Goa Unemployment Foreign Jobs Scams Illegal Immigration
जागतिक सिनेमाद्वारे मायभूमीतून दुसऱ्या देशांत होणाऱ्या बेकायदा स्थलांतरांचे शौर्य, धैर्य अशा मानकांच्या साह्याने नेहमीच उदात्तीकरण करण्यात आले आहे. भारतीय सिनेमा ‘डंकी’, अमेरिकन ‘क्रॉसिंग ओव्हर’ ‘युनायटेड कच्छे’ नामक वेबसिरीज अशी अनेक उदाहरणे आहेत. कथानकांमधून कायदेशीर, बेकायदा मुद्यांना नगण्य गणले जाते. कायद्याच्या कक्षेत होणाऱ्या परिणामांपेक्षा जिवावर उदार होऊन केल्या जाणाऱ्या थरारक प्रवासावर भर राहतो.
वास्तवात अशा प्रकारांचे परिणाम घातक असतात. नोकरीच्या हेतूने अमेरिकेत जाऊ पाहणाऱ्या दोघा गोमंतकीयांना मेक्सिकोतून अमेरिकेत जाताना सीमेवर पकडण्यात आले, ज्यांना अत्यंत लाजिरवाण्या पद्धतीने गोव्यात परतावे लागले. नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या दलालामुळे आपण फसलो असल्याच्या तक्रारी संबंधितांनी पोलिसांत दिल्या आहेत. दुसऱ्या एका प्रकरणात गोव्यातील काही तरुणांना थायलंडमध्ये नोकरीचे आश्वासन देऊन अन्यत्र नेऊन सोडण्यात आले. त्यामुळे फसवणूक करणाऱ्या दलालांचा मुद्दा फसफसून वर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी विदेशात नोकरीसाठी जाणाऱ्यांनी बोगस दलालांपासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
‘एनआरआय’ आयोगही फसवणूक झालेल्या युवकांच्या संपर्कात आहे. परंतु फसवणूक (Fraud) टाळता कशी येईल, या संदर्भात सरकारने काही मार्गदर्शन करणारी व्यवस्था उभारलेली लोकांना ठाऊक नाही. गोव्यात खास ‘एनआरआय’ आयुक्त आहेत. कोविड काळात परदेशी गोमंतकीयांना मायभूमीत आणण्यात वा युक्रेन-रशिया युद्धप्रसंगी खात्याने उजवी कामगिरी केली. तथापि, गेली अनेक वर्षे परदेशी नोकरीच्या निमित्ताने फसगतीची उदाहरणे समोर येत असूनही योग्य माहिती देणारी शिबिरे अथवा कार्यक्रम राबविल्याचे काही ऐकिवात नाही. कायदेशीर मार्गदर्शन करणारी अशी व्यवस्था न उभारता किंवा असल्यास त्या संदर्भात नागरिकांना काही माहिती नसल्यास फुकाच्या सल्ल्यांना काही अर्थ राहत नाही.
गोव्यात (Goa) बेरोजगारीची टक्केवारी कमी होत असल्याचा सरकारी दावा आहे. मात्र, समस्या सुटलेल्या नाहीत, हे दृष्य रूप आहे. परकीय चलनाच्या तफावतीमधील नफा तरुणांना खुणावतो. केवळ गोवाच नाही तर किनारी राज्यांत हे प्रमाण अधिक दिसते. पूर्वी आंतरराष्ट्रीय प्रवास नियमांत आताइतकी कठोरता नव्हती. तेव्हा बोटीतून परदेशात जाऊन नशीब फळफळल्याची उदाहरणे पाहिल्याने ‘विदेशात जाणे म्हणजे आयुष्याचे सोने झाले’, अशी धारण दृढ झाली. त्यामुळेच नोकरीच्या आमिषांना, मृगजळाला बरेच जण भुलतात. अर्थात स्वत:च्या जोखमीवर बेकायदा पद्धतीने परदेशी जाऊन तेथे शरणार्थी बनून ईप्सित साध्य करण्याचे धाडस दाखवणारे कमी नाहीत.
परदेशी नोकरीच्या निमित्ताने फसवणूक झाल्याचा दावा करणारे सर्वच बरोबर आहेत, असे मानणे चुकीचे ठरेल. चांगले शिक्षण घेऊन परदेशी जाणारे डॉक्टर, इंजिनिअर फसत नाहीत. शैक्षणिक पात्रता कमी असलेल्यांची फसगत होते किंवा ते जाणूनबुजून गैरमार्गाचा अवलंब करतात. जाणीवपूर्वक बेकायदा ‘डंकी’ मार्गाचा वापर केला जातो. त्यासाठी दलाल, मानव तस्करांचा वापर होतो. वास्तविक, परदेशात जाताना मिळालेला व्हिसा कोणत्या उद्देशासाठी, किती काळासाठी आहे, हे ‘इंडियन इमिग्रेशन’कडून तपासले जाते. तेथे फसगत टळू शकते. परंतु पर्यटक व्हिसा मिळवून अन्य देशात बेकायदा वास्तव्य करण्याचा मार्ग पत्करण्यात येतो, त्याला फसगत कसे म्हणावे? असे बेकायदेशीर वास्तव्य केल्यानंतर तेथील कायद्याप्रमाणे शिक्षा मिळत असेल तर त्याविरुद्ध ओरड करण्यात काहीही अर्थ नसतो. पण, म्हणून सरकारनेही अशी फसवणूक होऊ नये म्हणून परदेशी नोकरीचे आमिष देऊन फसवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली पाहिजे व कोणी असा दावा केल्यास त्याची सत्यता अधिकृत करण्याची व्यवस्थाही हवी.
अन्यथा गोमंतकीय फसतच राहतील. प्रश्न केवळ येथून बेकायदेशीर पद्धतीने जाणाऱ्या लोकांचाच आहे, असे नव्हे तर अमेरिकेसारख्या पाश्चिमात्य देशांचा भारतीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही दूषित आहे. जवळपास १००वर्षांपूर्वी भगत सिंह थिंद नावाच्या एका शीख व्यक्तीने अमेरिकन लष्करातर्फे अमेरिकेच्या बाजूने लढाईत भाग घेतला होता. त्याने अमेरिकन नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्याला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने, ‘गोरा हा शब्द सामान्य वापरातील शब्द आहे, वैज्ञानिक उत्पत्तीचा नाही आणि तो केवळ युरोपियन वंशाच्या गोऱ्या लोकांनाच लागू होतो’, असे म्हणत ते नाकारले. तेव्हा ‘द सॅक्रामेंटो बी’ वृत्तपत्राने हा निर्णय ‘सर्वांत स्वागतार्ह’ म्हणून कौतुक केले होते आणि ‘भारतातील या सारख्या स्थलांतरितांना जमीन भाड्याने देणे किंवा विकणे यापुढे होऊ नये’, असेही म्हटले होते.
दक्षिण आशियाई वंशाच्या लोकांना अमेरिकन नागरिकत्व मिळण्याचा अधिकार पुन्हा मिळाला तो १९४६साली. त्यामुळे, ज्या अमानुष पद्धतीने ‘कायद्याचे पालन’ अमेरिका करते, त्याचाही निषेध सर्व पातळीवर झाला पाहिजे. प्रत्येकाने अखंड सावध राहणे गरजेचे आहे. भूलभुलय्याला बळी पडून वाट्टेल तो मार्ग स्वीकारणारे जसे दोषी आहेत तसेच तशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून काही न करणारे सरकारही दोषी आहे. फुकाचे सल्ले देऊन नक्की फसगत कोण करत आहे व कोण करवून घेत आहे?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.