

India Beat Pakistan: दुबईच्या आयसीसी ॲकॅडमी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंडर-19 आशिया कपमधील ग्रुप-ए चा महत्त्वाचा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने बॅटिंग आणि बॉलिंग या डिपार्टमेंटमध्ये पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले. टीम इंडियाने हा सामना 90 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला.
दरम्यान, या सामन्यात भारतीय संघाने (Team India) पहिल्यांदा फलंदाजी करताना 46.1 षटकांत 240 धावांपर्यंत मजल मारली आणि त्यांचा डाव संपुष्टात आला. भारताच्या या धावसंख्येत आरोन जॉर्जच्या 85 धावांच्या शानदार खेळीचा मोठा वाटा होता. त्याने एकहाती किल्ला लढवत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली.
भारताने पाकिस्तानला (Pakistan) विजयासाठी 241 धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांना 49 षटकांत पूर्ण करायचे होते. मात्र, लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेली पाकिस्तानी टीम भारतीय गोलंदाजांपुढे टिकू शकली नाही. त्यांचा संपूर्ण संघ 41.2 षटकांत केवळ 150 धावांवर ऑल आऊट झाला.
भारतीय गोलंदाजीमध्ये दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहान यांचा जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. दीपेश आणि कनिष्कच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानी फलंदाजांनी अक्षरशः गुडघे टेकले. भारतीय संघाला पहिली विकेट मिळवून देण्यात वेगवान गोलंदाज दीपेश देवेंद्रन यशस्वी ठरला. नवव्या षटकात गोलंदाजीला येताच त्याने पहिल्याच चेंडूवर समीर मिन्हासला बाद करुन संघाला पहिले यश मिळवून दिले. यानंतर त्याने अली हसन आणि अहमद हुसैन यांनाही लवकर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
फिरकी गोलंदाज कनिष्क चौहाननेही गोलंदाजीला आल्यावर उस्मान खानची महत्त्वाची विकेट घेतली. भारतीय गोलंदाजांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे पाकिस्तानने केवळ 77 धावांतच आपले निम्मे खेळाडू गमावले.
पाकिस्तानकडून फक्त हुजैफा अहसनने एका बाजूने संघर्ष करत 70 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. पण त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही, ज्यामुळे तो आपल्या टीमला पराभवापासून वाचवू शकला नाही.
भारतीय संघाकडून गोलंदाजीत सर्वांनी दमदार प्रदर्शन केले. दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. किशन कुमार सिंहने 2 विकेट्स घेतल्या. खिलान पटेल आणि वैभव सूर्यवंशी यांनाही प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
पाकिस्तानवर 90 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवल्यामुळे भारतीय संघाने अंडर-19 आशिया कपच्या ग्रुप-ए च्या गुणतालिकेत (Points Table) पहिला क्रमांक पटकावला आहे. भारताने 4 गुणांसह हे स्थान मिळवले असून, त्यांचा नेट रनरेट +3.240 इतका आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा संघ 2 सामन्यांत 1 विजय आणि 1 पराभवासह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतीय संघ आता आत्मविश्वास घेऊन 16 डिसेंबर रोजी आपला पुढील सामना मलेशिया अंडर-19 संघाविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.