Marriage Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Indian Wedding: फुकाचा थाटमाट! संपादकीय

Dowry And Social Pressure In Marriages: लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हटले जाते. केवळ दोन जिवाचेच नाही तर दोन कुटुंबांचे होणारे मनोमिलन व्यक्तीच्या आयुष्यातील एक मंगलमय पर्व असते. भारतीय संस्कृतीने विवाहाला संस्काराचा दर्जा दिला आहे, याचे कारण व्यक्तीला जीवनामध्ये जे चार पुरुषार्थ साध्य करत मोक्षाप्रत जायचे असते, त्या प्रवासातील विवाह हादेखील एक महत्त्वाचा घटक असतो.

गोमन्तक डिजिटल टीम

लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हटले जाते. केवळ दोन जिवाचेच नाही तर दोन कुटुंबांचे होणारे मनोमिलन व्यक्तीच्या आयुष्यातील एक मंगलमय पर्व असते. भारतीय संस्कृतीने विवाहाला संस्काराचा दर्जा दिला आहे, याचे कारण व्यक्तीला जीवनामध्ये जे चार पुरुषार्थ साध्य करत मोक्षाप्रत जायचे असते, त्या प्रवासातील विवाह हादेखील एक महत्त्वाचा घटक असतो. पण संस्कारांचा भाग दिवसेंदिवस आक्रसत चालला असून बटबटित इव्हेंटबाजी वाढली आहे.

अगदी ‘प्री वेडिंग शूट’पासून ते हनिमूनपर्यंत पैसा पाण्यासारखा वाहतो. ऐपत असलेले वधुपिता स्वखुशीने प्रचंड खर्च करतात; पण ज्यांची ऐपतच नाही त्या वधुपित्यांना मात्र गळफास लागतो. लोकांची उसनवारी करत पैसे गोळा करा अन् शेवटी तोच पैसा आपल्या काळजाचा तुकडा असलेल्या लेकीसोबत इतरांना द्या... हे उलटे गणित त्यांना फसवते आणि नागवते. घराण्याचा तोरा मिरवण्याच्या नादात आपण काय गमावतो आहोत, याचेही भान राहात नाही. आणि एवढे सगळे करून नवी नात्याची वीण घट्ट बांधली गेली, नव्या आयुष्याचा प्रारंभ चांगल्यारीतीने झाला, असे होईलच असे नाही, याची उदाहरणे नित्यनेमाने समोर येत आहेत.

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणातून रोज समोर येणारे वास्तव उद्विग्न करणारे आहे. आपल्या घरात येणारी लेक हे संपत्ती वाढविण्याचे साधन आहे, असे मानणे ही तर विकृतीची परिसीमा झाली. अद्यापही स्त्रीला समान प्रतिष्ठा आहे, हा विचार समाजाला पचवता आलेला नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. या घटनेनंतर हुंडाप्रथेच्याविरोधात आवाज उमटू लागले आहेत, ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब. पण तो तात्कालिक ठरता कामा नये.

याच्याशीच जोडलेला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे विवाहसमारंभातील वाढती उधळपट्टी. राजकीय शक्तिप्रदर्शन करण्याच्या उद्देशाने लग्नाची (Marriage) फाइव्हस्टार पार्टी करणारे अनेक महाभाग आपल्याला सभोवताली पाहायला मिळतात. राजकारणातील नवोदित नेतेमंडळी अशाच लग्नात फोटोसेशन करून ते समाजमाध्यमांत झळकावतात. हल्ली श्रीमंत गावांतील विवाहसोहळे हे अनेकांसाठी जनसंपर्काचे इव्हेंट ठरले आहेत. संगीतरजनी असो अथवा लावणीचे कार्यक्रम अथवा डोके भंजाळून टाकणारे डीजेचे डोंगर; सगळीकडे पैशाची शक्ती दाखविण्याची जणु स्पर्धाच लागली आहे.

अशा सोहळ्यांमध्ये होणारी खाद्यपदार्थांची नासाडी ही आणखी एक गंभीर समस्या. विवाहानंतर मुलापेक्षा जास्त मुलीच्या आयुष्याला कलाटणी मिळत असते. आपल्या आई-वडिलांचे घर सोडून ती मुलगी सासरी येते. कुटुंबाचा विस्तार झाला की, तिच्याही जबाबदाऱ्या वाढतात. अनेकींना तर घर सांभाळताना उदरनिर्वाहासाठी नोकरीही करावी लागते. आयुष्यात बऱ्याचदा संघर्षामध्ये ती खूप एकाकी पडते. समारंभावरील अनावश्यक खर्च टाळून केलेली वडिलांची बचत अशावेळी मुलीच्या आयुष्यात फार मोठा आधार ठरू शकते. बदलत्या काळात हा विचार करायलाच हवा.

हौस असेल आणि ती पुरविण्यासाठी पैसा असेल तरीही थाटात विवाहसमारंभ करूच नये, असे नाही. माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे. अशा उत्सवांतून त्याला आनंद मिळतो आणि तो मिळवला पाहिजे. अशा उत्सवांवरचा सगळा खर्च पाण्यात जातो, असे म्हणणेही योग्य ठरणार नाही. या पैशांतून अनेकांचे व्यवसाय चालतात. कलागुणांना, कौशल्यांनाही प्रोत्साहन मिळते. मग ती फोटोग्राफी असो, रांगोळीकाम असो, वेशभूषा, केशभूषा असो वा पाककौशल्य असो. मुद्दा हा आहे की, प्रत्येकाने आपापल्या ऐपतीनुसार नियोजन करण्याचा. आपण करतो आहोत, त्या मंगलकार्याचे मर्म, प्रयोजन लक्षात घेण्याचा. केवळ दुसरा करतो म्हणून मीही करतो, या मानसिक सक्तीतून बाहेर पडण्याची गरज आहे.

अनुकरण ही गोष्ट सर्वथा त्याज्य नसते. पण ते जर डोळस नसेल, भल्याबुऱ्याचा, दूरगामी हित-अहिताचा विचार त्यात नसेल तर ते नक्कीच घातक ठरते. याची आठवण करून देण्याची वेळ आली आहे. कर्ज काढून उसना आव आणणे हे पुढचे जीवन बरबाद करणारे ठरू शकते. मोठा गाजावाजा करणे, झगमगाट करणे म्हणजे कार्य उत्तम झाले, हा उथळ समज दिवसेंदिवस फैलावताना दिसतो आहे.

सार्वजनिक जीवनातील औचित्याचाच नव्हे तर अभिरूचीचाही दिवसेंदिवस होत असलेला ऱ्हास चिंता वाटावी, असा आहे. लग्नसमारंभातील वरपक्षाचे श्रेष्ठत्व, वर्चस्व, त्यांचे मानापमान वगैरे गोष्टींतून आपला समाज अद्यापही बाहेर पडत नाही. समारंभांचा झगमगाट, थाटमाट, दणदणाट कितीही वाढवला तरी हा अंधार अधिक गडद होताना दिसतो तो त्यामुळेच. हे सगळे पाहता पुन्हा एकदा सामाजिक सुधारणेच्या चळवळीची गरज तीव्रतेने जाणवते आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hong Kong Fire Video: हाँगकाँगमध्ये भीषण आग! 65 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती; धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

Goa Politics: आरजी-काँग्रेसचे विचार वेगळे! आमदार व्हेन्झींची युतीवर टीका; म्हणाले, "भाजपला हरवण्यासाठी 'स्वच्छ' नेतृत्वाची गरज"

SCROLL FOR NEXT