Goa Kala Academy building in Panaji highlighting its cultural significance Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Kala Academy: कला अकादमी, 'क्या पाया क्या खोया?'

kala academy konkani drama competition: कला अकादमीच्या कोकणी नाट्य स्पर्धेचा सुवर्ण महोत्सवी सोहळा आज १० जुलै रोजी साजरा होत आहे. कोकणी नाट्य स्पर्धेला पन्नास वर्षे होणे ही खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मिलिंद म्हाडगुत

कला अकादमीच्या कोकणी नाट्य स्पर्धेचा सुवर्ण महोत्सवी सोहळा आज १० जुलै रोजी साजरा होत आहे. कोकणी नाट्य स्पर्धेला पन्नास वर्षे होणे ही खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे, यात शंकाच नाही. ही स्पर्धा १९७६ साली जेव्हा अस्तित्वात आली, तेव्हा ती किती दिवस टिकेल हे सांगणे कठीण होते. तेव्हा स्पर्धेला आवश्यक असणारी पाच नाटकेही मिळणे कठीण जायचे. पण कोकणी चळवळ टिकवण्याकरता अनेक रंगकर्मींनी पदरमोड करून ही स्पर्धा टिकवली. केवळ टिकवलीच नाही, तर बहरातही आणली. पण हल्ली या स्पर्धेचा उलटा प्रवाह सुरू झाल्यासारखा वाटू लागला आहे.

स्पर्धेला पन्नास वर्षे झाली म्हणून आनंद साजरा करत असताना दुसऱ्या बाजूला या स्पर्धेतील अनेक त्रुटी जाणकारांना जाणवायला, खुणवायला लागल्या आहेत. मुख्य म्हणजे प्रेक्षकांचा या स्पर्धांवरचा विश्वास कमी होताना दिसू लागला आहे. मी गेली तीन वर्षे दैनिक ‘गोमन्तक’ करता कोकणी नाट्य स्पर्धेचे परीक्षण करत असल्यामुळे या कमी होत चाललेल्या विश्वासाचा अनुभव घेत आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेत भाग घेणाऱ्या नाटकांची संख्याही दरवर्षी कमी होताना दिसत आहे. ४८व्या कोकणी नाट्यस्पर्धेत तीस प्रवेशिका होत्या पण २३ नाटकेच सादर झाली. ४९व्या स्पर्धेत प्रवेशिका होत्या २५ पण नाटके सादर झाली २१. पन्नासाव्या म्हणजे गेल्या वर्षी प्रवेशिकांची संख्या घसरून ती १८ वर आली. त्यातली १७ नाटके रंगभूमीवर अवतरली.

आता यातून स्पर्धेतील नाटकाच्या संख्येला कशी उतरती कळा लागली आहे, हे दिसून येते. हीच गोष्ट प्रेक्षकांची. दोन-तीन नाटके वगळता या तीन वर्षांच्या कालावधीतील स्पर्धांत फोंड्याचे राजीव गांधी कला मंदिर खालीच दिसले. याबाबतीत काही प्रेक्षकांशी बोलल्यावर त्यांचा या स्पर्धांवरचा विश्वास उडत चालल्याचे प्रतीत झाले. काहींनी तर या स्पर्धा म्हणजे सेटिंग असल्याचा आरोप केला.

त्यात परत कला अकादमीच्याच मराठी ‘अ’ गट नाट्य स्पर्धेत परीक्षक लाच प्रकरण उजेडात आल्यामुळे प्रेक्षकांचा उरला सुरला विश्वासही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याचप्रमाणे वाङ्मयचौर्यासारखा स्पर्धेच्या पारदर्शकतेला नख लावू शकणारा प्रकार सध्या कोकणी नाट्य स्पर्धेत धुडगूस घालू लागला आहे. आणि विशेष म्हणजे सुवर्ण महोत्सवी स्पर्धेच्या वेळीच हा प्रकार उजेडात आला. हा प्रकार गेली कित्येक वर्षे सुरू आहे, हेही आता उघडकीस यायला लागले आहे. आणि एवढे होऊनही कला अकादमीचे (Kala Academy) पदाधिकारी मात्र ‘तेरी भी चूप, मेरी भी चुप’ हा राग आळवताना दिसताहेत. कोणतीही स्पर्धा ही निर्भेळ असायला हवी.

पारदर्शकता हा स्पर्धेचा स्थायीभाव असायला हवा. पण या स्पर्धांत सध्या याच गोष्टींची वानवा दिसत आहे. हे परीक्षक लाच प्रकरण उजेडात आले, ते दैनिक ‘गोमन्तक’ मुळेच. त्यामुळे यापूर्वीही अशी प्रकरणे घडली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ही शक्यता पटलावर यायला लागल्यामुळे सगळेच परीक्षक संशयाच्या पिंजऱ्यात कैद झाल्यासारखे वाटू लागले आहे. मिळालेल्या पुरस्कारांवरही प्रश्नचिन्ह उभे राहताना दिसू लागले आहे. जर कला अकादमीने या प्रकरणाचा खुलासा केला असता तर ‘दूध का दूध और पानी का पानी’ होऊन गेले असते.

पण प्रकरण गुलदस्त्यात राहिल्यामुळे स्पर्धेच्या चाहत्यांत तीव्र असंतोष पसरल्याचे बघायला मिळत आहे. ‘गोमन्तक’तून प्रसिद्ध झालेले यासंबंधीचे अनेक लेख, वाचकांची पत्रे यातून या असंतोषाची ‘झलक’ पाहायला मिळाली. त्यामुळे कोकणी नाट्य स्पर्धेचा सुवर्ण महोत्सवी सोहळा साजरा करत असताना या सर्व त्रुटींचा विचार व्हायला हवा.

कोकणी नाट्य स्पर्धांना पूर्वी होणारी गर्दी आता का दिसत नाही, याचाही आढावा घ्यायला हवा. या पन्नास वर्षात ‘क्या खोया और क्या पाया’ हेही बघायला हवे. नाहीतर सुवर्ण महोत्सवी सोहळा हा,‘दिखावा’ अन् ‘खोगीर भरती’ चा प्रकार ठरू शकतो. वर्षे वाढली याचा अर्थ दर्जा वाढला असा होत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. म्हणूनच या दर्जाला गालबोट लावण्याचे जे प्रकार सध्या सुरू झाले आहेत, त्याचा बीमोड करण्याचा संकल्प या सोहळ्याच्या निमित्ताने कला अकादमीच्या धुरीणांनी सोडायला हवा. तो भविष्यात आचरणात आणण्याचा मानस बाळगला पाहिजे. असे झाले तरच हा सुवर्ण महोत्सवी सोहळा खऱ्या अर्थाने ‘साजरा’ केला असे म्हणता येईल. नाहीतर ‘नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे’ अशी या स्पर्धेची गत झाल्याशिवाय राहणार नाही, एवढे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT