Goa Crime News Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

अग्रलेख: रामा काणकोणकर यांना भररस्त्यात मारहाण, सशस्त्र दरोड्यांचे सत्र; यालाच अराजक म्हणतात

Goa Crime: झोपडपट्ट्या उभ्या राहत आहेत. सरकार मतांसाठी त्या अधिकृत करते आहे. रेकी करणाऱ्या दरोडेखोरांना वा चोरांना आधार अशाच जागी मिळतो. येईल त्याला सामावून घ्या.

गोमन्तक डिजिटल टीम

वस्तुस्थितीच मान्य नसते तेव्हा ती सुधारण्याचे मार्गही बंद होत जातात. परिस्थिती चिघळत जाते. व्यवस्थाच जेव्हा मूर्खांच्या नंदनवनात राहते, तेव्हा शहाण्यांना जगणे नकोसे होते. लोकांना सुरक्षेचे वातावरण देण्यात पोलिस अपयशी ठरत आहेत आणि ते वारंवार सिद्ध होत आहे.

पोलिस महानिरीक्षकांनी माध्यमांना मुलाखती देऊन सुरक्षेच्या वाफा दवडणे थांबवावे. राज्यात कायदा-सुव्यवस्था लयास पोहोचली आहे, ते मान्य करा. रामा काणकोणकर यांना भर रस्त्यात बदडून काढल्यानंतर सर्वसामान्यांच्या मनात चिंता वाढली. गरीब माणसाच्या मनात सुरक्षा धोक्यात आल्याची भावना तीव्र बनली. आता श्रीमंतही धास्तावलेत.

गणेशपुरी- म्हापशात डॉ. घाणेकर यांच्या बंगल्यावर पडलेल्या सशस्त्र दरोड्यानंतर आपण गरीब आहोत ते बरे, अशी धारणा गोरगरिबांची बनल्यास नवल नसावे. राज्यात सध्या ना गरीब सुरक्षित ना श्रीमंत! मग पोलिस करतात तरी काय? सहा महिन्यांपूर्वी नागाळी-दोनापावला येथील धेंपो कुटुंबीयांच्या बंगल्यावर दरोडा पडला, सुरक्षा रक्षकाला दरोडेखोरांनी चादरीत गुंडाळले, घरातील वृद्धांना बांधून लाखोंचा ऐवज लांबवला.

‘सीसीटीव्ही’चे डीव्‍हीआर चोरट्यांनी काढून नेले. तपासात पोलिसांना पुरते अपयश आले. तपासाचे पुढे काय झाले, ह्यावर भाष्यही टाळले गेले. त्याचाच परिणाम दोनापावलाच्या घटनेची म्हापशात पुनरावृत्ती झाली. कायदा सुव्यवस्थेची लक्तरे पुन्हा वेशीवर टांगली. नशिब, दोन्‍ही घटनांमध्‍ये जिवीतहानी टळली; अन्‍यथा परिणामांचा विचारही न केलेला बरा. ‘गुन्हा घडल्यानंतर आमचे काम सुरू होते’, हा एक सार्वत्रिक गैरसमज पोलिसांमध्ये रुजलाय.

गुन्हा घडल्यानंतर त्याचा तपास करणे व दोषीस शिक्षा होईल अशी व्यवस्था करणे हा कौशल्याचा व प्रशिक्षणाचा भाग. परंतु समाजात गैरकृत्य करताना कसलेल्या गुन्हेगारासही दहावेळा विचार करायला भाग पाडण्याइतपत जरब, धाक निर्माण करणे हा जबाबदारीचा भाग. गुन्हा घडूच नये यासाठी असलेली जरब व तशातही तो घडलाच तर त्वरित तपास करण्याचे कौशल्य, याच गोष्टींची अपेक्षा समाजाने पोलिसांकडून कशी ठेवावी? कारण, सातत्याने पदरात घोर निराशा येत आहे.

पौर्णिमेच्या रात्री म्‍हापशातील रस्त्यांवर गर्दी होती. पहाटे दरोडेखोर गज कापून बंगल्यात शिरले, डॉ. घाणेकर कुटुंबीयांना धाक दाखवून पाहुणचार करून घेतला आणि लुटले हे भयानक आहे. दोनापावलाप्रमाणे म्हापशातही सीसीटीव्ही निकामी केले. अशावेळी लोकांनी काय करावे? सरकार टेक्नॉलॉजीच्या गप्पा करते, सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्हीसाठी कित्येक कोटी खर्च केल्याचे सांगितले जाते. पण, प्रत्यक्षात स्थिती निराळी आहे. म्हापसा शहरात प्रवेश करण्याचा मार्ग व बाहेर पडण्याच्या रस्त्यांवर सीसीटीव्ही नाहीत.

मार्केट परिसर, गांधी सर्कलमध्ये सीसीटीव्ही अद्याप बसवलेले नाहीत. ह्याच म्हापसा शहरात दुकाने फोडण्याच्या घटना वरचेवर होत असूनही प्रशासनाला जाग आलेली नाही. म्हापसा प्रकरणातील दरोडेखोर चोरलेली कार घेऊन पणजीत येतात, तेथून टॅक्सीने बेळगावात पोहोचतात. या प्रवासात वाटेत तपास करणारी कोणतीही यंत्रणा नव्हती का? गस्त नव्हती? त्यांना जराही संशय आला नाही? पोलिसांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. खुद्द पोलिस गुंडांकडून मार खातात, सुलेमानसारख्या माफियाला साथ देतात.

रात्रीची नाकाबंदी कागदावर राहते. खबरे नावालाही उरले नाहीत. हे अपयश मोठे आहे. ‘गुन्ह्यांची उकल करण्यात आम्ही यशस्वी ठरतो’, अशी आत्मप्रौढी मिरवण्यापेक्षा गुन्हे रोखता कसे येतील हे पाहा. अलीकडेच दलात नवतरुण दाखल झालेत. परिणामी कर्मचारीबळ कमी आहे असेही नाही. तरीही समाजाचे रक्षण करण्‍याचे दायित्‍व असलेले पोलिस अतिदुर्बळ का? दोनापावला येथील दरोड्याने ‘सुरक्षा रक्षक’ या संकल्पनेचा फुगा फुटला. सुरक्षा रक्षकांच्या नावावर हजारो रुपये कंपन्या घेतात व कमी मोबदल्यात रक्षक नेमतात. नियम, अटींचे काय?

तशी तपासणी कुणी कधी केली का? तर नाही! झोपडपट्ट्या उभ्या राहत आहेत. सरकार मतांसाठी त्या अधिकृत करते आहे. रेकी करणाऱ्या दरोडेखोरांना वा चोरांना आधार अशाच जागी मिळतो. येईल त्याला सामावून घ्या, पण नियमांची पायमल्ली होत असल्याने गुन्हेगारी रोखली जाणे कठीण बनले आहे. मतांची लालसा भिनलेली राजसत्ताही अराजकतेला जबाबदार आहे. घरासमोर सीसीटीव्ही बसवूनही दरोडे पडत असल्यास सामान्यांनी आणखी काय करावे?

डिचोली शहरात एक कोटीचे सीसीटीव्‍ही बसवले, परंतु सध्‍या यंत्रणा नादुरुस्‍त आहे. पणजीतील स्‍थिती निराळी नाही. केवळ निविदेतील मलिदा लाटण्‍यासाठी कोट्यवधी खर्च केले जातात. गोवा आकाराने लहान आहे. रस्त्यांवर सीसीटीव्हींचे जाळे विणा, त्‍याची निगा राखा. या अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणांचा अभाव कुठे- कुठे कसा आहे, हे पोलिसांपेक्षा चोरांनाच अधिक नेमकेपणाने माहीत आहे.

पकडलेच या गुन्हेगारांना तर शिक्षा देण्याआधी त्यांना सुरक्षेतल्या आणखी किती पळवाटा माहीत आहेत, हे आधी जाणून घ्या. चोरी होऊच नये यासाठी सर्वंकष उपाययोजना केल्यानंतर सुरक्षेच्या गप्पा हाणा. पोलिस यंत्रणाच गबाळी असल्यानेच गुन्हेगारांचे फावते. चुका मान्य करा व त्या दुरुस्त करा. अन्यथा हे अराजक कधी संपणारच नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

SCROLL FOR NEXT