संजय घुग्रेटकर
बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले, की गणेशचतुर्थीची तयारी सुरू होते. घरोघरी यंदा काय काय करायचे, याचे नियोजन करतात. चतुर्थीला मूळ घरी जायचे असते, तेथील तयारीचा आढावा घेतला जातो, कामे वाटून घेतली जातात. मूर्ती कोणती घ्यायची याचीही चर्चा सुरू होते, याच काळात नेहमीप्रमाणे प्रशासन जागे होते आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी जाहीर केली जाते. ‘हे करणार’, ‘ते करणार’, ‘दंडात्मक कारवाई करणार’ अशा घोषणा केल्या जातात, पत्रके काढली जातात, पण पुढे काहीच होत नाही.
त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घरोघरी विराजमान होतात आणि विसर्जनानंतर तळे, विहिरी, समुद्र किनाऱ्यांवर मूर्तींच्या विद्रुपीकरणाचे देखाव्याचे दर्शन घडते. याला जबाबदार कोण? प्रशासन, भाविक की मूर्तिकार? हा प्रश्न फक्त आठ दिवस चर्चेत राहतो आणि नंतर सर्वजण सगळेच विसरून जातात. पुन्हा पुढील वर्षी जुलै महिन्यात संबंधित खाते, प्रशासनातर्फे निर्देश दिले जातात.
प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदीचा निर्णय अनेक वर्षांपासून घेतला जातो. पर्यावरण संरक्षण कायदा १९८६च्या कलम ५ अन्वये अशा प्रकारच्या गणेश मूर्ती बनविणे, आयात करणे, निर्यात करणे विक्री करणे यांवर बंदी आहे.
राज्यात कुठेही अशा मूर्ती ठेवणे बेकायदा कृत्य समजले जाते, तर मग गल्लोगल्ली गणेशमूर्तीची विक्री सुरू केली आहे, त्याकडे संबंधित विभागातील पोलिस निरीक्षक अथवा उपनिरीक्षक गप्प का आहेत? पर्यावरण संचालक सचिन देसाई यांनी निर्देश देऊनही कुठेच कारवाई होत नाही, सगळीकडे राजरोसपणे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची विक्री होत आहे.
अनेक ठिकाणी या मूर्तींची साठवणूक करण्यात आली आहे. बाहेरील राज्यातून अशा मूर्तींची आयात केली जाते, तेव्हा तपासणी नाक्यावर असलेले तपासणी करणारे अधिकारी, पोलिस करतात?
सगळीकडे गोंधळ आहे, हात ओले करून मोठ्या प्रमाणात मद्याची तस्करी होते, त्याचप्रमाणे बेकायदा अशा मूर्ती किंवा साहित्याची ये-जा सुरू असावी. तपासणी नाके बिनकामाचे ठरत आहेत, जर येथील कर्मचारी चोख काम करत नाहीत, तर त्यांची तेथे गरज काय? असा सवाल सर्वसामान्य जनता करीत आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या गणेश मूर्तीमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. पीओपी पाण्यात विरघळत नाही आणि त्यामुळे जलाशयांमध्ये प्रदूषण होते. तसेच, पीओपीच्या मूर्तींमुळे जलचरांवरही परिणाम होतो. या मूर्तींमुळे जलप्रदूषण होऊन मातीची गुणवत्ता घटते आणि पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते.
पीओपी पाण्यात विरघळत नाही, त्यामुळे जलाशयांमध्ये प्रदूषण होते. यामुळे पाण्यात राहणाऱ्या जीवसृष्टीवर नकारात्मक परिणाम होतो. पीओपीच्या मूर्तींमुळे मातीची गुणवत्ता घटते, ज्यामुळे शेतीवर परिणाम होतो.
जलप्रदूषणामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. पीओपीच्या मूर्तींमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते. पीओपीच्या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्यामुळे, त्या जलाशयात तसेच पडून राहतात, ज्यामुळे मूर्तींची विटंबना होते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या धुळीमुळे श्वसन संस्थेचे विकार होऊ शकतात.
शाडू मातीच्या गणेशमूर्तीचा वापर करावा, नैसर्गिक रंगांचा वापर करावा, विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करावी, पीओपीच्या मूर्तींवर बंदी आणावी. पर्यावरणाची काळजी घेणे आवश्यक आहे, त्यामुळे पीओपीच्या मूर्तींऐवजी शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करणे फायद्याचे आहे.
पर्यावरणाला पीओपीमुळे मोठा धोका निर्माण होत असल्याने हा प्रकार थांबवायचा असेल तर निद्रिस्त संबंधित अधिकाऱ्यांनी जागे होऊन कठोर कारवाई केली पाहिजे. चित्रशाळांची तपासणी नेमकेपणाने करायला हवी. पीओपी मूर्ती जप्त करून दोषींवर कठोर कारवाई करायला हवी.
तरच अशा बेकायदा पीओपी मूर्ती गोव्यात येणे बंद होईल. भाविकांनीही पीओपी मूर्तींना नकार दिला, तर अर्धी लढाई जिंकता येईल आणि राहिलेली अर्धी लढाई प्रशासनावर अवलंबून आहे, ज्यांना अधिकार दिले आहेत, त्यांनी आपली जबाबदारी नेमकेपणाने पार पाडावी.
गणपतीबाप्पा नक्कीच अशांना सुबुद्धी देवो!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.