Mandrem Village Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Mandrem: सफर गोव्याची! शांततेचा, निवांतपणाचा आणि निसर्गाशी संवाद साधण्याचा अवकाश देणारं 'मांद्रे'

Mandrem Village Goa: हे गाव आजही शांततेचा, निवांतपणाचा आणि निसर्गाशी संवाद साधण्याचा अवकाश देतं. इथे माणूस स्वतःशीच बोलायला शिकतो, आणि कदाचित म्हणूनच मांद्रे मनात खोलवर घर करून बसतं.

गोमन्तक डिजिटल टीम

उत्तर गोव्यात समुद्राच्या कुशीत अलगद विसावलेलं मांद्रे हे माझ्यासाठी केवळ नकाशावरचं एक गाव नाही, तर माझ्या अस्तित्वाचा, माझ्या श्वासाचा आणि माझ्या ओळखीचा अविभाज्य भाग आहे. पांढऱ्या शुभ्र वाळूवर उमटलेली पावलं, लाटांच्या संथ गजरात हरवलेलं मन आणि संध्याकाळी आकाशात रंगांची उधळण करणारा सूर्य.

या सगळ्यांत माझ्या गावाचं सौंदर्य दडलेलं आहे. हे गाव आजही शांततेचा, निवांतपणाचा आणि निसर्गाशी संवाद साधण्याचा अवकाश देतं. इथे माणूस स्वतःशीच बोलायला शिकतो, आणि कदाचित म्हणूनच मांद्रे मनात खोलवर घर करून बसतं.

पण माझ्या गावाची खरी ओळख केवळ समुद्र, वाळू आणि सूर्यास्त एवढीच मर्यादित नाही. पस्तीसहून अधिक देवस्थानांनी नटलेलं मांद्रे हे खऱ्या अर्थाने देवभूमी आहे. लहानमोठ्या प्रत्येक देवळात श्रद्धेचा दिवा अखंड तेवत असतो. प्रत्येक देवस्थानाचा उत्सव म्हणजे संपूर्ण वाड्याचा श्वास होऊन जातो. दरवर्षी प्रचंड भक्तिभावाने साजरा होणारा सप्तेश्वर भगवतीचा भजनी सप्ताह आणि दसरोत्सव हे तर गावाच्या अस्तित्वाचे ठोके आहेत.

कार्तिकी एकादशीला होणारा भजनी सप्ताह म्हणजे शब्दात मावणार नाही असा अनुभव. सलग सात दिवस आणि सात रात्री, चोवीस तास अखंड चालणारे भजन, वेगवेगळ्या वाड्यांतील पारकरी मंडळींचा निस्वार्थ सहभाग, टाळ-मृदुंगाच्या तालावर हरखून गेलेली मने. या सगळ्यामुळे संपूर्ण मांद्रे भक्तिरसात न्हाऊन निघतं. कार्तिकी एकादशीच्या सायंकाळी एकाच वेळी चार-पाच ठिकाणी सुरू होणाऱ्या मैफली पाहिल्या, की डोळे भरून येतात.

त्या क्षणी हे गाव फक्त वस्ती राहत नाही; ते भक्तीने उजळलेलं एक जिवंत देवालय बनतं. मांद्रे हे नाट्यवेडं गाव आहे, हे अभिमानाने सांगावंसं वाटतं. प्रत्येक वाड्यावर, प्रत्येक देवस्थानाच्या आवारात वर्षानुवर्षे रंगत आलेली नाटकं आजही सुरू आहेत. दशावतारी नाटक असो, हौशी रंगभूमी असो किंवा स्पर्धात्मक रंगभूमी. या तिन्ही आघाड्यांवर मांद्रे कधीच मागे राहिलेलं नाही.

कलाकार घडवणारी आणि रसिक घडवणारी ही भूमी आजही रंगभूमी जिवंत ठेवते. कोकणी तियात्र या लोककलेलाही येथे तेवढाच मान, प्रेम आणि आधार मिळतो. पाश्चात्त्यीकरणाची वावटळ जरी भोवती फिरत असली, तरी या गावाची भक्ती, देवभोळेपणा आणि संस्कृती अजूनही तग धरून आहेत. या मातीनं गोमंतकाला आणि साहित्यसृष्टीला अनेक समर्थ साहित्यिक दिले.

‘साहित्यसंगम’ सारखा साहित्याची जपणूक करणारा, संवाद घडवणारा उपक्रम याच गावातून जन्माला आला, ही बाब आमच्यासाठी अभिमानाची आहे. जवळपास सलग साडेचारशे अधिक मासिक कार्यक्रम सादर करणारी ही संस्था म्हणजे मांद्रेच्या बौद्धिक समृद्धीचं प्रतीक आहे. ज्ञान, संस्कार आणि मूल्यांची जपणूक इथे नकळत होत राहते.

मांद्रेची माणसंही तितकीच खास आहेत. पर्यटकांशी मैत्रीपूर्ण, मनमोकळी आणि आपुलकीने वागणारी ही माणसं गावाचं खऱ्या अर्थाने सौंदर्य वाढवतात. पाहुणा इथे पाहुणाच राहत नाही, तर थोड्याच वेळात तो आपलाच होतो, हीच मांद्रेची खरी ओळख आहे. मांद्रे म्हणजे माझी ओळख, माझा श्वास आणि माझा अभिमान. ही केवळ भूमी नाही, ही माझी माती आहे, जी मला घडवते, मला प्रश्न विचारायला शिकवते आणि मुळांशी जोडून ठेवत आयुष्यभर गात राहते.

-परेश नाईक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Unity Mall: "25 कोटी खर्च झालेत, आता माघार नाही!", युनिटी मॉल हलवण्यास सरकारचा नकार; मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावावर ग्रामस्थ काय उचलणार पाऊल?

Mandovi Express: प्रवास घाईचा नाही, तर 'चवीचा'! मुंबई-गोवादरम्यान धावणारी फूड क्वीन 'मांडवी एक्सप्रेस'; खवय्यांसाठी का आहे स्वर्ग?

Viral Video: महामार्गावरील 'त्या' हॉटेलबाहेर मृत्यूनं गाठलं, पण एका सेकंदानं उलटला डाव; व्हायरल व्हिडिओवर नेटकरी म्हणाले, 'यमराज' बहुदा सुट्टीवर होते!

Donald Trump: "इराणला जगाच्या नकाशावरुन पुसून टाकू!" डोनाल्ड ट्रम्प यांची खुलेआम धमकी; लवकरच पडणार युद्धाची ठिणगी? VIDEO

Chimbel Unity Mall: चिंबल प्रकल्पांवरुन पेच कायम! 'प्रशासन स्तंभ' रद्द करण्याचे संकेत, मात्र 'युनिटी मॉल'बाबत मुख्यमंत्री ठाम

SCROLL FOR NEXT