गोव्याची भूमी पूर्वापार नाट्यप्रेमी आहे. मराठी रंगभूमीच्या विकासात इथल्या कष्टकरी समाजाने शेकडो वर्षांपासून महत्त्वाचे योगदान दिले आहे. रणमाले, जागर ही इथली लोकनाट्ये कधीकाळी गोव्यात असलेल्या नाट्यपरंपरेच्या समृद्धीची जाणीव करून देतात.
पोर्तुगीज येण्यापूर्वी गोमंतकात नाट्यकलेला वाव देण्यासाठी ज्या परंपरा विकसित झाल्या, त्यात काल्याला उल्लेखनीय स्थान लाभलेले आहे. इथल्या कित्येक पिढ्या कालोत्सवातल्या नाट्यकलेच्या सादरीकरणातून संस्कारित झाल्या. रामायण, महाभारत या अद्वितीय महाकाव्यांची भारतीय लोकमानसावर युगायुगांपासून मोहिनी आहे. त्यातून प्रेरणा घेऊन, त्यातल्या कथासूत्रांवरती आधारित जी नाट्यकला जन्माला आली त्यात काल्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
श्रावण महिन्यात गोकुळाष्टमी आली म्हणजे गोव्यातल्या लोकमानसाला खरे तर काल्याची आठवण होते. परंतु हिंदू कालगणनेतील आठवा महिना कार्तिक हा कालोत्सवाचा मास असे म्हटले तर वावगे ठरू नये.
पावसाची जवळपास चार महिने चालू असलेली रिपरिप थांबली आणि दसरा दिवाळीचे, उत्सवाचे दिवस आले की काल्यांची ओढ लोकमनाला लागते. प्रबोधिनी एकादशीला चातुर्मासाची समाप्ती होते. शयनगृही असलेला श्रीविष्णू चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर कर्तव्यसिद्धीसाठी कार्यतत्पर होतो आणि त्यासाठी असंख्य दीपांच्या तेजाने आसमंत उजळून निघत असतो.
कोजागिरी पौर्णिमेपासून नभांगणी पूर्णचंद्र लावण्य नजरेत भरत असते. याचाच साज त्यानंतरच्या पौर्णिमेल निरभ्र आकाशाची साथ असेल तर अनुभवायला मिळतो. लोकमन देवभोळे असल्याने, आपण जे काही करतो त्यामागे परमेश्वर अधिष्ठान असले पाहिजे, अशी भावना असल्याकारणाने आपण ज्या गावात वास्तव्य करतो तेथील ग्रामदैवताची कृपा आपणाला लाभावी अशी इच्छा निर्माण झाल्याने त्यांनी जी सण-उत्सवांची परंपरा निर्माण केली. त्यात कालोत्सवही होता.
‘काला’ हा शब्द खरे तर दही, दूध, लोणी आदी दुग्धजन्य पदार्थ एकत्र करून कालविण्याला लागू होता. बाळकृष्ण गोकुळात असताना आपल्या सवंगड्यांबरोबर जेव्हा गुरेढोरे घेऊन चरायला गेला तेव्हा भुकेच्या वेळी प्रत्येक जण आपण घरातून आणलेली शिदोरी वेगवेगळ्या ठिकाणी बसून स्वतंत्रपणे खात असल्याचे पाहिले. त्यासाठी त्यांच्यात एकी निर्माण व्हावी. भेदभाव विसरून त्यांनी एकसंध व्हावे, म्हणून बाळकृष्णाने सर्वांच्या शिदोर्या एकत्र करून कालवल्या आणि सर्वांनी हसतखेळत आणलेल्या अन्नांचा आस्वाद घेतला. त्या दिवसापासून काला शब्द रूढ झाला आणि त्यामुळे गोकुळाष्टमीच्या दुसर्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा सुरू झाली.
वरगावातील माशेल येथे देवकीकृष्णाच्या मंदिरासमोरील प्रांगणात पावसात तेथील नाना जाती, संप्रदायांचे लोक एकत्र येऊन चिखलकाला खेळतात. पंढरपुरात आषाढी-कार्तिकी पौर्णिमेस हरिदासाच्या काल्याची परंपरा आहे.
वारीला आलेली मंडळी त्या काल्याला जमते आणि काल्याचा प्रसाद घेऊन आपापल्या गावी परतते. डिचोलीतील कारापुरात विठ्ठलापूर येथे गोपाळ काल्याची परंपरा आहे. तेथील आबालवृद्ध त्यात सहभागी होऊन बालकृष्णाच्या लीलांना समूर्त करतात. गोव्यात गोपाळकाला, चिखलकाला, रातकाला म्हणजेच दशावतारी काला, दिसकाला म्हणजे गवळणकाला आणि बालक्रीडा काला असे काल्यांचे नानाविध प्रकार पाहायला मिळतात.
त्यात श्रीकृष्णाच्या विविध लीलांवरती आधारलेला गोपाळकाला गोव्यात विशेष लोकमान्य ठरलेला आहे. त्यात श्रीकृष्णजन्मापासून त्याच्या गोकुळातील पूतना संहार, कालियामर्दन असे अनेक प्रसंग नाट्याभिनयाच्या माध्यमातून दाखवले जातात. काही ठिकाणी गोपाळकाला गोकुळाष्टमीला साजरा करतात. रात्रीचा काला झाल्यावर दुसर्या दिवशी दुपारी गवळणकाल्याचे सादरीकरण होते. पूर्वीच्या काळी देवदासी समाजातील स्त्रिया गवळणकाल्याचे सादरीकरण करायच्या. त्यात श्रीकृष्णाची भूमिकाही त्याच करायच्या.
पूर्वीच्या काळी मशाली पेटवून मंदिरासमोरील एकाच जागी दरवर्षी वाद्ये वाजवून, नृत्य, गायन सादरीकरण व्हायचे. त्यातून कालांतराने महाभारत, रामायणातील कथासूत्रावरती नाट्याभिनय करण्याची परंपरा निर्माण झाली असावी आणि त्यातून काला जन्माला आला असावा.
घुमट, शमेळ, कासाळे झांज आदी वाद्यांच्या साथसंगतीतून निर्माण झालेल्या संगीताच्या पार्श्वभूमीवरती हे सादरीकरण होऊ लागल्यावर त्यात अधिक रंगत निर्माण झाली. पोर्तुगीज येण्याअगोदर कुडाळ ते कारवार इथपर्यंत प्रदेश अशा कालोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणातून एकासूत्रात बांधला गेला.
काला करणार्या लोककलाकारांच्या समुदायाला ‘मेळे’ ही संज्ञा प्राप्त झाली. असो मेळे ठिकठिकाणी जाऊन कालोत्सव सादर करू लागले. सांगे, धारबांदोडा, केपे आणि सासष्टी या तालुक्यांच्या सीमेवर असलेला पर्वत चंद्रेश्वर-भूतनाथ देवस्थानासाठी शेकडो वर्षांपासून नावारूपास आला होता. या चंद्रनाथ पर्वतावरती १७६८साली जेव्हा महारथ त्यावेळी तेथे दशावतारी काल्याचे सादरीकरण करण्यात आले, असा उल्लेख आढळतो.
गोव्यातील काल्याची परंपरा ही मराठी रंगभूमीच्या ऊर्जितावस्थेला कारणीभूत ठरली असली पाहिजे. हरिदास किंवा सूत्रधार आपल्या मंगलाचरणाने काल्यास प्रारंभ करतो. अभंग, श्लोक, आर्या, भक्तिगीतांचे पूर्वभागात हरिदास सादरीकरण करायचा. प्रत्येक मंदिरासमोर असलेल्या अंगणात काल्याचे सादरीकरण केले जायचे. रंगपटात कलाकार रंगकामास जाण्यापूर्वी हरिदास पेटार्यातील गणपती, सरस्वतीचे वाहन मोर आदी देवदेवतांचे गंधपुष्प अर्पण करून समई पेटवून पूजा करतो. रंगकाम संपल्यावरती टाळमृदंगाच्या घोषात गणपती नाचत रंगमंचावरती प्रवेश करायचा. त्यानंतर ऋद्धी सिद्धी, सरस्वती नर्तनात प्रवेश करतात. हे संपल्यावरती शंखासुर आख्यान सुरू होते.
काल्यातील शंखासुराचे आख्यान हे प्रमुख आकर्षण असायचे. तपोसाधनेत बसलेल्या ब्रह्मदेवाला शंखासुर आपल्या कृत्यांनी त्रस्त करतो चार वेद ब्रह्मदेवाकडून हिसकावून तो पलायन करून सागरतळी लपतो. त्यावेळी ब्रह्मदेवाचा धावा ऐकून श्रीविष्णू मत्स्यावतार धारण करून शंखासुराशी युद्ध करतो आणि त्याचा पराभव करून वेद आणतो. या शंखासुराच्या माध्यमातून समाजातल्या नाना प्रवृत्ती, विकृतीचे जणू काही दर्शन लोकमानसाला घडत असते.
‘आम्ही जातीचे ब्राह्मण आमचे सोयरे मुसलमान’ असे म्हणून आपली ओळख करून देणारा भटजी पूजा कीर्तन, पुराण आरती आदींचे जणू काही विडंबन करतो. शंखासुर, भटजी आदी काल्यातील पात्रे विनोद, विडंबनाच्या माध्यमातून समाजातील नानाविध व्यंगांवरती बोट ठेवतात. पूर्वीच्या काळी आजच्यासारखी मनोरंजन, प्रबोधनाची साधने उपलब्ध नव्हती आणि त्यामुळे कालोत्सवातील नाट्याचे सादरीकरण हे लोकमानसासाठी आकर्षण बिंदू होते.
गावातल्या मुख्य दैवताशी निगडीत असलेल्या या काल्याचे सादरीकरण गोव्यातल्या निरनिराळ्या देवळात ठरावीक तिथीनुसार होते. कार्तिकातल्या पौर्णिमेला कालोत्सवाला प्रारंभ होतो आणि मार्गशीर्षपर्यंत कालोत्सव चालू राहतो. देवकीकृष्णाची माशेल येथील काला हा एकेकाळी गोव्यात विशेष प्रसिद्ध. कार्तिकात सलामीलाच इथला काला पाहण्यासाठी परिसरातील नाट्यरसिक माशेलात हमखास यायचे. नृत्य, नाट्य, गायन, वादन, अभिनय यांच्या सादरीकरणातून रंगणारा हा काला रसिकांना तृप्तीचा अनोखा अनुभव देणारा उत्सव होता. बोरीतील नवदुर्गेचा कालोत्सवही असाच प्रसिद्ध. गुलाबी थंडीच्या मौसमात गावोगावी रंगणारा कालोत्सव इथल्या लोकमनाला जगण्यासाठी ऊर्जा द्यायचा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.