मधू य.ना. गावकर
‘व्हाईट कॉलर्ड’ लोकांना पर्यावरणाचे सोयर सुतक नाही, त्यांना फक्त स्वतःपुरते जग दिसते. आज हव्यासाने तो सृष्टीवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांच्या कृत्यांना लगाम घालण्यास गोमंतकाच्या गावागावांतील जनता आज रस्त्यावर उतरून भूमी वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसते.
पृथ्वीचा जन्म झाल्यावर पाणीद्रव प्रथम आला, त्या समुद्री पाण्यात प्रथम वनस्पतीने जन्म घेतला, नंतर त्या पाण्याचे सूर्याच्या उष्णतेमुळे बाष्पीभवन होऊन त्या पाण्याचे हलक्या कणात रुपांतर होऊन ते कण वर खेचले जाऊन एकत्रिकरणाने त्यांचे ढग बनून त्यांना वाऱ्याची साथ मिळून परत पाण्यात रुपांतर झाल्याने जडपाणी पदार्थ पाऊस खाली येत पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडून त्या ओलाव्याने वृक्ष वेली, झुडपे, वनस्पती, बियाणे जमिनीवर जन्मास आले. त्यापुढील काळात सरपटणारे प्राणी जन्मले. नंतर सस्तन प्राण्यांचा जन्म झाला. वनस्पती धान्यावर पशूपक्षी पाळीव जनावरे जगतात, जंगली तृणभक्षी प्राण्यांची शिकार करून मांसाहारी प्राणी जगतात. वसुंधरेची ही सायकल चालवण्यास सर्वांनाच ऊर्जेची गरज भासते, ती ऊर्जा तृण, वृक्ष, झुडपे, वेली आणि सर्व तत्वांकडून आपल्याला मिळते. सर्वच प्राणी कार्बनवायू पृथ्वीला देतात आणि तिच्यावरील वृक्ष तो शोषून प्राणवायू प्राणिमात्रांना देतात. त्यातून वातावरणाचा तोल निसर्ग सावरतो. आज काही स्वतःला अतिहुशार समजणारी माणसे स्वार्थासाठी जैविक संपदेची नासाडी करीत आहेत. ‘व्हाईट कॉलर्ड’ लोकांना पर्यावरणाचे सोयरसूतक नाही, त्यांना फक्त स्वतःपुरते जग दिसते. त्यांच्या कृत्यांना लगाम घालण्यास गावागावांतील जनता आज रस्त्यावर उतरून भूमी वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसते.
भारतात १९७३ साली उत्तरांचलातील गढवाल नंदादेवी जंगलाच्या रक्षणासाठी तिथल्या आदिवाशी लोकांनी पुढाकार घेऊन झाडांना मिठ्या मारून ते जंगल वाचवले, त्या ‘चिपको’ चळवळीने भारतात पर्यावरण रक्षणासाठी कैक आंदोलनांनी जन्म घेतला. १९७२ साली स्वीडनमधील स्टॉकहोम शहरात पर्यावरण रक्षणार्थ प्रथम जागतिक परिषद भरून ओझोनवायू, औद्योगिकीकरणातून रसायनांमुळे पाणी दूषितीकरण, वातावरण बदल, आम्ल पर्जन्य, सागरी जीवाश्मू परिसंस्था अशा विषयांवर चर्चेस सुरुवात होऊन पर्यावरण रक्षणाला चालना मिळण्यास सुरुवात झाली. १८३० साली संपूर्ण जगाची लोकसंख्या शंभर कोटी होती, आज दीडशे कोटीकडे वाटचाल करीत आहे.
मानवाच्या गरजा भागवताना भूगर्भातील तेल, जळवायू, कोळसा, खनिज, पाणी ही खनिजे संपण्याच्या मार्गावर उभी आहे. त्याने पृथ्वीवर भूकंप, वादळे, सुनामी, दुष्काळ, महापूर अशी अवर्षणे येण्यास सुरुवात झाली आहे. शिवाय रासायनिक द्रव्याने शेतजमीन पडीक बनत चालली आहे. जंगलतोडीने डोंगराळ भागातील सुपीक मृदा नाले, नदीच्या प्रवाहातून पाण्याबरोबर समुद्रात जात आहे. बोडक्या डोंगरावरून हिंस्र जनावरे अन्नाच्या शोधार्थ मानवी वस्तीत येत आहे. कोणत्याही परिसंस्थेच्या विकासासाठी ऊर्जेइतकाच पोषक द्रव्यांच्या पर्याप्त चक्रीकरणासाठी गरज असते.
भारत १९४७ साली स्वतंत्र झाला, मात्र गोवा भारतात १९६५ साली विलिन झाला, त्यापूर्वी इवलासा गोवा एक देश होता, ४५० वर्षे पोर्तुगीजांनी गोव्यावर राज्य केले हा इतिहास आहे. स्वातंत्र्यानंतर विकासासाठी एक औषध कारखाना तिसवाडीतील धुळापी गावात आला, त्यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी विरोधात आंदोलन केले, नंतर मुरगाव तालुक्यातील पठारावर जुवारी खत कारखाना सुरू झाला. आणि त्यातील प्रदूषित पाणी वेळसांव किनाऱ्याकडील अरबी समुद्रात जाऊन मोठ्या प्रमाणात मत्स्यसंहार झाला. त्यावेळी स्थानिक मच्छिमारांनी मोठे आंदोलन उभारले, पुढील काळात ताळगाव काराझोळ समुद्र किनारी मच्छिमार बांधवांचे आंदोलन झाले, नंतर थापर ड्युपोन्ट कंपनीचा नायलॉन धागा बनवण्याचा कारखाना भूतखांब पठारावर आला, त्याला फोंडा तालुक्यातील शेतकरी बागायतदारांनी प्रखर विरोध केला. शेवटी त्या आंदोलनात एक आंदोलक हुतात्मा झाला.
नंतर सत्तरीत सालेली गावात पाषाण खाणीवरून गावकऱ्यांनी आंदोलन केले. शेळमेळावलीत ‘आयआयटी’ उभारण्यास स्थानिकांनी विरोध केला, त्या आंदोलनालाही हिंसक वळण लागले. नंतर तो प्रकल्प सांगेत नेण्याचा प्रयत्न झाला, त्यापूर्वी तो काणकोणच्या भगवती पठारावर नेण्याचा प्रयत्न झाला, तिथेही स्थानिकांनी प्रखर विरोध केला.नंतर शिरदोन गावातील लोकांनी बांबोळी पठारावरील मेगा प्रकल्प रद्द करण्यासाठी आंदोलन केले, त्यात आमदाराने उपोषण केले. त्यापुढील दिवसांत पेडणेत आंदोलन झाले, नंतर चिंबलच्या तोयार तलावासाठी आंदोलन झाले, तसेच सावर्डेच्या मिराबाग बंधाऱ्याला विरोध करणारे आंदोलन झाले. नंतर आयआयटी प्रकल्प कसमशेळ येथे उभारण्यास तिथल्या शेतकऱ्यांनी विरोध केला.
सांकवाळ गावात ‘भूतानी’चा प्रकल्प उभारण्यास तिथल्या स्थानिकांनी आंदोलन केले. डिचोलीतील कारापूर गावात स्थानिक रहिवासी गावच्या डोंगर पठारावर येणाऱ्या लोंढा महागृहप्रकल्पाला विरोध करीत शांततापूर्ण मार्गाने लढत आहेत. कारापूरवासीयांनी पणजीत आझाद मैदानावर नंतर दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलने केली. आजही तिथले वयस्क, युवा, विद्यार्थी ५ महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत. पाहू, सरकार प्रकल्प बंद करून कारापूरवासीयांना न्याय देणार की, प्रकल्प पूर्ण करणार हे येणारा काळ ठरवेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.