Goa Bad Roads Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

अग्रलेख : खराब रस्ते रोजगार पुरवतात हे तुम्हाला माहिती आहे का?

Goa Road: खोदलेल्या रस्त्यांमुळे कित्येकांचे बळी गेलेत. इथे बांधकाम विभागाला जुमानतो कोण? कामत यांना धाक निर्माण करावा लागेल. त्यासाठी घोषणा नव्हे कारवाई करून दाखवावी लागेल.

गोमन्तक डिजिटल टीम

खराब रस्त्यांविषयी गोमंतकीयांत प्रचंड रोष आहे. पण, रस्त्याचे खराब असणे अनेकांना रोजगार पुरवते, याविषयी लोक अनभिज्ञ असतात. फार फार तर कंत्राटदार, अधिकारी आणि मंत्री हे ‘लाभार्थी’ असतात, एवढे लोकांना ढोबळमानाने माहीत असते.

पण मॅकेनिक, अस्थिरोगतज्ज्ञ, अनेक डॉक्टर, औषधविक्रेते, टायर दुरुस्त करणारे, टायर निर्मिती करणारे, वाहनांचे स्पेअर पार्ट तयार करणारे अशा अनेकांच्या रोजीरोटीस हस्तेपरहस्ते खराब रस्त्यांचेच मोठे योगदान आहे, याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?

एकाच ठिकाणी वारंवार, दर सहा महिन्यांनी त्याच त्याच ठिकाणी पडणारे खड्डे हे तर कंत्राटदार, अधिकारी व कामगार यांना नियमित रोजगार प्राप्त व्हावा म्हणून केलेली योजनाच आहे. त्याशिवाय खड्डेमय रस्ते हे साहसी पर्यटनाचे आकर्षण बिंदू आहेत. खड्डा चुकवून पूर्ण रस्ता पार करणाऱ्या चारचाकी चालकास भरगोस बक्षिसाची स्पर्धा आखल्यास प्रचंड प्रतिसाद मिळेल, यात शंकाच नाही. वाहनचालकांचे कौशल्य, संयम यांची परीक्षाच हे रस्ते घेतात.

अजिबात न दगदगता, खराब रस्त्यांवर न डाफरता, खड्डे चुकवत वाहन पणजीतून म्हापशापर्यंत नेल्यास नवीन वाहनचालकास अन्य कोणतीही परीक्षा न घेता परवाना देऊन टाकावा; शिवाय, वाहन चालवण्याच्या परवान्याचे नूतनीकरण आपोआप करून देण्याची योजना वाहतूक खात्याने आता राबवली पाहिजे. उपहास, विनोद सोडल्यास याचा गांभीर्याने विचार करण्यासारखीच गोव्याच्या रस्त्यांची स्थिती आहे.

मळ्यातला पेव्हर्स बसवून दुरुस्त केलेला रस्ता म्हणजे तो कसा असू नये याचा अक्षरश: वस्तुपाठ आहे. विकासाचा मार्ग हा चिंतेचा विषय झाला आहे, तसाच ‘रस्ता’ हासुद्धा शास्त्रीय संशोधनाचा विषय झाला आहे. अपघातांचे सत्र तर काही केल्या थांबायचे नाव घेत नाही.

अपघातबळींची संख्या पाहता, ते मानवी चुकीमुळेच होत आहेत, हे मानणे चुकीचे ठरेल. जेवढा वाहन चालकांचा हलगर्जीपणा, बेजबाबदारपणा जबाबदार आहे, तेवढेच रस्तेही आहेत.

वळणे, चढउतार, वेगमर्यादा या बाबीही काही अंशी अपघातास आमंत्रण देणाऱ्या ठरतात. त्यांच्या अपघातप्रवण असण्याचा अभ्यास गांभीर्याने होणे आवश्यक आहे.

दरवर्षी पावसाच्या सुरुवातीला गोमंतकीयांना एक भीषण वास्तव पुन्हा पुन्हा अनुभवावे लागते. खड्डेमय रस्ते, जीवघेणी वाहतूक, अपघातांचे वाढते प्रमाण, वाहनांची झीज, इंधनाचा अपव्यय, प्रवासाचा वाढलेला कालावधी ही परिस्थिती आता इतकी सवयीची झाली आहे की लोकांनी हे आपले ‘नशिब’ अशी समजूत करून घेतली आहे.

विकासाच्या गरुडझेपा घेणाऱ्या भाजप सरकारला खड्डेमय रस्त्यावर इलाज काढता आलेला नाही.

त्यामधील छुप्या अर्थकारणाचा व्हायरस कोविडपेक्षा भयंकर असल्याने गोवाच काय, देशात त्यावर ठोस उपाय काढण्याचे प्रयत्न होत नाहीत. ‘आप’ने ‘भाजपचे खड्डे’ मोहिमेद्वारे आरसा दाखवण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य आहे.

परंतु, सरकारला आपचा आरसा पाहण्यात रस नाही. बांधकाम खात्याचे नवनिर्वाचित कप्तान कामत खराब रस्त्यांच्या अभ्यासात मग्न आहेत. परीक्षा वाहन चालकांची सुरू आहे. खड्ड्यांत हरवलेल्या रस्त्यांमुळे होणाऱ्या अत्याचारांना विटलेल्या कुडचड्यातील नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागले.

खरा प्रश्न असा आहे की हजारो रुपयांचा खर्च करूनही आपण अजूनही टिकाऊ व दर्जेदार रस्त्यांच्या प्रतीक्षेत का आहोत? साधारणत: २०१७ पासून गोव्यात खराब रस्त्यांनी बाळसे धरले. मुसळधार पावसावर खापर फोडायचे आणि वेळ मारून न्यायची.

ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या घोषणा तर कापूसकोंड्याच्या गोष्टीसारख्या झाल्या आहेत. हॉटमिक्स झालेले रस्ते कोणत्याही खात्याला प्रधान मुख्य अभियंत्याची परवानगी असल्याशिवाय फोडू देणार नाही, अशी गर्जना मंत्री कामत यांनी केली असली तरी एका घोषणेपलीकडे त्याला काही अर्थ नाही.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी ‘पावसाळ्यात रस्ते खोदण्यास मनाई’ असा आदेश काढला गेला. तरीही कित्येक ठिकाणी रस्ते फोडले गेले. खुद्द मंत्री खंवटे यांनी वीज खाते वाटेल तसे रस्ते खोदत असल्याचा आरोप केला, ज्यावर समोरून मुखी मिठाची गुळणी घेतल्याप्रमाणे गुळमुळीत उत्तरापलीकडे काही साध्य झाले नाही. खोदलेल्या रस्त्यांमुळे कित्येकांचे बळी गेलेत. इथे बांधकाम विभागाला जुमानतो कोण?

मंत्री कामत यांना धाक निर्माण करावा लागेल. त्यासाठी घोषणा नव्हे कारवाई करून दाखवावी लागेल. बेमुर्वत ठेकेदार व परवाने न घेता रस्ते खोदणाऱ्या खासगी कंपन्या, सरकारी खातेप्रमुखांना धडा शिकवावा लागेल.

खराब रस्ते दुरुस्तीचा मार्गही भ्रष्टाचाराच्या वाटेनेच जातो. त्यामुळे लोकांनी दाखवून दिल्यास रस्ते लगेच दुरुस्त करू, ही वल्गनाच ठरेल. मुळात रस्ते खराब का होतात याचा प्रामाणिक अभ्यास, कठोर अंमलबजावणी, किमान पाच वर्षांची हमी घेण्याशिवाय अन्य मार्ग नाही!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT