Pandharpur Wari  Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa to Pandharpur Wari: यंदा गोव्यातल्या विविध भागांतून महाराष्ट्रातल्या पंढरपुरी तीर्थक्षेत्री भक्तवत्सल विठुरायाच्या दर्शनार्थ वारकऱ्यांचे जत्थे आषाढी एकादशीच्या जत्रेत सहभागी होण्यासाठी गेलेले आहे .

राजेंद्र केरकर

यंदा गोव्यातल्या विविध भागांतून महाराष्ट्रातल्या पंढरपुरी तीर्थक्षेत्री भक्तवत्सल विठुरायाच्या दर्शनार्थ वारकऱ्यांचे जत्थे आषाढी एकादशीच्या जत्रेत सहभागी होण्यासाठी गेलेले आहे . भगवद्भक्तीच्या समृद्ध परंपरेनं वारकरी संप्रदायाला गेल्या कित्येक शतकांपासून प्रपंच नेटका करून परमार्थ साधण्याचा सहज सोपा मार्ग मराठी संतांनी नाना जातीजमातींत विखुरलेल्या कष्टकरी समाजाला दिलेला आहे.

त्यामुळे मान्सूनच्या पावसाचा मारा असो, अथवा वादळवारा; त्यांना थोपवू शकत नाही. काही दिवस का होईना आपले प्रापंचिक व्याप, ताप त्यागून माणसे भारावल्यागत पंढरपुरी जाण्याच्या वारीत उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. आषाढी, कार्तिकी, माघी अथवा चैत्री यांपैकी एका शुद्ध एकादशीस गळ्यात तुळशीची माळ घालून नियमाने वारकरी पंढरपुरी जात असतो.

ज्ञानदेवें रचिला पाया |

उभारिले देवालया ॥

संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या जन्मापूर्वीपासून अव्याहतपणे चालू असलेल्या वारकरी संप्रदायाच्या भक्ती परंपरेला तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान दिले होते. ज्ञानेश्वर पूर्वकालापासून की विठ्ठलाचे माहात्म्य वृद्धिंगत झाले होते आणि महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आदी प्रांतांतून विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी पंढरपुरी यायचे.

ज्ञानेश्वराचे वडील विठ्ठलपंत हे आषाढी - कार्तिकी एकादशीला गेले होते याचा उल्लेख संत नामदेवांनी केलेला आहे. नाना जाती पंथांतल्या चोखा मेळा, सेना न्हावी, गोरा कुंभार, नामदेव, तुकाराम, नरहरी सोनार, बंका, सखू , जनाबाई या संतांच्या समृद्ध परंपरेनं वारकरी संप्रदायाला महत्त्वपूर्ण अधिष्ठान सर्व समाजात देण्यात महत्त्वाचे योगदान केले होते.

वारकरी संप्रदायात भक्ती हे मोक्षाचे आणि स्वात्मसुखाचे श्रेष्ठ साधन मानले आहे. पंढरीची व आळंदीची अशा दोन वाऱ्या वारकरी संप्रदायात प्रचलित आहेत. विठ्ठलभक्ती आणि प्रेमाची अनुभूती घेऊन वारकरी आपले जीवन समृद्ध करत असतात.

परमार्थ आणि व्यवहार धर्माच्या शिकवणुकीचा समन्वय वारकरी संप्रदायाने शेकडो वर्षांपासून घातला आणि त्यामुळे गोव्यासारख्या प्रदेशातही आषाढी आणि कार्तिकी शुद्ध एकादशीची परंपरा शेकडो वर्षांपासून प्रचलित असलेली पाहायला मिळते.

गोव्यातून पंढरपुरी वारीला जाणे आज महामार्ग आणि रेलवेमार्गामुळे सहज सोपे झालेले आहे. परंतु पूर्वी रामघाट, केळघाट, चोरला घाट या मार्गातून जंगलवाटा तुडवत आणि आषाढात दुथडी भरून वाहणारे नदीनाले ओलांडून जाणे हे मोठे अग्निदिव्य होते.

‘पंढरीच्या वाटे, बाभळीचे काटे’ हा अनुभव वारकऱ्यांना त्याकाळी अक्षरश: ‘पदोपदी’ यायचा. परंतु असे असतानाही वारकरी निर्भयपणे मार्गक्रमण करायचे. नित्यनेमाने पंढरपुराची आषाढी, कार्तिकी एकादशीची वारी करणाऱ्यांत वाटबा दुलबा राणे मोर्लेकर यांचे नाव महत्त्वपूर्ण आहे.

सत्तरी आणि डिचोली महालातील व्यापार, उद्योगधंद्यांत गुंतलेली मंडळी आपले प्रापंचिक व्याप बाजूला ठेवून वारीत सहभागी व्हायचे.आपले वार्धक्य आपणाला यापुढे पंढरपुराच्या वारीत सहभागी होण्यास साथ देणार नाही याची कल्पना जेव्हा वाटबा राणेंना आली, तेव्हा आर्ततेने त्यांनी श्रीविठ्ठलाला आपला शेवटचा दंडवत भावपूर्ण अश्रूंनी घातला.

तेव्हा म्हणे देव भक्ताच्या निर्व्याज प्रेमावरती प्रसन्न होऊन त्यांच्यासोबत निघाला. विठ्ठलाचे आगमन प्रथम कृष्णापूरच्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भीमगडावरती झाले. तेथून काही काळासाठी त्याचे मंदिर सत्तरीतील करंझोळ गावात होते.

करंझोळ गावात त्यामुळे गेल्या तीन शतकांपासून विठ्ठल, विठोबा या नावांची असलेली चलती पाहायला मिळते. तेथून श्रीविठ्ठल मोर्लेगडाच्या पायथ्याशी वसलेल्या मोर्लेत होता आणि तेथून त्याची स्थापना सत्तरीतल्या पडोशे गावातल्या निबिड अरण्यात केली जे स्थळ ‘पंढरीणी’ म्हणून नावारूपास आले.

शेवटी हे मंदिर कारापुरातल्या मारुतीगडावर किल्लासदृश गढीवरती वाळवंटी नदीच्या उजव्या काठावरती पाचशे वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आल्याची प्रचिती लिखित इतिहासातून आणि लोकपरंपरांतून येते.

विठ्ठलाच्या आगमनाने साखळी शहराजवळचा हा परिसर ‘विठ्ठलापूर’ म्हणून नावारूपाला आला. गोव्यात विठ्ठलभक्ती आणि वारीची परंपरा खूप जुनी आहे. वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत म्हणून त्याला पूजनीय मानलेले आहे. उडपीजवळच्या पाजक क्षेत्रातून गोव्यात आलेल्या मध्वाचार्यांनी श्रीसंस्थान गोकर्ण मठाची स्थापना पैंगिणीतल्या तळपण नदीकिनारी पर्तगाळ येथे केली होती.

तेथे १५४५ सालातली ब्राँझची पूज्यस्थानी असलेली वीर विठ्ठलाची मूर्ती याच परंपरेची साक्ष देत असते. गोव्यात जेथे व्यापार उद्योगाची भरभराट झाली तेथे भाविकांनी श्रीविठ्ठलाची स्थापना उत्स्फूर्तपणे केली. सर्वांसाठी खुले असलेले त्याचे भक्तीद्वार त्याला कारणीभूत ठरले होते.

पेडणे तालुक्यात विठ्ठलप्रेमाची मोहिनी भाविकांवर इतकी पडली की त्यांनी महिषासुरमर्दिनीच्या रूपातल्या तत्त्वाला श्रीविठ्ठलादेवी असे नाव प्रदान केले. फोंडा, माशेल, सांगे आदी ठिकाणची विठ्ठल मंदिरे गेल्या कित्येक दशकांपासून भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली आहेत.

उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्य या सर्वांसाठी श्रीविठ्ठल मुक्तीदाता भासला त्याला त्याचे भावविभोर आणि वात्सल्यसिंधू स्वरूप कारणीभूत ठरलेले आहे. सारस्वत असो अथवा आदिवासी जमाती विठ्ठलाचे विठोबा, पांडुरंग हे नाव लोकमानसाला विशेष भावल्याची प्रचिती पदोपदी मिळते.

तळकट कुंभवडे घाटमार्गे जाताना झोळंबेत किंवा रामघाटात जाताना मोर्ले घोटगेवाडीत असणारी विठ्ठल मंदिरे वारकरी संप्रदायांची वारीत जाताना प्रेरणास्थानं ठरली होती. त्यामुळे ध्यानीमनी प्रतीत होणारा विठ्ठल जसा भजन, कीर्तनात भेटतो तसाच तो धालो, फुगडी, रणमाले यांसारख्या लोक परंपरांतही अनुभवायला मिळतो.

‘पंढरीच्या पांडुरंगा हरी विठ्ठला’ अशी आर्त साद त्याला संकटप्रसंगी कष्टकरी घालतो आणि त्याच्या समजुतीनुसार तोच त्याची मुक्तता करतो. म्हणूनच त्याच्याशी भक्तांची वीण घट्ट आणि अतूट राहिलेली पाहायला मिळते.

गोव्याच्या मातीत मिळणाऱ्या काव रंगाला चुन्याच्या पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमीवरती विठ्ठलाचे रूप कोरण्यासाठी कल्पकतेनं उपयोग केलेला पाहायला मिळतो . त्यामुळे हे रूप त्यांच्यासाठी सावळे परब्रह्म ठरलेले आहे.

भारतीय संस्कृती कोशकार पंडित महादेवशास्त्री जोशी यांच्या शब्दांत सांगायचे तर पंढरपुरची वारी ही त्यांच्या दृष्टिकोनातून -केवळ वारकऱ्यांच्याच नव्हे; तर उभ्या महाराष्ट्राच्या जनमनात विठ्ठल भरून उरला आहे. काशी-वाराणशीच्या आधी पंढरपूरला जाण्यासाठी ते तळमळत असते. ’पाप्यासि कैंचे पंढरपूर’ या वाक्प्रचारांत केवढे आर्त भरून राहिले आहे त्याची कल्पना करा. गोमंतकापासून तो वर्‍हाड-खानदेशापर्यंत कुठेही जा; पहाटेच्या रामपाऱ्यांत बायका दळण मांडून बसल्या की खालीलसारख्या किती तरी भावभरी ओव्या तुमच्या कर्णकुपिकेत पडतील.

पंढरीचा राणा | चला पहायाला जाऊं ॥

संसारांत होऊं | कृतकृत्य ॥

पंढरपुरांत | वीण्याशीं वीणा दाटे

| साधूला संत भेटे | वाळवंटीं ॥

बाई पंढरपुरांत | कपिला गाय येली

| विठोबाचे जेवणाला | दुधाची खीर केली ॥

बाई पंढरपुरांत | कायचा कल्ला होई

| चुडा भरिते रुक्मिणी | राजा विठू बाकी देई ॥

गोव्यातल्या स्त्रीपुरुषांच्या लोकगीतांतून विठ्ठलाच्या भक्तीची समृद्ध परंपरा अनुभवायला मिळते. गोव्यातले पोर्तुगीज ख्रिस्ती मिशनरिही विठ्ठलभक्ती आणि वारीच्या परंपरेनं अचंबित झाले होते. २६ नोव्हेंबर १५६६ रोजी पाद्री सेबास्त्यांव गोन्साल्वीस याने ब्रदर लोरेझो मेक्सिको यांना हिंदूचे ख्रिस्तीकरण होण्यापूर्वी; लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, जरी उपजोनी संसारी| एक वेळ देखसी पंढरी| विटिलरायाची नगरी|, असा नामदेवांचा अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आपल्या पत्रात केलेली आहे. आज ही परंपरा गोव्यातल्या लोकमानसाने अव्याहतपणे चालू ठेवलेली गावोगाव पाहायला मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT