तेनसिंग रोद्गीगिश
आधीच्या लेखांत आपण पाहिले आहे की गोव्यातील ख्रिश्चन समाजात दख्खन क्षत्रिय आणि कुणबी या ओळखी नीटपणे वेगळ्या ठेवण्यात आल्या होत्या. गोव्यात क्षत्रियांत ‘चाड्डी’ असे वेगळेपण केले गेले, तर मराठी भाषिक प्रदेशांत या सर्वांना ‘मराठा’ या एकाच नावाने संबोधले गेले.
‘मराठा’ म्हणजे नेमके कोण, यात पुरेशी स्पष्टता नाही. देशपांडे यांच्या मतानुसार, हा शब्द प्राचीन युद्धकलेत निपुण समाजाशी निगडीत आहे. या क्षात्रपरंपरेचे सर्वाधिक प्रभावी प्रतीक म्हणजे शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व!
आधुनिक महाराष्ट्रात ही संज्ञा राजकीयदृष्ट्या प्रभुत्व असलेल्या उच्चवर्णीय गटाचे द्योतक ठरली आहे. (संदर्भ : देशपांडे, २००३ : कास्ट एज मराठा : सोशल कॅटगरीज, कलोनिअल पॉलिसी अँड आयडेन्टिटी इन अर्ली ट्वेंटिएथ सेन्च्युरी महाराष्ट्र, इंडियन इकॉनॉमिक अँड सोशल हिस्ट्री रिव्ह्यू, ३).
‘मराठा’ या नावातच लढाऊ वृत्ती एकवटली आहे. इस्लामी आक्रमणाच्या वाढत्या प्रभावाला प्रतिकार करण्यासाठी अनेक जाती या नावाखाली एकवटल्या. नंतरच्या काळात इंग्रजांच्या नागरी व सैनिकी सेवेद्वारे सामाजिक उन्नती साधण्यासाठी याचा उपयोग झाला.
स्वातंत्र्योत्तर काळात निवडून येऊन राजकारणात वर्चस्व मिळविण्यासाठी ही ओळख प्रभावी साधन ठरली. मराठा म्हणजे नेमके कोण, याचा गोंधळ उडण्यामागेही हीच कारणे आहेत. गोव्यातील हिंदूंनी ‘चाड्डी’ या नावाऐवजी ‘मराठा’ ही संज्ञा स्वीकारली, आणि मराठी प्रदेशाबाहेरील इतर समाजांनीही याच धर्तीवर उच्च, पण अब्राह्मणी ओळख निर्माण करण्यासाठी हा नमुना अनुसरला.
बहुतेक मराठी सैन्यवर्गातील उच्चपदस्थांनी राजपूत वंशाचा आणि ‘शहाण्णव कुळी’ वंशावळीचा दावा केला. परंतु पश्चिम भारतातील मोठ्या संख्येने असलेले कुणबी शेतकरी जे मराठा सैन्यांमध्ये सेवेवर होते; कॉन्स्टेबल यांनी याला ‘क्षत्रियीकरण’ असे म्हटले आहे. (संदर्भ : कॉन्स्टेबल, २००१ : द मार्जिनलायझेशन ऑफ अ दलित मार्शिअल रेस इन द लेट नाइन्टीन्थ अँड अर्ली ट्वेन्टिएथ सेन्च्युरी वेस्टर्न इंडिया, जर्नल ऑफ एशिअन स्टडीज, खंड ६०, क्र. २, ४४२).
म्हणूनच ‘मराठा’ या संकल्पनेत दख्खन क्षत्रिय आणि कुणबी दोघांचाही समावेश होतो. परंतु या संज्ञेची व्याख्या काळानुसार बदलत राहिली आणि ती राजकीय प्रवाहांनुसार हलत-बदलत गेली. एका बाजूला ब्राह्मण होते जे मराठा हा उपाधी स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत होते, तर दुसऱ्या बाजूला ब्राह्मणविरोधी जाती एका छत्रछायेखाली येण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यामुळे सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक स्तरावर ‘मराठा’ ही ओळख नेहमीप्रमाणेच वादग्रस्त राहिली.
आश्चर्याची बाब म्हणजे मानववंश शास्त्रज्ञांनी मराठ्यांच्या मूळ भारतीय आणि नजीकच्या पूर्वेतील (इराणीय) वंशपरंपरेचा उल्लेख अगदी अलीकडच्या काळात केला. उदाहरणार्थ रिस्ले लिहितो:
पश्चिम भारतातील स्कायथो-द्राविडी प्रकार, ज्यात मराठा ब्राह्मण, कुणबी आणि कोर्ग (कूर्ग) यांचा समावेश आहे; हा बहुधा स्कायथियन व द्राविडियन घटकांच्या मिश्रणातून तयार झाला असावा. ज्यापैकी स्कायथो घटक उच्च जातींमध्ये जास्त प्रमाणात आढळतो आणि तर द्राविडी घटक खालच्या जातींमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. डोके रुंद आहे; उजळ त्वचा, चेहऱ्यावरले कमी केस, मध्यम उंची, मध्यम व निमुळते नाक. (संदर्भ : रिस्ले, १९१५ : द पीपल ऑफ इंडिया, ३३).
रिस्लेचे निरीक्षण भौगोलिक वैशिष्ट्यांवर आधारित होते. तो पश्चिमी दख्खनचे रहिवासी, म्हणजेच मराठी भाषिक लोक यांबद्दल लिहीत होता. परंतु ‘मराठा ब्राह्मण’ ही संज्ञा काहीशी गोंधळात टाकणारी आहे. तसेच ‘स्कायथियन’ हा शब्द वापरणे काही अंशी योग्य नाही असेही म्हटले जाते.
सुमारे ८००० ई.स.पूर्व ते २००० ई.स.पूर्व या काळात मूलभूत दोन जाती/जातीय गट भारतात आले; त्यापैकी आधीचा गट नजीकच्या पूर्वेतील (इराणातील झाग्रोस पर्वतरांगेच्या परिसरातून) आला, तर नंतरचा गट मध्य आशियाई स्टेप्समधून आला. आपण पहिल्याला ‘क्षत्रिय’ आणि दुसऱ्याला ‘ब्राह्मण’ असे संबोधतो.
‘आर्य’ आणि ‘इंडो-युरोपियन’ या संज्ञांसारखेच ‘स्कायथियन’ हा शब्दही क्षत्रिय आणि ब्राह्मण यांमधील वेगळेपण ठळकपणे दाखवत नाही, असे दिसते. मराठा (दख्खन क्षत्रिय) आणि कुणबी दोघांनाही देशी भारतीय घटकाबरोबरच नजीकच्या पूर्वेतील (इराणीय) वंशपरंपरेचा प्रभावही आहे. रिस्लेने जे वाक्य लिहिले ते बरोबर आहे: ‘उच्च जातींत (दख्खन क्षत्रिय) स्कायथियन घटक प्रबळ आहे, तर खालच्या जातींत ( कुणबी) द्राविडी घटक प्रबळ आहे.’
परंतु लक्षांत घेण्यासारखी बाब म्हणजे ‘चाड्डी’ ही संज्ञा केवळ दख्खन क्षत्रियांना सूचित करते, तर ‘मराठा’ या संज्ञेत बहुतांशी दख्खन क्षत्रिय आणि कुणबी या दोघांचाही सामावेश होतो.
१७व्या शतकापर्यंत गोव्याती हिंदू क्षत्रिय स्वत:स ‘चाड्डी’ म्हणवत असत. केवळ शिवाजी महाराजांच्या उदयामुळे आणि ‘मराठा’ या उपाधीला प्रतिष्ठा प्राप्त झाल्यानंतरच गोव्यातील हिंदूंनी मराठा ही संज्ञा स्वीकारली. (संदर्भ : पिसुर्लेकर, १९३६ : अ एलमेंत हिंदू द कास्त चाड्डो, अ ओरिएन्त पोर्तुगीज, खंड ३०, २०४).
मराठे आणि इंग्रज या दोन्ही सत्तांनी आपल्या सैन्यासाठी स्थानिकांची मोठ्या प्रमाणावर भरती केली. या भरतीसाठी निकष ठरवला गेला तो म्हणजे ज्यांना ‘मार्शिअल रेसिस’ (योद्ध्यांचा समुदाय) असे संबोधले जात होते.
वर्णव्यवस्थेनुसार क्षत्रिय हे स्वाभाविकपणे ‘मार्शिअल रेसिस’ या निकषांत बसत होते; त्यांचे राजपूत-क्षत्रिय नाते हे या विश्वासाला आणखी पुष्टी देणारे ठरले. आणि स्थानिक क्षत्रिय सरदारांनी आपल्या फौजांमध्ये ज्या कुणब्यांची भरती केली होती, ते नंतर आपोआप मराठा तसेच इंग्रज सैन्याचा अविभाज्य भाग बनले. यालाच पुढे ‘नोकरी’ म्हणून ओळखले गेले.
परंतु पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली असे काही घडलेच नाही. सह्याद्रीपलीकडील कोकणाप्रमाणे गोव्यातील स्थानिक सरदार युद्धांसाठी ख्यातकीर्त नव्हते; त्यांनी मोठ्या फौजा उभ्या केल्या नाहीत. सैन्याला लागणारे मजूरसुद्धा ते पुरवत नसत. त्यामुळे कुणब्यांना क्षत्रियांत सामावून घेण्याची, आणि त्यायोगे क्षत्रिय होण्याची संधी येथे जवळजवळ अस्तित्वातच नव्हती.
गोव्यातील पोर्तुगीज सैन्याचा मोठा भाग हा पोर्तुगालमधून आणलेल्या पलटणींवर आधारित होता. सुमारे १६७०च्या आसपास स्थापन झालेल्या ‘इंडियन आर्मी’तही पोर्तुगीज वंशाच्या लोकांचाच भरणा होता. प्रारंभीच्या काळात पोर्तुगिजांचे कोणतेही नियमित व कायमस्वरूपी सैन्य भारतात नव्हते; विस्तार आणि संरक्षणासाठी लागणाऱ्या लष्करी गरजा दरवर्षी मान्सूनसोबत राज्यातून येणाऱ्या फौजांद्वारे पूर्ण केल्या जात; त्यात काही स्थानिक पोर्तुगीज वंशाचे भरती केलेले सैनिक जोडले जात. (संदर्भ : रॉद्रिगीश, २०१८ : सोल्स, स्पाइसीस अँड सेक्स - स्ट्रगल फॉर युरोपियन असेन्डन्सी इन पोर्तुगीज इंडिया, १०९).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.