Persian influence on marathi Dainik Gomatnak
गोंयकाराचें मत

‘फारसी-मराठी’ संमिश्र प्रभावाला 19 व्या शतकातील इतिहासकारांनी ‘मराठा संस्कृतीवरील मुस्लिम आक्रमण’ असे स्वरूप दिले..

Persian influence on marathi : भाषेतील ‘फारसी-मराठी’ संमिश्र प्रभावाला एकोणिसाव्या शतकातील राष्ट्रवादी इतिहासकारांनी ‘मराठा संस्कृतीवरील मुस्लिम आक्रमण’ असे नकारात्मक स्वरूप दिले.

Sameer Panditrao

कौस्तुभ नाईक

जोपर्यंत हिंदुस्थानापर्यंत जात नाही तोपर्यंत मेहंदीला रंग येत नाही. इराणमध्ये उगम होणारी प्रतिभा ही हिंदुस्थानात आगमन झाल्यानंतर रंग पकडते असे जे मुहम्मद कुली सलीम तेहरानी म्हणतो, ते भारत-इराण यांच्या दृढ संबंधांचे द्योतक आहे.

इराणवर झालेल्या हल्ल्यात परदेश नीतीच्या नावावर जी भारताने बोटचेपी भूमिका घेतली तिच्यामुळे वर्षानुवर्षे प्रस्थापित असलेल्या भारत-इराण संबंधांवर पाणी तर फेरलेच पण हा जो शतकांचा दुवा आहे त्यालाही कुठेतरी तडा गेला.

आज अज्ञानामुळे असेल कदाचित पण इराणवर हल्ला झाला तर भारतीयांनी हळहळण्याची काय गरज, असा प्रश्न विचारणारी एक पिढी आहे. फारसी भाषेचा कितीतरी खोल प्रभाव भारतीय उपखंडावर आहे आणि मराठी भाषा आणि संस्कृतीही त्याला अपवाद नाही.

मराठी प्रशासकीय आणि दप्तरी कामकाजावर फारसी भाषेचा अत्यंत खोल प्रभाव पडला होता. इतिहासकार डॉ. प्राची देशपांडे ह्यांनी लिहिलेल्या एका निबंधात त्या लिहितात की ‘कौलनामा’ यांसारखे दस्तऐवज आणि ‘इस्तावा’ किंवा ‘किर्दी मामुरी’ यांसारखे फारसी शब्द मराठी लेखनिक आणि महसूल पद्धतींमध्ये खोलवर रुजले होते.

दख्खनमधील सुलतानशाहीच्या काळात, मोडी लिपीत लिहिलेले फारसी-मराठी द्विभाषिक दस्तऐवज मोठ्या प्रमाणावर वापरले जाऊ लागले. या द्विभाषिक दस्तऐवजांमध्ये फारसी आणि मराठी भाषेच्या वेगवेगळ्या भूमिका होत्या; वरिष्ठ अधिकारी अधिकाराची मोहोर आणि मुख्य आदेशासाठी संक्षिप्त फारसी भाषेचा वापर करत असत, तर कनिष्ठ लेखनिक गावपातळीवरील कामकाजाच्या सविस्तर नोंदींसाठी मराठीचा वापर करत असत.

१६७४मध्ये, शिवाजी महाराजांनी मुघल प्रशासकीय शब्दांचे वर्चस्व कमी करण्यासाठी ‘राज्यव्यवहारकोश’ तयार करवून घेतला, ज्यामध्ये ‘कौलनामा’ ऐवजी ‘अभयपत्र’ यांसारखे संस्कृत पर्यायी शब्द सुचवले गेले.

या प्रयत्नांनंतरही, फारसी दस्तऐवजांची मूळ रचना, मोहोर लावण्याची पद्धत आणि जुने शब्द प्रशासनात टिकून राहिले. या ‘फारसी-मराठी’ संमिश्र संस्कृतीचा कायमस्वरूपी ठसा आजही ‘सनदापत्रे’ आणि ‘कागदपत्रे’ (फारसी मूळ शब्द आणि मराठी प्रत्यय) यांसारख्या जोडशब्दांतून दिसून येतो.

एकोणिसाव्या शतकातील राष्ट्रवादी इतिहासकारांनी या भाषिक प्रभावाला ‘मराठा संस्कृतीवरील मुस्लिम आक्रमण’ असे नकारात्मक स्वरूप दिले होते, परंतु आजचे इतिहासकार याकडे व्यापक आणि बहुभाषिक जगाचा एक प्रादेशिक आविष्कार म्हणून पाहतात.

ह्या भाषिक देवाणघेवाणीचा गोमंतभूमीही अपवाद नव्हती आणि गोव्यातल्या अभिलेखागारात अनेक फारसी भाषेतली कागदपत्रे आहेत. तिथले अधिकारी डॉ. बालाजी शेणॉय ह्यांच्या पुढाकाराने त्यातल्या बऱ्याच साधनांचा अनुवादही झालेला आहे.

त्याआधी डॉ. पांडुरंग पिसुर्लेकरांनीही काही फारसी साधनांचा वापर करून गोव्याच्या इतिहासावर प्रकाश टाकला होता. त्यात १६७८साली एका फारसी भाषेत लिहिलेल्या अदिलशाहाकालीन निवाड्याद्वारे कवळे येथील सरज्योतिषांची सेवा कायम करणारे पत्रही पिसुर्लेकर यांनी छापले आहे. त्यापलीकडे गोव्यात फारसी व मराठी भाषेचे जे आदानप्रदान होते त्याचेही अनेक नमुने मराठी पत्रव्यवहारातून पाहायला मिळतात. उदाहरणार्थ हे पत्र पहा..

मोहिबानपन्ह: मुखलिसान दस्तगाहा: अजी दिलयेखाल नारो चिमणाजी सरसुभेदार मामले फोंडा दुवा सलाम बाजत सलाम उंकी येथील खैर जाणून मोहिबी आपली खैरखुशी कलमी करीत असिलें पाहिजे दिगर मोहिबी किताबत व आंबे सुमार ७० सतर पाठविले पोंहचोन दिल खूश होऊन आराम पावला यैसेंच हरवख्त दरघडी खत किताबत पाठऊन खबर घेणें

मोहिबास वाजीब असे कुकरली व असोळणे वगैरा गाव यांचा हिसेब लिहिला तो मालुम जाहला त्याची तहकिकात मनात आणून लिहिणे ती लिहिले जाईल मोहिबा कारणे किरळ वोसीं सुमार १ पाठविली आहेत बा माणासे विठ सेणवी धुमे पोंहचवितील ज्यादा काये लिहिणे प्यार मोहबत खुदा येताला सलामत रखो हे किताबत रा छ ७ माह जमादिलोवल हे किताबत.

पत्राची भाषा जरी मराठी असली तरी त्यावर फारसीची गडद छाया वाचणाऱ्याच्या नजरेतून नक्कीच सुटायची नाही. पोर्तुगीज सरकारचा व्यवहार गोव्यात जरी मुख्यत्वे पोर्तुगीज भाषेतून चालला असला तरी शेजारच्या राज्याची खबर ठेवण्यासाठी, मुघलांशी संपर्क साधण्यासाठी त्यांना फारसी भाषेवर अवलंबून राहावे लागत व त्यासाठी त्यांनी फारसी भाषातज्ज्ञांचे पदही निर्माण केले होते.

बरीच दशके पानवेली रायबंदर येथील कामत वाघ घराण्यातील व्यक्ती ह्या पदावर होती. १८०१साली बहुगुण कामत वाघ ह्यांनी लिहिलेल्या गोमंतकाच्या बखरीत रामचंद्र बहुगुण कामत वाघ हे तत्कालीन फारसीनवीस (फारसी तज्ज्ञ) म्हणून नेमलेले होते असा उल्लेख सापडतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Forex Reserve Record: भारताच्या परकीय चलन साठ्याने रचला इतिहास! फॉरेक्स रिझर्व्ह 785 अब्ज डॉलर पार; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

Horoscope 12 September 2026: सूर्याचं नक्षत्र बदलताच 'या' राशींचं चमकणार भाग्य, शनिवार ठरणार वरदान; होणार अफाट धनलाभ

Mapusa Coconut Price: महागाईत गणेशोत्सवाचा आनंद वाढला! म्हापशात अवघ्या 2 रुपयांत नारळ; दोन दिवसांत तब्बल 9 ते 10 हजार नारळांचे वाटप

Galjibaga Beach: गालजीबाग किनाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात! अनेक वर्षांपासून सुरू असलेली धूप वाढली; वनखात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा माजी नगरसेवकांचा आरोप

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

SCROLL FOR NEXT