Smart City Panaji Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Opinion: निर्बुद्ध प्रशासन

Panaji Smart City Issues: पणजी ही गोव्याची राजधानी नाही, प्रयोगशाळा आहे असे एकदा जाहीर करून टाका. वर्षामागून वर्षे उलटताहेत, गोगलगाय लाजेल इतक्या कूर्मगतीने चाललेल्या ‘स्मार्टसिटी’ प्रकल्पात नियोजनाच्या अभावामुळे कोट्यवधींचा चुराडा झाला आहेच.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी ही गोव्याची राजधानी नाही, प्रयोगशाळा आहे असे एकदा जाहीर करून टाका. वर्षामागून वर्षे उलटताहेत, गोगलगाय लाजेल इतक्या कूर्मगतीने चाललेल्या ‘स्मार्टसिटी’ प्रकल्पात नियोजनाच्या अभावामुळे कोट्यवधींचा चुराडा झाला आहेच; शिवाय नागरिकांच्या मरणयातना थांबलेल्या नाहीत.

आमदार बाबूश मोन्सेरात (MLA Babush Monserrate) यांनी ‘कळ सोसा’ सांगितल्यास वर्ष उलटले. दु:ख कळ सोसण्याचे नाही; गरोदर नसताना कळ सोसली म्हणून कुणी बाळंत होते का? कितीही कळ सोसली म्हणून पणजी स्मार्ट होईल का? अजिबात नाही, कारण त्यासाठी जे करावे लागते ते केलेलेच नाही. ऐन पर्यटन हंगामात शहरातील रस्ते उकरून ठेवणे शहाणपणाचे लक्षण नाही. सांतिनेज तसेच शहरातील अन्य अंतर्गत रस्ते कोणतीही पूर्वकल्पना न देता बंद करण्यात आल्याने वाहन चालकांच्या नाकी नऊ आले आहेत. निर्बुद्ध प्रशासकीय कारभाराचा फटका काल दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला बसला.

पणजीत (Panaji) अभूतपूर्व वाहतूक कोंडी होते म्हणजे काय हे त्यांनी अनुभवले असेल. १८ जून मार्गावर जिथे मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा फसला, त्यासोबत रुग्णवाहिकाही होती. कोंडीमुळे एखाद्या अत्यवस्थ रुग्णाच्या जिवाला धोका पोहोचू शकतो. असा प्रकार दरदिवशी होत आहे. पाटो पुलावर अचानक भर दिवसा वेल्डिंगचे काम सुरू करण्यात आल्याने बराच वेळ तीनही बाजूंनी वाहने अडकून पडली. अशी कामे ऐरणीवर येतात व ती दिवसा वाहतूक वाढलेली असताना करावी लागतात याचाच अर्थ वेळीच लक्ष दिले जात नाही. मुख्यमंत्र्यांना अनुभूती आल्याने स्थितीत काही फरक पडेल, असा वांझोटा आशावाद बाळगण्यास हरकत नसावी!

‘स्मार्टसिटी’चा कंत्राटदार कधी कोठे खड्डे खणून ठेवतो, याचा कुणालाही पायपोस नाही. जिथे रस्ते बंद केले जातात तेथे ना मार्गदर्शक फलक, ना वाहतूक पोलिस. कुणाचा धाक नसल्याने हा अनागोंदी कारभार सुरू आहे. वास्तविक पर्यटन हंगाम सुरू असताना रस्ते फोडायचे काम पुढे ढकलणे आवश्यक होते.

नाताळपासून दरदिवशी वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. कदंब स्थानकापासून पाटो पुलाच्या दिशेने कूच केल्यावर वाहनांच्या रांगा लागतात. इप्सित स्थळी पोहोचायला किती वेळ लागेल याचा भरवसा नाही. ज्याला जशी वाट दिसेल तसा तो पुढे सरकतो. केंद्र सरकारने जून २०१५साली स्मार्टसिटी मिशन सुरू केले. योजनेतून देशातील १०० शहरांचा कायापालट करण्यासाठी नियोजन करण्यात आले.

शहराच्या गरजा काय आहेत, त्यासाठी काय नियोजन करावे लागेल, तसेच नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी काय करता येईल, याचा त्यामागे विचार होता. पणजीत तसा विचार कागदावरच राहिला. परिणामी राजधानीचा श्वास गुदमरतो आहे. नुकताच सेरेंडिपीटी महोत्सव झाला.

देश-परदेशातील हजारो कलाप्रेमी पणजीत दाखल झाले. असे महोत्सव व्हायलाच हवेत; परंतु पणजीतील वाहतूक नियोजन पुरते ढासळले. भविष्यात मोठ्या कार्यक्रमांसाठी पणजी शहराबाहेर कायमस्वरूपी ठिकाण निर्माण करता येते का, हे महानगरपालिकेने पाहणे अगत्याचे आहे. २६ जानेवारीपासून कला अकादमी नजीक लोकोत्सव सुरू होईल. त्या आठ दिवसांच्या कालावधीत वाहतूक कोंडीचा पुनःप्रत्यय येईल.

कांपाल, मिरामार रस्ता पूर्ण ठप्प होऊन जातो. गतवर्षी महापौरांनी अशा समस्येवर उपाय काढण्याचे सुतोवाच केले होते; प्रत्यक्षात अद्याप त्याविषयी पाऊल उचललेले दिसले नाही. ‘इमॅजिन पणजी’सह महापालिकेवर बाबूशसह त्यांचे पुत्र आहेत. प्रश्न सोडविण्याची त्यांच्याकडे इच्छाशक्ती नाही आणि अन्यायाविरोधात ‘ब्र’ काढण्याची पणजीवासीयांत धमक नाही.

‘स्मार्टसिटी’ची कामे पूर्ण करण्यास ३१ मार्चची डेडलाइन वाढवून देण्यात आली आहे. तरीही ती कामे पूर्ण होतील आणि दर्जेदार होतील याची सुतराम शक्यता नाही. बाकी निर्बुद्ध प्रशासनामुळे स्मार्ट सिटी खड्ड्यात गेली तरी ‘इमॅजिन पणजी’ हे नाव ज्या बहाद्दराने दिले त्याच्या कल्पक बुद्धीला दाद द्यायलाच हवी. शेवटी पणजीचे ‘स्मार्ट’ होणे ‘इमॅजिन’च करावे लागणार, प्रत्यक्षात काहीच होणार नाही याचेच ते द्योतक आहे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute Beach: मित्रांसोबतची गोवा ट्रिप ठरली अखेरची! 23 वर्षीय हैद्राबादचा तरुण समुद्रात बुडाला; कळंगुटमधील घटना

Pooja Naik: 'हा तर सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न...' पूजा नाईकच्या आरोपांवर काय म्हणाले आमदार मायकल लोबो?

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; गोवा पोलिसांकडून 1371 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

VIDEO: भारत-पाक सामन्यात 'चिटींग'? खेळाडूनं घेतला जबरदस्त झेल, तरीही पंचानी दिलं नॉट आउट! 'ICC'चा नियम काय सांगतो?

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

SCROLL FOR NEXT