परवा ‘अॅडोलसन्स’ ही चार भागांची मालिका पाहून हादरून गेलो. संपूर्ण जगात तिने झंझावात निर्माण केला आहे. भारतात तिला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळेल असे मालिकेच्या निर्मात्यांनाही वाटले नव्हते, परंतु कधी नव्हे त्या मोठ्या प्रमाणावर ही मालिका पाहिली जाते. आपल्या देशात सात कोटी लोकांनी ती पाहिली. माध्यमे तिच्यावर चर्चा करू लागलेली आहेत आणि मानसोपचार तज्ज्ञही समाजात अजूनपर्यंत फारशा बोलल्या न गेलेल्या या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहू लागले आहेत.
मालिकेची सुरुवात एका पोलिस धाडीने होते. युकेमधील एका शहरात शस्त्रसज्ज पोलिस भल्या पहाटे एका सुखवस्तू बंगल्यात घुसून पौंगडावस्थेतील मुलाला ताब्यात घेतात. घरात हाहाकार माजतो, तो निष्पाप मुलगाही (जॅमी मिलर) अवाक् होऊन ‘मी काही केले नाही, मी निष्पाप आहे,’ असे किंचाळत राहतो. पोलिस मुलाला अंथरुणातून ओढून काढतात, तेव्हा भयाने त्याची विजार ओली झालेली असते... पालक अवाक् होतातच, परंतु आमच्या घरात असे काही घडलेले नाही. आमची मुले असला प्रकार करणार नाहीत, असे ओरडून रडत सांगत राहतात.
आता दुसरे दृश्य पोलिस ठाण्यातील आहे. तेथेही जॅमी रडत आपण निष्पाप असल्याचे सतत सांगत राहतो. त्याची आर्जवे, चेहऱ्यावरचा भाबडेपणा, ओघळणारे अश्रू पाहून प्रेक्षक हेलावून जातात, त्याचे पालकही हवालदिल झालेले... युकेतील पोलिस कायद्याचे पालन करणारे. तेही निष्ठुर नाहीत, परंतु त्यांना नेमकेपणाने कायदा माहीत असतो.
वडिलांना ते नियम सांगत राहतात, त्यांना कायद्याने काय अधिकार आहेत, त्याचीही माहिती दिली जाते. वकीलही सरकारतर्फे मिळवून दिला जातो. वकील त्यावेळी एक गोष्ट पालकांच्या लक्षात आणून देतात. हा प्रकार गैरसमजुतीतून घडला असण्याची शक्यता नाही. तसे घडले असले तरी तुम्हांला नुकसान भरपाई मिळू शकते, परंतु पोलिस अशी धाड घालून मुलाला उचलून नेतात, याचा अर्थच त्यांच्याकडे सज्जड पुरावे असण्याची शक्यता आहे. तेव्हा आम्हांला या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन काय घडले, ते जाणून घ्यावे लागेल.
चित्रपटाच्या शेवटापर्यंत हा जॅमी निष्पाप भासतो. तो गुन्हेगारी कृत्य करू शकणार नाही, असे वाटत राहते. तरीही पोलिस एक-एक पुरावे समोर आणू लागतात. वर्गातील ज्या मुलीची - मेरी हिची - हत्या झालेली असते, तिच्याशी भांडताना जॅमीची सीसीटीव्ही कॅमेराबद्ध झालेली क्लिप समोर आणली जाते. दुसऱ्या कॅमेऱ्यात हा जॅमी त्या मुलीचा पाठलाग करतानाचे दृश्य टिपले जाते. तिसऱ्या कॅमेऱ्यामध्ये ही घटना घडल्यानंतर तो घरी जातानाचे दृश्य पोलिसांनी मिळविलेले असते.
निष्पाप, भाबडा, गैरसमजुतीतून पकडला गेलेला असा हा कोवळा जॅमी पुढे एका समुपदेशक महिलेशी कसा बेदरकारीने आणि तरबेज पद्धतीने वागतो, तेही मनाला धक्का देणारे. तिला तो कोंडीत पकडतो, तिला घाबरवतो तो प्रसंग अंगावर काटा उभा करणारा, या वयातील मुले कोणत्याही थराला कशी जाऊ शकतात... किशोरवयीन मुलाचे वर्गातील मुलींबरोबर खटके उडणे, इतर मुलांबरोबरही त्याचे न जुळणे, त्यामुळे येणारा अस्वस्थपणा, शाळेतील बाचाबाची, मुलांमधील हिंस्र भांडणे, मुलींची शेरेबाजी, डिजिटल युगात सेक्स आणि कौमार्याच्या बाबतीत मनावर होणारे परिणाम, सध्याच्या किशोरवयीन मुलांसमोरील प्रश्न व त्यांचे अगदीच वेगळे बनलेले भावविश्व यावर ‘अॅडोलसन्स’ गांभीर्याने उजेड टाकतो.
वास्तविक या जॅमीवर आई-वडिलांनी चांगले संस्कार केलेले असतात. घरात दोन मुले (जॅमी व त्याची बहीण), दोघांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते, परंतु कळत-नकळत ही मुले इंटरनेट आणि डिजिटल माध्यमांकडे खेचली जाऊन त्यातून त्यांचे वेगळेच भावविश्व तयार होते. त्याचा नेमकेपणाने वेध हा चित्रपट घेतो.
सध्याच्या गुंतागुंतीच्या जीवनात पालक व त्यांची किशोरवयीन अपत्ये यांच्या समज येण्याच्या काळात इंटरनेटच्या प्रभावामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती अजूनपर्यंत एवढ्या भयानकरीत्या समोर आली नव्हती. खून घडले होते, मुले विचित्र वागत होती, हिंसाचारही घडत होता. परंतु गोष्टी एवढ्या गंभीर थराला गेल्या, समाज म्हणून त्याकडे फारसे गांभीर्याने कोणी पाहिले नव्हते.
कारण मुले वडिलांची नजर चुकवून आधी जसा टीव्ही पाहत तसा आता इंटरनेट वापरू लागली आहेत. या चित्रपटाने पालकांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केलेले नाही, परंतु जीवनाचा निष्ठुर भाग बनलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्वरेने जनजागृती आणि हस्तक्षेप आवश्यक असल्याचे मात्र ठासून सांगितले आहे.
दुसऱ्या बाजूला समाजमाध्यमांनी विविध विषय हाताळले आणि तो चित्रित करण्याचा त्यांना अधिकार आहेच, तरीही असे प्रकार हाताळताना फिल्टर लावले जातात. पालकांना त्याची जाणीव करून दिली जाते व काही सुरक्षा उपायही सुचविले जातात. परंतु परिस्थिती हाताळताना पालक, समाजाची तारांबळ उडते आहे. डिजिटल साक्षरता आता पालकांनाच नव्हे तर समुपदेशक, शिक्षक व शिक्षण संस्था यांनाही आव्हानात्मक ठरू लागली आहे. त्यातून शाळा आणि घरांमध्ये खुला सुसंवाद होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. इंटरनेट वापरावर निर्बंध आलेच पाहिजेत, असे आता समुपदेशकही म्हणू लागलेत.
दुसरी बाब आहे, ती म्हणजे वर्गातील मुलां-मुलींचे भावविश्व समजून घेण्यात शिक्षक कमी पडू लागले आहेत. मुले एकमेकांची टिंगलटवाळी करतात, पुढे जाऊन ही टिंगल छळ, सतावणूक बनते. अशावेळी शिक्षकांकडे तक्रार करूनही काही होत नाही.
मुलीसुद्धा मुलांचा मानसिक छळ करू शकतात. मुलांना आपल्यात मिसळू न देणे, अत्यंत खोडसाळपणे बोलणे, काही कटकारस्थानेही रचणे, विशेषतः समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया देणे, असे प्रकार तर श्रीमंत शाळांमध्ये सर्रास चालू आहेत. शिवाय मुलींचे लक्ष वेधून घेण्यासाठी काही मुले आक्रस्ताळेपणा करतात, वर्गात धटिंगणगिरी करतात. त्याचा परिणाम इतर मुलांवर होऊ शकतो. अशा मुलांशी पालक-शिक्षकांनी बोलले पाहिजे. अनेक मुले इंटरनेटमुळे आपल्या कुटुंबीयांपेक्षा अशा गटांमध्ये अधिक ओढली जाऊ लागली आहेत. महानगरांमध्ये असे प्रकार अधिकच घडू लागले आहेत व सेक्स आणि हिंसाचार त्यांच्या जीवनाचा भाग बनते आहे. संपूर्ण समाजासाठीच ही एक भयंकर आव्हानात्मक बाब मानली पाहिजे.
‘अॅडोलसन्स’ मालिकेत तरुण मुली कशा पद्धतीचे पार्टनर किंवा मित्र पसंत करतात आणि त्यातून मुले दुखावली जातात. त्यांच्यामध्ये एक तर दुबळेपणा किंवा आक्रमकता निर्माण होऊन हिंसक प्रतिक्रिया निर्माण होऊ शकते, यावर उजेड टाकला आहे.
किशोरवयात अनेक शाळांमध्ये मुला-मुलींच्या जोड्या बनलेल्या असतात. मुली सुंदर दिसणाऱ्या, शरीर कमावलेल्या, हरहुन्नरी आणि छान विनोदी, समंजस मुलांच्या घोळक्यात राहतात. दुर्दैवाने अशी मार्दव मिरवणारी - मुले कमीच असल्याने बराच मोठा वर्ग या आनंदापासून दूर राहतो. त्यांना मुली खिजगणतीत घेत नाहीत किंवा त्यांच्यावर अरबट-चरबट विनोद केले जातात. त्यामुळे या मुलांच्या कोवळ्या मुलांवर ओरखडा उमटतो. आपल्या सांन्निध्यात मुली येणारच नाहीत, आपण एकटे राहू, अशी काहीशी त्यांची मानसिकता बनते. पुढे जाऊन त्यातील अनेकजण ‘सक्तीचे ब्रह्मचारी’ बनलेले असतात. असा एक नवीन वर्ग तयार होऊन त्यांंच्याबद्दल या मालिकेच्या निमित्ताने बरेच छापून आले आहे.
महिला आता अधिकच चोखंदळ बनल्या आहेत. बऱ्याच पुरुषांना पार्टनर मिळत नाहीत. त्यातच समाजात मुलींची संख्या घटली आहे. ‘अॅडोलसन्स’मध्ये जे मुलगे मुलींना आवडत नाहीत, ते पुढे जाऊन कसे विकृत बनतात व आपला राग हिंसाचारातून कसा प्रकट करतात, त्याचे नेमकेपणाने चित्रण केले आहे.
भारतात अशा पद्धतीचा एक वर्ग तयार झाला आहे, तो अस्वस्थ आहे आणि त्याचीही प्रतिक्रिया भीषण असू शकते. असे काही निष्कर्ष अलीकडे राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. हा गट समाजमाध्यमातील विकृत चित्रांच्या संपर्कात आल्यास त्यातून कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते. कोवळ्या वयात मुले, ट्विटर व इन्स्टाग्रामच्याही आहारी जात असल्याचे दिसून आले आहे.
शालेय जीवनात सध्या सेक्स व हिंसाचारासंदर्भात बरेच काही घडते, ज्याचा सुगावा शिक्षक-पालकांना लागलेला नाही. हुशार मुलामुलींचे वेगळे घोळके असतात आणि इतर मुला-मुलींवर ही मंडळी अश्लील आणि तेवढेच हिंस्र कमेंट करीत असतात. या पिढीच्या विचारातही प्रचंड बदल झाला आहे. त्यातील काहीजण कट्टर धार्मिक किंवा जातीयवादी असतात.
किशोरवयातच सेक्सबद्दल त्यांच्या जाणिवा तीव्र बनतात. शिवाय लैंगिक संबंधाचा टप्पाही त्यांनी ओलांडलेला असतो. दोन हजार सालानंतर जन्माला आलेल्या या किशोरवयीन मुलांना ‘झेंजी’ म्हटले जाते. इन्स्टाग्रामवरच्या प्रभावातून त्यांची भाषाही बदलली. ती सांकेतिक भाषेत बोलतात. त्यात ‘इमोजी’चा वापर होतो. इमोजीत रंग महत्त्वाचा. ‘व्हॅलेंटाइन डे’ला जसा लाल गुलाब तसा तिरस्कारासाठी काळा रंग! जॅमीला चिडवण्यासाठी ही वर्गमैत्रीण इमोजी टाकून त्याला भडकावते. ‘तू पुरुषच नाहीस, तुला मी भाव देत नाही, तू माझ्या प्रेमाच्या पात्रतेचा नाही’, हे त्याला समाजमाध्यमांवर सुनावले जाते.
या समजुती-गैरसमजातून ही किशोरवयीन मुले एक तर स्वतःला इजा करून घेतात किंवा प्रत्यक्ष हिंसाचाराच्या पातळीवरही उतरतात. गोव्यात काही वर्षांपूर्वी वास्को शहरात चांगल्या घरातील तीन-चार मुलांनी एकत्र येऊन आपल्याच एका मित्राचा सूत्रबद्ध रितीने खून केला होता. त्यावेळी इंटरनेट एवढ्या जोमात नव्हते.
चातुर्यकथा किंवा चित्रपट पाहून ही मुले या विकृतीत सापडली होती. अनेक प्रगत देशांमध्ये विकृत विचारसरणींमुळे कित्येक खून, हिंसाचार घडत असल्याचे दिसून आले आहे. ‘अॅडोलसन्स’मध्ये १३ वर्षीय जॅमी मिलर आपल्याला दुर्लक्षिणाऱ्या वर्गमैत्रिणीचा ठरवून काटा काढतो.
वर्गात आपल्याला कोणी भाव देत नाहीत, मुली दुर्लक्ष करतात, आपल्याला आवडणारी मुलगी समाजमाध्यमांवरून आपली टिंगलटवाळी करते, या भावनेने जॅमी पछाडलेला असतो. समाजमाध्यमांवर अशा भावनेने पछाडलेल्या पुरुषांचा एक प्रभावी गट तयार झालेला आहे. बहुतांश मुलींना समाजातील २० टक्केच पुरुष आवडतात. उर्वरित बहुतांश पुरुष त्यामुळे वैफल्यग्रस्त बनतात. त्यांना काहीतरी करून दाखवायचे असते, ही सध्याची भावना जॅमीमध्ये प्रकटलेली दाखविली आहे.
भारतामध्येही अशा पुरुषांचा गट तयार झाल्याचे वृत्त एका राष्ट्रीय वृत्तपत्राने ‘अॅडोलसन्स’वर भाष्य करताना अलीकडेच दिले आहे. असे मुलगे समाजमाध्यमांवर खूपच आक्रमक होतात. मुलींना वेश्या म्हणण्याइतपत त्यांची मजल जाते. स्त्रीवादाचीही ते निर्भर्त्सना ते करतात व धर्मांधांप्रमाणेच मुलींना शिक्षण देऊ नये, अशा थरांची वक्तव्ये त्यांच्याकडून केली जातात. इंटरनेटवर जादा वेळ दिल्याचेही हे घातक परिणाम आहेत.
इंटरनेटच्या सान्निध्यात जादा वेळ घालविल्याने ही माध्यमे माणसाच्या मनाचा कब्जा घेतात व व्यक्तीच्या आयुष्यात असुरक्षितता निर्माण करतात. इंटरनेट प्रभावामुळे सुंदर आणि बुद्धिमान मुलींबद्दल असूया व तिरस्कार निर्माण करणारा एक घटक आहे. वरिष्ठ समाजाबद्दल ते अनादर पसरवतात. द्वेष व असूया ही एक सध्या इंटरनेटचा आमूलाग्र भाग झाली आहे. त्यातून सच्चे मित्र तुटले जाऊन माणसे एकलकोंडी बनली व त्यांच्या मनात विकृत हिंस्र विचार सतत निर्माण झाले. बोलायला, आपल्या भावना व्यक्त करायला जवळ कोणी नसल्याने ही मुले एकतर हिंसाचाराला बळी पडतात किंवा अमलीपदार्थांच्या आहारी जातात.
विचारसरणीशी निगडित द्वेषमूलक वक्तव्ये व भाषणे सध्या समाजापुढील सर्वांत मोठे आव्हान ठरलेले आहे. हिंसाचार कमी न होता, तो वाढीस लागला आहे. इंटरनेटमुळे माणसे दुरावली, त्यांच्यातील आपुलकी, प्रेम आटत गेले. सर्वांनाच आपण कोण तरी मोठे आहोत, हे दाखविण्याची गरज वाटू लागली. त्यातून हिंसाचार वाढत असल्यास नवल नाही.
‘अॅडोलसन्स’मध्ये एका बिघडलेल्या-विकृत मनोवृत्तीवर उजेड टाकला आहे. तशीच गंभीर बाब ड्रग्सने निर्माण केली आहे. शाळांमध्येही ड्रग्स पोहोचले, ही बातमी आता जुनी झाली.
शाळांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने किशोरवयीन मुले इतरांच्या सान्निध्यात येतात. इंटरनेटमुळे त्यांचे कुतूहल चाळवलेले असते. त्यातून ड्रग्सचे सेवन सुरू होते व पुढे ते अंगवळणी पडते. तज्ज्ञांच्या मते, झेंजी मुले पालकांनी ‘वाढवलेली’ नसतातच. शिक्षकांच्याही प्रभावात नसतात. ती आता इंटरनेटची अपत्ये ठरली आहेत. ही अस्वस्थ पिढी आहे. इंटरनेट सतत त्यांच्या कानात फुतफुतते, आई-वडील थकून भागून झोपी गेल्यावर त्या पिढीचा दिवस सुरू होतो... इंटरनेटने त्यांची एक तशी ओळख तयार केली आहे.
अनेक राज्यांमध्ये मुले अत्यंत कोवळ्या वयात ड्रग्स सेवन करीत असल्याचे आढळून आले आहे. क्रीडा मैदान, शाळांचे आवार व शीतपेय विकणाऱ्या गाड्यांवरही अमलीपदार्थ सर्रास उपलब्ध आहेत. केरळमध्ये एका सर्वेक्षणानुसार ७० टक्के मुलांनी दुसऱ्या वर्गातच ड्रग्स चाखून पाहिले होते, असे आढळून आले. एका पुनर्वसन शिबिरात २१० विद्यार्थ्यांचा अभ्यास केला असता, त्यातील ७० टक्के मुले कोवळ्या वयात ड्रग्ससंदर्भात जाणून होती व काहींनी तर केजीमध्ये ड्रग्स चाखला होता.
डिसेंबरचा वापर, ड्रग यामुळे अनेक मुले आक्रमक बनतात. फार उशिरा पालकांच्या नजरेस ही बाब येते. घरात भीतीचे वातावरण पसरते. आपला मुलगा अमलीपदार्थांच्या आहारी गेल्याने आई-वडील चक्रावतात. जीवनात वेगळे अद्भुत करून दाखवण्याच्या हव्यासाने एक पिढीच नष्ट झाल्याचा हा अनुभव आहे. सुरुवातीला महाविद्यालयांमध्ये ड्रग पोचले होते. आता त्यांनी प्राथमिक शाळांमध्ये शिरकाव केला आहे. अनेक मुलीही या चक्रात अडकल्या आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे अनेक पालकांना परिस्थिती कशी हाताळावी हे समजतच नाही. आपले मूल जीवनापासून तुटत चालले आहे, आपण हतबल आहोत, असे त्यांना जाणवते. मुलाचे मूड स्विंग होत राहतात, त्याचे अभ्यासावरचे लक्ष उडून जाते, तो रात्री अपरात्री जागा राहतो, त्रागा करतो, त्याचे आरोग्य बिघडते - केवळ किशोरवयीन घडामोडी म्हणून त्याकडे पाहता पाहता परिस्थिती गंभीर बनते.
सध्या केवळ युरोप नव्हे तर भारतीय समाजही या पालक - किशोरवयीन मुलांचे जीवन या द्वंद्वात सापडला आहे. ‘अॅडोलसन्स’ने त्यावर भीषण उजेड टाकला. केवळ मानसोपचारतज्ज्ञांच्या दालनात दबक्या आवाजात चाललेली चर्चा उघड्यावर आली. त्यातून पालक व मुलांचे दुरावलेले संबंध, विशेषतः पौगंडावस्थेतील मुलांची भाषा, त्यांची बदललेली जीवनशैली व डिजिटल युगाचा संबंध हे विषय समोर आले. एका गंभीर सामाजिक वैगुण्यावरचे हे प्रखर भाष्य आहे. समाजमाध्यमांचा अतिवापर व पौगंडावस्थेतील युवकांवर होणारे गंभीर परिणाम अत्यंत प्रत्ययकारी पद्धतीने मांडण्यात आला. मेंदू विकसित होण्याच्या काळात स्मार्टफोन किंवा समाजमाध्यमांचा प्रभाव पडून समाजावर काय परिणाम होऊ शकतो, याचे दर्शन घडले.
समाज आधीच तुटला आणि एकत्रित कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झाली, शेजारधर्म राहिला नाही. एकेकाळी शेजारचा माणूसही वाईट संगतीत दिसणाऱ्या मुलाचा कान पकडण्याचा अधिकार बाळगत असे. आता किशोरवयीन मुले-मुली पार्किंगमध्ये हातात बाटल्या घेऊन मुलींच्या खांद्यावर हात टाकून बसलेले आढळल्यास, त्यांना हटवण्याचे धैर्य कोणाला नसते. कारण त्यांच्या वाटेला जाण्याची छाती कोणात नाही. वर्गात शिक्षकही घाबरून असतात. एक समंजस, संगोपनमूल्य व्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या आहेत... ‘अॅडोलसन्स’ एक भयपट म्हणून आपण जरी पाहिला तरी तीच परिस्थिती आपल्या शेजारी, गावात, जवळपास घडू लागली आहे. आपण ती पाहत असतो. कधी कधी आपण तिच्याकडे काणाडोळा करतो. मात्र ती अगदीच खिजगणतीत न घेण्यासारखी मात्र नक्कीच नाही...!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.