गोव्याच्या अगदी टोकाला वसलेल्या काणकोण तालुक्यातल्या पैंगिणी गावातल्या हिरव्यागार वृक्षवेलींनी नटलेल्या ‘पर्वत कानन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ तेथील धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक साधनेमुळे नावारूपास आलेला आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांतल्या कर्नाटकातल्या उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या सदाहरित जंगलात उगम पावणाऱ्या तळपण नदीकिनारी वसलेला हा मठ द्वैतवादी वैष्णव पंथातल्या गौड सारस्वत ब्राह्मण समाजाशी निगडीत असला, तरी गोमंतकाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात त्याला महत्त्वाचे स्थान लाभले आहे.
कर्नाटकात उडपी जवळ असणाऱ्या पाजक क्षेत्री ११९९साली जन्माला आलेल्या मध्वाचार्यांनी माध्व संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. गोदावरी तीरी त्यांना शिष्य भेटले.
द्वैत सिद्धांताच्या प्रचारासाठी त्यांनी ३०पेक्षा जादा ग्रंथांची निर्मिती केली आणि आठ ठिकाणी मठांची स्थापना केली. नारायणीय उपनिषदाद्वारे त्यांनी माध्व संप्रदायाचे तत्त्वज्ञान विकसित करून, त्याचा प्रभावीपणे प्रचार आणि प्रसार आपल्या शिष्यांमार्फत केला.
शाळिग्रामरूपी श्रीविष्णूची उपासना अंकन, नामकरण आणि भजनाद्वारे करणाऱ्या या पंथाचे कालांतराने भारताच्या विविध अशा १८ ठिकाणी मठ निर्माण झाले.
संप्रदायाचे सहावे स्वामी रामचंद्र तीर्थ जेव्हा बद्रीनाथ तीर्थयात्रेत आजारी पडले तेव्हा ही यात्रा त्यांच्या आदेशानुसार नारायण स्वामी यांनी पूर्ण केली आणि उडपी येथे येऊन गुरुचे दर्शन घेतले. श्रीमद् नारायणतीर्थ स्वामी यांनी १४७५ साली गोकर्ण मठाची स्थापना करण्याची अनुमती दिली.
प्रचलित लोकसंकेतानुसार जेव्हा उडपीजवळील शांभवी नदीकिनारीच्या पालीमरू गावातून स्वामी रामचंद्रतीर्थ जेव्हा गोकर्ण मठाच्या मागील बाजूला गेले होते तेव्हा त्यांना तेथे चार पाषाणी मूर्ती आढळल्या होत्या.
या मूर्तींची स्थापना करण्याच्या तंद्रीत असताना त्यांनी दैवी संकेतानुसार या मूर्ती घेऊन जाताना त्या जेथे जड होतील तेथे त्यांची स्थापना करण्याचे त्यांनी योजिले होते आणि त्याप्रमाणे ते पैंगिणीतल्या पर्वत कानन स्थळी पोहोचले तेव्हा म्हणे या मूर्ती जड झाल्या.
ठरल्याप्रमाणे मूर्तीची स्थापना पाण्याची सुविधा नसलेल्या ठिकाणी कशी करणार? या चिंतेत असताना, तेथे गाय प्रकट होऊन तिच्यामागे भाविक गेले असता त्यांना तळपण नदीकिनारी वसलेली सध्याची जागा खूपच आवडली आणि त्याच ठिकाणी श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाची स्थापना करण्यात आल्याची लोकश्रद्धा प्रचलित आहे.
‘गोव्याच्या भेटीत मध्वाचार्यानी शैव पंथीय गौड सारस्वत ब्राह्मणांना माध्व संप्रदायाकडे आकर्षित केले. त्यानंतर श्रीनाथ नारायणतीर्थ स्वामी यांनी मठग्रामी (मडगाव) येथे माध्व संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करणाऱ्या मठाची स्थापना केली.
परंतु सासष्टी तालुका जेव्हा पोर्तुगिजांच्या ताब्यात आला तेव्हा धार्मिक छळवादावेळी १५६० ते १५६८ या काळात ते कर्नाटकातल्या भटकळ येथे आले आणि तेथे मठाची स्थापना केली. कालांतराने गोव्यातल्या समाजबांधवांसाठी मठाची स्थापना पर्तगाळी येथे करण्यात आली’ असे ऍड. रुई गोमिश परेरा यांनी ‘हिंदू टेम्पल्स अँड डेअटीज’ या पुस्तकात नमूद केले आहे.
या मठाला फार मोठी परंपरा असून श्रीमद् नारायणतीर्थ श्रीपाद वडेर स्वामींपासून श्रीमद् द्वारकानाथतीर्थ श्रीपाद वडेर यांच्यानंतर विद्यमान २४वे विद्याधीशतीर्थ श्रीपाद वडेर यांनी या मठाची सूत्रे हाती घेतली. आज त्यांच्या आधिपत्याखाली श्रीगोकर्ण जीवोत्तम मठाच्या स्थापनेचा ५५०वा वर्धापनदिन विविध सांस्कृतिक आणि देवकार्यांच्या आयोजनाद्वारे होत आहे.
मठाच्या आवारात श्रीरामाचे मंदिर आहे त्याला ३७५ वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जाते. पोर्तुगीज ग्रंथकर्ते लोपिश मेंडिस यांनी तळपण नदीकिनारी मठाच्या परिसरात जे श्री रामचंद्र मंदिर आहे ते १८११ आणि १८१२ साली स्थापन करण्यात असल्याचे तेथील लेखात नमूद केले असल्याचे म्हटले आहे.
डॉ. व्यं. त्र्यं. गुणे यांनी संपादित केलेल्या गोवा गॅझेटियर या ग्रंथात तेथील वीरविठ्ठलाचे स्थळ रामदेवाच्या स्थळाच्या उजवीकडे मठाच्या चार भिंतीत असून, संप्रदायाचे अनुयायी त्याला भजतात, असे म्हटले आहे. पंचधातूचे हे दैवत मठाधिपतीचे उपास्य असून, ते जेथे जातात तेथे ती मूर्ती नेत असल्याचेही म्हटले आहे.
ही मूर्ती पवित्र शिला नदीत गोकर्ण मठाधीश तृतीय जीवोत्तमतीर्थ यांना तीर्थयात्रेच्या वेळी सापडली असल्याची नोंद आहे. श्रीविठ्ठलाच्या उपासनेला संप्रदायात विशेष महत्त्व असल्याने त्यांच्या मूर्ती-परंपरेतील भूविजय विठ्ठल मूर्ती गोकर्ण मठात पूजेला असून, दुसरी दिग्विजय विठ्ठल मूर्ती भटकळ मठात आणि तिसरी वीर विठ्ठल मूर्ती धर्मगुरूंकडे असते.
मूर्ती नव्या मठाधिपतीकडे देण्याची परंपरा पूर्वाश्रमीचे मठाधिपती पाळतात. मारुतीचे स्थळही लक्षवेधक आहे. पर्तगाळचा मठ श्रीगोकर्ण संस्थानाचे मुख्यालय असून, इतर शाखा भटकळ, पंढरपूर, गोकर्ण, डिचोली, रिवण, अंकोला, होन्नावर, व्यंकटापूर, बडोदा, इत्यादी ठिकाणी आहेत.
पर्तगाळ मठ दिग्विजय रामचंद्रतीर्थ यांनी पर्वत कानन अथवा पर्तगाळ येथे स्थापन केल्याची नोंद आहे. संस्थानाचे ग्रंथालय जुन्या धार्मिक ग्रंथांनी समृद्ध असून तेथे संस्कृत विद्याध्ययनाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. संस्थानाच्या परिघात पूर्वाश्रमीच्या मठाधिपतीच्या समाध्या आणि तुळशी वृंदावने आहेत. त्याचप्रमाणे देवी दुर्गा आणि वेताळ यांची मंदिरे असल्याची नोंद आहे.
१८८६ साली प्रकाशित ‘ए इंडिया पोर्तुगेझा’ या लोपिश मेंडिस यांच्या ग्रंथात तळपण नदीकिनारी या संस्थानाचा मठ असून त्याचे प्रकाशित करण्यात आलेले चित्र या संस्थानाच्या गतवैभवाची प्रचिती आणून देते.
श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचे श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी यांनी सार्ध पंचशताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून आणि नव्या काळाची गरज ओळखून मठाचे नूतनीकरण आरंभले आहे. त्यानिमित्त संस्थानाच्या आवारात ७७ फूट उंचीचा कांस्य धातूचा पुतळा उभारण्याचा संकल्प पूर्णत्वास येत असून, वर्तमान आणि आगामी काळात पर्तगाळ धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्राच्या लौकिकास नेण्याची योजना आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.