Goa University Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa University: विद्यार्थ्यांचे जेवण अन् विश्‍वासाचा प्रश्‍न

Goa University Mess Hygiene: गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळ महासचिव म्हणून कार्य करत असताना २०२४ साली अशाच प्रकारच्या तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या.

दैनिक गोमन्तक डिजिटल

सुदीप राजेंद्र नाईक

गोवा विद्यापीठ ही राज्यातील सर्वोच्च शिक्षणसंस्था आहे. त्यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण अन्न मिळणे हा त्याचा अधिकार आहे, उपकार नव्हेत. प्रत्येक पालक मुलाला मोठ्या विश्वासाने विद्यापीठात पाठवतो. त्या विश्वासाला तडा जाऊ नये, ही जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची आहे.

गोवा विद्यापीठाच्या वसतिगृहातील मेसमध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या, किडे तसेच झुरळाचे तुकडे आढळल्याच्या अलिकडील घटना अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक आहेत. विद्यापीठात शिक्षणासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच इतर राज्यांतून विद्यार्थी येतात. त्यांच्यासाठी वसतिगृह हे केवळ राहण्याचे ठिकाण नसून दुसरे घर असते आणि मेसमधील अन्न ही त्यांची मूलभूत गरज असते.

अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या ताटात पौष्टिक आणि स्वच्छ अन्नाऐवजी अशा प्रकारचे घृणास्पद प्रकार आढळणे हे कोणत्याही सुजाण समाजासाठी लाजिरवाणे आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे हा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही. यापूर्वीही गोवा विद्यापीठाच्या मेसबाबत विद्यार्थ्यांकडून स्वच्छता, अन्नाचा दर्जा आणि व्यवस्थापनाविषयी तक्रारी झालेल्या आहेत. त्यामुळे ही एखादी अपवादात्मक घटना नसून व्यवस्थेतील सातत्याने दुर्लक्षित राहिलेल्या त्रुटींचे हे गंभीर उदाहरण आहे.

गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळ महासचिव म्हणून कार्य करत असताना २०२४ साली अशाच प्रकारच्या तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या. त्या वेळी केवळ निवेदने देऊन किंवा निषेध नोंदवून आम्ही थांबलो नाही. संबंधित अधिकाऱ्यांसोबत मेसची प्रत्यक्ष पाहणी केली. त्या पाहणीत स्वच्छतेसंदर्भातील अनेक त्रुटी निदर्शनास आल्या. स्वयंपाकघरातील स्वच्छता, अन्न हाताळण्याची पद्धत, एकूण देखभाल, तसेच एक्झॉस्ट आणि वायुवीजन व्यवस्थेतील उणिवा स्पष्टपणे समोर आल्या.

त्या वेळी या सर्व बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणून आवश्यक सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली होती. काही सुधारणा झाल्या देखील; मात्र आज पुन्हा अशाच प्रकारच्या घटना घडत असतील, तर त्या सुधारणा सातत्याने टिकवून ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित विषयांमध्ये कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. विद्यापीठाची गुणवत्ता केवळ अभ्यासक्रम, परीक्षा किंवा संशोधनावर मोजली जात नाही; तर विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानपूर्वक वातावरण उपलब्ध करून देण्यावरही ती अवलंबून असते.

मेसमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नाची गुणवत्ता ही त्यातील सर्वात महत्त्वाची बाब आहे. या संपूर्ण प्रकरणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हा विषय तातडीने विद्यापीठ प्रशासनासमोर मांडला आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. विशेषतः विद्यापीठ परिसरातील कार्यकर्ता अंशुल सिनारी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देत हा विषय सातत्याने लावून धरला आहे. विद्यार्थ्यांच्या हिताच्या प्रश्नांवर कोणतीही विद्यार्थी संघटना अशीच सकारात्मक व जबाबदारीची भूमिका घेत असेल, तर त्याचे स्वागतच झाले पाहिजे.

मेसची नियमित आणि अचानक तपासणी, स्वच्छतेच्या निकषांचे काटेकोर पालन, अन्नसुरक्षेचे वेळोवेळी लेखापरीक्षण, कीटकनाशक फवारणीचे नियमित नियोजन, स्वयंपाकघरातील वायुवीजन आणि स्वच्छतेची योग्य व्यवस्था, अन्नसाठ्याची शास्त्रीय देखभाल, तसेच विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर त्वरित कारवाई करणारी पारदर्शक यंत्रणा उभारणे ही आता काळाची गरज आहे. केवळ घटनेनंतर चौकशी समित्या नेमण्यापेक्षा अशा घटना घडणारच नाहीत, अशी व्यवस्था उभारणे हेच खरे प्रशासनाचे यश ठरेल.

प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण अन्न मिळणे हा त्याचा अधिकार आहे, उपकार नव्हेत. प्रत्येक पालक आपल्या मुलाला मोठ्या विश्वासाने विद्यापीठात पाठवतो. त्या विश्वासाला तडा जाऊ नये, ही जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची आहे. विद्यार्थ्यांच्या ताटात पुन्हा कधीही अन्नाऐवजी निष्काळजीपणा वाढून येऊ नये, हीच या लेखामागची भूमिका आहे. (लेखक गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळाचे माजी महासचिव आहेत.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT