पणजी: अगदी ग्रामरचनेपासून ते समाजरचनेपर्यंत मंदिर हे गोव्यात केंद्रस्थान राहिले आहे. त्याच्या अवतिभवति सगळी सांस्कृतिक, सामाजिक जडणघडण झाली. पोर्तुगीज काळात जेव्हा देवळे पाडण्यात आली, तेव्हा लोकांनी देव इतरत्र नेऊन पुन्हा देवस्थाने उभारली.
देवस्थान हे गोमंतकीय जाणिवेचे प्रतीक आहे. त्यामुळे, पोर्तुगिजांच्या जोखडातून मुक्त झालेल्या गोव्यात सामाजिक, सांस्कृतिक सरमिसळ असली तरी देवभोळ्या, श्रद्धावान माणसांचा समान धागा कायम आहे. त्या श्रद्धेच्या श्रीमंतीवर गोव्यातील देवस्थानांचे वैभव अधिक वृद्धिंगत झाले.
भाविकांचा विश्वासरूपी भक्कम पाया भविष्यातही अबाधित राहायला हवा. ती जबाबदारी नवनिर्वाचित देवस्थान समित्यांची आहे. दोनशेहून अधिक देवस्थानांमध्ये पुढील तीन वर्षांसाठी नव्या समित्या निवडण्यात आल्या. बऱ्याच देवस्थानांत निवडणूक प्रतिष्ठेची बनवली गेली.
उच्च न्यायालयाच्या एका निवाड्यामुळे विविध पदांसाठी ‘पॅनेल’विरहित व्यक्तिगत अर्जांना देण्यात आलेली मुभा अनेकांना दिलासा ठरला. अपवाद वगळता मुक्त, निष्पक्ष, शांततापूर्ण निवडणुका झाल्या, नवे शिलेदार ठरले. पैकी बरेच चहरे जुनेही आहेत. विजयी समिती सदस्यांनी विजयाचा आनंद चाखताना आता कर्तव्याची जाणीवही मनी बाळगणे अगत्याचे आहे.
गोव्यातील देवस्थानांना सामाजिक रचनेत मोठे स्थान आहे, म्हणूनच बहुतांश देवस्थाने वैभवसंपन्न आहेत. भाविक देवासाठी यथाशक्ति भरभरून दान करतात. जमा झालेल्या निधीचा काटेकोर नियोजनासह समाजोत्थानासाठी हातभार लागल्यास ते मोठे कर्म ठरेल. कोणत्याही संस्थेची ताकद ही तिच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते.
मंदिरे ही सामाजिक ऊर्जा देणारी केंद्रे आहेत, जे भान कारभाऱ्यांना आज अभावाने दिसते. राजकीय व्यवस्थेनंतर जर कुणाचा दबदबा असेल तर तो देवस्थानांचा. जगाचा इतिहास आहे, देवस्थाने व राजसत्तेने हातात हात घेऊन इतिहास घडवले आहेत. गोव्यातील नव्या समित्यांनी समाजाच्या गरजांचा वेध घेऊन योगदानरूपी नवे पर्व सुरू करावे.
शाळेपासून अगदी हल्लीचे राजकीय पक्षही प्रगतिपुस्तक जाहीर करू पाहतात. मंदिर समित्यांनीदेखील शिक्षण, आरोग्य, संस्कार अशा त्रिसूत्रीच्या अवलंबाद्वारे, दानशूर होत, सामाजिक दृश्य स्वरूपातील कार्यात अग्रेसर राहून प्रगती साधावी, निकोप स्पर्धा करावी. मंदिर कार्यात, व्यवस्थापनात शेगावच्या गजानन महाराज मंदिरासम आदर्श गोव्यात का निर्माण होऊ नये?
देवस्थानांच्या जत्रोत्सवात भाविक सुलभ व्यवस्थापन दिसणे हे मंदिर समित्यांचे कार्य आहे, ज्याची जबाबदारी सरकारवर टाकून मोकळे होता येणार नाही. स्वच्छता, निसर्गभान, भाविकांसाठी प्रसाधनगृहे जिथे नाहीत तेथे निर्माण करावीत. देवस्थानांमध्ये वाद विकोपाला पोहोचणे, उत्सव बंद पडणे, गट-तट उभे राहणे समाजस्वास्थ्यास हानिकारक आहे.
मानापमानाचे प्रश्न सुसंवादातून, सामंजस्याने सोडविणे शक्य आहे. मंदिरे ही मिळकतीचे साधन म्हणून पाहून चालणार नाही. अगदी प्रतिकूल परिस्थितीत केवळ देवाची मूर्ती घेऊन धावलेल्यांनी पुन्हा देवस्थाने उभारली. आपली सांस्कृतिक, सामाजिक ऊर्जास्थाने त्यांनी नव्याने उभी केली. तेव्हा त्यात अर्थकारणाचा भाग नव्हता.
स्वतंत्र गोव्यात कंपन्या व राजकारण यामुळे समित्यांना अवास्तव महत्त्व प्राप्त झाले. संस्कृतीचे केंद्र असलेली देवस्थाने सत्ता व संपत्तीची केंद्रस्थाने झाली. आज पुन्हा त्यांना सत्तेच्या व संपत्तीच्या जोखडातून बाहेर काढून संस्कृतीचे केंद्र बनवणे हे खरे या नवनिर्वाचित समित्यांपुढील आव्हान आहे. गोव्यातील मंदिरांची स्थिती गोव्याबाहेरील देवळांपेक्षा वेगळी आहे. तिथे सरकारे, मंत्री, आमदार देवस्थानांच्या जमिनी, संपत्ती लुटतात.
गोव्यात देवस्थानांना मूळ हेतूकडे घेऊन जाण्यास खूप संधी आहे. गोव्यातील देवस्थानांचा विकास सांस्कृतिक पर्यटन या दृष्टीनेही झाला पाहिजे. देवस्थानाच्या आश्रयाने निर्माण झालेल्या अनेक कुप्रथा आता नष्ट झाल्या आहेत. पण, त्यांची जागा सामाजिक विद्वेषाने घेतली. ही विषवल्लीही उपटून काढावी. या निवडणुकीत सर्व ज्ञातीचे पदाधिकारी निवडून आल्याने देवस्थाने सामाजिक समतेची केंद्रेही व्हावीत, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. देवस्थानांचे व्यवस्थापन वर्चस्व स्थापन करण्याच्या हेतूने, मालकी हक्काच्या भावनेतून न होता विश्वस्त म्हणून व्हावे. तेही असे की, नास्तिकानेही म्हणावे, ‘देव आहे देवालयी!’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.