तेनसिंग रोद्गीगिश
आपण यापूर्वी आईसाठी वापरल्या जाणाऱ्या प्राचीन बृहतकोकणमधील ‘अव्वा’ या शब्दाचा उल्लेख मागील काही लेखांत केला होता. बृहतकोकणच्या हजारो वर्षे चालत आलेल्या वंशपरंपरेचे आणि संस्कृतीचा ह एक टिकून राहिलेला पुरावा आहे. हा शब्द बृहतकोकणमध्ये तामिळ आणि संस्कृत या दोन्ही संस्कृतींपूर्वीचा वाटतो. हा त्या प्रदेशातील मूळचा शब्द होता, जो दख्खनी क्षत्रिय आणि कुणबी या दोघांकडून वापरला जात होता.
आधुनिक मराठीतील ‘आई’ आणि आधुनिक कोकणीतील ‘आवय’ हे दोन्ही शब्द बहुधा ‘अव्वा’पासून आले असावेत. लक्षात घ्या की तो संस्कृतच्या ‘मातृ’ या धातूपासून आलेला नाही, किंवा तामिळच्या ‘ताय’ या धातूपासूनही आलेला नाही. आईसाठी वापरले जाणारे आधुनिक कन्नडमधील ‘तायी’ आणि तेलुगूतील ‘तल्लि’ हे शब्द तामिळमधून आलेले दिसतात. ‘अव्वा’ मात्र या भाषांमध्ये ‘आव्वा’ या रूपात आजी या अर्थाने जिवंत राहिलेला आहे.
या ‘अव्वा’च्या ‘आजी’करणाने आपल्याला भाषेच्या शब्दसंपत्तीच्या इतिहासाबद्दल एक महत्त्वाचा धागा मिळतो. जर आई-वडील आपल्या आईला अव्वा म्हणत असतील, तर मुले (मुलगा/मुलगी)ही त्यांच्या आजीसाठी याच शब्दाचा वापर करणार,
पण आपल्या आईसाठी ते त्या काळातील अधिक प्रचलित शब्द वापरणार; आणि कन्नडमध्ये तो शब्द तायी असा होता. आई आणि आजी यांच्यात फरक करण्याची गरज दोन वेगळ्या शब्दांच्या वापराला जन्म देते; जुना शब्द आजीसाठी आणि नवीन शब्द आईसाठी वापरला जातो.
अशा प्रकारची शब्दांच्या अर्थांमध्ये कालांतराने झालेला सूक्ष्म अपभ्रंश आपल्याला भाषेच्या शब्दसंपत्तीच्या इतिहासाची दिशा दाखवतो. म्हणूनच कुणबी किंवा वडुकर परंपरेचा अवशेष असलेला अव्वा हा बृहतकोकणमधील एक प्राक्-संस्कृत, प्राक्-तामिळ असा मूळचा शब्द दिसतो.
खूप वर्षांपूर्वी आपण या शब्दाच्या प्राचीनतेबद्दल दुसऱ्या संदर्भात चर्चा केली होती. शिलाहार राजा रट्टराज यांच्या १००८ईसापूर्वच्या खारेपाटण ताम्रपटांमध्ये रट्टराज राजाने आपल्या आई-वडिलांच्या सन्मानार्थ आणि स्वतःच्या आध्यात्मिक कल्याणासाठी अव्वेश्वराला अर्पण केलेल्या पंचोपचारपूजेसाठी काही गावांची देणगी दिल्याची नोंद आहे. ‘मी माझ्या आई-वडिलांच्या सन्मानासाठी आणि माझ्या स्वतःच्या आध्यात्मिक कल्याणासाठी पवित्र अव्वेश्वराच्या पंचोपचारपूजेसाठी कुष्मांडी हे गाव दान दिले आहे’
(संदर्भ : मिराशी, १९७७ : कॉर्पस इन्स्क्रिप्श्नुं इंडिकारुम, खंड ६, १९२)
या ताम्रपटांमध्ये उल्लेखलेली गावे गोव्याच्या सासष्टी आणि केपे तालुक्यांतील काही स्थाननामांशी जुळताना दिसतात. कुष्मांडी = कुसमणें;
मणिग्राम = आमोणें / अमोणा;
क्षार-नदी = साळ नदी;
असनवीर = असोळ्णें / असोळ्णा;
कारपर्णी = करमणें / कार्मोणा;
गवहण = गावणे.
म्हणून मंदिरही या परिसरात असावे असा अंदाज करता येतो. वर्दे-वालावलीकर यांच्या मते अव्वेश्वर हीच देवता आज चंद्रनाथ टेकडीवरील चंद्रेश्वर म्हणून पुजली जाते.
(संदर्भ : वर्दे-वालावलीकर, १९६२ : वल्लीपत्तनाचो सोद, ३०४)
कुसमणें हे चंद्रेश्वर मंदिराच्या पूर्वेला ४ किमी, असनवीर पश्चिमेला ८ किमी, तर कार्मोणा आणि गावणे ही असनवीरच्या पलीकडे साळ नदी ओलांडून आहेत. हा संपूर्ण प्रदेश कधीकाळी वेळीप (कुणबी) वस्तीने व्यापलेला असावा. आज वेळीप पारोडा, आमोणा आणि कुसमणें या भागांपुरतेच उरले आहेत, उर्वरित प्रदेशावर दख्खनी चाड्डींचे वर्चस्व आहे.
किल्होर्न यांच्या मते अव्वेश्वर हे अव्वा (आव्वो) + ईश्वर (शिवाचे विशेषण) या संयुक्तातून आले असावे, अंबिकेश्वर किंवा अंबापती यांसारखे. (संदर्भ : किल्होर्न, १८९४ : खारेपाटन प्लेट्स ऑफ रट्टराजा, एपीग्राफिया इंडिका, खंड ३, २९३).
त्याचे विद्यमान चंद्रेश्वर किंवा चंद्रनाथ या रूपात झालेले पुढील रूपांतर समजणे फार अवघड नाही, कारण तेही शिवाचेच एक विशेषण आहे. शक्यता अशी आहे, की इतिहासामध्ये कालौघात दोन्ही विशेषणांचा वापर चालू होता : शिलाहार देवतेला अव्वेश्वर म्हणत, तर भोज तिला त्यांच्या कुळदेवतेप्रमाणे चंद्रेश्वर म्हणत.
मंदिर कदाचित अनेकदा पुन्हा बांधले गेले. काही इतिहासकारांच्या मते रट्टराजचे पिता अवसर तृतीय यांनी हे पुन्हा बांधून देवतेला स्वतःच्या नावाशी जुळवले असावे; किंवा अवसर राजांच्याच नावाचा उगम या अव्वेश्वर देवतेतून झाला असावा. दक्षिण भारतीय राजघराण्यांत अशी प्रथा होती. होयसळ विष्णुवर्धन यांचे मूळ नाव बिट्टिदेव, तसेच पूर्व चालुक्यांच्या दोन विष्णुवर्धनांचेही. बिट्टिदेव / बिट्टिगा / बिट्टारस हे नावे गुराखी देव विट्टा / बिट्टा / विठ्ठल यांच्या नावांवरून आली.
रामचंद्र चिंतामण ढेरे, २०११ : द राईज ऑफ अ फोक गॉड, २४८).
विद्यमान मंदिरातील गुहेसारखे एका मोठ्या काळ्या खडकात कोरून केलेले गर्भगृह खूप जुने वाटते आणि कदाचित ते प्राचीन वेळीप गुराखी देवतेचे मूळ देवस्थान असावे. आजही चंद्रेश्वराला त्याच प्रकारची कांबळ अर्पण करण्याची प्रथा आहे ज्याचा वापर वेळीप करतात. पारोडा टेकडीवरील आजचा भूतनाथ हा त्या मूळ वेळीप देवतेचा अवशेष असावा.
अव्वा-ईश्वर हे संयुक्त विशेष रंजक आहे कारण ते कुणबी-किरात एकत्रीकरणाकडे बोट दाखवते. शिव (ईश्वर) हा किरातांचा देव होता; ते व्यापारासाठी उत्तर-पूर्वेकडून भारतात आले आणि संपूर्ण गंगा-सिंधू मैदानात तसेच त्याच्या पश्चिम टोकाला काठियावाड येथे पसरले.
कुणबींनी कदाचित काठियावाडचे बंदर आधीच विकसित केले होते. कुणबी-किरात सहकार्यामुळे ते बंदर क्षत्रिय येण्यापूर्वीच उत्कर्षास पोहोचले असावे. नंतर क्षत्रियांनी त्याला पुढच्या टप्प्यावर नेले असावे.
खारेपाटण ताम्रपटांत भोज आणि कदंब यांची राजधानी असलेले चंद्रपूर हे एक बंदर म्हणून उल्लेखले आहे, ते बहुधा सध्याचे चांदोर असावे. हे नामांतरण नंतरच्या काळातील असावे. क्षत्रिय (काठियावाडी चाड्डी) काठियावाड बुडाल्यानंतर नवे बंदर शोधण्यासाठी दक्षिणेकडे आले, त्या काळातील हा बदल असावा. शिलाहार हे सर्वांत यशस्वी काठियावाडी चाड्डी असावेत. शिव हा कोकण किनाऱ्यावर काठियावाडी चाड्डी वास्तव्यास असल्याची स्पष्ट खूण आहे.
कुणबी - किरात - काठियावाडी चाड्डी (क्षत्रिय) हा खरोखरच खूप गुंतागुंतीचा इतिहास आहे!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.