IFFI 2025 Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

IFFI 2025: वाहतूक कोंडी करून, सर्वसामान्यांना त्रास देऊन 'इफ्फी'चे उदघाटन का केले?

IFFI 2025: नाही म्हणायला स्थानिक चित्ररथांना दिलेली संधी स्‍थानिक कलाकारांसाठी सकारात्मक बाब ठरली इतकेच त्‍यातील समाधान. पण एक नक्की, यापुढे वाहतूक कोंडी करून इफ्फीचे उद्घाटन हा एक ‘रस्ताद सोहळा’ ठरू नये.

गोमन्तक डिजिटल टीम

'इफ्फी’ अर्थात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गुरुवारी राजधानी पणजीत प्रारंभ झाला. खुल्या जागेत उद्‌घाटन सोहळ्याचा प्रथमच प्रयोग झाला. तो कसा होतो, याची अनेकांना उत्कंठा होती. सोहळा संपल्यानंतर नवा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा झाला. तसा तो करणे आयोजकांना क्रमप्राप्त आहे; परंतु वास्तव निराळे होते.

उद्‌घाटन सोहळ्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयोजन भानाचा प्रकर्षाने अभाव दिसला, असे खेदाने म्हणावे लागत आहे. सिनेरसिकांच्या सोहळ्यात राजकारण आरूढ होऊ नये. अलीकडे ‘इफ्फी’चेही राजकीयीकरण होत आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा आला. उद्‌घाटन सोहळ्यात राजकीय पुढाऱ्यांना प्राधान्य अधिक होते, व्यासपीठावर राजकीय नेते अधिक दिसले.

ज्यामुळे बऱ्याच सिनेकर्मींची निराशा झाल्यासारखी स्थिती होती. गर्दीवर कुणाचे नियंत्रण नव्हते. मुदलात, उद्‌घाटन सोहळ्याचे बांबोळीतील शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजन का टाळले? त्यामागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. येणारे रसिक, होणारी गर्दी, वाहन पार्किंग, वातानुकूलन व्यवस्था मुखर्जी स्टेडियमवर असताना उद्‌घाटन सोहळ्यासाठी खुली जागा निवडण्याचे प्रयोजन काय?

अर्थात तशीच काही अडचण असल्यास तीही नामुष्कीच. ‘नवा प्रयोग’ या नावाखाली उघड्यावर जागतिक दर्जाचा कार्यक्रम करून काल वाहतूक कोंडीला आयते निमंत्रण दिले. गोवा म्हणजे युरोप नव्हे वा काश्मीर वा पूर्वोत्तर राज्य. येथे बारमाही उकाडा. सकाळी काहीसे थंड असणारे वातावरण दुपारनंतर तापते, सायंकाळनंतर उष्मा हळू हळू कमी होत जातो. परिणामी, उद्घाटनाची वेळ पाहता कार्यक्रम खुल्या जागेत घेणे असंयुक्तिक होते.

जगात असा कुठेही महोत्सव होत नसेल की, जो वाहतुकीस, नागरिकांना वेठीस धरतो. लोकांना दोन दिवस पाच-सहा तास वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. इफ्फीबद्दल सामान्यांचे मत काय होत असेल? दिखाऊ सोहळ्यात व समारंभात वाया गेलेला महोत्सव अशी त्याची संभावना होत असल्यास ते खेदजनक आहे. यंदा चित्रपटांचे वेळापत्रक व तिकीट विक्री पाहिल्यास पुढील दोन दिवसांची तिकिटे सहज उपलब्ध होत आहेत.

कधी एकेकाळी पहिल्या दिवसापासून ‘हाउसफुल’ वातावरण असायचे. इफ्फीसाठी साडेसात हजार प्रतिनिधी नोंद झाले, असे सांगितले जाते. पण, किती जणांनी सिनेमासाठी पैसे भरले, याचा आढावा घेतल्यास उत्तर सुखदायी नसेल. मनोरंजन सोसायटीचे अधिकारी फ्रान्‍समधील ‘कान्‍स’ महोत्सवाला अभ्‍यासासाठी म्‍हणून जातात.

मात्र, तेथील शिस्त येथील येथील आयोजनात दिसून येत नाही. ते तेथे काय शिकतात, हे इथल्‍या महोत्‍सवात प्रतिबिंबित होत नाही. लाखोंचा खर्च होतो, ते पैसे सत्कारणी लागावे. मूळ हेतू उत्तम प्रकारे साध्य व्हावा, ही अपेक्षा आहे. नाही म्हणायला स्थानिक चित्ररथांना दिलेली संधी स्‍थानिक कलाकारांसाठी सकारात्मक बाब ठरली इतकेच त्‍यातील समाधान. पण एक नक्की, यापुढे वाहतूक कोंडी करून इफ्फीचे उद्‌घाटन हे एक ‘रस्ताद सोहळा’ ठरू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शनि आणि गुरुची चाल करणार मालामाल! नव्या वर्षात खुले होणार उत्पन्नाचे नवे मार्ग, 2026 मध्ये 'या' राशींना मिळणार धनकमाईच्या सुवर्णसंधी

Bodgeshwar Jatra: म्हापशात प्रशासनाचा बडगा! श्री बोडगेश्वर जत्रोत्सवातील जायंट व्हील्ससह 20 राईड्स सील; सुरक्षेच्या कारणास्तव मोठी कारवाई

पिढ्यांमधील अंतर आणि मनाचा समतोल: सुखी म्हातारपणाची गुरुकिल्ली

लग्नाच्या मांडवात राडा! नवऱ्या मुलाला किस करणाऱ्या 'एक्स'ला नवरीनं भर मंडपात धोपटलं; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

India Pakistan Nuclear List: तणावाच्या वातावरणातही भारत-पाकिस्तानने जपली 35 वर्षांची परंपरा; अणुयादीच्या देवाणघेवाणीने जगाचे वेधले लक्ष

SCROLL FOR NEXT