समिती स्थापन करून महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्ते चळवळीमध्ये भाग घेऊन अटक करून घेण्यामध्ये नानासाहेब गोरे, सेनापती बापट, पीटर अल्वारीस, महादेव शास्त्री जोशी यांचा सहभाग होता. दक्षिण गोव्यात प्रभाकर वैद्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कुंकळ्ळीच्या पोलिस स्टेशन आणि आर्मी डेपोवर सशस्त्र हल्ला करून दहशत निर्माण केली. त्याबद्दल त्यांना कारावास झाला. हुतात्मा बापू गवस या पेडणे महालातील वीराला जीपच्या बॉनेटला बांधून फरफटत ओढून नेण्यात आले. असंख्य ज्ञात-अज्ञात वीरांनी गोवा मुक्तीसाठी बलिदान दिले. कोण, कुठला २५ वर्षांचा कोवळा कर्नालसिंग पत्रादेवी सीमेवर येतो काय आणि या भूमीवर देह ठेवून हुतात्मा होतो काय? पत्रादेवी नाक्यावर सरकारी प्राथमिक शाळेच्या प्रांगणात त्यांचा छोटेखानी पुतळा त्या संघर्षाची आठवण देत उभा आहे.
शेवटी सर्व देेशांतून निषेधाचे सूर उमटू लागल्यावर आणि चळवळींना जोर आल्यावर पंतप्रधान नेहरू यांनी पोर्तुगाल सरकारला अंतिम इशारा दिला. ‘आता सहनशक्ती संपली’ जून १९६१ मध्ये पोर्तुगालला आवाहन करण्यात आले. परंतु प्रतिसाद न दिल्यामुळे सैन्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पोर्तुगालच्या अधिकाऱ्यांनी इथल्या गव्हर्नरला ‘इतक्या दूर भारतात लढणे शक्य होणार नाही. युद्ध टाळा’, असा सल्ला दिला होता. परंतु ‘नाटो’चा पाठिंबा मिळून अमेरिका देशाला आवाहन करून भारताला हरवता येईल, अशी गव्हर्नरला आशा हाेती. अमेरिकेने आपले बलाढ्य सातवे आरमार बोटीतून अरबी सागरात आणले होते; पण याचा काही उपयोग न होता दीड दिवसात पाेर्तुगालला शरणागती पत्र देऊन माघार घ्यावी लागली. जाताना मात्र त्या नतद्रष्ट पोर्तुगालने रस्ते-पूल मोडून भारतीय लष्करासमाेर अडचणी निर्माण केल्याच; परंतु शेवट गोड झाला. गोवा पाशवी शक्तींपासून मुक्त झाला. या दिवशी गोवा मुक्तीसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या, तुरुंगात आपले मूल्यवान जीवन वाया घालविलेल्या त्या असंख्य वीरांना माझी श्रद्धांजली.
- महाबळेश्वर सामंत
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.