

पणजी: लखलखत्या चंदेरी दुनियेचा ५६वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) पडदा २० नोव्हेंबर रोजी उघडला. त्यासाठी गोवा मनोरंजन सोसायटी, जुनी जीएमसी इमारत आणि आयनॉक्स परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
पोस्ट खाते, एनएफडीसी, रिझर्व्ह बॅंक व इतर खासगी संस्थांचे माहिती देणारे स्टॉल्स आकर्षण ठरत आहेत. ऑयनॉक्स परिसरात उभारण्यात आलेल्या कृत्रिम मांडवी पुलासोबत अनेकजन फोटो काढत आहेत, सेल्फी घेत आहेत. खवय्यांसाठी देखील अनेक फूड स्टॉल्स देखील मोठ्या संख्येने थाटण्यात आले आहेत.
इफ्फीसाठी आयनॉक्स परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अग्निश्मन दलही सज्ज आहे. विशेष नियंत्रण कक्षाची उभारणीसुद्धा करण्यात आली आहे.
सोबतच इफ्फीच्या प्रतिनिधींसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मोफत रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कदंबच्या इव्ही बससुद्धा उपलब्ध आहेत. इफ्फी नोंदणी कक्षात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
‘शोले’ चित्रपट १९७५ साली प्रदर्शित झाला होता. यंदा या चित्रपटाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या चित्रपटातील जय-वीरूच्या जोडीचे आणि त्यांच्या बुलेटचे चाहत्यांना आजही आकर्षण आहे. ही बुलेट सध्या पणजीतील आयनॉक्स परिसरात ठेवण्यात आली आहे. सिनेप्रेमींसाठी ती आकर्षणाचे केंद्र बनली आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त यंदा बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमच्या सभागृहात संगीत, सादरीकरण आणि सर्जनशील अभिव्यक्ती एकत्र आणणारा ‘इफ्फीस्टा’ हा चार दिवसांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांनी या कार्यक्रमाची माहिती विद्यार्थी, पालकांना देऊन त्यांना त्याचा लाभ घेण्यास सांगावे, अशी सूचना करणारे परिपत्रक शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी जारी केले आहे.
‘इफ्फीस्टा’ हा कार्यक्रम २१ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत होणार आहे. त्यात ओशो जैन, बॅटल ऑफ बँड्स, सुरों का एकलव्य, वाह उस्ताद आणि देवांचल की प्रेमकथा असे कार्यक्रम सादर केले जातील, असेही झिंगडे यांनी परिपत्रकात म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.