IFFI Goa 2025 Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

IFFI 2025: 'इफ्फी'च्या कार्यक्रमस्थळी गोमंतकीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार दिसायला हवे होते; परंतु चित्र मात्र अगदीच वेगळे..

IFFI Goa: इफ्फीसारख्या एखाद्या कार्यक्रमात सर्वांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी घोषणा करायची (ज्यात कला व संस्कृतीखातेही आले) आणि प्रत्यक्षात आपल्याला हवे तेच, हव्या त्याच माणसांसाठी करायचे यात गोवेकरांना इफ्फीचा कैफ कसा बरे चढेल?

गोमन्तक डिजिटल टीम

शंभू भाऊ बांदेकर

गोव्यात ५६ व्या इफ्फी म्हणजे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे खुल्या आकाशाखाली उघडे पडलेले उद्‍घाटन मोठ्या थाटामाटात गोव्याच्या राजधानीत झाले. बाकी रसिकांची, गोवेकरांची वाहतूक कोंडीमुळे झालेली अलौकिक गैरसोय वगळता, यंदा राजधानी पणजी शहरातून उद्‍घाटनाच्या दिवशी या सोहळ्यानिमित्त एक भव्य चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली, ती डोळ्यांचे पारणे फेडणारी होती.

या महोत्सवात जगभरातील एकूण १२७ देशातील साडेसात हजारांहून अधिक प्रतिनिधींची नोंदणी झाली असून ८४ देशांतील एकूण २७० हून अधिक चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

इथपर्यंत हे ठीक आहे, पण यात गोव्यातील दिग्दर्शकांचे तीन चित्रपट आणि गोव्यातील निर्मात्यांचे दोन चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत, हीच काय ती गोव्याच्या बाबतीत जमेची बाजू आहे. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ यातसुद्धा हल्ली बदल होत असतात.

पण २००४पासून या महोत्सवाने गोव्यात आपला डेरा टाकला व नोव्हेंबर महिना सुरू झाला की चित्रपट शौकिनांना इफ्फीचे वेध लागायला सुरुवात होते. सुरुवातीपासूनच गोवा हेच इफ्फीचे कायमस्वरूपी केंद्र व्हावे यासाठी प्रयत्न सुरू होते व त्याला यशही आले आहे. पण या क्षेत्राशी संबंधित येथील तारे, तारका, दिग्दर्शक, निर्माते यांना त्याचा किती फायदा झाला हे पाहू जाता गोवेकरांच्या पदरात काही पडले नाही, याचाच प्रत्यय वारंवार येतो.

सुरुवातीला तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, दिगंबर कामत यांनी हा महोत्सव यशस्वी व्हावा म्हणून जाणीवपूर्वक भरीव कार्य केले आहे. त्यात त्यांना यशही आले.

सुरुवातीला गोव्यातील कलाकारांना यात इथे तिथे बागडताही आले. त्यावेळच्या मनोरंजनपट कार्यक्रमात आपले कलाकौशल्य पेश करण्याची संधीही काहीजणांना मिळाली. मनोरंजन कार्यक्रम समितीवर विष्णू सूर्या वाघ यांच्यासारखा जाणकार कलाकार आल्यामुळे त्यांनी गोव्यातील अनेक कलाकारांचे विविध ठिकाणी कार्यक्रम घडवून आणले.

याचे कारण म्हणजे त्यावेळी चित्रपट प्रदर्शनातील काही महत्त्वपूर्ण भाग गोव्याने आपणाकडे घेतले होते. त्यानंतर हळूहळू गोव्यातील कलाकारांना कसे उमलावे हाच जणू महत्त्वाचा भाग झाला, व त्याचा परिणाम इफ्फीच्या गोमंतकीय रया हरवल्यास व येथील जनतेला रंजनमनोरंजनापासून दूर ठेवण्यात झाला.

खरे तर, नवोदितांपासून प्रथितयश असलेल्या विविध क्षेत्राशी संबंधित कलाकारांना घेऊन इफ्फी करता आले पाहिजे, असे पर्रीकर-दिगंबर जोडगोळीला वाटत होते. पण दुर्दैवाने आज हा महोत्सव आचके घेत आहे. त्यातून ‘हेचि फळ काय मम तपाला’ हे या क्षेत्राशी संबंधित कलाकारांना वाटले, तर त्यात आश्‍चर्य नाही.

या संदर्भात नुकतीच ‘गोमन्तक टीव्ही’वर संपादक संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’मध्ये गोव्यातील राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मीकांत शेटगावकर यांनी जी खंत व्यक्त केली ती खूप काही सांगून जाते.

शेटगावकर म्हणाले, ‘इफ्फीच्या आयोजनात कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणात गोमंतकीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार दिसायला हवे होते. परंतु चित्र मात्र अगदीच वेगळे पाहायला मिळत आहे. एकंदरीत या क्षेत्राशी संबंधित गोमंतकीयांना डावलले जात आहे.

त्यांनी या महोत्सवात सहभागी व्हावे असेदेखील कुणाला वाटत नाही.’ ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया लक्षात घेऊन येथील जाणकार कलाकारांची कळत नकळत संबंधितांनी जी उत्तरक्रिया चालवली आहे, ती थांबवावी असे आवाहन करावेसे वाटते.

मनोरंजन सोसायटीने चांगले काम केलेले एक माजी सदस्य विशाल पै काकोडे यांनीही आपली स्पष्ट व सडेतोड भूमिका मांडताना म्हटले, ‘स्थानिक चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांना योग्य तो मानसन्मान द्यावा.

जेणेकरून त्यांच्या कार्याची दखल घेण्यासारखे ते होते. पण तसे झालेले दिसले नाही. मुख्य म्हणजे या संस्थेत या संस्थेशी संबंधित लोकच नाहीत. (थोडक्यात राजकारण्यांना हवी असलेली खोगीरभरती आहे) ज्यावेळी गोमंतकीय कलाकारांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मानित करण्यात आले, त्यावेळीही समाजमाध्यमांवरून साध्या शुभेच्छादेखील त्यांना देण्याचे औचित्य साधले नाही. त्यामुळे ही मनोरंजन सोसायटी नेमके करते काय? हा सवाल काकोडे यांनी उपस्थित केला आहे. त्याला कोण व कसे उत्तर देते हे पाहणेही मनोरंजक ठरेल!

सरकार आपणास आवश्यक वाटणारे बदल-फेरबदल अनेकवेळा करत असते. शेटगांवकर आणि पै काकोडे यांच्या वक्तृत्वाची दखल घेऊन अजूनही गोमंतकीय निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्यासाठी काही करता आले तर इफ्फीचा या मातीतल्या माणसास फायदा झाला असे म्हणता येईल.

एक गोष्ट मात्र निश्‍चितपणे नाकारता येणार नाही, ती म्हणजे गेल्या २० वर्षांच्या या महोत्सवात गोमंतकीय कलाकार, निर्माते, दिग्दर्शकांना बरेच काही शिकता आले, एखाद्या कार्यक्रमात सर्वांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी घोषणा करायची (ज्यात कला व संस्कृती खातेही आले) आणि प्रत्यक्षात आपल्याला हवे तेच, हव्या त्याच माणसांसाठी करायचे यात गोवेकरांना इफ्फीचा कैफ कसा बरे चढेल?

या क्षेत्रातील विविध भागातील अनुभवी लोक आपल्याला मार्गदर्शन करतात. देशात विदेशात गाजलेल्या चित्रपटांचा, त्यातील तारे-तारका यांच्या अभिनय कौशल्यांचा आनंद घेता येतो. आपल्या आवडल्या तारे-तारकांना दिग्दर्शक, निर्मात्यांना, जवळून पाहता येते, जमेल तर त्यांच्याशी संवाद साधता येतो, इत्यादी जमेच्या बाजू जरूर आहेत.

इथे आणखी एक गोष्ट नमूद करणे भाग आहे, तो म्हणजे सिनेक्षेत्रात वावरणारे, मडगाव रवींद्र भवनाचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांची संयम बाळगण्याची भूमिका! त्यांचे म्हणणे असे की सिनेमांच्या निर्मितीसाठी सरकारने आर्थिक योजना सुरू केली आहे.

त्यासाठी २०२३पर्यंतचे अर्ज ग्राह्य धरण्यात आले आहेत, केवळ निधी वितरण बाकी आहे. त्यामुळे सिनेनिर्माते, कलाकार आदींनी थोडा संयम बाळगावा, सरकारवर टीका करणे टाळावे. प्रत्यक्षात गेली दोन वर्षे संबंधित लोक संयम आणि विवेक बाळगून शांत आहेत.

आता यात संयमाची आणि समन्वयाची भूमिका घेणारे तालक यांना सरकारच्या म्हणण्यात तथ्य वाटत असेल तर त्यांनीच सरकारला साकडे घालून हा इफ्फी समाप्त होण्यापूर्वी निधीचे वाटप होईल याकडे लक्ष द्यावे, असे सुचवावेसे वाटते.

कारण फक्त या महोत्सवाच्या वाहतूक व पाहुण्यांचे खाणे पिणे, यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा करणाऱ्या व चित्ररथ स्पर्धेसाठी लाखोंच्या रकमेची खैरात करणाऱ्या शासनाला ही गोष्ट अशक्य वाटू नये. तरी कृपया या गोष्टीचा सकारात्मक विचार करून महोत्सव सर्वार्थाने सर्वांसाठी यशस्वी करावा, असे नम्रपणे सुचवावेसे वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assonora Accident: दारूच्या नशेत चालवली गाडी, थेट कोसळली कालव्यात; मित्राचा बुडून मृत्यू, संशयिताचा जामीन नाकारला

Goa ZP Election: 2 मतदान केंद्रे रद्द, नवीन केंद्राला मान्यता; दक्षिण गोव्यात जि.पं. निवडणूक वारे जोरात

Sattari Scrapyards: भंगारअड्ड्यांवर पडला छापा, गोव्यात सापडला बांगलादेशी घुसखोर; सत्तरीतील बेकायदेशीर अड्डयांमुळे 3 वर्षांपूर्वीची घटना चर्चेत

Goa Spiritual Festival 2026: गोव्यात रंगणार 'स्पिरिच्युअल फेस्टिव्हल', लंडन येथे घोषणा; देवस्थानांची दर्शनयात्रा, तारखा जाणून घ्या..

Goa Beach: "भज मन राधे गोविंदा!" हरमल बीचवर चक्क विदेशी पर्यटकांनी गायले 'भजन'; गोव्याच्या किनाऱ्यावरील व्हिडिओ तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT