

पणजी: गोवा सरकारकडून गेल्या दहा वर्षांत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह (इफ्फी) गोव्याचाही विकास साधण्यात आला. राज्याला देशाची सर्जनशील राजधानी आणि चित्रपट निर्मिती हब बनवण्याचे प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारकडून सातत्याने सुरू आहेत. गोव्याची आणि देशाची संस्कृती इफ्फीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्याच्या अनुषंगानेच यंदाच्या महोत्सवाचे उद्घाटन भव्य चित्ररथ मिरवणुकीने करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
५६ व्या इफ्फीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. पणजीतील जुन्या गोमेकॉ इमारतीसमोर थाटलेल्या प्रशस्त मंचावर राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री डॉ. सावंत, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, दिग्दर्शक तथा इफ्फीचे संचालक शेखर कपूर, अभिनेते अनुपम खेर, तेलगु अभिनेते बालकृष्ण, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर ब्राझिलियन ‘दी ब्ल्यू ट्रेल’ या चित्रपटाने महोत्सवास सुरुवात झाली.
इफ्फीच्या उद्घाटनानंतर चित्रपट रसिकांचे आकर्षण असलेल्या चित्ररथ मिरवणुकीस सुरुवात झाली. गोव्याच्या चित्रपट संस्कृतीचे दर्शन घडवणारे ११ आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (एनएफडीसी) १२ असे एकूण २३ चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते.
१.आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने गोव्यात कायमचा मुक्काम ठोकल्यापासून प्रत्येक वर्षी महोत्सवामध्ये वेगवेगळे बदल करण्यात येत आहेत. महोत्सवासाठी जगभरातून गोव्यात येणाऱ्या चित्रपट रसिकांसाठी आवश्यक त्या साधनसुविधा उभारण्यात येत आहेत. त्यामुळे महोत्सवाचा दर्जा वाढत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
२.यंदाच्या महोत्सवाचा ‘कंट्री फोकस’चा मान जपानला मिळाला असून, जपान आणि भारतात पूर्वीपासूनच सांस्कृतिक संबंध आहेत. त्याचा फायदा दोन्हीही देशांमधील कलाकारांना होत असल्याचे त्यांनी सांगितले.
३.गोव्यातील चित्रपट कलाकारांना इफ्फीचा मोठा फायदा मिळत आहे. राज्यातील अधिकाधिक चित्रपट इफ्फीत झळकावेत, यासाठी राज्य सरकार दिग्दर्शकांना आर्थिक पाठबळ देत आहे. निसर्ग सौंदर्य लाभलेल्या गोव्यात दरवर्षी अनेक चित्रपटांचे चित्रिकरण केले जाते.
४.त्यामुळे चित्रिकरणास ‘एक खिडकी’ योजनेअंतर्गत तत्काळ मंजुरी देण्यात येत आहे. त्यामुळे जगभरातील दिग्दर्शकांनी गोव्यात येऊन आपल्या चित्रपटांचे चित्रिकरण करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.