Parashurama mythology Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Parashurama History: विष्णूचा सहावा अवतार मानल्या जाणाऱ्या 'परशुरामा'ने आईचा शिरच्छेद का केला?

Parashurama Mythology: परशुरामाने धारण केलेली एकंदर ब्राह्मणवादी प्रतिमा, त्याला विष्णूचा सहावा अवतार मानले जाणे, या गोष्टी अशा गृहीतकाचा स्वीकार करण्यातले मोठे अडथळे आहेत.

Sameer Panditrao

तेनसिंग रोद्गीगिश

परशुरामाने दख्खनच्या क्षत्रियांच्या एका गटाचे नेतृत्व कोकण, तुळुवा आणि मलबार किनारी भागांत केले असेल का? प्राचीन काळी समुदायात घडलेल्या गोष्टींची सामूहिक आठवण मौखिक परंपरेने एका पिढीतून दुसऱ्या पिढीत चालत आली व कालांतराने तेच परशुराम आख्यान तर झाले नसेल? ही सामूहिक कृतज्ञतेची, वीरपूजेची भावना असेल का? परशुरामाची तीन मंदिरे अस्तित्वात आहेत: चिपळूण (महाराष्ट्र), पैंगीण (गोवा) आणि तिरुवल्ला (केरळ).

परशुरामाने धारण केलेली एकंदर ब्राह्मणवादी प्रतिमा, त्याला विष्णूचा सहावा अवतार मानले जाणे, या गोष्टी अशा गृहीतकाचा स्वीकार करण्यातले मोठे अडथळे आहेत. परशुरामांची आख्यायिका दीर्घकाळापासून संस्कृत साहित्याचा आणि पुराणांचा अविभाज्य भाग आहे.

परंतु परशुरामची ओळख दख्खन संस्कृतीशी इतकी जवळून गुंफलेली आहे की, दख्खन क्षत्रियांना पश्चिम किनाऱ्यावर नेणारा तो प्रणेता होता ही बाब सहजपणे दुर्लक्षित करता येत नाही. हे केवळ परशुरामाने सागर मागे हटवून किनारपट्टीची भूमी मिळवण्याबद्दल नाही.

त्याची आई रेणुका, बहुधा वडुकर नसली तरी दख्खन क्षत्रिय होती. जोशींच्या मते, ती आताच्या विदर्भ प्रदेशाची राणी होती. जमदग्नीला युद्धात तिचा सामना करणे शक्य नसल्याने त्याने तिच्याशी प्रेमाचे नाटक केले व तिला मोहात पाडून तिच्याशी लग्न केले. ज्यामुळे तिचे राज्य प्राप्त झाले; अखेर त्याला तिला मारण्याची संधी मिळाली. (संदर्भ : जोशी, २०१६: ग्रीक नाविक ते पेशवाई, ७३).

रेणुकेची मुळे दख्खनमध्ये खोलवर रुजलेली दिसतात. कर्नाटक आणि तेलंगणामध्ये तिला एलम्मा आणि महाराष्ट्रात येल्लुई म्हणून पुजले जाते. तिची पूजा करण्याचे कारण काय असू शकते? तीदेखील वीरपूजा असू शकते का?

ब्राह्मण-क्षत्रिय संघराज्याच्या हल्ल्याविरुद्ध मूळ दख्खनच्या क्षत्रिय-वडुकर लोकांचे रक्षण करणारी म्हणून तर रेणुकेची पूजा होत नसावी ना? यावरून जोशींच्या प्रबंधालाही काही प्रमाणात बळकटी मिळते. या टप्प्यावर दख्खनचे क्षत्रिय आणि गंगा-सिंधूच्या मैदानी भागांतले क्षत्रिय यांमध्ये फरक करणे आवश्यक आहे. गंगा-सिंधूच्या मैदानी भागातील क्षत्रियांनी त्यांच्या विस्तारवादी प्रयत्नात बहुधा ब्राह्मणांना सहकार्य केले असावे.

परंतु परशुराम कथेचे अजूनही बरेच पैलू आहेत जे दख्खनच्या क्षत्रियांचा उपकारकर्ता या त्याच्या प्रतिमेस छेद देतात. उदाहरणार्थ, त्याची आई रेणुका हिचा शिरच्छेद करण्याचे त्याचे कृत्य. ‘त्याला महान तपस्वी असलेल्या महाबाहू जमदग्नींनी आज्ञा केली, ’माझ्या मुला, तुझ्या या दुष्ट आईला कोणताही संकोच न करता मार.’ तेव्हा रामाने ताबडतोब परशू उचलला आणि त्याच्या आईचे डोके कापले’.

(संदर्भ : महाभारत, पुस्तक ३: वन पर्व: तीर्थ-यात्रा पर्व). जमदग्नी रेणुकेला मारू इच्छितो, त्याच्या मोठ्या मुलाला ते करण्यास सांगतो; पण तो तसे करण्यास नकार देतो. बाकीचे पुत्रही त्याचे ऐकत नाहीत. पण, त्यांच्यातील सर्वांत धाकटा राम (परशुराम) ऐकतो. पण नंतर तो त्याच्या वडिलांकडे त्यांची आज्ञा ऐकून तसे केल्याबद्दल वरदान मागतो; तो रेणुकेला पुन्हा जिवंत करण्याची विनंती करतो.

परशुरामने केलेल्या या चुकीचे स्पष्टीकरण कसे द्यावे? हे समजून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे परशुराम त्याच्या वडिलांच्या घराण्यातील गंगा-सिंधू क्षत्रियांबद्दलची त्याची वंशपरंपरागत निष्ठा आणि दुसऱ्या बाजूस आईच्या माहेरची दख्खनच्या क्षत्रियांबद्दलची त्याची ओढ.

गंगा-सिंधूच्या मैदानातील क्षत्रिय म्हणून, वडुकर आणि दख्खनच्या क्षत्रियांचा नाश करणे आणि ब्राह्मणांच्या प्रगतीत साह्य करणे ही त्याची स्वाभाविक इच्छा होती. पण दख्खनच्या क्षत्रिय म्हणून, दख्खनच्या लोकांसोबत उभे राहणे हे त्याचे कर्तव्य होते.

आपण निष्ठेचा हा संघर्ष पुन्हा एकदा पेटलेला पाहतो, जेव्हा परशुराम ’एकवीस वेळा’ क्षत्रियांचा नाश करण्यासाठी निघतो. तो त्याच्या ध्येयात यशस्वी होतो. ‘जमदग्नीचा पुत्र, एकवीस वेळा पृथ्वीला क्षत्रियांपासून मुक्त केल्यानंतर, महेंद्र पर्वताच्या त्या सर्वोत्तम ठिकाणी गेला आणि तिथून त्याची तपश्चर्या सुरू झाली’. (संदर्भ : गांगुली, १८९६: महाभारत, पुस्तक १: आदि पर्व: आदिवंशावतरण पर्व).

मग त्याला पश्चात्ताप होतो व तो तपश्चर्या करतो. कारण त्याने केवळ दख्खन क्षत्रियांचा संहार केला नव्हता, तर त्याने अकल्पनीय कृत्य केले होते: दख्खन क्षत्रिय वंशाला ब्राह्मणांनी भ्रष्ट केले होते. ‘आणि जेव्हा पृथ्वी क्षत्रियांपासून वंचित होती, तेव्हा संततीची इच्छा असलेल्या क्षत्रिय स्त्रिया, हे राजा, ब्राह्मणांकडे येत असत आणि कठोर प्रतिज्ञा असलेल्या ब्राह्मणांचा त्यांच्याशी केवळ स्त्री ऋतूमध्ये संबंध असायचा, परंतु हे राजा, कधीही कामुकतेने आणि अनैतिकतेने संबंध येत नव्हता.

आणि ब्राह्मणांशी अशा संबंधातून हजारो क्षत्रिय स्त्रिया जन्माला येत होत्या. मग, हे राजा, क्षत्रिय वंशाची भरभराट व्हावी म्हणून, पुष्कळ क्षत्रिय, मुले आणि मुली जन्माला आल्या. आणि अशा प्रकारे तपस्वी ब्राह्मणांनी क्षत्रिय स्त्रियांपासून क्षत्रिय वंश निर्माण केला.

दीर्घायुष्याचे आशीर्वाद मिळालेली नवी पिढी सद्गुणात भरभराटीला येऊ लागली. अशा प्रकारे ब्राह्मणांच्या डोक्यावर असलेल्या चार वर्गांची पुनर्स्थापना झाली’. (संदर्भ : गांगुली, १८९६: महाभारत, पुस्तक १: आदि पर्व: आदिवंशावतरण पर्व). तो पश्चात्तापदग्ध होता. कदाचित स्वतःला क्षमा करू न शकलेल्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी, त्याने त्याच्या आईच्या माहेरच्या लोकांना त्यांच्यासाठी निर्माण केलेल्या नरकातून बाहेर काढले. कदाचित याचसाठी तर त्याला सह्याद्री ओलांडून जावे लागले नसेल ना?

परंतु परशुरामाने त्रिहोत्र येथून पंचगौड ब्राह्मण कुटुंबे आणली असावीत आणि त्यांना गोव्यातील पंचक्रोशीत आणि कुशस्थळी (कुठ्ठाळी) येथे स्थायिक केले असावे असे मानले जाते.

ही भारद्वाज, कौशिक, वत्स, कौंडिण्य, कश्यप, वसिष्ठ, भार्गव, विश्वामित्र, गौतम आणि अत्री गोत्र असलेल्यांची कुटुंबे होती. त्यांना मठग्राम (मडगाव), कुशस्थळी (कुठ्ठाळी) आणि कर्दळीनगर (केळशी) येथे वसवण्यात आले. (संदर्भ : दा कुन्हा, १९९२: स्कंदपुराणांतरगतम् सह्याद्रिखंडम्, चितपावनब्राह्मणोत्पत्ती, ४७-४८, ३०४) त्याआधीच चिपळूणमध्ये चित्पावन ब्राह्मणांच्या वसाहतीचे वर्णन येते.

भारताच्या संपूर्ण पश्चिम किनाऱ्यावर ब्राह्मणांचा इतिहास परशुरामापासून सुरू होतो. दख्खनच्या चाड्डींना पश्चिम किनाऱ्यावर नेणारा परशुराम आणि ब्राह्मणांची वसाहत करणारा परशुराम, हे परस्परविरोधी वाटतात. पण ते तसे असण्याची गरज नाही.

‘आणि मृतांचा सन्मान करण्यासारख्या वैदिक विधींचे (श्राद्ध) पालन करण्यासाठी त्यांनी ब्राह्मणांच्या साठ कुटुंबांना नवीन प्रदेशात स्थायिक केले’. कोणाचे श्राद्ध करण्यासाठी? याचा अर्थ असा की ब्राह्मणांना तेथे आणण्यापूर्वी या प्रदेशात काही लोक राहत होते. परशुरामाने दख्खन क्षत्रियांचे नेतृत्व केले आणि त्यांना पश्चिम किनाऱ्यावर स्थायिक केले आणि नंतर त्यांच्या अंतिम संस्कारांसाठी त्रिहोत्रातून ब्राह्मण आणले, असे आपण गृहीत धरू शकतो. (संदर्भ : दा कुन्हा, १९९२: स्कंदपुराणांतरगतम् सह्याद्रिखंडम्, चितपावनब्राह्मणोत्पत्ती).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT