अग्रलेख: गोव्यात 'दरोडा' घालायचा विचार जरी मनात आला, तरी कापरे भरेल अशी जरब व भीती बसणे शक्य आहे..

Baina Theft: गोवा दरोडे घालण्यासाठी योग्य जागा, ही प्रतिमा बदलून गोव्यात दरोडा घालायचा विचार जरी मनात आला, तरी कापरे भरेल अशी जरब व भीती चोरांना बसणे सर्वांच्या सहभागातूनच शक्य आहे.
Baina Robbery
Baina TheftDainik Gomantak
Published on
Updated on

बायणा येथील दरोड्यात परप्रांतीय सूत्रधार असल्याची माहिती समोर आली. अन्य दरोड्यांचा उलगडा झाल्यास हेच वास्तव समोर येईल. दरोडे घालण्याची पद्धत पाहिल्यास बंगल्यांची, त्या भागाची माहिती असलेल्या व्यक्तींशिवाय दरोडे अशक्य होते, हे कळते. बायणात नायक कुटुंबीयांकडे नोकरीसाठी राहिलेल्या ओडिशातील तरुणाने दरोड्याचा कट आखला, हा उलगडा पोलिस आणि नागरिकांसाठी धडा आहे.

बायणातील दरोडेखोरांना पकडणाऱ्या गोवा पोलिसांचे अभिनंदन! अपयशाच्या पायऱ्यांवर बरेच बोल सहन केल्यानंतर त्यांनी आपला बाणा दाखवला. प्रत्येक गोंयकाराला रक्षणकर्ते वाटावेत, अशीच पोलिसांची कामगिरी अपेक्षित आहे. पोलिस दलाचे राजकीयीकरण थांबल्यास कार्यप्रवणता कित्येक पटीने वाढेल, हा आमचा विश्‍वास आहे. बायणातील दरोड्यातील संशयितांचा इतर प्रकरणांशी काही संबंध आहे का, हे तपासले जाईलच.

जुने गोवे, म्हापसा दरोड्याचा तपास लागल्यास बरीच धक्कादायक माहिती समोर येऊ शकेल. गोव्यातील गुन्ह्यांमध्ये परप्रांतीयांचा टक्का अधिक आहे, हे खुद्द मुख्यमंत्र्यांनी या अगोदर अनेकदा म्हटले आहे. परंतु त्यात घट होईल, अशी भक्कम पावले कधी उचलली गेलेली नाहीत. भाडेकरू तपासणी काही दिवस होते, पुढे यंत्रणा शिथिल पडते. नागरिकांनाही सर्व जबाबदारी पोलिसांवर झटकून मोकळे होता येणार नाही. गोव्यात स्थलांतरितांची संख्या वाढली आहे. त्यात बेकार मजूर लक्षणीय आहेत.

अशातूनच चोऱ्या, दरोडे वाढत आहेत. सगळेच परप्रांतीय कामगार गुन्हेगार नाहीत, पण परप्रांतीय अशा गुन्हेगारीत दिसून येत असल्याने ताकही फुंकून पिण्याची सवय अंगी बाणवावी लागेल. खून आणि बलात्काराची प्रकरणे पाहिल्यास २०१८ ते २०२२ या कालावधीत घडलेल्या ५२८ गुन्ह्यांत २९०हून अधिक परप्रांतीय गुन्हेगार आहेत. गोव्यात विसावणाऱ्या परप्रांतीयांकडे राजकीय हेतूने वा स्वार्थप्रेरित भावनेतून होणारे दुर्लक्ष गुन्हेगारीस चालना देत आहे.

प्रत्येक परप्रांतीय हा गुन्हेगार असत नाही, हे खरे असले तरी त्याआड अनेक गुन्हेगार गुन्हे करून पळून जातात हीसुद्धा वस्तुस्थिती आहे. परप्रांतीयांवर अविश्‍वास दाखवणे हा हेतू नाही, पण म्हणून त्यांची कुठलीच पडताळणी न करता त्यांना भाड्याने खोली देणारे, मतांकरता रेशनकार्डापासून मतदार कार्डापर्यंत सर्व ओळखपत्रे काही पैशांसाठी मिळवून देणारे लोक स्थानिक, गोंयकारच आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

Baina Robbery
Baina Robbery Case: नायक कुटुंबीयांच्‍या दुकानातील जुना कामगारच निघाला दरोड्याचा सूत्रधार, 8 दिवसांत छडा; 6 जणांना मुंबईतून अटक

संरक्षणाची सर्व जबाबदारी पोलिसांवर ढकलून सुशेगाद राहणे हा आत्मघातच आहे. जसे पोलिस त्यांच्या कर्तव्यात कसूर करण्यासाठी जबाबदार आहेत, तसे लोकही आपल्या कर्तव्यात कमी पडतात म्हणून उत्तरदायी आहेत. आम्ही गोमंतकीय मिळून हे दरोड्यांचे हे लोण थांबवू शकतो. स्थानिकांनी जागरूक राहणे, पंचायतींनी प्रत्येक घरमालकाकडून माहिती गोळा करणे हे कार्य अविरत करणे अनिवार्य आहे.

Baina Robbery
Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

तिथे हेळसांड झाल्यास आणखी दरोडे पडत राहतील. कुणाची तरी आयुष्यभराची कमाई लुटली गेल्याची बातमी छापताना आम्हांलाही प्रचंड त्रास होतो. त्यातून सजगता रुजली नाही, तर अशा घटनांची बातमी करून काहीच हाती लागणार नाही. गोवा दरोडे घालण्यासाठी योग्य जागा, ही प्रतिमा बदलून गोव्यात दरोडा घालायचा विचार जरी मनात आला, तरी कापरे भरेल अशी जरब व भीती चोरांना बसणे सर्वांच्या सहभागातूनच शक्य आहे. आता बास झाले, आणखी एकही दरोडा नको!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com