मधू य.ना. गावकर
पृथ्वीच्या निसर्गाला जसा पंचमहाभूतांचा विशाल समन्वय आहे, त्याच प्रकारे मानवी जीवनाशी त्याचा निकटचा संबंध आहे. मानवी शरीर पंचमहाभूतांपासून बनले आहे. आपले शरीर जरी इवलेसे असले, तरी त्याला ब्रह्मांडाची लघू प्रतिकृतीच मानली आहे. माणूस पाण्याने आपले शरीर स्वच्छ करतो, त्याचप्रकारे सृष्टीच्या अंगावरून वाहणारे पाणी तिला संतुलित ठेवण्याचे काम करते.
निसर्गाप्रमाणेच मानवाने तिचे मार्ग व तिला स्वच्छ ठेवणे हे त्याचे कर्तव्य ठरते. ज्ञान हे माणसाचे समृद्ध भांडार आहे, त्यातूनच बुद्धीचा प्रवास सुरू झाला. आधुनिक मानव जीवनासाठी नैसर्गिक संपदेचे अतिरिक्त शोषण करीत आहे. त्यामुळे, त्याचे दुष्परिणाम सजीव आणि निर्जीव सर्वांना भोगावे लागतात. माणसाने अपरिग्रहाची वृत्ती अंगी बाणवली तर वसुंधरा त्याला सर्वतोपरी सुखी, संपन्न बनवू शकते.
माणूस जरी भौतिकदृष्ट्या सुस्वरूपात सुखी होताना दिसला, तरी आंतरिकदृष्ट्या तो दुःखी झालेला पाहावयास मिळतो. हिंसाचार, मानसिक रोग, संघर्ष, द्वेष यांचे प्रमाण आज वेगाने वाढत आहे.
याचे कारण भौतिकवाद, विचारसरणीचा तो दुष्परिणाम आहे, तो निवारण्यासाठी माणसाने सदाचार, सद्गुणी संस्कार उपायांनी पर्यावरणाचे रक्षण करण्याची मोठी गरज आहे. पृथ्वीवरील पाणी म्हणजे विराट जैवविविधतेचा श्वास आहे, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.
संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाची विचारधारा सृष्टीच्या तत्त्वातून प्रकट झाली. विश्वाचा समतोल राखण्यासाठी मानवाला वेळोवेळी पंचतत्त्वांनी मार्गदर्शन केले आहे. पर्यावरणात दडलेल्या मानवी कल्याणाच्या संपत्तीला ओरबाडून नष्ट करण्याचा सपाटा तिच्यावरील मानवानेच लावला आहे.
सृष्टीला सुखमय बनविण्याचा विचार देणारी पंचतत्त्वे माणसातच आहेत. ती त्याला संदेश देतात. त्याच संदेशातून माणूस भूमीला माता मानतो आणि ती माणसाला भूमिपुत्र मानते. या नात्याचे पालन आपण केल्यास दोघांमधील संघर्षाचा प्रश्न उरणार नाही.
मानवाने विज्ञानाला मानून कृषी, आरोग्य, संरक्षण, चिकित्सा यांचा शोध लावून स्वत:स सुरक्षित राखण्याचे उपाय शोधले. वरून खाली वाहत येणारे ओहोळातील पाणी आपली जननी आणि विज्ञान या अजस्र धारा आहेत. ती मानवाच्या भौतिक सुखसुविधा पूर्ण करण्यासाठी साहाय्यक ठरली आहे. आज नैसर्गिक पदार्थ निर्मितीने नवनवीन यंत्रांच्या वापराने ती सृष्टीचा विनाश करतात.
भूमीच्या अंतर्भागातून पेट्रोल, युरेनियम, मँगनीज, आयर्न, कोळसा यांचा वारेमाप उसपा करून, तो वापरल्याने त्याचे प्रदूषण सर्वत्र पसरून शेवटी पाण्यातून वाहत समुद्री भागातील पाण्यात मिसळते. त्याने सर्वच जीवसृष्टीला धोका पोहोचतो. अण्वस्त्र क्षेपणास्त्राच्या निर्मितीने भूमीचा विध्वंस होण्यास ती कारणीभूत ठरतात.
पृथ्वीवरील प्रत्येक नैसर्गिक पदार्थ जैव विविधतेचा रक्षणकर्ता आहे. वृक्ष, ओहळ, नद्या, माती, हवा, पाऊस हे सारे पृथ्वीचे पोषणकर्ते आहेत. त्या पोषणकर्त्याचे रक्षक सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्रे आकाशमंडल आहे. पण तिच्याच अंगावर जन्मलेला मानव इतर पोषक घटक व जीवाश्म यांची हानी करतो.
त्या कारणाने पृथ्वी आणि आकाश मंडलाचा ताळमेळ बसत नाही. पृथ्वीवरील डोंगर, झाडे, नद्या आणि जैविक संपदा निसर्गाबरोबर खेळतात. त्यांचे रक्षण ज्ञानी माणसानेच केले पाहिजे. पाणी, हवा, प्रकाश, आकाश, पृथ्वीचे योग्य प्रकारे पोषण करून तिचे ते रक्षणही करतात. तिच्या रक्षणासाठी सूर्याकडून केवळ आठ मिनिटात त्याची किरणे पृथ्वीवर पोहोचतात असे शास्त्रज्ञ मानतात. सूर्य पृथ्वीचा मोठा रक्षणकर्ता आहे. तो पृथ्वीला प्रकाश देतो आणि तिच्याकडून घेतो ते म्हणजे पाणी होय.
ओहोळांचा उगम शोधत पायी चालत असताना हे विचारचक्र डोक्यात सुरूच होते. त्यामुळे माझी पावले कधी पाळी गावच्या ओहोळांच्या उगमाकडील गवळीवाडा होडलेमळ या डोंगरमाथ्या ठिकाणी पोहोचली ते कळलेच नाही.
या ओहोळाला तळेमाथा आणि गिधाडसडा या दोन डोंगराचे पाणी मिळून गवळीवाडा उगमाकडून घळीतून वनराईला पाणी पुरवत तो आंबेगाळ भागात येतो. आंबेगाळ भागातील परिसरात येथील स्थानिकांच्या पूर्वजांनी मरडशेती केली होती. शिवाय या भागात फणस, आंबा, सुपारी, केळी, कोकम पीक घेतले होते. डिचोली तालुक्याचा पाळी गाव दक्षिण बाजूने शेवटचा भाग. त्या गावाला म्हादईने आपला किनारा देऊन फोंडा, डिचोलीची सीमारेषा आखली आहे. तिच्या काठावर आंबेशी ते तळेमाथ्यापर्यंत मोठमोठी कुळागरे, बागायती पाहावयास मिळतात.
आंबेगाळकडून ओहळ पाळी बाजाराच्या सखल भागात पाणी पुरवठा करतो. तिथली मरडशेती, कुळागर आणि लोकांना पाणी देत खालच्या भागातील देवसू भागात पोहोचतो. तिथल्या कुळागरांना आणि भातेशतीला पाणीपुरवठा करतो.
प्राचीन काळी तिथले कष्टकरी शेतकरी त्या ओहोळात नैसर्गिक बांध घालून आपल्या कुळागरांना पाणी देत होते. देवसू भागात त्याला पूर्व बाजूने उगम पावलेला दुसरा ओहळ खाली येऊन मिळतो. त्याचा उगम पूर्व बाजूच्या डोंगरात मँगनीज खाणींच्या भागात होतो.
त्या डोंगरात निसर्गाने मोठ्या प्रमाणात मँगनीज साठा दिला आहे. या मँगनीज उपशाने आज पाळी गावाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहावयास मिळते. दुसरा ओहळ खाण भागातून खाली रामशेटभाटाकडे पोहचून कुळागर, शेतीला लाल पाणी पुरवत देऊळवाडा परिसरात येऊन तिथला कुळागरी भाग सिंचन करून पारोडा भागातून भल्यामोठ्या सरदवायगण शेतीला पाणी पुरवतो.
देऊस या ठिकाणी मुख्य ओहोळास मिळून तिथला मुख्य रस्ता ओलांडून अंतरशे भागातील कुळागराला पाणी पुरवत पुढे नवरवाडा भागातील कुळागरांना पाणी देतो. म्हादई नदीच्या पात्रात लाल पाणी सोडतो. पाळी गावात आनेगाळ, तळेमाथा, पारोडा, देऊळवाडा, अंतरशे, नवरवाडा, मस्तकवाडा, पंढरीवाडा, तोर्लवाडा, झरकुणे आणि नाईकवाडा भागात तिथल्या पूर्वजांनी त्या ओहोळाच्या शुद्ध पाण्यावर कृषीलागवड करून गाव हिरवळीने सजवला होता.
कुळागरे जिवंत ठेवण्यास कष्टाने बंधारे उभारून त्यात साठवलेले पाणी पाटाने दूरवर नेऊन लाकडी कल्ल्यांच्या आधारे हाताने सिंचन करून कुळागरे जगवली होती. गो-पालनातून तयार झालेले शेणखत देऊन त्या कुळागरांतून मोठे पीक घेतले होते.
दिध, आठवा, पोर्लो, उबिर नावाची सरदवायगण शेती याच ओहोळाच्या पाण्याने पिकवून त्या अन्नावर जगले होते. ओहोळातील गोडी मासळी आणि म्हादई नदीतील तामसा, पाल, शेवटा, केर, काळुंद्र, खेकडा, चोणकूल, झिंगे खाऊन आपले आनंदी आयुष्य जगले होते. आंबा, फणस, काजू, नारळ, सुपारी, मिरी, ओटम, कोकम पिकवून संसार चालवत होते. कुमेरी भागात नाचणी, पाकड, वरी, कांग, कुळीथ, उडीद लागवडीने सुपीक कडधान्ये पिकवीत होते.
फणस म्हटला की संपूर्ण गोव्यात पाळी आणि वांते गावांची आठवण होते. अनेक प्रकारच्या फणसांच्या जाती या दोन गावांना निसर्गाने भेट दिल्या आहेत. तिथले फणस सुगंध पसरविणारे व माधुर्याबाबतीत उसाच्या रसाला मागे टाकणारे आहेत. पिवळा, कापा, रसाळ त्यांना बाजारात मोठी मागणी होती.
आज या गावाला पाहिल्यास चारही दिशांनी मँगनीज खाणींनी विळखा घालून संपवले आहे. पूर्वजांनी नवदुर्गेचे नाव घेत कष्टाने निर्माण केलेला पाचूचा पाळी गाव, तिथली शेती; डोंगरांची छाती फोडून त्यांच्या हृदयातील लाल रक्ताने (मातीने) माखून ठेवल्याने आज तिथला कष्टकरी समाज गंजलेले ट्रक आणि पोकलीन दारात ठेवून दुःखी अंत:करणाने वावरत असलेला पाहावयास मिळतो.
संपत्ती आणि समृद्धी यात कायम फरक असतो. पाळीतील स्थानिकांच्या पूर्वजांकडे संपत्ती नव्हती पण ते समृद्ध होते. खाऊन पिऊन सुखी होते. मँगनीजच्या भस्मासुरास स्वत:च्या डोक्यावर हात ठेवायला देऊन पाळीच्या ग्रामस्थांनी संपत्ती मिळवली खरी, पण त्यांच्यावर समृद्धी घालवण्याची पाळी आली. आज तर परिस्थिती अशी आहे की, संपत्तीही नाही आणि समृद्धीही नाही. येथील लोकांनी केवळ गंजलेल्या पत्र्याचे ट्रकच नव्हे तर त्यातून गंजलेले ‘पांत्राव’पणही झाकून ठेवले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.