श्रीलंकेत ‘दित्वा’ चक्रीवादळाचा हाहाकार! पूर आणि भूस्खलनात 47 जणांचा मृत्यू, 21 बेपत्ता; भारतालाही धोक्याचा इशारा VIDEO

Ditwah Cyclone In Sri Lanka: भारताचा शेजारील देश असलेल्या श्रीलंकेवर सध्या गंभीर नैसर्गिक आपत्तीचे सावट आहे.
Ditwah Cyclone In Sri Lanka
Sri LankaDainik Gomantak
Published on
Updated on

Ditwah Cyclone In Sri Lanka: भारताचा शेजारील देश असलेल्या श्रीलंकेवर सध्या गंभीर नैसर्गिक आपत्तीचे सावट आहे. धोकादायक ‘दित्वा’ चक्रीवादळामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये भीषण पूर आणि जीवघेणे भूस्खलन झाले. या मोठ्या नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत डझनभर लोकांचा मृत्यू झाला असून अनेक लोक अद्यापही बेपत्ता आहेत. सध्या संपूर्ण श्रीलंकेत चिंतेचे वातावरण आहे.

मोठी जीवितहानी

चक्रीवादळ ‘दित्वा’ने काल (27 नोव्हेंबर) सकाळी श्रीलंकेच्या पूर्व किनाऱ्यावर धडक दिली, त्यानंतर देशाच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली. ताज्या माहितीनुसार, पूर आणि भूस्खलनाच्या (Landslide) या दुखद घटनांमध्ये आतापर्यंत 47 लोकांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी झाली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या 21 लोक बेपत्ता आहेत, ज्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. याशिवाय, शेकडो लोक जखमी झाले असून त्यांना मदत पोहोचवण्याचे कार्य सुरु आहे.

बचावकार्य आणि पर्यटन मंत्रालयाचे आवाहन

चक्रीवादळामुळे (Cyclone) झालेल्या नुकसानीची दखल घेऊन श्रीलंकेच्या प्रशासनाने तात्काळ बचाव अभियान सुरु केले. श्रीलंकेची सेना आणि आपत्ती व्यवस्थापन पथके एकत्रितपणे काम करत आहेत. पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. दरम्यान, पर्यटन मंत्रालयाने एक महत्त्वाचे आवाहन केले. परिस्थिती सामान्य होईपर्यंत पर्यटकांनी श्रीलंकेचा प्रवास स्थगित करावा जेणेकरुन बचावकार्यात कोणताही अडथळा येणार नाही आणि पर्यटकही सुरक्षित राहतील.

केळणी नदीला पुराचा धोका

दुसरीकडे, सततच्या मुसळधार पावसामुळे केळणी नदीच्या पाण्याची पातळी धोक्याची पातळी ओलांडत आहे. त्यामुळे पुढील 48 तासांत नदीकाठच्या सखल भागांमध्ये पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. एहेलियागोडा, यतियानटोटा, रुवानवेला, देहियोविटा, सीतावाका, डोम्पे, पादुक्का, होमगामा, कडुवेला, बियागामा, कोलोनावा, केलानिया, वट्टाला आणि कोलंबो यांसारख्या शहरांमध्ये पूर येण्याची मोठी शक्यता आहे.

भारताच्या किनाऱ्याकडे ‘दित्वा’चा प्रवास

चक्रीवादळ ‘दित्वा’ सध्या श्रीलंकेतील त्रिंकोमालीच्या जवळ घोंघावत असून ते हळूहळू उत्तर-उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे. हे चक्रीवादळ आता भारताच्या पूर्व किनाऱ्याकडे, विशेषतः तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या दिशेने पुढे सरकत आहे. त्यामुळे दोन्ही देशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळामुळे श्रीलंकेच्या उत्तर, उत्तर-मध्य, मध्य आणि पश्चिम प्रांतांमध्ये 200 मिलीमीटरहून अधिक अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

संपूर्ण बेटावर वाऱ्याचा वेग 60 ते 70 किलोमीटर प्रति तास असून तो 80-90 kmph पर्यंत वाढू शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ‘दित्वा’ चक्रीवादळ 30 नोव्हेंबरपर्यंत भारताच्या पूर्व किनाऱ्याजवळ पोहोचेल, ज्यामुळे तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यांवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी खराब हवामानाचा अंदाज घेऊन सुरक्षित ठिकाणी राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com