Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

सूर्य दोनापावला ठिकाणी जुवारीच्या मुखात लांब जात म्हणतो, ‘कदंब, बेतीवरे, पर्वरी, बांबोळी, वेर्णा आणि साकवाळ पठारे म्हातारी झाली’

Goa Opinion: मावळणारा सूर्य दोनापावला ठिकाणी आज जुवारीच्या मुखात लांब जात म्हणतो, ‘कदंब, बेती वेरे, पर्वरी, बांबोळी, वेर्णा आणि साकवाळ पठारे म्हातारी झाली’.

गोमन्तक डिजिटल टीम

मधू य. ना. गावकर

तिसवाडी तालुक्याला जरी मांडवी पात्रातील चोडण, दिवाडी, वाशी, आखाडा, सांतइस्तेव्ह आणि कुंभारजुवे ही बेटे जोडून महसुली तालुका बनविला, तरी सातवे भलेमोठे बेट तिसवाडी आहे. त्याला निसर्गाने मांडवी, जुवारी आणि गंवडाळी-बाणस्तारी नद्यांनी वेढून अलग ठेवले आहे. तिसवाडी बेटाला निसर्गाने कदंब हे पतंगाच्या आकाराचे नामांकित पठार देऊन त्या पठारावर पडणाऱ्या मान्सून पावसाने तिसवाडीची जैवविविधता पोसून सांभाळली आहे.

पश्चिम घाटाच्या पायथ्याकडून तीन डोंगर रांगांची भूशिरे अरबी समुद्रात घुसली असून दक्षिण बाजूचे मुरगावचे सडा भूशिर, उत्तर बाजूने बेती-वेरे भूशिर आणि मधले बांबोळी दोनापावला पठार भूशिर, या तीन भूशिरांनी मांडवी आणि जुवारी नद्यांना वाट करून देत अरबी समुद्राचे खारे पाणी आत घेऊन त्या पाण्यात पश्चिम घाटातून आणलेले गोड पाणी खाऱ्या पाण्यात मीलन घडवले.

त्यात जैवविविधतेला जन्म देऊन संपूर्ण गोव्याला त्या अन्न साखळीने जगवले आहे. अजब म्हणजे तिसवाडी बेटावरील कदंब आणि बांबोळी हे दोन पठार निसर्गाने पतंगाच्या आकृतीने बनवलेले दिसतात. पठाराच्या सभोवार खालच्या भागात मऊ मुलायम सुपीक गाळाची माती पठाराच्या वर्तुळाकार परिसरात पसरलेली आहे.

त्यात भात, भाजीपाला यांची लागवडा पाहावयास मिळते. पर्यावरणीय दृष्टीने कदंब पठाराला पाहिले तर मान्सून वारे सुरू होताच, मांडवी आणि जुवारी नदीच्या मुखातून आत शिरून ते कदंब पठारामुळे छेदून पश्चिम घाटाच्या डोंगरदऱ्यांकडे धाव घेताना कदंब पठाराला पाऊस देऊन भिजवते. कदंब पठार दोनापावला ते चिंबल आणि कुडका ते दोनापावलापर्यंत, जुवारी मांडवीने अरुंद करून पूर्व बाजूने ओल्डगोवा ते नेवरा आणि सांतान कुडका ते रायबंदर पाटोपर्यंत पूर्व, पश्चिम, दक्षिण उत्तर दिशांनी चौकोनी आकाराने निर्माण झाले आहे.

पठारावर पडणारा पाऊस, सापेर, बायगिंणी, ओल्डगोवा, आजोशी, मौळा, कुडका, चिंबल, सांतान, भाटी, मेरशी, कालापूर या गावातील ओहोळांमधून गोडेपाणी खालच्या भागात नेतो.

ते पाणी सांतिनेज, रुआ-द-ओरे, मेरशी, चिंबल, शिरदोण या खाड्यांमधून मांडवी, जुवारी, बाणस्तारी नद्यांना मिळते. मळा, मेरशी, रायबंदर, पाटो, सापेर, बायगिंणी, गंडकी, नेवरा, करसकी, आजोशी, मंडूर, डोंगरी, शिरदोण भागात ओहळ अगर खाडीच्या मुखावर पूर्वजांनी खाऱ्या पाण्यापासून शेतीचे रक्षण होण्यासाठी मानशी उभारल्या होत्या.

पठाराला सांतीनेज, सांत आंद्रे, रुआ-द-ओरे, चिंबल आणि शिरदोण खाड्या त्यातून समुद्राचे पाणी आत घेऊन ते पाणी मिठागरांच्या शेतात भरून घेत मोठ्या प्रमाणात मीठ पिकवतात. पिलार, चिंबल, बोंडवेल आणि करमळी तळ्यात गोडेपाणी साठवून ते पाणी पिण्यास वापरून वांयगण शेती आणि भाजीपाला मळ्यास सिंचन करीत होते.

कदंब पठाराला निसर्गाने कुडका, जुने गोवे आणि आजोशी गावांना सदोदित गोडे पाणी वाहणारे झरे दिले आहेत. पतंग आकृतीचा कदंब पठार हा आपल्या भूमिपुत्रांनी परिक्रमा घालून जगत आपली संस्कृती घडविली.

रायबंदर, पानवेल, सापेर, बायंगिणी, ओल्डगोवा, करमळी, आजोशी, मंडूर, डोंगरी, नेवरा, पिलार, गोवावेल्हा, भाटी मौळा, सांतान, कुडका, पाळे, शिरदोण, बांबोळी, नावशी, काकरा, ओडशेल, दोनापावला, आयवा, करंजाळे, ताळगाव, नागाळी, बांदार, कालापूर, मेरशी, चिंबल ही गावे वसवून पर्यावरणाला, निसर्गाला साथ दिली होती.

या कदंब पठाराने हजारो वर्षांच्या इतिहासात अनेक राजवटी घडलेल्या आणि नेस्तनाबूद झालेल्या पाहिल्या आहेत. त्याने गोपकपट्टणमच्या संपूर्ण पट्ट्यात होणारी जहाजबांधणी पाहिली आहे, पठारावरील राजमार्गावरची वाह्तूक पाहिली आहे आणि हात-कातरो खांबास बांधून कापलेले हजारो हातही पाहिले आहेत.

पठार परिसरात अनेक राजवटींनी सत्तेसाठी लढाया केल्या आणि नेस्तनाबूद झाल्या. पण, पठाराने वसुंधरा आणि पाण्याचे साठे जपले होते. गुलामगिरीच्या जोखडातून गोवा मुक्त झाला आणि बेतीवेरे, पर्वरी, साळगाव, साकवाळ, वेर्णा, कदंब, बांबोळी पठाराच्या गळ्यातील साखळ्या तुटल्या.

पण येणाऱ्या काळात विकासाच्या नावाने, पिकास, फावडा, घण, पारय, शेवाळ, जेसीबी, कोयता, कुर्‍हाड, करवत, कटर अशा हत्यारांचे घाव घेऊन पठाराच्या शरीरावर बिनदिक्कत घातले जात आहेत. जीवन देणाऱ्या पाण्यात त्याची लालमाती मिसळते.

ती माती पावसाच्या पाण्याबरोबर खालच्या भागात वाहत येऊन ओहळ, खाड्या, तलाव, सरदवायंगण, खाजन-शेती आणि मिठागरे नष्ट होतात. पठारावर आणि त्यांच्या उतरणीवरील झाडे, झुडपे तोडून सपाटीकरणाने बंगले, घरे, सदनिकांची कॉंक्रीट जंगले उभी झाल्याने, वर्षाकाठी येणाऱ्या मान्सूनवर वाईट परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे.

पठारावर पडणारा पाऊस झाडे, वेली व गवताच्या साहाय्याने थोपून धरून ते पाणी जमिनीत जिरवण्याचे काम करतात. सपाट जमिनीवर आणि उतारावरील खडकावर बारीक आकाराच्या बिळातून जमिनीच्या अंगात पाणी साठवून ठेवण्याचे काम खडक करतात. पठारांच्या खननाने आणि उभारलेल्या कॉंक्रीटने निसर्गाची ही भूगर्भ रचना नष्ट झाली आहे.

पडणाऱ्या मान्सून पावसाचे पाणी जमिनीत न जिरता, मिळेल तिथून वाहत खाली येताना परिसरात फेकलेल्या प्लास्टिक कचरा सोबत घेऊन येते. निर्मळ ओहळ, तलाव, खाडी, नदी आणि सुपीक शेतजमिनींत साचून मानव आणि मुक्या प्राण्याला आज धोका निर्माण झाला आहे. जैवविविधतेची साखळी तुटत चालली आहे.

कदंब पठाराच्या पश्चिम बाजूने मांडवी-जुवारीचे मुखे आहेत, त्या मुखांनी आणि अरबी समुद्रात मोरी, रावस, इसवण, कर्ली, सांगट, बाळा, मोडसा, पापलेट, मुडुशी, डांटाळ, बांगडा, पेडवा, तार्ला, तारसोळी, खेकडा, शिवड, तिसरी, शिनावणी, धोडयारा, लेप, सपनाळा, झिंगे मासळी मिळते, आणि पठाराच्या

पूर्व बाजूने मांडवी, जुवारी आणि बाणस्तारी नद्यांच्या पाण्यात चोणकूल, तामसा, पालु, शेवटा, काळुंद्र, मुत्रा, शेतुक, वागी, सफेद झिंगे, खरचाणी, बुराटे, तोकी, खेकडे, काळे-खुबे, पांढरे खुबे, सांगट अशा प्रकारची मासळी सापडते. नद्या, खाडीतील मासळी समुद्रात राहत नाही आणि समुद्रातील मासळी नद्यांच्या वरच्या पात्रात राहत नाही.

म्हणजे निळा समुद्र आणि नद्यांतील पाण्यात आर्य, द्रविडांचा जातिभेद पाहावयास मिळतो. भारतात आर्य, द्रविडांचे वेगळेपण असले तरी मानव ओहळ, खाडी, नदी समुद्री पाण्यातील मासळी अन्न म्हणून खाण्यास पटाईत आहे.

जुवारी, मांडवीचे पात्र आणि मुखे हे मत्स्यधनाची कोठारे आहेत. पठाराच्या सभोवार नद्या समुद्राच्या काठावर मत्स्यव्यवसायाचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो. समुद्री मासळीचा हंगाम सुरू झाला म्हणजे मच्छीमार लोक कदंब पठाराच्या दगडी कातळावर मासळी सुकवीत होते. जरी पठार जागा, माती निर्मितीचे असलेले तरी पठाराच्या उत्तर बाजूने पाषाण आहे.

सांपेद्र भागात पठाराच्या पायथ्याकडे पाषाणी खडी काढणाऱ्या दोन ठिकाणी खाणी आहेत. या पठाराच्या सांनिध्यात राहणाऱ्या हिंदू, ख्रिश्चन, मुसलमान यांनी आपल्या धर्माला बाजूला ठेवून गोवा स्वातंत्र्यासाठी एकत्रित पोर्तुगिजांशी लढण्यासाठी हिरवागार कदंब पठाराच्या जंगल, झाडीचा आश्रय घेतला होता.

त्या पठारावरील काजू बोंडे, आंबा, फणस, काकडी, टरबूज खाऊन भूक भागवून दिवस काढले होते. पठारावर पिकणारा रानमेवा खाऊन तहान भागवली, अशा या विस्तीर्ण पठाराने पाऊस पडल्यानंतर प्रथम अळंबी पिके देऊन सरपटणाऱ्या प्राण्यांना अन्न पुरवले होते.

इतिहासाची गाथा सांगणाऱ्या कदंब पठारावर सकाळचे कोवळे ऊन पडताच पक्ष्यांचे थवे, शेतजमिनीत पोट भरण्यास जत्रा भरवीत होते. पावसाळा सुरू झाला म्हणजे डोंगररांगेवर शेतकरी मळे घालायचे. हे सारे पाहत मावळणारा सूर्य दोनापावला ठिकाणी आज जुवारीच्या मुखात लांब जात म्हणतो, ‘कदंब, बेतीवरे, पर्वरी, बांबोळी, वेर्णा आणि साकवाळ पठारे म्हातारी झाली’.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "चिमुकल्यांचे हात-पाय बांधून अमानुष छळ!" डेकेअर सेंटरचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी 13 जणांना ठोकल्या बेड्या

Goa Professional League 2026: स्पोर्टिंग क्लब द गोवाचा 'विराट' विजय! डॉयल अल्विसची शानदार हॅटट्रिक अन् प्रोफेशनल लीगच्या जेतेपदावर तिसऱ्यांदा कोरलं नाव

Goa River Drowning Cases: गोव्यात बेफिकिरीमुळेच बुडण्याच्या घटनांमध्‍ये होतेय वाढ! सत्तरी तालुक्‍यातही चिंता; मद्यसेवन, सुरक्षेअभावी नद्या बनल्‍या धोकादायक

Harmal Wedding Theft : वीज पुरवठा थांबवून मारला डल्ला, लग्नसोहळ्यातील लुटीचा पडद्याआडून खेळ तपासाचे आव्हान

Bicholim Class 11 Admissions : अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ, विज्ञान शाखेसाठी चुरस; ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT