अॅड. सूरज मळीक
निसर्ग हा आपला अन्नदाता आहे. गोव्यात ग्रीष्म ऋतूतील सूर्यकिरणे जमिनीवर पडताच घरासमोर असलेल्या अंगणात त्याचे वैविध्यपूर्ण दर्शन घडते. कुठे टिकाऊ खाद्यपदार्थ म्हणून आंबा, चिंच, ओटम, भिरंड, फणस यांसारख्या फळांचे पापड, सोले, साटे, बिया तर कुठे वनऔषधी म्हणून, बहाव्याच्या शेंगा, पळसाची फुले, सरपाट्याची वेल, असणाच्या साली उन्हात वाळवायला टाकलेल्या दृष्टीस पडतात.
गोमंतकातील लोकसंस्कृतीत फणसाचे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे. फणसाची पाने, फळे, बिया व खोडाचा अतिशय कल्पकतेने उपयोग केला जातो. हे सदाहरित वृक्ष भारतासह इंडोनेशिया, चीन, मलेशिया, श्रीलंका, बांगलादेश व इतर प्रांतातही आढळतात. फणस हे बांगलादेशाचे राष्ट्रीय फळ आहे. भारतातील केरळ आणि तामिळनाडू या राज्याने त्याला राजाश्रय देऊन त्याच्या उत्पादनासाठी पावले उचललेली आहे. थायलंड मध्ये तर फणसाचे उत्पादन करणारे मोठमोठे कारखाने आहेत.
फणसाची हिरवी पाने जुनी झाल्यावर केशरी रंगात परिवर्तित होतात आणि काही दिवसांनी ती गळून खाली पडतात. खोडाचा आतील भागही केशरी रंगाचा असतो. अधूनमधून खोडाच्या साली निघाल्यावर तो रंग दृष्टीस पडतो. फणस हे जगातील खाण्यासाठी उपयुक्त असलेल्या फळातील सर्वांत मोठे फळ आहे.
फणस त्याचा रंग, आकार, चव आणि विशिष्ट नाद उत्पन्न करू शकणाऱ्या लाकडामुळे साहित्यिकांसह चित्रकार आणि संगीतकाराला सुद्धा आकर्षण ठरलेला आहे. संत शेख महम्मद हा एक मुस्लीम धर्मीय वारकरी संत. आपल्या एका अभंगात ते म्हणतात.
फणस सर्वांगीं कांटवले, भितरीं महा गोडीनें कोंदले, तैसें साधुहृदय जालें, बोधासंगें परियेसा. फणसाला बाहेरून भरपूर काटे असले तरी त्याच्यातील मधाळ रसाळ गरे सजीवमात्रांचा अन्नदाता ठरलेला आहे.
फणसाचे खोड तर भारतातील विविध भागातील संगीत समृद्ध करण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहे. त्याचे लाकूड सांगीतिक वाद्यांना उत्तम नाद उत्पन्न करते. गोव्यातील शिगमोत्सवात वाजविला जाणारा ढोल असो किंवा शास्त्रीय संगीतातील वीणा असो त्यासाठी फणसाचे खोड नादमधुर बाज देतात.
गोव्यातील काणकोण, खोतीगाव या प्रदेशात जर आपल्या घरी कुणी पाहुणे आले तर नाचण्याचे सरबत आणि फणसाच्या पानाच्या वेष्टणात, मळलेल्या पिठात गोड धोड घालून तयार केलेले दोणे देऊन त्यांचे स्वागत केले जाते. प्रचंड वजन, मोठा आकार, आतून चविष्ट गरे असलेला फणस म्हणजे गोमंतकातील अन्न संस्कृतीस लाभलेले नैसर्गिक धन होय.
पूर्वी खाद्य मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागायचा तेव्हा मार्च ते जूनपर्यंत चार महिने पायवाटेने प्रवास करणाऱ्यांच्या भुकेचा प्रश्न सोडविण्याचे कार्य फणस करायचा. आपल्या नातेवाइकांच्या घरी जाताना त्यांना भेट म्हणून फणसाचे पापड, चिवडा, साट यासारखे टिकाऊ पदार्थ आत्मीयतेने बनवून नेत असत. त्यामुळे शहरांतून आपल्या मुळगावी परतलेले लोकसुद्धा परतीच्या प्रवासात फणसाचे ओेझे नेते असत.
गोव्यातील पणशे, फणसुली, पणसायमळ, पणसखंडे, पणसवाडी ही ग्राम आणि स्थळ नावे तिथे मुबलक प्रमाणात असलेल्या फणसाच्या झाडावरून आलेली आहेत. गोव्यात फणसाला जरी राजाश्रय नसला तरी त्याला येथील लोकमानसाने देव वृक्षाच्या रूपात पाहिलेले आहे. बार्देश तालुक्यातील अस्नोडा गावातील एका मंदिरात भव्य देह असलेले फणसाचे झाड आहे. या वृक्षात त्यांना चैतन्यदात्री शक्तीचा अनुभव आला. त्यामुळे फणसालाच त्यांनी राष्ट्रोळीच्या रूपात पुजलेले आहे.
ग्रीष्माच्या प्रारंभी अजून फणसात गरे तयार झालेले नसतात. परंतु या कालखंडातसुद्धा कोवळ्या लहान फणसाची साल बाजूला करून, त्याला बारीक कापून मिर्ची व मीठ घालून चवदार ‘चारकुटो’ भाजी बनवली जाते. काही दिवसांनी जेव्हा गरे व आठळ्या तयार होतात तेव्हा फोडणी देऊन बनवलेली गरमागरम शाक भाजी तर गोमंतकातील जनतेची अगदी लोकप्रिय.
त्याच्या आठळ्या चण्याच्या आमटीत घातल्याने बटाट्याची गरज भासत नाही. फणसाचे गरे काढून झाल्यावर उरलेल्या मधल्या भागाचे लोणचे करता येते आणि बाहेरील साली फेकून न देता गाईगुरांना चारा म्हणून दिला जातो.
फणसाच्या आठळ्या येणाऱ्या पावसाळ्यात सुद्धा टिकून राहाव्यात म्हणून त्यांना साठवून ठेवण्याची विशिष्ट पद्धत आहे. बिया एकत्र करून पाण्याचा शिडकाव केलेल्या त्या मातीमध्ये मिसळल्या जातात. त्यानंतर त्यांना शेणाने सारवलेल्या खोलीच्या एका कोपऱ्यात जमिनीवरच ठेवल्या जातात.
पावसाळ्यात जेव्हा फणस मिळणे दुरापास्त होते तेव्हा या जपून ठेवलेल्या आठळ्यांचा श्रावणातल्या शाकाहारात समावेश केला जातो. पावसाळ्यात सहज उगवणाऱ्या तायकीळ्याच्या किंवा तेऱ्याच्या भाजीत अर्ध्या कापलेल्या आठळ्या घालून भाजीला अजून पौष्टिक आणि रुचकर बनवितात. या सारख्या पुरुमेताच्या असंख्य संकल्पना माती आणि निसर्गाशी निगडित असलेल्या संस्कृतीची परस्पर आठवण करून देतात.
नैसर्गिकरीत्या जंगलात उपलब्ध असलेले फणस अस्वलांचे आवडते खाद्य आहे. त्यामुळे उन्हाळ्यात फणसाच्या परिसरात त्याचे वास्तव असते. ती झाडावर चढून फणसाचा आस्वाद घेतात. मौसमी महिन्यांतील फणस आशियाई हत्तींनादेखील खूपच आवडतात. त्यांना खाण्यासाठी ते गावच्या आसपास घुटमळतात. फणस पिकल्यावर त्याचा प्रचंड वास सुटल्यावर माकड, शेकरू, फुलपाखरे या फळांकडे आकर्षित होतात.
पूर्णपणे पिकलेला फणस जेव्हा जमिनीवर पडतो तेव्हा तो हळू हळू कुजायला लागतो. परंतु त्यावर बुरशी येऊन मातीशी एक होण्याअगोदर त्यातील रस पिण्यासाठी अनेक फुलपाखरे येतात. पावसाळ्यात जंगल मार्गाने जाताना जर एखादा फणस जमिनीवर पडलेला असेल तर उभेउभ पानासारखे दिसणाऱ्या ब्यू ओक लिफ फुलपाखरांचे दर्शन होऊ शकते. हे फुलपाखरू सहसा फुलांतून रस पिताना आढळत नाही. त्यामुळे विशेषत फणसाचा मधुर रस पिण्यासाठी ती जमिनीवर पडून फुटलेल्या फणसावर बसलेली दिसतात. त्याचबरोबर चॉकलेट पेन्सि, कॉमन बॅरोन, कॉमन इव्हिनिंग ब्राऊनसारखी फुलपाखरेही आढळतात.
पण आज फणस वजनाने जड, त्याच्यात चिकट चीक वारंवार हाती लागतो म्हणून अनेकांनी फणसांकडे पाठ फिरवलेली आहे. फणसाचे पान काढल्यास देठातून चीक निघतो. फणस काढण्यासाठी झाडावर चढलेला माणूस जेव्हा कोयती खोडावर मारून ठेवतो तेव्हा त्या प्रत्येक आघातात खोडातून चीक येताना दिसतो. त्यामुळे रूमड, पिंपळ यांसारख्या प्रजातींसोबत फणसालाही मोरासी (फिग) या कुळात गणले जाते. अंत्रूज महालात आदिवासी जमातीने फणसाचे महत्त्व ओळखून त्यांचे चिप्स, पापड, फणसपोळी करून विक्री करण्याचे कौशल्य उपयोगात आणलेले आहे.
फणसाचा उपयोग आपल्या पूर्वजांना ज्ञात होता आणि त्यासाठी त्यांनी लग्न सोहळ्यात फणसाची भाजी महत्त्वाची मानली होती. रसाळ-कापे फणसाचे गोड गरे वर्षातून २-३ महिने खाणे त्यांचा आवडीचा छंद होता. आज आंब्या - फणसाचा उपयोग मूल्यवर्धित अन्न पदार्थ तयार करण्यासाठी झाला तर समाजमनाला फणसाची किंमत कळेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.