Iffi Goa 2024 Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Iffi Goa 2024: "इफ्फी सुरुवातीला बोल्ड होता, आता कलाकारांची मांदियाळी; फक्त भिकार चित्रपट माथी मारू नका"

International Film Festival of India: चित्रपट महोत्सवाची यंदा ५५वी आवृत्ती होती. गोव्यात तो २००४पासून भरतोय. या महोत्सवाने आता आपले पाय व्यवस्थित रोवले आहेत. एकतर तो गोव्यातच भरणार असण्यावर आता शिक्कामोर्तब झालेय खरे, परंतु त्याचे चाचपडणे संपून त्याला स्वतःचा स्वर कधी सापडेल याचीच चर्चा होतेय.

गोमन्तक डिजिटल टीम

राजू नायक

गोव्यात इफ्फी भरल्यापासून त्याच्या प्रत्येक आवृत्तीला मी रसिक बनून सहभागी झालो. यावर्षी त्याचे एकदम नवे रूप समोर आले. सध्या लोक ओटीटी प्लॅटफॉर्मकडे आकर्षित होताहेत. नेटफ्लिक्ससारख्या कंपन्या मोठे योगदान देत आहेत. परंतु इफ्फीवरही त्यांचे प्रभुत्व असावे काय? इफ्फी हे जागतिक चित्रपट महोत्सवांप्रमाणेच कलात्मक आणि प्रयोगशील चित्रपटांचे व्यासपीठ होतेय म्हणूनच जागतिक सिनेमा व आंतरराष्ट्रीय स्पर्धा या विभागात जगातील नवेकोरे सिनेमा आणून त्यांच्यातील नावीन्य आणि भव्यदिव्यता भारतीय प्रेक्षकांसमोर मांडण्याची ती हक्काची जागा होती.

दुर्दैवाने अलीकडे या महोत्सवाला वेगळेच परिमाण लाभले आहे. यावर्षी तर देशी चित्रपटांचे वारेमाप प्रदर्शन, खासगी प्रायोजकांचे प्रभुत्व आणि भारतीय चित्रपट कलाकारांची मांदियाळी हाच झगमगाट अधिक होता. या बदललेल्या इफ्फीवर आता चर्चा व्हायला हवी.

चित्रपट महोत्सवाची यंदा ५५वी आवृत्ती होती. गोव्यात तो २००४पासून भरतोय. या महोत्सवाने आता आपले पाय व्यवस्थित रोवले आहेत. एकतर तो गोव्यातच भरणार असण्यावर आता शिक्कामोर्तब झालेय खरे, परंतु त्याचे चाचपडणे संपून त्याला स्वतःचा स्वर कधी सापडेल याचीच चर्चा होतेय. कारण मुंबईत भरणाऱ्या ‘मामी’ महोत्सवाचे अस्तित्व दोलायमान बनले आहे, याचे प्रमुख कारण त्याच्या प्रायोजकांनी घेतलेली माघार.

तो खासगी पातळीवर भरत असे. तो स्वायत्त असे, म्हणूनच त्याचे आयोजन व स्वरूप नेटके असे. त्याच्या दर्जाबद्दल आयोजक चोखंदळ असत. परिणामी तो इफ्फीला समांतर चालत असे, काहीवेळा तर इफ्फीपेक्षा अधिक दर्जेदार अशी ख्याती त्याने प्राप्त केली होती. वास्तविक आता इफ्फी ‘मामी’ला मागे टाकणार असेच वातावरण असल्याने मुंबईतील रसिकांसाठी तरी ती आनंददायी बाब नाही.

सरकारनेच दबाव आणून ‘मामी‘चे स्थान डळमळीत केल्याची चर्चा आहे. परंतु तरीही यावर्षी तो पुढे रेटण्यात आला. पूर्वी तो मुंबईतील २२ चित्रपटगृहांत झळकत असे, यंदा केवळ पाच ठिकाणी स्क्रिनिंग चालले. यापूर्वीही २०१३-१४मध्ये ‘मामी’च्या मार्गात अडथळे निर्माण झाले होते. त्यावेळी चित्रपट क्षेत्रातील अनेक नामवंतांनी पुढे येऊन तो आपल्या खांद्यावर पेलून धरला. त्यावेळी ‘जिओ’ पुढे येत होती. तिने सढळ हस्ते मदत केली व तो चांगलाच नावारूपाला आला. मामीप्रमाणेच पुण्यातील ‘टीस’ महोत्सवही आपली प्रतिष्ठा टिकवून आहे. त्यानंतर इफ्फीत बदल झाले व चित्रपट महोत्सव संचालनालय गुंडाळून ही सर्व जबाबदारी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाकडे (एनएफडीसी) सोपविण्यात आली. एनएफडीसीने सध्या आक्रमक धोरण स्वीकारल्याचे दिसते आहे. परंतु त्यांचा सारा भर इफ्फी लोकप्रिय बनविण्यावर आहे. त्यातून दर्जेदार चित्रपटाचा दर्जा गमावला तर जाणार नाही ना, अशी चिंता टीकाकारांमध्ये आहे.

चित्रपट महोत्सव जगात अनेक ठिकाणी चालतात. जितकी अधिक वर्षे हे महोत्सव चालले आहेत, तितका त्यांचा दर्जा वाढलेला आपण पाहतो. कान, टोरँटो, जर्मनीसारख्या महोत्सवांनी तर जागतिक दर्जा टिकवला आहे. तेथे चित्रपटांना प्रवेश मिळणे म्हणजेच त्यांच्यासाठी भाग्याचे दार खुले होण्यासारखे असते. परंतु त्यासाठी विशेष मेहनत त्यांनी घेतली आहे. स्वायत्तता हे त्यांचे मुख्य ब्रीद, त्यामुळेच समकालीन स्वरूपाचे वादग्रस्त विषय निवडणे, जगातील ताज्या घडामोडींकडे लक्ष ठेवणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचे परमोच्च शिखर गाठले जाईल यावर कटाक्ष ठेवणे आणि कोणत्याही राजकीय दबावाची पर्वा न करणे आदी तत्त्वे त्यांनी कटाक्षाने पाळली आहेत. भारतात त्याचेच तर वावडे आहे.

मी अनेक चित्रपट रसिक टीकाकारांशी बोलत होतो. संतोष पाठारे हे मुंबईत दर्जेदार चित्रपटांच्या क्षेत्रात काम करणारे एक संघटक. मुंबईत प्रभात चित्रमंडळाचे एक महत्त्वाचे सदस्य. त्यांच्याशी बोलत असताना इफ्फीने घेतलेले नवे वळण, टीकाकारांना भावेल काय, याचे नेमके उत्तर मला सापडले.

संतोष पाठारेंसारखे कला समीक्षक गोव्यात किमान आठ दिवस मुक्काम करतात. स्वखर्चाने येऊन आपली चित्रपटांची आवड भागवतात. ते दरवर्षी इफ्फीमध्ये किमान २० चित्रपट पाहत आले आहेत. तेही सतत लोकांशी बोलून महोत्सवाबद्दलच्या आवडी-निवडी समजून घेत असतात. त्यांनाही इफ्फीबद्दल संमिश्र प्रतिक्रिया जाणवल्या.

संतोष पाठारेंच्या मते इफ्फीमध्ये चित्रपट पाहण्याची एक पद्धती आहे. चित्रपट महोत्सवाची माहिती पुस्तिका ताब्यात आल्यानंतर त्यावर संशोधन करावे लागते. ते म्हणाले, मी चित्रपट निवडताना चित्रपटाचा दिग्दर्शक, कलाकार व विषय यांचा अभ्यास करूनच तिकीट आरक्षित करतो. सामान्य प्रेक्षक असा अभ्यास न करता थिएटरमध्ये गेला तर तो कंटाळणार हे निश्चित. कारण वाईट सिनेमेही असतात. चित्रपट निवडताना दिग्दर्शक व कलाकार यांची किमान नावे नजरेखाली घातली तर त्या चित्रपटाची मांडणी व स्वरूप समजून येऊ शकते. विशेषतः नावाजलेल्या जागतिक चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेले चित्रपट तज्ज्ञांच्या नजरेखालून गेलेले असतात. त्यामुळे त्यांचा किमान दर्जा राखलेला असतो.

मी त्यांना माझी शंका विचारली. सुरुवातीच्या सात-आठ वर्षांत इफ्फी ‘बोल्ड’ होता. चित्रपट महोत्सव सेन्सॉरविरहित असतो, त्याचे स्वरूप तसेच राहायला हवे, कारण चित्रपटविषयक जाणकार, तज्ज्ञ यांच्यासाठी हे व्यासपीठ आहे. महोत्सवांची मांडणीच तशी ठेवलेली आहे. त्याचे स्वरूप आता बदलल्यासारखे वाटते का? हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे भारतात कधीही प्रदर्शित न होऊ शकणारे अनेक चित्रपट विशेषतः जे सेक्सबाबत भाष्य करीत, ते पूर्वी महोत्सवात पाहायला मिळाले आहेत. ते हल्ली दिसेनासे झाले आहेत. पाच एक वर्षांपूर्वी काही चित्रपट निवडूनही ते प्रदर्शित झाले नव्हते. एक-दोन भारतीय चित्रपटांनाही त्याचा फटका बसला. कारण ते चित्रपट ‘बोल्ड’ होते. उजव्या शक्तींना संस्कृतीच्या वैविध्याचा नेहमीच तिटकारा असतो. त्यांना साऱ्या देशाला एका साच्यात बसवायचे असते.

नैतिकतेचा साचा!

भाजप सत्तेवर आल्यानंतर संस्कृतीवर त्यांनी पकड बसवली. राजकीय विषय बाजूलाच राहिले, शिवाय अशा नाजूक विषयांवर आपोआप बंदी आली. अशी सरकारे सत्तेवर आल्यानंतर आपोआपच चित्रपट निवडणाऱ्या मंडळींचाही दृष्टिकोन बदलत असतो. चित्रपट दोन पातळ्यांवर निवडले जातात. एक म्हणजे राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन. राज्यकर्तेच जर संस्कृती रक्षणाचा आव आणून गदा घेऊन बसलेले असतील तर मग विशिष्ट चाकोरीतील चित्रपटच निवडले जातील, तेथे प्रक्षोभक नवविचारांच्या चित्रपटांना स्थान नाही.

दुसरी बाब खर्चाची आहे. मोठमोठ्या नावाजलेल्या चित्रपट महोत्सवात गाजलेले किंवा पारितोषिकप्राप्त चित्रपट आणायचे झाल्यास त्यासाठी खर्च करावा लागतो. विशेषतः पहिल्या पुरस्कारप्राप्त चित्रपटाला जी बिदागी द्यावी लागते ती काही वेळा आयोजकांना परवडणारी नसते. परंतु यावर्षी ‘मामी’ चित्रपट महोत्सवात आलेले चित्रपटही इफ्फीत स्थान मिळवू शकले नाहीत. उदाहरणार्थ ‘कान’मध्ये अनेक पारितोषिकप्राप्त चित्रपट ‘अ‍ॅमेलिया पेरेझ’. स्पॅनिश भाषेतील ही विनोदी संगीतिका त्यानंतर अनेक महोत्सवांमध्ये गाजली. ‘कान’मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान लाभलेला ‘एनोरा’ मुंबई महोत्सवात दाखवला, परंतु गोव्यात आम्ही त्याला मुकलो.

केवळ खर्च आखडता घेण्यासाठी इफ्फीमध्ये चित्रपट आणले जात नाहीत काय? टीकाकारांच्या मते एनएफडीसीला खर्चाचे प्रमाण केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय आखून देत असते. त्यात एक महत्त्वाचा हिस्सा चित्रपट मिळवण्यावर खर्च होतो. परंतु आम्ही नेहमी पाहत आलोय, चित्रपट महोत्सव संचालनालय किंवा एनएफडीसीपेक्षा गोव्याची मनोरंजन सोसायटी अधिक निधी खर्च करीत आली आहे. यावर्षी तर तो खर्च दीडशे कोटींहूनही अधिक झाला आहे, त्यात कला अकादमीचा खर्च जमेस धरलेला नसेल. परंतु मग एवढा खर्च करून नावाजलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रपट आणता येत नसतील तर अशा अनाठायी, बेगडी चकचकाटाला काय अर्थ? वास्तविक भारत सरकारने इफ्फीच्या चित्रपट निवड प्रक्रियेला अधिक महत्त्व दिले पाहिजे. कान, टोरँटोसारख्या महोत्सवातील पुरस्कारप्राप्त व प्रयोगशील चित्रपटांना येथे स्थान मिळालेच पाहिजे.

ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांच्याशी मी बोलत होतो. ते म्हणाले, गोव्यात आम्ही एवढा खर्च करून येतो ते भिकार सिनेमे पाहायला नव्हे. या महोत्सवात अतिसामान्य व बेकार असे अनेक चित्रपट होते. अरे तुमच्याकडे प्रोग्रामर्सची एवढी मोठी यंत्रणा आहे, चांगले चित्रपट निवडा. काही मराठी चित्रपट तर अतिसामान्य होते. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात असे ‘प्रोत्साहनपर’ चित्रपट दाखविण्याचे धोरण नको! ते परखडपणे पुढे म्हणाले : काही चांगल्या चित्रपटांच्या थिएटरमध्ये खुर्च्या रिकाम्या असतानाही आम्हांला तिकीट नसल्याचे कारण सांगून आत जायला दिले नाही. ‘मामी’मध्ये थिएटरमध्ये जागा राहिल्या तर रांगेतल्यांना आत सोडण्याची सोय आहे.

संतोष पाठारे यांचे मत मात्र वेगळे होते. त्यांच्या मते चित्रपट महोत्सवाचे स्वरूपच आता बदलले आहे. कारण चित्रपट निर्माणातही काही बदल होत आहेत. एकेकाळी सेक्स हा जगभर चित्रपटांसाठी आकर्षणाचा विषय असायचा. परंतु आता चित्रपट निर्माणावर बाजाराने गारूड घातले आहे. म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्म लोकप्रिय होत आहेत व ते घराघरांत पोहोचले आहे. जगभरात तयार होणारे आक्रमक व प्रयोगशील चित्रपट आता घरात बसून पाहता येतात. एकाचवेळी ते जगभर दिसतात. त्यामुळे कुटुंबाला दाखवल्या जाणाऱ्या चलचित्रांत किमान सभ्यता असावी, असा निकष बाळगला जातो. परंतु जगभरातील राजकीय विषयांना मात्र येथे बंधन नाही.

भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून त्यांना आपले राजकीय विषय इफ्फीवर लादायची सोय उपलब्ध झाली आहे, याबद्दल कोणाला शंका नसणार. यावेळी तर इंडियन पॅनोरमाची सुरुवातच ‘वीर सावरकरने’ झाली व त्यात ‘काश्मीर फाइल्स’चीही निवड झाली. ‘साबरमती रिपोर्ट’, ‘कलम ३७०’ यांनी निवड समितीचा दृष्टिकोन नेमकेपणाने दृग्गोचर केला.

इफ्फीमध्ये यावेळी ‘स्थलांतर’ हा विषय प्रामुख्याने समोर आला. पाच एक वर्षांपूर्वीपर्यंत दुसरे महायुद्ध व नाझी भस्मासुरामुळे निर्माण झालेली मानवाची ससेहोलपट हा विषय तीव्रतेने पुढे येत असे. त्या काळात मी दर महोत्सवात अंगाचा थरकाप उडवणारे सात-आठ तरी ज्यू शिरकांडावरचे चित्रपट पाहिलेले आहेत. दुसऱ्या महायुद्धाला अनेक वर्षे लोटूनही अद्याप ज्यूंच्या जखमा भरून आलेल्या नाहीत, याचेच ते प्रत्ययकारी दर्शन असे. ज्यूंची कलाक्षेत्रांवरही जबरदस्त पकड असल्यामुळे आपल्या पूर्वजांच्या वेदना ते सतत मांडतात. याही महोत्सवात असे एक-दोन सिनेमा खात्रीने प्रदर्शित झाले, परंतु ५५व्या महोत्सवात प्रत्ययकारी पद्धतीने सामोरे आला तो स्थलांतराचा विषय. आपण गोव्यात बसून विशिष्ट संकुचितपणे स्थलांतराचा विषय हाताळतो. बाहेरून झुंडी येताहेत, त्यामुळे आपण भयभीत होतो. परंतु गोव्यात संधी नाकारलेले सुशिक्षित, बुद्धिमान तरुणही आता मोठ्या प्रमाणात स्थलांतर करू लागले आहेत. हा विषय बोचणारा आहे, परंतु त्यावर राजकीय उत्तर आपल्याकडे नाही.

दुसऱ्या बाजूला जगभर युरोपामधूनही बेकायदेशीर स्थलांतराने जीवघेणे स्वरूप गाठले आहे. यावेळी असंख्य चित्रपट या स्थलांतरावर होते. ज्यात मुस्लीम अतिरेकाकडे ओढले गेलेले तरुण. त्यांचे अकाली मृत्यू, पाठी राहिलेल्या त्यांच्या कुटुंबाची होणारी ओढाताण, ताटातुटीत भरडलेली मुले, हिंसाचार अशा अनेक पद्धतीने स्थलांतराचा विषय समोर आला.

‘लुना पार्क’ हा चित्रपट ग्रीस देशाच्या अंतर्गत अस्वस्थतेवर भाष्य करणारा होता. ‘लॉस्ट हॉर्स’मध्येही मंगोलीयन स्थलांतरितांचा प्रश्न हाताळण्यात आला. ‘रेड पाथ’ व ‘हू आय बिलाँग टू’ या चित्रपटांनी मानवी संवेदनशीलतेचे नवे पदर उलगडून दाखविले. त्यात अत्यंत संवदेनशील पद्धतीने मानवी भावबंध प्रकट केले आहेत. जगभर रोजीरोटीचा प्रश्न तीव्र झाला, तसे तरुणांचे जथ्थे आपले देश सोडून युरोपकडे सरकू लागले. मध्य आशियामध्ये आता दहशतवाद फोफावला जात आहे. ग्रीससारखा देश आपल्याला केवळ पर्यटनामुळे माहीत आहे.

परंतु तेथील अंतर्गत भागात गरिबी आहे. पोटा-पाण्याचा प्रश्न तीव्र बनला आहे. अशावेळी एक महिला आपल्या तरुण मुलाला घेऊन बेकायदेशीररीत्या दुसऱ्या देशात जाते, तेथे पकडली जाते व त्यानंतर होणारी ताटातूट हा या कथेचा केंद्रीय बिंदू आहे. या स्थलांतर विषयामागे जगण्याची तीव्र धडपड प्रत्ययकारी पद्धतीने समोर येते. ‘लॉस्ट हॉर्स’ चित्रपटात एका वृद्ध रहिवाशाचा घोडे पालनाचा व्यवसाय असतो, त्याचे घोडे नाहीसे होतात. त्यांच्या शोधात तो आपल्या मुलासह जंगलात हिंडू लागतो. त्या जंगलात लपून राहणारे स्थलांतरित, त्यांचे दैन्य याला तो सामोरा जातो, पुढे एका स्थलांतरिताच्या मुलाचा झालेला अपघाती मृत्यू, शहरातील मुला-मुलींचे संबंध अशी जगण्याची तीव्रता अत्यंत गंभीरपणे चित्रपटात हाताळली आहे. स्थलांतरितांच्या कथांमध्ये सारखेपणा असतो, रोजीरोटीसाठीची धाव, ताटातूट, शोषण आणि हिंसाचार. हा संघर्ष सध्या जगभर शिगेला पोचला आहे. जगभरातील तरुण त्यात पिचले जाताहेत.

संतोष पाठारे यांनी चांगल्या चित्रपटांसाठी गोव्यातील इफ्फीला भक्तिभावाने कायम यायचे ठरविले आहे. २००४पासून यात्रेला यावे तसे अनेक समीक्षक, टीकाकार नित्यनेमाने गोव्यात येतात. यावेळी त्याच्याप्रमाणेच महाराष्ट्रातील अनेक चित्रपटरसिक गर्दी करून आले होते. इतकी वर्षे मी केरळीयन प्रेक्षकांची गर्दी पाहत होतो. इफ्फीमध्ये केरळीयन चित्रपट रसिकांचे प्रभुत्व नेहमीच राहिले आहे. ते नेहमी वेगळ्या पोषाखात असल्याने त्यांचा पेहराव व भाषा यामुळे सहज ओळखता येतात. केरळातही चित्रपट महोत्सव होतो, परंतु गोव्यात त्यांना भावते ती गोष्ट म्हणजे जवळजवळ एकाच ठिकाणी चित्रपट पाहण्याची सोय. दुसरी गोष्ट म्हणजे केरळीयन माणूस हा चित्रपटभक्त म्हणूनच ओळखला जातो.

एकूण दक्षिणेवरच चित्रपटांनी गारूड घातले आहे. त्यात केरळी माणूस त्याच्यावरच्या उत्कट प्रेमासाठी ओळखला जातो. तो एकवेळ उपाशी राहील, परंतु चित्रपट पाहील, अशीच रसिकता आता महाराष्ट्रात निर्माण झालेली आपण पाहतोय. गेल्या किमान दहा वर्षांत महाराष्ट्रात निर्माण होणारे चित्रपट वाढले आहेतच, अभिरुची निर्माण झालीय, शिवाय तरुण पिढीने चित्रपटाला दिलेले नवीन परिमाण विस्मयचकित करणारे आहे. चित्रपटगृहातही लागोपाठ अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित होत असल्याने तरुणवर्ग त्यांना प्रतिसाद देतो आहे. त्याचाच परिणाम म्हणजे यंदा इफ्फीत जिथे जातो तेथे मराठी कानावर पडत होती. मराठीतील सर्व तरुण कलाकारांनी हजेरी लावलीच, शिवाय चित्रपट समीक्षक आणि रसिक यांचीही उपस्थिती लक्षणीय होती. इफ्फीची सर्वांत मोठी उपलब्धी म्हणजे भारतातील वेगवेगळ्या ठिकाणच्या रसिक व समीक्षकांसाठी एकत्र भेटण्याचे ते एक महत्त्वाचे ठिकाण बनलेय. एवढा मोठा कलाकारांचा मेळावा देशात अन्यत्र क्वचितच भरत असेल.

संतोष पाठारेंच्या मते यावर्षी इफ्फीतील चित्रपट पणजीबाहेर एकदोन ठिकाणी दाखविण्यात आले, जेथे पणजीहून जाणे शक्य नव्हते. यावेळी मडगावमध्ये काही प्रयोग ठेवण्यात आले होते. परंतु तेथील आयनॉक्समध्ये चित्रपटांना किती प्रतिसाद मिळाला, हा प्रश्नच आहे. फोंडा शहरात प्रेक्षागरे ओस पडली होती.

इफ्फी केवळ पणजीमध्ये सीमित राहू नये, तो इतर महत्त्वाच्या ठिकाणीही जायला हवा, तेथील प्रेक्षकांचा पणजीत येऊन पणजीतील वाहतूक कोंडी वाढवण्याला हातभार लागू नये. परंतु याचा अर्थ मडगाव, फोंडा येथे केवळ एकच स्क्रिनिंग ठेवणे असा नाही. यावेळी तसे झाले व इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमधील काही चित्रपट केवळ मडगावच्या आयनॉक्समध्ये प्रदर्शित झाले. तेथे केवळ सात-आठच प्रेक्षक होते. निळू दामले तेच म्हणाले : मडगाव, पर्वरी, फोंडा येथे तुम्ही काही चित्रपट दाखवू शकता, परंतु आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सारे चित्रपट पणजीत प्राधान्यक्रमाने दाखविलेच पाहिजेत. एकाच जागेत जवळजवळ सर्व चित्रपट पाहता येतात ही पणजीची खासियत बनली पाहिजे.

पणजीतील बहुतेक चित्रपटगृहांना यावर्षी झालेली तुफान गर्दी, हा महोत्सव आता वयात आलेला आहे, याचीच प्रचिती देत होता. माझ्या मते, यावर्षी बहुतेक जागतिक सिनेमा गर्दीने फुलले. बहुतेक प्रेक्षकगृहे फुल्ल होती, परंतु त्यात आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे किती चित्रपट होते? आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कमी चित्रपट निवडल्यामुळे मोक्याच्यावेळी चित्रपटगृहामध्ये गाला प्रिमियर किंवा देशी चित्रपटांनी गर्दी केली होती. टीकाकार मानतात की, अशा महोत्सवामध्ये जगात गाजलेले चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध असते. देशी चित्रपट आपल्याला वर्षभरात कुठेही पाहता येतात, हे देशी चित्रपट आता ओटीटीवरही महिनाभरात उपलब्ध होत आहेत, परंतु बरेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे, वेगवेगळ्या भाषांतील चित्रपट कधीच पाहायला मिळत नाहीत.

ते पाहणे ही इफ्फीची उपलब्धी असते. त्यामुळे अशा चित्रपटांची संख्या वाढली पाहिजे. निळू दामले यांची प्रतिक्रिया होती, ‘हौशी लोकांचे चित्रपट दाखविण्याची सोय इफ्फीमध्ये नको. आम्ही पैसे खर्चून येतो, आमच्या माथी असले भिकार चित्रपट मारू नका!’ महत्त्वाच्या वेळांमध्ये पणजीतील मुख्य प्रांगणात आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखविले पाहिजेत व त्यासाठी इफ्फीने खर्च करताना हात आखडता घेऊ नये, असेच टीकाकारांचे म्हणणे आहे. योग्य नियोजन झाले आणि खर्चाबाबतही दिल्ली आणि गोव्याने समन्वय साधला तर कितीही महागडे चित्रपट आणता येणे शक्य आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इफ्फीवर कोणाचे सरकार आहे, त्याचे सावट पडू नये. तो स्वतंत्र राहावा. इफ्फी स्वायत्त ठेवण्यावरच त्याची आंतरराष्ट्रीय ख्याती व यशापयश टिकून राहील़!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT