Manohar Parrikar Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Manohar Parrikar: देशाचे तिसरे मानाचे पद भूषवलेले लोकप्रिय नेते! गोव्याच्या राजकारणातला दीपस्तंभ 'मनोहर पर्रीकर'

Manohar Parrikar Opinion: राज्य अपंग झाल्यासारखे वाटत असल्यामुळे ‘भाई आज असायला हवे होते’, असे वाटणे साहजिकच आहे. लोकांच्या मनाचा कानोसा घेतल्यास तसे पडसाद उमटताना दिसतात यात शंकाच नाही.

Sameer Panditrao

मिलिंद म्हाडगुत

आजचा दिवस, १७ मार्च हा गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचा सहावा स्मृतिदिन. पर्रीकर आज हयात नसले तरी ते अनेकांच्या मनातील ‘मर्मबंधातील ठेव’ बनले आहेत यात शंकाच नाही.

पर्रीकरांचे सर्वांत मोठे कार्य म्हणजे त्यांनी भाजप पक्ष गोव्यात रुजवला. एकेकाळी ही गोष्ट अशक्य वाटत होती. त्यावेळी राज्यात मगो पक्ष ‘मी’ म्हणत होता. मगो व भाजपची विचारसरणी समान असल्यामुळे भाजपचा गोव्यातील विधानसभेत प्रवेश होणे हे अनेकांना अशक्यप्राय वाटत होते. पण पर्रीकरांनी मगोलाच शिडी करून ही अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवली. त्याकरता त्यांनी १९९४साली मगोशी युती केली.

त्या साली मगोचे १२ तर भाजपचे चार आमदार निवडून आले आणि भाजपचा विधानसभेत चंचुप्रवेश झाला. चारच आमदार असल्यामुळे भाजप तसा दुय्यमच होता. पण पर्रीकरांनी चार आमदार असूनसुद्धा किल्ला लढविला. त्यांच्या परिश्रमामुळे १९९९साली भाजपचे १० आमदार निवडून येऊ शकले आणि मगोची चार आमदारांपर्यंत घसरण झाली आणि इथूनच भाजपने मगोला ’ओव्हरटेक’ करायला जी सुरुवात केली ती आजपर्यंत कायम आहे.

त्यानंतर २०००साली तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या रवि नाईकांच्या साहाय्याने पर्रीकर मुख्यमंत्री झाले. वास्तविक रवि त्यावेळी अकरा आमदार घेऊन भाजपमध्ये आले होते, त्यामुळे फक्त दहा आमदार असलेल्या व मुख्य म्हणजे मंत्रिपदाचाही अनुभव नसलेल्या पर्रीकरांना त्यांनी मुख्यमंत्री का केले, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.

पण तेव्हापासून पर्रीकरांनी जी गोव्याच्या राजकारणावर पकड बसविली ती शेवटपर्यंत कायम ठेवली. पर्रीकर हा परवलीचा शब्द बनायला लागला. २००२साली ऐनवेळी रवि परत काँग्रेसमध्ये जाऊनसुद्धा पर्रीकरांनी सत्ता काबीज केलीच.

यादरम्यान २००४साली त्यांनी गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे इफ्फी गोव्यात आणला. खरे तर ते एक मोठे आव्हानच होते. जेव्हा गोव्यात इफ्फी आणण्याचा करार झाला होता तेव्हा केंद्रात भाजपचे सरकार होते. पण लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यामुळे गोव्यात इफ्फी येईल की नाही, याबद्दल शंका वर्तविल्या जाऊ लागल्या. त्यात परत इफ्फीला पूरक अशा साधनसुविधाही गोव्यात उपलब्ध नव्हत्या.

पण पर्रीकरांनी रात्रीचे दिवस करून या साधनसुविधा निर्माण केल्या. अखेर २८ नोव्हेंबर २००४ रोजी गोव्यात इफ्फीचे आगमन झाले. हा पहिला इफ्फी ’न भूतो न भविष्यति’ असाच होता. इफ्फीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ९ डिसेंबरला तर पणजीत तब्बल लाख-दीड लाख लोकांचा जनसमुदाय जमला होता. मात्र एवढे होऊनही जानेवारी २००५ मध्ये काही भाजप आमदारांनी दगा दिल्यामुळे पर्रीकरांचे सरकार कोसळले.

पण पर्रीकर डगमगले नाहीत आणि त्यांना डगमगणे परवडणारेही नव्हते. शेवटी ते भाजपचे कप्तान होते. दिगंबर कामतांसारखा विश्वासू साथीदार भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेल्यामुळे ते थोडे विचलित झाले असले तरी फिनिक्स पक्षासारखी त्यांनी राखेतून उडी घेतलीच. २००७ साली १४ जागा मिळाल्यामुळे भाजप सत्तेत येऊ शकला नसला तरी पर्रीकरांची गोव्याच्या राजकारणावरची पकड तशीच राहिली.

विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी विधानसभा गाजवून सोडली. त्याचा परिणाम २०१२साली झाला. एका बाजूला प्रशासनातील ढिलाईमुळे काँग्रेस कमकुवत बनायला लागली होती, तर दुसऱ्या बाजूला पर्रीकरांचा प्रभाव वाढायला लागला होता. त्यावर्षी पर्रीकर मुख्यमंत्री व्हावे म्हणून अल्पसंख्याकांनीसुद्धा भाजपला मतदान केले होते. यामुळे भाजप प्रथमच बहुमताने सत्तेत येऊ शकला.

हा पर्रीकरांचा करिश्मा होता. पण मुख्यमंत्री म्हणून पर्रीकराना फक्त अडीच वर्षे मिळू शकली. या दरम्यान त्यांची देशाच्या संरक्षण मंत्रिपदावर निवड झाली. २०१७साली झालेल्या निवडणुकीत भाजपची लोकप्रियता घटू लागल्याचे त्यांना मिळालेल्या १३ जागांवरून प्रत्ययास आले.

पण तरीही पर्रीकरानी गोवा फॉरवर्ड, मगो अशा भिन्न विचारसरणीच्या पक्षांची मोट बांधून सरकार स्थापन केलेच. अर्थात याला १७ जागा मिळवूनसुद्धा सरकार स्थापनेत चालढकल करणारी काँग्रेसदेखील तेवढीच जबाबदार होती. पण संरक्षण मंत्रिपद सोडून पर्रीकरांनी परत एकदा राज्याच्या कप्तानाची भूमिका निभावली आणि शेवटचा श्वास घेईपर्यंत त्या भूमिकेला न्याय दिला.

पर्रीकरांचा वचकच असा असायचा की त्यांना मंत्री, आमदारांबरोबर सरकारी अधिकारीही वचकून असायचे. त्यांच्याकडे एक प्रकारची दूरदृष्टी होती. ते फार पुढचा विचार करत असत. याचकरता भाजप ‘हायकमांड’चा त्यांच्यावर पूर्ण विश्वास असायचा. म्हणूनच तर त्यांना देशाचे संरक्षण मंत्रिपद मिळू शकले.

गोव्यासारख्या छोट्या राज्याच्या नेत्याला देशाचे तिसरे मानाचे पद मिळावे यातूनच पर्रीकरांची महानता अधोरेखित होते. गोव्याच्या भाजपबद्दल बोलायचे तर पर्रीकर हेच त्यांचा शेवटचा शब्द असायचे. त्यांच्या निर्णयात पंतप्रधान मोदी असो वा अमित शहा असो, कोणी कधीच हस्तक्षेप केला नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्री म्हणून सुरुवातीचे पर्रीकर व २०१२ साली नंतरचे पर्रीकर यात बराच फरक आढळतो हेही तेवढेच खरे.

सुरुवातीच्या वर्षांत पर्रीकरांची जी पकड होती ती या काळात थोडीशी शिथिल झाल्यासारखी वाटली. रोखठोक बोलणे हाही त्यांचा स्वभाव असायचा. त्यामुळे काही जण दुखवलेही जायचे. पण त्यांच्या व्यापक इमेजमुळे ते खपून जात असे. त्यांनी कधीच स्वार्थाचे राजकारण केले नाही. ‘फॅमिली राज’पासून तर ते नेहमीच दूर राहिले.

नाही तर त्यांचा पुत्र उत्पल तेव्हाच म्हापसा मतदारसंघाचा आमदार झाला असता आणि पर्रीकरांच्या निधनानंतर भाजपने ज्याप्रकारे उत्पलची परवड केली तीही झाली नसती. आज राज्याच्या प्रत्येक क्षेत्रात प्रशासन अपंग झाल्यासारखे वाटत असल्यामुळे ‘भाई आज असायला हवे होते’ असे वाटणे साहजिकच आहे. लोकांच्या मनाचा कानोसा घेतल्यास तसे पडसाद उमटताना दिसतात यात शंकाच नाही.

खरे तर पर्रीकर हे एक ‘टॉवरिंग’ व्यक्तिमत्त्व होते. गोव्याच्या राजकारणाचा इतिहास पाहिल्यास सुरुवातीचे भाऊसाहेब बांदोडकर व मध्यंतरीचे थोडेफार रवि नाईक हे दोन अपवाद सोडल्यास राजकारणावर एकहाती प्रभाव सोडणारा पर्रीकरांसारखा दुसरा नेता दिसतच नाही. त्यामुळे त्यांना पर्याय सापडणे कठीणच.

गोव्याचा भाजप म्हणजे पर्रीकर असे जे समीकरण त्या काळात रुजले होते ते उगाच नव्हे. पर्रीकर हे रविंसारखे बहुजन समाजाचे नेते बनू शकले नाहीत, असे जरी म्हटले जात असले तरी गोव्याला राज्याचा दर्जा मिळाल्यानंतरचे ते नंबर वन मुख्यमंत्री आहेत यात दुमत असण्याचे कारणच नाही.

आज भाजप बराच विस्तारला आहे. ’पार्टी विथ डिफरन्स’ आणि ‘काँग्रेसमुक्त भारत’ म्हणता म्हणता तो ’काँग्रेसयुक्त भाजप’ झाला आहे. त्यामुळेच उमेदवारीच्या काळात ज्या भाजप कार्यकर्त्यांनी पोटतिडकीने काम केले होते त्यांच्यावर आता ’हेचि फळ काय मम तपाला?’ म्हणण्याची पाळी आली आहे. ज्यांनी त्यावेळी भाजपवर जहाल टीका केली होती ते आज मानाची स्थाने बळकावून बसलेले दिसत आहेत.

त्यामुळेच आज पर्रीकरांच्या आठवणी या अशा कार्यकर्त्यांसाठी आसरा बनल्या आहेत. तसे आजही राज्याच्या प्रत्येक क्षेत्रात पर्रीकरांच्या आठवणी घुमताना दिसतातच. त्यामुळे गोव्याच्या दृष्टीने पर्रीकर हे एखाद्या दीपस्तंभासारखे वाटताहेत. या ’दीपस्तंभा’ने दाखविलेल्या प्रकाशात आजच्या राजकारण्यांना वाटचाल करण्याची बुद्धी होवो, हीच त्यांच्या पुण्यतिथीदिनी प्रार्थना!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: बेघरांसाठी गोव्यात नवी गृहनिर्माण योजना: मुख्यमंत्र्यांची घोषणा

स्वप्न नव्हे, सत्य! आता 100 वर्षे जगा, साठीतही घ्या तरुणाईचा अनुभव; 'हे' 5 उपाय आहेत फायदेशीर, वैज्ञानिकांचा दावा

Bengaluru: बंगळूरुच्या बसस्थानकाजवळ जिलेटिनच्या कांड्या सापडल्याने खळबळ; दहशतवादविरोधी पथक घटनास्थळी दाखल!

"30 तारखेला लग्न आणि नवरा पळाला, आता माझ्याशी लग्न कोण करणार?" चहलसोबत नात्याच्या चर्चांवर महवशची Post Viral

Pakistan: देशाला उद्धवस्त करणारा हल्ला होणार, ओसामा खानच्या भविष्यवाणीने पाकड्यांची उडाली झोप; एअरस्पेस केला बंद

SCROLL FOR NEXT