Deepak Dhavlikar, Pramod Sawant  Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Politics: आगामी निवडणुकीत भाजप-मगो युती राहील का?

Goa BJP MGP Alliance: मुख्यमंत्री सध्या युतीत असलेल्या मगो पक्षाला खेळवत, डिवचत आहेत. ‘देतो त्या जागा घ्या नाही तर युतीतून हद्दपार व्हा’, असा इशारा त्यांच्या बोलण्यातून व्यक्त व्हायला लागला आहे.

Sameer Panditrao

मिलिंद म्हाडगुत

सध्या मगो पक्ष हा गोवा सरकारचा एक घटक आहे. मगो पक्षाचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर हे वीज मंत्री आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप व मगो पक्षाची युती होईल असा अंदाज व्यक्त होत होता. तसे संकेत मगो नेत्यांकडूनही मिळत होते.

पण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकत्याच केलेल्या काही भाषणातून वेगळाच अर्थ प्रतीत व्हायला लागला आहे. मांद्रे मतदारसंघ सध्या मगो पक्षाकडे आहे. पण, तिथे आगामी निवडणुकीत कमळ फुलणार अशा प्रकारचे वक्तव्य नुकतेच मुख्यमंत्र्यांनी आपल्या मांद्रे मतदारसंघातील एका भाषणात केले.

यावर मगो पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी मांद्रेतील भाजप कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याकरता म्हणून मुख्यमंत्री तसे बोलले असावेत, असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असला तरी पडद्यामागे वेगळेच मोहरे नाचत असल्याचा संशय निर्माण झालाच. आता नुकतेच मुख्यमंत्र्यांनी प्रियोळ मतदारसंघातही परत तेच वक्तव्य केल्यामुळे या संशयाला अधिकच बळकटी प्राप्त झाली आहे.

प्रियोळात तर मुख्यमंत्री अधिक आक्रमक झालेले वाटत होते. ज्यांना युतीत राहायचे असेल त्यांनी राहावे नाहीतर आताच जावे, पण प्रियोळात येत्या निवडणुकीत कमळ फुलणारच असा सूचक इशारा त्यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवू पाहणार्‍या मगोला दिला आहे. यातून भाजपला आता मगो पक्षाची जरुरी राहिलेली नाही, असे समजायचे का? तसे पाहू गेल्यास मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यात काही चूक आहे असे नाही.

सध्या मगो पक्षाचे फक्त दोनच आमदार आहेत. २८आमदारांचे सज्जड बळ असलेल्या भाजपला या दोन आमदारांची जरुरी आहे, असेही नाही. तीच गोष्ट आगामी विधानसभा निवडणुकीसही लागू पडते. एक मडकई सोडल्यास मगोला पूरक असलेल्या इतर मतदारसंघात भाजपही तेवढाच प्रबळ आहे.

म्हणूनच तर मागच्यावेळी युती नसूनसुद्धा प्रियोळ, फोंडा, शिरोडा, पेडणे या मतदारसंघात भाजपने बाजी मारली होती. राहता राहिला प्रश्न मांद्रे मतदारसंघाचा; तिथेही मगोचा स्वबळावर विजय झालेला नाही. तिथे मगो जिंकू शकला तो माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिल्यामुळे हेही सर्वज्ञात आहे. या वस्तुस्थितीचे पडसादच मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून उमटताहेत.

खरे तर प्रियोळ, फोंडा, मांद्रे, पेडणे यांसारखे मतदारसंघ मगोला देणे भाजपला बिलकूल परवडणारे नाही. मांद्रे मतदारसंघात जरी मगोचा आमदार असला तरी या मतदारसंघात सध्या भाजपमधून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुक आहेत. इतरांचे सोडा मगोचा विद्यमान आमदार जीत आरोलकर सुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.

आगामी निवडणुकीत आरोलकर भाजपचे उमेदवार असू शकतात, असा कयास त्यामुळेच व्यक्त केला जात आहे. फोंड्यात तर सध्या भाजपच्या उमेदवारी करता दोन उमेदवार इच्छुक असल्याचे बघायला मिळत आहे. यामुळेच कृषिमंत्री रवि नाईक यांचे पुत्र रितेश आणि नगरसेवक विश्वनाथ दळवी यांच्यात भाजपच्या उमेदवारी करता तीव्र स्पर्धा लागल्याचे दृश्य बघायला मिळत आहे.

त्यामुळे हा मतदारसंघ भाजप लढवणार हे जवळजवळ निश्चित आहे. तीच गोष्ट भाजपचे आमदार असलेल्या शिरोडा, पेडणे, सावर्डे यांसारख्या मतदारसंघांची. त्यामुळे सगळ्या शक्यता तपासता, युती झालीच तर हव्या असलेल्या मतदारसंघांपैकी मगोच्या पदरात फक्त मडकई हा एकमेव मतदारसंघ पडू शकतो. आणि इतर मतदारसंघ हवे असल्यास भाजप मगोला सासष्टीतील कॅथलिकबहुल असलेले मतदारसंघ देऊ शकतो, ज्याचा मगोला कोणताही फायदा होणार नाही.

मडकई, फोंडा, सावर्डे, प्रियोळ, डिचोली, मांद्रे, पेडणे, डिचोली, मये या मतदारसंघातच मगोची खरी ताकद आहे. पण एक मडकई वगळता सध्याच्या परिस्थितीत भाजप मगोला या मतदारसंघांपैकी एकही मतदारसंघ देईल असे वाटत नाही. त्यात परत सध्या गोवा भाजपचा आत्मविश्वास भलताच दुणावला आहे.

कोणत्याही परिस्थितीत आपण सरकार स्थापन करू शकतो असा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे. याची सुरुवात झाली ती २०१७सालापासून. तेव्हा भाजपचे १३ आमदार निवडून येऊनसुद्धा मनोहर पर्रीकर यांनी सरकार स्थापन केले ते याच आत्मविश्वासाच्या जोरावर. आता तर डॉ. प्रमोद सावंत दोन पावले पुढे जाऊ लागले आहेत.

विरोधी पक्षातील आमदारांना भाजपच्या वळचणीला कसे आणायचे याचा फॉर्म्युला त्यांनी आत्मसात केला आहे. त्यामुळेच कोणाची फिकीर करण्याची त्यांना गरज वाटत नाही. हीच ‘गरज नसण्या’ची दर्पोक्ती भाषणांतून दरवळत आहे. अभिमान आणि गर्व यात पुसट रेषा असते; राजकारणात तरी ती ओलांडू नये, असा अलिखित नियम आहे. कारण, कुणाला कुणाची कुठे, किती व केव्हा गरज लागेल हे कुणीही खात्रीपूर्वक सांगू शकत नाही.

शेवटी सगळ्या नद्या कशा सागरला मिळताहेत तसे विरोधी पक्षांचे व्हायला लागले आहे. भाजप हाच त्यांचा किनारा बनायला लागला आहे. याचा प्रत्यय घडोघडी येत आहे. याची खात्री असल्यामुळे मुख्यमंत्री ‘बिनधास्त’ व्हायला लागले आहेत.

समजा आगामी निवडणुकीत मगो भाजप युती झाली नाही आणि मगोने दोन वा तीन जागा जिंकल्या तर मगो भाजपच्या छावणीत येणार याची मुख्यमंत्र्यांना खात्री आहे. भाजपला पर्याय ठरू शकेल ती काँग्रेसही सध्या गलितगात्र अवस्थेत आहे. काँग्रेससोबत सत्ता स्थापन करून भाजपला शह देणेही सध्या तरी अशक्य वाटते. त्यामुळे, भाजपसोबत जुळवून घेण्याशिवाय तसा दुसरा कोणताही पर्याय सध्या मगोकडे राहिलेला नाही, हेही ते सध्या जाणून आहेत.

त्यातही एक शक्यता म्हणून समजा आगामी निवडणुकीत काँग्रेसने थोडीफार बाजी मारली, तरी त्यांना वेसण कसे घालायचे याचीही चांगली माहिती भाजपकडे आहे. त्यामुळेच ते सध्या युतीत असलेल्या मगो पक्षाला खेळवत, डिवचत आहेत.

‘युती पाहिजे असेल तर, देतो त्या जागा घ्या नाहीतर युतीतून हद्दपार व्हा’, असा इशारा यामुळेच त्यांच्या बोलण्यातून व्यक्त व्हायला लागला आहे. केंद्रात भाजपचे सरकार असल्यामुळे त्यांच्या या बोलण्याला हायकमांडचा पाठिंबा असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. इतर राज्यांकडे पाहिल्यास जिथे जिथे स्थानिक पक्ष कमजोर झाले, तिथे तिथे भाजपने त्यांचे पंख छाटण्यास सुरुवात केली. गोव्यातही तेच सुरू आहे.

या वक्तव्यापुरता विचार करायचा झाल्यास, मुख्यमंत्र्यांनी चेंडू मगोच्या रिंगणात टाकला आहे. ‘काय तो निर्णय आताच घ्या’, असे सांगून निवडणुकीच्या उंबरठ्यावर बाशिंग बांधणार्‍यांनाही त्यांनी सूचक इशारा दिला आहे. हा इशारा देताना मुख्यमंत्र्यांनी येत्या डिसेंबरमध्ये होणार्‍या झेडपी, तसेच पुढील वर्षी होणार्‍या नगरपालिका निवडणुकांचाही उल्लेख केला आहे.

आहे की नाही एका दगडात अनेक पक्षी मारण्याची मुख्यमंत्र्यांची धूर्त पद्धत? मुख्यमंत्र्यांनी जरी चेंडू मगोच्या रिंगणात टाकला असला, तरी मगोला तो टोलवता येणार नाही. तो टोलवायचा असेल तर हातात असलेले मंत्रिपद सोडावे लागेल. सध्या तरी ही कृती त्यांना परवडणारी नाही. सुदिन ढवळीकर व केतन भाटीकर यांनी दिलेल्या सावध, बचावात्मक प्रतिक्रियेवरून हेच लक्षांत येते.

मगोने पक्ष संघटन अधिक मजबूत केले, प्रत्येक बूथचा विचार करून ठाम कार्यकर्ते व ठोस कार्यक्रम राबवला तर कदाचित काही बदल घडेल. केवळ जिंकून येणार्‍या उमेदवारांवर अवलंबून न राहता, पक्ष संघटन तळागाळात रुजवणे हा चांगला पर्याय ठरू शकेल. अद्याप ‘सिंहा’ला मानणारे ज्येष्ठ मतदार आहेत. स्वबळ वाढवायचे की, दावणीला बांधून घ्यायचे हा खरा महत्त्वाचा प्रश्न - मुख्यमंत्र्यांनी टाकलेल्या पेचापेक्षाही - मगोसमोर आहे. आता या पेचाला हा पक्ष कसा सामोरा जातो याचे उत्तर मात्र येणारा काळच देऊ शकेल, एवढे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT