स्नेहा महांबरे
शालेय जीवनापासून ‘सह’ शब्द मनाला चिकटला. याच्याशी आपण सारे शिक्षित वाचक नक्कीच सहमत असाल याची मला खात्री आहे. पत्रिकेतील ‘सहकुटुंब सहपरिवार...’ या शब्दांसोबत माझे मन सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या काळापर्यंत मागे गेले. त्या शिवकाळात याला पर्यायी शब्द ‘सह कबीले’, ‘सकल कबीला’ असे होते. येथेही ‘सह’ म्हणजे बरोबर, सोबत, सांगाती, समवेत, सवे हाच अर्थ अभिप्रेत होता. तर ‘कबीला’ शब्दाचा अर्थ कुटुंबातील सर्व लहान मोठी माणसे व स्त्रिया असा होतो.
माझे महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना त्या काळात ‘तर्कशास्त्र’ (Logic) विषय अभ्यासला होता. ‘तर्कशास्त्रा’त योग्य विचार करण्याची पद्धत आणि अचूक निष्कर्ष काढण्याचे नियम शिकवले जात असत. माणसाच्या विचारांमध्ये सुसंगतता आणि अचूकता आणणारे शास्त्र म्हणजे ‘तर्कशास्त्र’. हे शास्त्र खूप महत्त्वाचे आहे, मानवी विचार सुधारण्यास याची मदत होते. एखाद्या गोष्टीमागील कारणे तपासून ती खरी किंवा वैध आहेत का हे पटवणेही सहज शक्य होते.
‘तर्कशास्त्र म्हणजे विचारात सुसंगता. पण कपाट आवरताना मात्र हा सगळा तर्कच कोलमोडतो.’ घरात अलीकडे कपाट आवरायला घेतले होते. ‘आवरणे’ हा शब्द त्या कामाला पुरेसा नाही. पण ‘कपाट लावायला’ असे म्हणायला जीभ धजावत नाही, म्हणजे मी काय करत होते याचा अंदाज आपणास आला असेल! आपल्याकडील प्रत्येक वस्तूमध्ये एखादी आठवण अडकलेली असते, काहीत आपला जीव गुंतलेला असतो. तर काही वस्तू मनाला भावलेल्या असतात. त्यामुळे बाजूला घेऊन बसलेल्या त्या डस्टबिन म्हणजे कचऱ्याच्या डब्यात काही पडलेले दिसतच नव्हतं.
उगाचच हाताला आलेली गंजलेली एखादी पिन, एनव्हलप कापत असताना निघालेला छोटा तुकडा, एखादा फाटलेला कागद (उलट सुलट करून पाहून) अशा अगदी जुजबी वस्तू त्या डस्टबिनमध्ये मला दिसल्या! याचे कारण त्या वस्तूंच्या ‘सहवासा’चा परिणाम होता. मागील काही वर्षांत आलेल्या निमंत्रण-आमंत्रण पत्रिका एका कप्प्यात ठेवल्या होत्या, पेक्षा कोंबल्या होत्या. तो कप्पा मुंबईतील लोकलचा डबा असल्याप्रमाणे आता मला भासू लागला. हे लिहीत असताना मला माझ्या शालेय जीवनात अभ्यासलेला विंदा करंदीकर यांचा ललित निबंध ‘आतले आणि बाहेरचे’ हा आठवला आणि हसू आले.
त्या ललित निबंधात रेल्वे गाडीत चढत असताना बाहेर असलेल्या माणसाला आतल्या माणसांबद्दल चीड असते, मात्र तोच माणूस एकदा का कसातरी आत गेला, की तो लगेच आपली भूमिका बदलून ‘आतला बनतो’. मानवी स्वभावावर विंदा करंदीकर यांनी केलेले हे मिश्किल भाष्य आहे. कपाटाच्या खणात सुरुवातीला अगदी निवडक लग्न पत्रिका, काही महत्त्वाच्या संमेलनांची निमंत्रणे, एखादं गृहप्रवेशाचे निमंत्रण किंवा घरगुती कार्यक्रमाचं निमंत्रण असे ठराविक आवडलेली निमंत्रणे ठेवली होती. आणि पुढे ती जागा ‘निमंत्रण पत्रिका ठेवण्याची जागा’ असा बहुतेक अलिखित नियम माझ्या मनात रूजला आणि नंतर मात्र आलेली निमंत्रण पत्रिका त्यात घुसवली जाऊ लागली, कारण ‘ठेवली’ म्हणायला त्यात जागा नव्हती आणि म्हणून मला आता तो सकाळच्या किंवा संध्याकाळच्या लोकलचा डबा वाटायला लागला.
आज मी तो अति कठोर निश्चय म्हणा, निर्णय म्हणा घेणारच होते, मला तो घ्यायचाच होता. यातली कोणती पत्रिका ठेवावी आणि कोणती फेकावी? हे निश्चित करावयाचे होते. अशावेळी मनाचा हिय्या करत मी एक एक पत्रिका बाहेर काढून उघडून वाचून दोन भागांत ठेवायला सुरुवात केली. बरीच मोठी चळत तयार झाली. इतक्यात फोनची रिंग वाजली, तो घेण्यासाठी मी हात पुढे केला आणि पुन्हा त्या दोन्ही चळती गळ्यात गळे घालून, माझ्यासमोर लोटांगण घातल्याप्रमाणे दिसू लागल्या! जणू काही त्यांनी सपशेल शरणागती पत्करली असावी. त्याही स्थितीत मला समोर खुणावणारी माझ्या भावाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका मी पुन्हा उघडली.
त्यातील ठळक अक्षरात लिहिलेल्या मजकुराकडे लक्ष गेले. ‘सहकुटुंब, सहपरिवार अगत्य येण्याचे करावे’ या ओळीत एक प्रेमळ आग्रह दिसून येत होता. मराठी भाषेतील लग्नपत्रिका किंवा इतर शुभकार्याच्या निमंत्रण पत्रिकेत ‘सहकुटुंब, सहपरिवार’ या शब्दप्रयोगाला खूप महत्त्व दिले गेले आहे. याचा अर्थ ‘आपल्या कुटुंबासोबत आणि नातेवाईकांसोबत येणे’ असा काहीसा आग्रह ही असल्यासारखाच होता. १९१० ते १९२५ या दशकात छापील लग्न पत्रिकांच्या प्रसारासोबत जणू त्या पत्रिकेचा ‘सहप्रवासी’ असल्याप्रमाणे वरील ओळ त्यात घट्ट झाल्याप्रमाणे बसली. आज एक शतक उलटले, तर आजच्या काळात ते आपले ‘सांस्कृतिक संचित’ बनले आहे. असे म्हणतात काही गोष्टी आपल्याला जन्मापासून चिकटतात, तशाच पद्धतीने शालेय जीवनापासून ‘सह’ शब्द मनाला चिकटला.
याच्याशी आपण सारे शिक्षित वाचक नक्कीच सहमत असाल याची मला खात्री आहे. पत्रिकेतील ‘सहकुटुंब सहपरिवार...’ या शब्दांसोबत माझे मन सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या काळापर्यंत मागे गेले. त्या शिवकाळात याला पर्यायी शब्द ‘सह कबिले’, ‘सकल कबीला’ असे होते. येथेही ‘सह’ म्हणजे बरोबर, सोबत, सांगाती, समवेत, सवे हाच अर्थ अभिप्रेत होता. तर ‘कबीला’ शब्दाचा अर्थ कुटुंबातील सर्व लहान मोठी माणसे व स्त्रिया असा होतो. कधीतरी लक्षपूर्वक, काळजीपूर्वक वाचलेले ग्रंथज्ञान असे कित्येकदा योग्य वेळी तर कित्येकदा नको त्यावेळी आठवते आणि पंचाईत ही होते, की या ‘सहकारा’च्या ‘सहपाठा’तून पटकन दुसऱ्या विषयाकडे वळता येत नाही.
‘अमरकोशा’मध्ये ‘सह’ शब्द ‘पद्धतदर्शक क्रियाविशेषण’ म्हणून येतो. हे शिकवताना सुरुवातीलाच पुस्तकांचा आधार घेत आणि नंतर ग्रंथ ‘सहवासा’ने ‘सह’ शब्दाचा मुख्य अर्थ ‘एखाद्याच्या सोबत’ किंवा ‘बरोबर’ असा मी सांगू लागले. संस्कृत साहित्याच्या आधारे ‘प्रभू राम हे लक्ष्मण व सीता ह्यांच्या सह वनात गेले होते.’ असे लिहूनही दिले होते. असे व्याकरणाचे तास डोळ्यासमोरून सरकू लागले. महाविद्यालयातील काही आठवणी जाग्या झाल्या. त्यावेळी ‘समाज म्हणजे स्वतः एक संघ किंवा संघटन आहे. समाज हा औपचारिक संबंधांचा असा संग्रह आहे, ज्यात एकत्र राहणारे लोक एकमेकांशी जोडलेले असतात' ही एडिनबर्ग यांची व्याख्या मनात आली. समाज टिकून राहण्यासाठी लोकांमध्ये नाते, संवाद, आपुलकी, सहकार्य असणे आवश्यक आहे.
यालाच ‘सहकार्याची भावना’ असेही म्हटले गेले. आपल्या या समाजात पूर्वी ‘एकत्र कुटुंब पद्धती’ अस्तित्वात होती. त्या काळात एखाद्याला आमंत्रण देताना फक्त त्या व्यक्तीला न देता त्याच्या घरातील सर्व लहान मोठ्या सदस्यांना आग्रहाचे आमंत्रण असावे या भावनेतूनच ‘सहकुटुंब’(कुटुंबासहित) आणि ‘सहपरिवार’ (नातेवाईक व परिवारासह) असे शब्द निमंत्रण पत्रिकेत मानाने छापले जाऊ लागले. काळ बदलला. दिवस, वर्षेही लोटली. सहाव्या वेतन आयोगात जुन्या ‘लेक्चरर’ या पदाचे नाव बदलून ‘असिस्टंट प्रोफेसर’ करण्यात आले. जुन्या ‘रीडर’ वा ‘सिलेक्ट ग्रेड लेक्चरर’ या पदाचे नाव बदलून ‘असोसिएट प्रोफेसर’ असे करण्यात आले आहे.
महाविद्यालयातील कागदपत्रांवर माझ्या व असिस्टंट प्रोफेसर मंडळींच्या पेपरांवर सही करताना ‘सहाय्यक प्राध्यापक’ व ‘सहयोगी प्राध्यापक’ असे शब्द पुन्हा एकदा सहकारी असल्याप्रमाणे त्या सहाव्या आयोगात सहभागी झाले आहेत. हा सारा सहकार्य करणाऱ्यांचा सहसाधक असण्याच्या वृत्तीचा मागोवा घेत असताना पुन्हा एकदा तर्कशास्त्र आठवले. आणि येथे माणसाच्या विचारांमध्ये सुसंगतता आणि अचूकता आणणारे शास्त्र, मानवी विचार सुधारण्यास मदत करणारे शास्त्र हे पटू लागले. ‘गोव्याची राजभाषा कोकणी असून मराठीला सहभाषेचा दर्जा देण्यात आला आहे.’ या विधानात ‘सहभाषा’ म्हणजे ‘सोबत, बरोबर’ हे सहज पटते. म्हणजेच ‘मराठी ही राजभाषा आहे’ हे सारे येथे अभिधा आणि लक्षणा शब्दशक्तीच्या आधाराने सूज्ञ सुशिक्षितांच्या मनाला सहजपणे समजते. असा हा भाषेच्या ‘सह’जीवनातून झालेला माझा ‘सह’प्रवास ‘सह’कार्यांच्या ‘सह’वासात झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.