Mankurad mangoes Goa Price Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

..शेवटी गोव्याचा आंबा तो गोव्याचा! तोच खरा बाकीचे सगळे पोरकारी! गोंयकार, आंबे आणि बरेच काही

Goan Mango: आता फक्त भायले आंबे म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर भारतातले आंबे मिळतील आणि ते आहेतही.’’ असं म्हणून त्याने सटासट काही नावे घेऊन ते आंबे दाखवले.

गोमन्तक डिजिटल टीम

प्रदीप तळावलीकर

परवा मला घरच्या पूजेला पंचफळें हवीत म्हणून एका फळवाल्यांच्या दुकानात जाण्याचा योग आला. पाच फळांत एक फळ आंबा घ्यावा म्हणून मानकुराद आंबे आहेत का, अशी चौकशी केली.

मानकुराद नाही म्हटल्यावर ‘आंफोंस’ वा ‘फेर्नादीन’ वा तत्सम गोवेकरी आंबे आहेत का असं विचारल्यावे तो विक्रेता मला म्हणाला, ‘‘पात्रांव, आता पाऊस सुरू झाला आहे. आता गोव्याकडले आंबे कुठले दिसायला?

आता फक्त भायले आंबे म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर भारतातले आंबे मिळतील आणि ते आहेतही.’’ असं म्हणून त्याने सटासट काही नावे घेऊन ते आंबे दाखवले. ‘केशरी’, ‘निलम’, ‘रत्ना’, ‘आम्रपाली’, वगैरे वगैरे. नावे ऐकून क्षणभर वाटले की काही नटमंडळी इथे गोव्यात बाह्यचित्रणासाठी आली नसावीत ना? असो.

काहीही असले तरी नावे ऐकूनच गोड वाटले. नाही तर आमच्या इथल्या आंब्यांना रूक्ष अशा भाटकारांची नावे. ‘मांगकुराद’, नंतर त्याचे ‘मानकुराद’ झाले, ‘मांगईलार’, ‘आंफोस’, ‘मालगेज’ वगैरे वगैरे.

डोळ्यांसमोर येतो कोण तर डोक्यावर हॅट घातलेला, खांद्यावरून पट्टे असलेली पँट घातलेला, तोंडात चिरूट कोंबलेला किंवा पाइप घेतलेला ‘सी सिंन्जोर’ म्हणणारा भाटकार. ‘निलम’, ‘रत्ना’, ‘आम्रपाली’ अशी नावे ऐकून सिनेमातली गोजिरवाणी मंडळी घरी न्यायची का, असं वाटतं खरं. पण गोंयकारांना काही आहे का त्याचे? त्यांना आपले त्यांचे भाटकारच बरे.

‘भायले’ म्हणून चांगले चविष्ट गोड आंबे असूनही गोंयकार ते घेणार नाहीत. उलट महागातले महाग असे इथलेच आंबे गोंयकार घेतील. गोव्याचे आंबे - विशेष करून मानकुराद - गोड असतात खरे;

पण दुसरी एक गोष्ट त्यांच्या विरुद्ध जाते ती म्हणजे इथल्या आंब्यांत असलेले ते सूत. आंब्याची कापलेली फोड दातांच्या कवळ्यांच्या मधोमध धरून ओरबाडताना दातांच्या भेगांत जे काही सूत जाऊन अडकते ते काढता काढता कधी कधी ‘सूतावरून डेन्टिस्ट’कडे जाण्याची पाळी येते.

ह्या उलट ‘रत्ना’, ‘निलम’ म्हणजे कसे सुंदर, साजूक, नाजूक प्रकृतीचे. आणि गोड तर इतके की त्यांच्यापुढे आमच्या संजीवनी साखर कारखान्यातली साखरसुद्धा फिकी पडावी. पण आम्ही गोंयकार कसले ? आम्हांला मानकुरादच पाहिजे!

आमच्या मानकुरादाची सर त्या रिटायर्ड अभिनेत्रीचे नाव लावणाऱ्या त्या रत्नाला येणार आहे का? त्या निलमला येणार आहे का? मानकुराद सोडाच पण आमच्या आफोंसच्याही जवळ येण्याची कुठल्याच रत्ना, निलमची बिशाद नसते. गोंयकार म्हणतो नावे रिटायर्ड नट्यांची घेतली म्हणून काय झाले, आमच्याकडच्या आंब्यांची नावे बघा कशी रिटायर्ड भाटकारांच्या नावांशी कशी मिळतीजुळती असतात. आफोंस म्हटला की कसा तुमानीवर पट्टे लावून खांद्यावरून घातलेल्या विजरीतल्या भाटकारांची आठवण करून देतो.

तसेच फर्नांडिसचे घ्या. तसेच कुलास, मालगेज आदी आंबे बघा कसे घरंदाज भाटकारांची आठवण करून देतात. नाही तर आमच्यासारख्या सामान्य नागरिकांतल्या नाईक, कामत पै, शणै, अशी नावे आहेत का आमच्या आंब्यात? सगळे कसे घरंदाज पोर्तुगीज बो.. बो.. बोलणारे. ‘सी सिंज्योर’, ‘आमान्जा’, ‘आते आमान्ज्या’, ‘मुइतु ओब्रीगाद’ करणाऱ्या पोर्तुगीजधार्जिण्या भाटकारांसारखे. असो.

उगाच नटनट्यांची नावे धारण केली म्हणून जमतं का? भाटकारांचा दर्जा आणि भाटकारांची ऐट कोठून येणार? आणि म्हणूनच गोव्यातल्या आंब्यांची सर भारतातल्या आंब्यांना कोठून येणार?

तुमच्यातला कुणी कदाचित असेही म्हणेल की महाराष्ट्रातल्या रत्नागिरी इथे आफोंसही आहे की मग तुमचाच आफोंस घरंदाज कसा ?

हे बघा आम्ही इथे वादविवाद करायला बसलेलो नाही. खरं म्हणायचे झाले तर त्यांच्याकडे त्याला हापूस असे म्हणतात तेव्हा हापूस कुठे आणि आफोंस कुठे? डझनभर मानकुरादाला दोनतीन हजार रुपये मोडणारा भाटकारच मानकुरादाला आपली मान हातात द्यायला हवा असतो. त्या लंगड्या बिंगड्याची काय बिशाद मानकुरादाच्या जवळ येण्याची.

असेही कानावर आलेले आहे की तुम्ही म्हणे म्हणतात की तुमचा हापूस अमेरिका, युरोप आदी देशांतही जाऊन पोहोचलेला आहे. आम्ही म्हणतो त्यांत काय मोठेसे? आमच्या मानकुरादाला बोट लागते. विमानात बसला की त्याचे प्रेशर वरखाली होते म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे त्याला तसा प्रवास करता येत नाही. नाहीतर त्याने ट्रंपासकट सगळी अमेरिका पालथी घातली असती. आणि युरोपचे म्हणाल तर पोर्तुगिजांनी त्याला माथ्यावर घेऊन मिरवला असता. सोडा.

तेव्हा ह्यातून जर काही मर्म काढायचं असलं तर आपल्याला असे म्हणता येईल की शेवटी गोव्याचा आंबा तो गोव्याचा! तोच खरा बाकीचे सगळे पोरकारी. तात्पर्य काय तर, आमचा गोंयकाराचा टिपिकल स्वभाव गुण. आपला तो बाबू. बाकीच्यांचा बाब्या. असो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पालकांनो, मुलांच्या हाती फोन देताय? त्याआधी ऑन करा 'या' 5 सेटिंग्ज, अश्लील कंटेंटला बसेल कायमचा लगाम

VIDEO: 'मला वाटलं होतं खूप घाण असेल, पण...' भारतीय रेल्वेच्या प्रवासाने विदेशी तरुणी भारावली; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IPL 2025: RCB फॅन्ससाठी मोठी बातमी! चिन्नास्वामी स्टेडियमवर सामने होणार की नाही? कर्नाटक सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

Goan Solkadhi: गोंयकाराची पहाटेची स्वप्नं दाट गुलाबी असतात, कारण त्यात 'सोलकढी'तल्या सोलाचा गडद रंग आणि नारळाच्या रसातला दाटपणा असतो..

तेंव्हा इकडे स्वतंत्र भारत, तर तिकडे गोवा होता! याबाजूला भारतीय जवान तर तिकडे पाकल्यांचे ‘सोजीर’ बंदुका घेऊन ताठ उभे होते..

SCROLL FOR NEXT