Kadamba Transport Dainik Gomanatk
गोंयकाराचें मत

Kadamba Transport: कदंबच्या बसेस आधुनिक झाल्या; ग्रामीण भागातील बससेवा, प्रवाशांची गर्दी अन् कर्मचाऱ्यांच्या सुविधांचे काय?

Kadamba bus service in Goa: कदंबने गेल्या चार दशकांमध्ये निश्चितच मोठा पल्ला गाठला आहे. डिझेल बसेसपासून इलेक्ट्रिक एसी बसेसपर्यंत झालेला बदल कौतुकास्पद आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मृणाली राऊत

कदंबने गेल्या चार दशकांमध्ये निश्चितच मोठा पल्ला गाठला आहे. डिझेल बसेसपासून इलेक्ट्रिक एसी बसेसपर्यंत झालेला बदल कौतुकास्पद आहे. मात्र, केवळ आधुनिक बसेस सुरू करणे म्हणजे सार्वजनिक वाहतुकीचा संपूर्ण विकास नव्हे. त्या बसेस योग्य मार्गांवर, योग्य वेळेत आणि पुरेशा संख्येने धावणेही तितकेच आवश्यक आहे.

गोव्यातील अनेक नागरिक काम, शिक्षण आणि दैनंदिन प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी कदंब परिवहन महामंडळाच्या बसेस या प्रवासाचे महत्त्वाचे साधन आहेत. अनेक गावांमध्ये कदंब बस हीच शहरांशी जोडणारी प्रमुख वाहतूक व्यवस्था असल्याने तिच्यावर विद्यार्थ्यांपासून नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकजण अवलंबून आहेत.

१९८० मध्ये कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापना झाली. त्यानंतर पणजी ते धावे (सत्तरी) या मार्गावर कदंबची पहिली बस धावली. विशेषतः ग्रामीण भागातील लोकांसाठी ही एक आशादायी सुरुवात होती. आता आपल्या गावातही बससेवा उपलब्ध होणार आणि प्रवास अधिक सोयीस्कर होणार, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये निर्माण झाली. गोव्यातील नागरिकांना सुरक्षित, विश्वासार्ह, आरामदायी आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे हा कदंबच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश होता.

१९८० मधील पहिल्या बसपासून ते आजच्या ‘ईव्ही’ बसेसपर्यंतचा कदंबचा प्रवास पाहता, या महामंडळाने निश्चितच मोठी प्रगती केली आहे. सुरुवातीला डिझेल बसेस, त्यानंतर सेमी लक्झरी, व्होल्वो, लक्झरी, स्लीपर आणि आता इलेक्ट्रिक एसी बसेस अशा विविध प्रकारच्या सेवा सुरू करण्यात आल्या. विमानतळ शटल सेवेसह आंतरराज्यीय वाहतूक सेवांचाही विस्तार करण्यात आला. वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि रस्ते अपघात कमी करण्यासाठी खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन सरकारकडूनही वेळोवेळी करण्यात येते. मात्र, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवायचा असेल, तर ती सेवा नागरिकांना प्रत्यक्षात किती सोयीस्करपणे उपलब्ध होते, याचाही विचार करणे तितकेच महत्त्वाचे आहे.

ग्रामीण भागातील बससेवेचा प्रश्न कायम?

कदंबच्या स्थापनेमागील एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे गावागावांतील कानाकोपऱ्यापर्यंत बससेवा पोहोचवणे. मात्र, आजही गोव्यातील काही गावांमध्ये पुरेशी बससेवा उपलब्ध आहे का, हा प्रश्न कायम आहे. सोशल मीडियावर कदंब बसेससंदर्भातील विविध व्हिडिओ आणि तक्रारी व्हायरल होताना दिसतात. त्यातून काही ठिकाणी प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी समोर येतात.

आजही काही गावांत बससेवेची मोठी गरज आहे. एखाद्या विशिष्ट भागात बससेवा सुरू करण्याची मागणी आमदारांना विधानसभेत करावी लागते, यावरूनही काही भागांमध्ये वाहतूक सुविधा पोहोचवण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होते. काही गावांमध्ये बससेवा असली, तरी प्रवाशांना उपलब्ध असलेल्या मोजक्या बसेसवरच अवलंबून राहावे लागते. विशेषतः शाळा, महाविद्यालये आणि कामाच्या वेळेत एका बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करताना दिसतात. अशा मार्गांवर अतिरिक्त बसेस सुरू करण्याची गरज आहे.

जुन्या बसेस बदला

काही शाळांसाठी चालवल्या जाणाऱ्या कदंब बसेस आजही जीर्ण अवस्थेत असल्याचे दिसून येते. अशा बसेसमुळे होणारे प्रदूषण आणि त्यांच्या देखभालीचा प्रश्नही दुर्लक्षित करता येणार नाही. जुन्या बसेसची नियमित तपासणी, देखभाल आणि आवश्यकतेनुसार त्यांची जागा नवीन बसेसनी घेणे गरजेचे आहे.

आठ प्रवाशांच्या मर्यादेचा मुद्दा

ईव्ही बसेस सुरू करणे हे कदंबच्या प्रवासातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. ज्या काही भागांमध्ये पूर्वी नियमित बससेवा नव्हती, तिथेही अशा बसेस सुरू झाल्याने नागरिकांना आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र, या बसेसमध्ये केवळ आठ प्रवाशांनाच उभे राहण्याची परवानगी असल्याचा नियम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रवाशांची संख्या मर्यादित ठेवणे महत्त्वाचे आहे. आठपेक्षा अधिक प्रवासी उभे असल्यास चालकाला आरटीओकडून दंड होण्याची शक्यता असते. मात्र, काही लांब पल्ल्याच्या मार्गांवर किंवा मर्यादित बसफेऱ्या असलेल्या भागांमध्ये प्रवाशांसमोर मोठा प्रश्न निर्माण होतो. शाळा, महाविद्यालये आणि कामावर जाणाऱ्या नागरिकांसाठी अनेकदा एकच बस उपलब्ध असते. अशा वेळी त्या बसमध्ये जागा न मिळाल्यास प्रवाशांनी काय करावे, हा प्रश्न आहे.

चालक, वाहकांच्या सुविधेचे काय?

कदंबच्या प्रवासात केवळ बसेस आणि प्रवाशांचाच विचार करून चालणार नाही, तर या संपूर्ण व्यवस्थेचा भार सांभाळणाऱ्या चालक आणि वाहकांचाही विचार होणे आवश्यक आहे. काही मार्गांवर चालक आणि वाहकांना रात्रीच्या वेळी घरापासून दूर असलेल्या ठिकाणी मुक्काम करावा लागतो. मात्र, अशा ठिकाणी त्यांच्यासाठी योग्य निवास, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेकदा चालक आणि वाहकांना रात्री बसेसमध्ये किंवा मंदिर परिसरात झोपावे लागत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. ही स्थिती पाहता त्यांच्या वास्तव्याच्या व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. दिवसभर प्रवाशांची जबाबदारी सांभाळणारे चालक आणि वाहक यांनाही सुरक्षित आणि सन्मानपूर्वक विश्रांती मिळाली पाहिजे.

कदंबने गेल्या चार दशकांमध्ये निश्चितच मोठा पल्ला गाठला आहे. डिझेल बसेसपासून इलेक्ट्रिक एसी बसेसपर्यंत झालेला बदल कौतुकास्पद आहे. मात्र, केवळ आधुनिक बसेस सुरू करणे म्हणजे सार्वजनिक वाहतुकीचा संपूर्ण विकास नव्हे. त्या बसेस योग्य मार्गांवर, योग्य वेळेत आणि पुरेशा संख्येने धावणेही तितकेच आवश्यक आहे. एखादा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर किंवा एखादी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतरच संबंधित यंत्रणेचे लक्ष त्या समस्येकडे जाते, असे चित्र निर्माण होऊ नये. समस्या निर्माण होण्यापूर्वीच त्यांचा अंदाज घेऊन नियोजन करणे अधिक महत्त्वाचे आहे. कदंबची प्रगती केवळ बसेसच्या आधुनिकतेपुरती मर्यादित न राहता प्रत्येक प्रवाशाच्या सोयीपर्यंत आणि प्रत्येक कर्मचाऱ्याच्या सुरक्षिततेपर्यंत पोहोचली पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Violence: बांगलादेशात हिंसाचाराचा भडका! अवामी लीगच्या आंदोलनाला हिंसक वळण; मोहम्मद युनूस यांचं घर दिलं पेटवून VIDEO

Feast Ground Clash: नावेलीच्या फेस्तात जमीन मालकीच्या वादातून हाणामारी; प्रवेशद्वार बंद केल्याने संघर्ष, दोघे जखमी

Cyber Crime: गोव्यात धमकी, तोतयागिरी अन् सायबर फसवणुकीचा सापळा; 2 महिलांना 31.91 लाखांचा गंडा, तिघांना अटक

IND vs NZ Test: हक्काची विकेट हुकल्याने गिल नाराज! फिलिप्सच्या एलबीडब्ल्यूवर हायव्होल्टेज ड्रामा; खडाजंगीचा व्हिडिओ व्हायरल

Goa AI Policy 2026: 'गोवा एआय' धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी; कौशल्य विकासासाठी 60 टक्के, स्टार्टअप आणि पायाभूत सुविधांसाठी प्रत्येकी 20 टक्के निधी

SCROLL FOR NEXT