Goa Liberation X
गोंयकाराचें मत

Goa Liberation: 'माझ्या गोव्याच्या भूमीत ‘दम मारो दम’ला उधाण, रक्ताळली नदी, खाण उकरून'; संपादकीय

Goa Opinion: राजकारणी आरोप-प्रत्यारोपांत गुंतले आहेत. सामान्य नागरिकांना याचा उबग आलाय. समुद्राकाठची शांत, सुशेगाद संध्याकाळ कधीच हरवली आहे. परंतु या टप्प्यावर खचून चालणार नाही. ज्या मुक्तीलढ्याचे आपण आज स्मरण करणार आहोत, त्याद्वारे मिळालेले स्वातंत्र्य काही भीक नव्हती.

Pramod Yadav

Goa Liberation Day

‘मुक्ती’ या शब्दात एक सकारात्मक नकार आहे. कुणाच्याही आधिपत्याखाली नसते ती मुक्ती. गोवाही असाच मुक्त झाला. मुक्तीच्या अलीकडे असते चळवळ, त्याग, लढा आणि पलीकडे कृतज्ञता. सामूहिक कृतज्ञता व्यक्त होते तो क्षण कृतज्ञता सोहळा.

स्वातंत्र्यवीरांचे योगदान हे प्राणांच्या मोबदल्यात असल्याने त्यांचे स्मरण, चिंतन हे प्रत्येक क्षणी असलेच पाहिजे; कारण आपला वर्तमानातला मुक्तीचा प्रत्येक क्षण त्यांच्यामुळेच आहे. त्यासोबत स्मरण म्हणजेच सिंहावलोकन करणे आलेच. तीही कृतज्ञताच. आज आम्ही अशा टप्प्यावर आहोत, जिथे क्रांती-उत्क्रांतीचा मागोवा घेण्यासोबत वर्तमानाचे अवलोकन आणि भविष्यवेध घेणे अपरिहार्य आहे.

मुक्तीनंतर गोव्याने देदीप्यमान भौतिक प्रगती साधली. सामान्य ‘गोंयकारा’चे जीवनमान उंचावण्याचा त्यात दृष्टिकोन होता. परंतु चौसष्टाव्या मुक्तिदिनाला सामोऱ्या जाणाऱ्या गोमंतभूमीचा विकासाच्या अतिरेकाने प्राण गुदमरला आहे. अंतरंगात बरीच चलबिचल जाणवते, एकीकडे संपन्नतेची स्वप्ने आणि दुसरीकडे अस्वस्थ समाज असा कमालीचा विरोधाभास हे सध्याचे वास्तव आहे.

ज्यांच्याकडे नागरी उत्थानाचे दायित्व आहे, अशा राजसत्तेला स्वार्थाने पोखरले आहे आणि त्याची विकासाची भूक गोव्याचे लचके तोडते आहे. पोलिस लाचार झालेत. नागरिकांना भय आणि चोरांचे ते साथीदार बनू पाहत आहेत. वर्षानुवर्षे राखलेल्या जमिनी रूपांतरित होत आहेत. वनांची कत्तल सुरू आहे. बाकीबाब यांनी अभिमानाने वर्णन केलेले मधाळ नारळ नाहीत आणि कपारीतून दूध सोडाच, पाणी तरी वाहेल की नाही याची शंका आहे. दुधाच्या घटांची जागा मद्याच्या घटांनी घेतली आहे. बोरकरांची क्षमा मागून म्हणावेसे वाटते :

माझ्या गोव्याच्या भूमीत थैमान व्यसनांचे चाले

गावकारी’चे मानकरी दास दिल्लीश्वरांचे झाले

माझ्या गोव्याच्या भूमीत जळाले चांदण्यांचे माहेर

केली धूप किनाऱ्याची आसवे गाळतो सागर

माझ्या गोव्याच्या भूमीत ‘दम मारो दम’ला आले उधाण,

विषण्णली मने, राजकीय संस्कृती पाहून

हिरवाईच इथली शान, म्हणूनी ताठ होई मान

परिसाची ही खाण, पण घेते आहे जान

तांबडीच धूळ, रस्त्यात साचून, नदी रक्ताळली, खाण उकरून

वाचवा, वाचवा, करते भूमी आक्रंदन; थांबवा विकृती, सांगे किंचाळून

गोव्यात आजही सार्वजनिक स्मशानभूमीचा प्रश्न सुटलेला नाही. कोर्टाने उगारलेला बडगा आणि लोकसभा निवडणूक जवळ आल्यावर सरकारला कूळ-मुंडकारांची आठवण येते. नागरी प्रश्न वाढले आहेत. राजकारणी आरोप-प्रत्यारोपांत गुंतले आहेत. सामान्य नागरिकांना याचा उबग आलाय. समुद्राकाठची शांत, सुशेगाद संध्याकाळ कधीच हरवली आहे. परंतु या टप्प्यावर खचून चालणार नाही. ज्या मुक्तीलढ्याचे आपण आज स्मरण करणार आहोत, त्याद्वारे मिळालेले स्वातंत्र्य काही भीक नव्हती. हा एकमेव लढा होता, ज्यात सर्व विचारांचे, जात-धर्माची कवाडे मोडून पोर्तुगिजांच्या जोखडातून गोव्याला मुक्त करण्यासाठी अनेक विचारवंत सरसावले.

लाटा येत जात राहतात. पाय घट्ट रोवून उभे राहावे लागते. लढा स्वकीयांच्या बेफिकीर वृत्तीसोबत द्यावा लागणार आहे. त्यासाठी भाषावाद, जाती-धर्माचा विद्वेष सोडून एकसंध येऊया. साठीच्या टप्प्यानंतर अनुभवाने, कर्तृत्वाने प्रगल्भ व्हायचे असते. पुढील पिढीला घडविण्याची अर्हता, पात्रता सोबत घेऊन सिद्ध व्हायचे असते. जे चालले आहे, जे पोसले जात आहे त्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी गोवा मुक्त केला नव्हता. घरादाराची राखरांगोळी केली नव्हती. आपल्या वंशजांना स्वकीयांविरुद्ध लढावे लागेल याची पुसटशीही कल्पना परकीयांविरुद्ध लढलेल्यांना नसावी.

लढाई संपलेलीच नाही. ‘गोंयकार’ तेव्हाही लढवय्या होता व आजही लढवय्याच आहे. भले आजची परिस्थिती आम्हीच निर्माण करून ठेवली आहे, तिच्याविरुद्ध आम्हालाच लढावे लागेल. गोमंतकीय असण्याची ओळख जपण्यासाठी, गोव्याच्या जमिनी राखण्यासाठी, लेकीबाळींची अब्रू वेशीवर टांगण्यापासून वाचवण्यासाठी, तरुणांना व्यसनांच्या विळख्यात जाण्यापासून वाचवण्यासाठी, गोव्याला भ्रष्टाचाराच्या व घोटाळ्यांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी लढा द्यावाच लागेल. तो दिल्याशिवाय गोमंतकीय राहणार नाही. सर्व गोमंतकीयांना, गोमन्तकतर्फे गोवा मुक्तीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: ..काय हा योगायोग! गावडेंचे आसन तवडकरांना, विधानसभेत बैठकव्‍यवस्‍थेत बदल; गावकर 19 वरून 1ल्या क्रमांकावर

Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्र्यांचे भोजन

Ganesh Gaonkar: राज्यपालांनी शपथ घेण्यास दिलेला नकार, हुकलेले पद ते नवीन सभापती म्हणून नेमणूक; गणेश गावकरांचा प्रवास

Ganesh Gaonkar: ‘एकावेळी एकानेच बोला’! नवनियुक्त सभापतींचे पहिल्‍याच दिवशी शिस्‍तीचे धडे; आमदारांना दिली तंबी

Goa Startup Policy: गोमंतकीय तरुणांसाठी मोठी बातमी! सरकारचे स्टार्टअप धोरण जाहीर; 10 हजार रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

SCROLL FOR NEXT