कोणत्याही क्षेत्रातील प्रगतीसाठी परकी देशांवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने टाकलेल्या प्रत्येक पावलाला प्रोत्साहन दिले पाहिजे. भारतीय बनावटीचा ‘३२-बीट मायक्रोप्रोसेसर- विक्रम’ हे असेच एक महत्त्वाचे पाऊल आहे.
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) पूर्णतः भारतीय बनावटीचा ‘३२-बीट मायक्रोप्रोसेसर- विक्रम’ विकसित केलेला आहे. या मायक्रोप्रोसेसरचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. कोविड काळात सुरू झालेले ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ आणि अमेरिकी अध्यक्षांच्या बेफाम मनमानीमुळे भर दिले जात असलेले स्वदेशी अभियान या दोन्ही उपक्रमांचे हे फळ आहे, असे मानता येईल.
चिप किंवा प्रोसेसर, इंटिग्रेटेड सर्किट या क्षेत्रात स्वतःचे उत्पादन घेऊन पहिल्यांदाच भारताचा प्रवेश होतो आहे, ही आनंदाची बाब. जगाचे अत्यंत झपाट्याने डिजिटायझेशन होत आहे. त्याची गती वाढतच राहणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्य (एआय) मानवी व्यवहाराच्या एकेक अंगांना स्पर्श करत आपली व्याप्ती विस्तारते आहे.
एकविसाव्या शतकाचा पाव कालखंड उलटत आहे. मानवी उत्क्रांतीच्या पट्टीने मोजमाप केले, तर पंचवीस वर्षे अत्यंत क्षुल्लक. जवळपास अदखलपात्र. तथापि, याच पंचवीस वर्षांनी जगाला तंत्रज्ञानाचे विराट रूप दाखवले आहे. तंत्रज्ञानात क्षणोक्षणी होणारी प्रगती, डिजिटायझेशन आणि ‘एआय’चा सर्वव्यापी संचार यातून आगामी काळाची झलक दिसते आहे.
अशा आजच्या काळासाठी सुसंगत तंत्रज्ञानात भारताने एखादे पाऊल टाकले, तर त्या पावलाचे स्वागत जरूर केले पाहिजे. येत्या दहा ते पंधरा वर्षांत या पावलांनी भारताची वाटचाल आणखी वेगाने होईल, अशी आशा बाळगायलाही हरकत नाही. कोणत्याही क्षेत्रातील प्रगतीसाठी परकी देशांवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने टाकलेल्या प्रत्येक पावलाला प्रोत्साहन दिले पाहिजे.
उपग्रह प्रक्षेपणात भारताने गेल्या तीन दशकांत घातलेली गवसणी हे स्वदेशीचे उत्तम उदाहरण आहे. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीयांची व्यावसायिक प्रगतीही जगाच्या औत्सुक्याचा विषय आहे. या साऱ्या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगतीचा टप्पा गाठण्यासाठी सातत्याने अनेक वर्षे प्रयत्न करावे लागले आहेत. शिक्षण, संशोधन, पायाभूत सुविधा, कौशल्यविकास अशा साऱ्यांची सांगड घालतच या क्षेत्रांमध्ये भारताचा दबदबा तयार झाला आहे.
भारतीय बनावटीचा ३२-बीट मायक्रोप्रोसेसर ‘विक्रम’कडे अशा दीर्घकालीन दृष्टीने पाहिले पाहिजे. ‘विक्रम’च्या निमित्ताने तीन महत्त्वाच्या आव्हानांची जबाबदारी पेलण्याचीही तयारी करावी लागेल. त्यातील सगळ्यात पहिली म्हणजे संशोधनाकडे अत्यंत उदासीनपणे पाहण्याची वृत्ती बदलावी लागेल. औषधनिर्मिती वगळता संशोधनात लक्षणीय काम केल्याची उदाहरणे आपल्याकडे सापडत नाहीत.
सापडली, तर ती हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असतात. कोणत्याही क्षेत्राचा विकास संशोधनाशिवाय अशक्य आहे. वाहननिर्मिती असो किंवा संरक्षणसाहित्याचे उत्पादन असो, युरोप-अमेरिका-रशिया-चीन-इस्राईलची उत्पादने जुळणीसाठी भारतात आणायची हे काही संशोधन नव्हे. संशोधन मूलभूत स्वरूपाचे आणि प्रामुख्याने उपयुक्त हवे. शिक्षणव्यवस्थेची सध्या सुरू असलेली फेररचना संशोधनाला अधिक चालना देईल, अशी अपेक्षा आहे.
मात्र, ही अपेक्षाच आहे. संशोधन विकासासाठी प्रचंड गांभीर्याने सर्व क्षेत्रांत प्रयत्न सुरू आहेत, असे दिसत नाही, हे वास्तव आहे. दुसऱ्या प्रमुख जबाबदारीमध्ये शिक्षण आणि कौशल्यविकास हातात हात घालून चालला पाहिजे. साक्षरता म्हणजे शिक्षण नव्हे. शिक्षणाने समाजातील प्रश्नांना हात घालता आला पाहिजे. आपले अभ्यासक्रम दशकभर जुने असतील, तर आपण फक्त बेरोजगारांची फौज निर्माण करू, हे ध्यानात घ्यावे लागेल.
तिसरे आव्हान आहे, सर्वच क्षेत्रांत जगात आपले नेमके स्थान काय आहे, याचे सुस्पष्ट चित्र भारतीयांना माहिती असले पाहिजे. त्यासाठी माहितीची मुबलक उपलब्धता हवी आणि धोरणे पारदर्शी हवीत. ते तसे नसेल, तर ‘विक्रम’ चिपच्या उत्पादनानंतर भारतात फार मोठा बदल तत्काळ व्हावा, असे अपेक्षांचे ओझे तयार होते. या ओझ्याखाली संशोधन गुदमरते. शिक्षण रेंगाळते आणि ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या’ परिस्थिती निर्माण होते.
सेमीकंडक्टर उत्पादनक्षेत्रात चीन, तैवान, अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया यांची मक्तेदारी आहे. या देशांनी १९८०च्या दशकात ‘३२ बीट प्रोसेसर’ निर्माण करून वापरण्यास सुरुवात केली. ती निर्मिती आपण २०२५च्या सप्टेंबरमध्ये करत आहोत. आपण जवळपास पावणेदोन लाख कोटी रुपयांच्या चीप दरवर्षी आयात करतो. हे अवलंबित्व दूर करण्यासाठी २०२१ मध्ये ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन’ सुरू झाले.
आपण २०२५ मध्ये ‘विक्रम’पर्यंत पोहोचलो. सेमीकंडक्टर उत्पादनक्षेत्राच्या नजरेत हे पाऊल चिमुकले आहे, याचे भान हवे. हे क्षेत्र भक्कम करण्यासाठी तब्बल ८५ हजार कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. प्रचंड मोठे भांडवल या उत्पादनासाठी गुंतवावे लागणार आहे. त्यामुळे, पहिल्या पावलाबद्दल अभिनंदन जरूर करू आणि त्याचबरोबर भविष्यकाळात ही पावले दमदार पडण्यासाठी आव्हानांना जोमाने सामोरे जाऊ.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.