अनु देसाई, हळर्ण-पेडणे
गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे लोकांचा कळवळा असल्याची नाटकं करणारे राजकारणी आणि तथाकथित विचारवंत आजच्या युवापिढीला ‘हे करा ते करा’ असे रात्रंदिवस उपदेशाचे फुकटचे डोस पाजत असतात. आजची युवा पिढी हीच खरी देशाचा आधारस्तंभ असून त्यांनी भरपूर शिक्षण घेऊन आपले भवितव्य उज्ज्वल करावे, ‘शिक्षणाला पर्याय नाही’, ‘जो शिकला तो टिकला’ ही वाक्ये सर्वच राजकारण्यांच्या तोंडून नेहमीच विलक्षण आवेशात निघतात.
शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याला हमखास रोजगार मिळेल, असे छातीठोकपणे सांगणाऱ्या या नेत्यांच्या तोंडाकडे बघून मुले रात्रीचा दिवस करून, रक्ताचे पाणी करून पदवीधर, द्विपदवीधर होतात. अनेक पदव्यांची कागदी भेंडोळी घेऊन राजकारण्यांच्या दारोदारी, वर्षानुवर्षे, पोट भरण्यासाठी किमान जगण्यासाठी एक छोटीशी नोकरी द्या हो म्हणून टाहो फोडतात. त्यांच्या उंबरठ्यावर चपला झिजवतात. वर्षानुवर्षे, आज नोकरी मिळेल, उद्या नोकरी मिळेल या आशेवर जगतात. पण ही आशा शेवटी आशाच रहाते व तरुण तरुणी शेवटी निराशेच्या गर्तेत जात आत्मविश्वास शून्य बनतात.
तरुणांना आशेचे गाजर दाखवत गोवा राज्य सरकारने तर ‘ॲप्रेंटिसशीप’ नावाचा आशेचा भलामोठा फुगा गोव्याच्या तरुणाईच्या तोंडासमोर नाचवला. मोठ्या आशाळभूतपणे हजारो अधिक तरुण तरुणींनी ॲप्रेंटिसशीपसाठी अर्ज केला; त्यातील काही तरुण तरुणींचे घोडे ॲप्रेंटिसशीप नावाच्या गोड गंगेत न्हाले. आशेच्या उंच झुल्यावर झुलत या तरुणाईने सरकारचं चांगभलं म्हणत जीव तोडून दहा बारा महिने इमानेइतबारे काम केले.
सरकारने आश्वस्थ केल्याप्रमाणे ‘ॲप्रेंटिसशीप’ केलेल्यांनाच सरकारी नोकरीत प्राधान्य देणार; त्यांना अग्रक्रमाने शासकीय सेवेत सामावून घेणार असे वारंवार छातीठोकपणे सांगितल्यामुळे या ‘ॲप्रेंटिसशीप’ करणाऱ्या युवक युवतींना भर दुपारी जागेपणी आपण सरकारी नोकरीत रुजू झाल्याची स्वप्ने पडू लागली. पण हे स्वप्नरंजन करत करत अकरा महिने सरकारचे हंगामी जावई व सरकारी सुना झाल्याचा अनुभव आल्यानंतर थेट घटस्फोटाचे प्रेमपत्र हातात पडले.
‘ॲप्रेंटिसशीप’ पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा ‘ये रे माझ्या मागल्या’ म्हणत आत्मविश्वासाने ही तरुणाई आता नोकरी मिळेलच या आशेने मंत्र्या-संत्र्यांचे उंबरठे पुन्हा एकदा नव्या जोमाने झिजवू लागली. पण हाय रे दैवा..! परत एकदा तीच गोड गोड आश्वासने, तुम्ही इकडे अर्ज करा, तुम्ही तिकडे परीक्षा द्या, असे म्हणत त्यांना पुन्हा पुन्हा वाटाण्याच्या अक्षता वाटण्यात आल्या. काही कालावधीनंतर तुम्हाला नक्कीच सरकारी नोकरीत सामावून घेतले जाईल, अशी हसतमुखाने या रडवेल्या तरुणाईला आश्वासने देण्यात आली.
‘साहेब नोकरी होईल तेव्हा होईल. किमान परत एकदा ‘ॲप्रेंटीस’ म्हणून हंगामी जावई किंवा सून म्हणून रूजू करा.’ असं सांगितलं तर तुम्हाला दुसऱ्यांदा तेच सासर नांदवायला घेऊ शकत नाही. नियम म्हणजे नियम ! असे रामशास्त्री बाण्याने ते नाटकी पुन्हा एकदा सांगू लागले. त्यामुळे या कोडग्यांपुढे आमचे काहीच चालायचे नाही असे म्हणत ही तरुणाई अकरा महिन्याच्या या गोड संसाराच्या आठवणी मनाकाळजात साठवून आपल्या पदव्यांचे गाठोडे हृदयाशी कवटाळून ढळाढळा अश्रू गाळत पदव्यांचे हे अर्थशून्य कागद आपल्या अश्रूंनी भिजवत आहेत.
या अश्रूंची आज ना उद्या कधीतरी फुले होतील या आशेने येणारा प्रत्येक दिवस कसाबसा कंठत आहेत. शेवटी शासकीय नोकरी पदरात पाडून घ्यायची असेल तर तरुणाईच्या पाठीशी वजनदार आईवडील किंवा करोडपती बाप असणे आवश्यक आहे अशीच कुणकुण सगळीकडे ऐकू येते आहे. पारदर्शकतेच्या आणि पात्रतेनुसार नोकरी देण्याच्या कितीही राणा भीमदेवी घोषणा झाल्या तरी त्या घोषणा हवेतच वितळणार हे सांगायला कोणा कुडमुड्या ज्योतिषाची गरज नाही. आपल्या हक्काची नोकरी प्राप्त करून आपलं उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी आजच्या तरुणाईने संघटितपणे संघर्ष केल्याशिवाय कोणताही पर्याय नाही कारण राज्यकर्त्यांना गर्दीची आणि एक गठ्ठा मतांचीच एकमात्र भाषा कळते.
सूज्ञास अधिक सांगणे न लगे..! असं म्हणण्यास कारण की एखाद्या शासकीय कार्यालयात किंवा निमशासकीय कार्यालयात साध्या एखाद्या शिपायाची नोकरी पाहिजे असेल तर किमान दहावी पास शैक्षणिक पात्रता लागते पण जे लोक शिक्षितांना आणि उच्च शिक्षितांना नोकऱ्या देतात, राज्याचा कारभार चालवतात ते राज्याचे कारभारी म्हणजे आमदार, नामदार, मंत्री, मुख्यमंत्री व्हायला कोणत्याही शैक्षणिक पात्रतेचा निकष नाही. एखादा नॉन मॅट्रिक, चौथी पास किंवा निरक्षर ही आमदार, नामदार झाल्याची गोव्यासह देशभरात अनेक उदाहरणे आहेत. असे बिनशिक्षणी, वैचारिक क्षमता नसलेले, दुरदृष्टीहीन नेते मग आपले अपयश लपवण्यासाठी वाटेल तसे अकलेचे तारे तोडतात.
‘मूर्ख भोगती राजवैभवा, पंडित फिरती दारोदार’ अशी आजच्या तरुण मुलांची अवस्था आहे. आपण नोकऱ्या देऊ शकत नाही किंवा मुलांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना सेवेत सामावून घेऊ शकत नाही हे प्रांजळपणे मान्य करण्याऐवजी ते नवनवीन कल्पनांची भुते निर्माण करतात. मग त्यांच्या नाटकीपणाचा दुसरा अंक सुरू होतो व ते नव्या आवेशाने म्हणतात,‘तरुणांनो, तुम्ही उच्च शिक्षित आहात; तुम्हाला भ्यायची गरज नाही. टीचभर नोकरीच्या पाठीमागे लागून तुम्ही संकुचित बनू नका. तुम्ही तुमच्या बुध्दिमत्तेच्या जोरावर शिक्षण घेतलेत. आता लाथ मारीन तिथे पाणी काढीन, अशी हिंमत हवी. नोकरीच्या चरख्यात जन्मभर पिळून घेण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा उद्योग धंदा उभा करा. नोकरीसाठी गयावया करण्यापेक्षा स्वतः उद्योगपती बनून अनेकांना रोजगार देणारे मालक बना.
शेती करून सोने पिकवा, आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण व्हा. पुन्हा असे उपदेशाचे डोस पाजणाऱ्या राजकारण्यांना तरुणांनी प्रश्न विचारायला हवा की शेती फुलवायची तर जमिनी कुठे आहेत? उद्योग धंदे उभारायचे तर भक्कम पाठबळ व त्याच्या जोडीला आर्थिक बळ अत्यावश्यक आहे. उद्योगासाठी सरकारच्या विविध खात्यातील योजनांचा लाभ घेण्यासाठी जर युवक संबंधित खात्याकडे गेला तर वरपासून खालपर्यंत खात्यातील प्रत्येकाला खाण्याची सवय आहे. एखाद्या उद्योगासाठी कर्ज काढले तर प्रत्येक त्रस्त संमंधाला त्याच्या हक्काचा तथाकथित वाटा देईस्तोपर्यंत अर्धी अधिक रक्कम खर्च होईल आणि मालक बनण्याचे दिव्य स्वप्न बघणाऱ्या युवकाच्या नशिबी दिवाळखोरी येईल.
चोहोबाजूंनी असा आनंदी आनंद असताना आणि ही वस्तुस्थिती पुरेपूर माहीत असतानाही हे राजकीय नेते डोळे झाकून जो उपदेश करतात तो म्हणजे युवकांच्या जखमांवर मीठ चोळणारा अक्षम्य अघोरी क्रूर विनोद आहे, म्हणूनच आजच्या युवा पिढीने ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ ही उक्ती डोळ्यासमोर ठेवून मार्ग स्वतःच निवडायचा आहे. ही सध्याची कटू वस्तुस्थिती आहे. आपल्या जीवनाचा आपणच शिल्पकार होत असताना ही सडलेली, किडलेली, पतभ्रष्ट आणि नैतिकता भ्रष्ट व्यवस्था समूळ उखडून टाकून स्वच्छ, नितळ आणि पारदर्शक व्यवस्था निर्माण करून खऱ्या अर्थाने प्रजेने प्रजेसाठी चालवलेले राज्य कसे निर्माण करता येईल याचा ध्यास आणि अभ्यास करून परिस्थिती पालटण्याचे शिवधनुष्य पेलण्याची तयारी तरुणाईने करायला हवी.