GSI Goa Gold Report Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

GSI Goa Gold Report: गोव्यात दुय्यम सोने नाही, हे सिद्ध करण्याची घाई कशासाठी?

Goa Secondary Gold Research: गोमन्तक’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘गोव्याच्या मातीतले सोने मातीतच!’ या वृत्तासंदर्भात सविस्तर वैज्ञानिक प्रतिक्रिया देत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

नंदकुमार कामत

‘जीएसआय’ च्या बारा नमुन्यांच्या दाव्याचा वैज्ञानिक प्रतिवाद; पंधरा वर्षांच्या संशोधनाकडे दुर्लक्ष का आणि स्वतंत्र पुनर्तपासणी का नाकारली जाते? ‘गोमन्तक’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘गोव्याच्या मातीतले सोने मातीतच!’ या वृत्तासंदर्भात सविस्तर वैज्ञानिक प्रतिक्रिया देत आहे.

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने गोव्यातील बारा लोहखनिज डंपचे नमुने तपासले आणि सर्व नमुन्यांमध्ये सोन्याचे प्रमाण कथित आंतरराष्ट्रीय निकषांच्या तुलनेत अत्यल्प असल्यामुळे या डंपमधून सोने काढणे व्यवहार्य ठरणार नसल्याचा निष्कर्ष पुढे आला. वृत्तात काही वर्षांपूर्वी मी गोव्यातील खाण डंपमध्ये मोठ्या आर्थिक मूल्याचे सोने असण्याची शक्यता व्यक्त केल्याचाही उल्लेख आहे. त्यामुळे हा विषय आता केवळ ‘जीएसआय’ च्या एका अहवालापुरता राहिलेला नसून गेली पंधरा वर्षे आम्ही केलेल्या आणि वारंवार शासनाच्या निदर्शनास आणलेल्या संशोधनाची विश्वासार्हता, सार्वजनिक खनिजसंपत्तीचे वैज्ञानिक मूल्यांकन आणि स्वतंत्र पडताळणीचा अधिकार यांच्याशी जोडला गेला आहे.

सर्वप्रथम माझ्या वैज्ञानिक भूमिकेविषयी कोणतीही संदिग्धता राहू नये म्हणून एक गोष्ट स्पष्ट करतो. गोव्यात कर्नाटकातील कोलार, हट्टी किंवा गदगसारखी प्राथमिक सोन्याची खाण, खोलवरची सोने खाण किंवा मोठा प्राथमिक शिरा सुवर्ण साठा असल्याचा दावा मी किंवा माझ्या सहकाऱ्यांनी केलेला नाही. गोव्याची भूवैज्ञानिक परिस्थिती वेगळी आहे. आमच्या संशोधनाचा विषय मुख्यतः गोव्याच्या अतिप्राचीन ‘बॅंडेड आयर्न फॉर्मेशन’ (BIF) आणि त्याच्याशी संबंधित ‘फेरूजीनस लिथोलॉजीस’ यांच्या दीर्घकालीन अपक्षय, ‘सुपरजीन एनरिचमेंट’, धूप नदी-नाल्यांमधील वाहतूक, अवसादन (sedimentation) आणि भू-सूक्ष्मजीवशास्त्रीय प्रक्रियांमधून मुक्त, केंद्रित, पुनर्संचित किंवा जैविक खनिजयुक्त झालेले दुय्यम सोने, सुवर्ण-सल्फाइड, सुवर्णयुक्त क्वार्ट्झ आणि जीवाणुरूपी/सूक्ष्मजीवरूपी दुय्यम सोने हा आहे.

प्राथमिक शिरा सुवर्ण साठा(Primary lode gold) आणि दुय्यम सोने यांची गल्लत करून आमच्या संशोधनाचे खंडन करणे वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचे ठरेल. पंधरा वर्षांचे संशोधन एका (<२५ ppb) अहवालाने पुसून टाकता येणार नाही गोव्यातील दुय्यम सोन्याचा प्रश्न मी ‘जीएसआय’चा ताजा अहवाल पाहिल्यानंतर उपस्थित केलेला नाही. सुमारे २०१०–११ पासून आम्ही या विषयावर क्षेत्रीय नमुना संकलन, सूक्ष्मदर्शकीय निरीक्षण, खनिज पृथक्करण, चुंबकीय पृथ्थकरण, जैवरासायनिक विश्‍लेषण, SEM-EDX आणि ICP-AES/OES सारख्या उपकरणीय पद्धती वापरून संशोधन केले आहे.

त्यातून मिळालेली माहिती संशोधनपत्रे, वैज्ञानिक लेख, परिषदांमधील सादरीकरणे, वृत्तपत्रीय वैज्ञानिक लेख आणि इतर माध्यमांतून सार्वजनिक करण्यात आली. शासनालाही या संशोधनाची वेळोवेळी माहिती देण्यात आली. तरीही गेल्या पंधरा वर्षांत या निष्कर्षांची शासनाने आमच्यासोबत किंवा स्वतंत्र तज्ज्ञांच्या साहाय्याने व्यवस्थित पुनर्पडताळणी करण्याऐवजी संशोधन जवळजवळ पूर्णपणे बाजूला ठेवले, हीच या वादाची खरी पार्श्वभूमी आहे.

गोव्यातील लोहखनिजात सोन्याचे अंश असल्याच्या आमच्या संशोधनात उत्तर आणि दक्षिण गोव्यातील BIF, Banded Hematite Quartzite (BHQ), Banded Magnetite Quartzite (बीएमक्यू) तसेच कमी दर्जाच्या लोहखनिजाच्या टाकाऊ पदार्थांचे परीक्षण करण्यात आले. त्यामध्ये कमी दर्जाचे ‘बीआयएफ’ तसेच टाकाऊ लोह खनिजात ७.७१ ppm, शिरगावच्या BHQ मध्ये१०.३५ ppm, वेळगे-सुर्ला येथील ‘बीएचक्यू’ मध्ये १२.९३ ppm आणि साकोर्डा येथील ‘बीएमक्यू’ मध्ये ८.४ ppm सोने नोंदविण्यात आले. SEM-EDX विश्लेषणातून मूलद्रव्यरूप सोन्याची उपस्थितीही नोंदली गेली. या संशोधनाच्या निष्कर्षात ७.७१ ते १३ ppm पर्यंतचे Au values गोव्याच्या सुवर्णमय लोह-खनिज प्रणालीचा अधिक व्यापक अभ्यास करण्यास पुरेसे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

आता ‘जीएसआय’च्या उपलब्ध अहवालात सर्व बारा नमुन्यांसाठी <25 ppb असा एकसारखा निकाल दिसतो. २५ ppb म्हणजे ०.००२५ ppm. त्यामुळे आमच्या प्रकाशित संशोधनातील कमी दर्जाच्या लोह खनिजातील टाकाऊ मालामधील ७.७१ ppm हा आकडा या मर्यादेपेक्षा किमान ३०८ पट अधिक आहे. साकोर्डा BMQ मधील ८.४ ppm सुमारे ३३६ पट, शिरगाव ‘बीएचक्यू’ मधील १०.३५ ppm सुमारे ४१४ पट, आणि वेळगे-सुर्ला BHQ मधील १२.९३ ppm सुमारे ५१७ पट अधिक आहे. ही विसंगती सामान्य विश्‍लेषणात्मक भिन्नता म्हणून बाजूला सारता येणार नाही.

आणखी महत्त्वाचे म्हणजे ‘जीएसआय’ने २५ ppb मोजलेलेही नाहीत. <25 ppb हा प्रत्यक्ष संख्यात्मक निकाल नसून ‘रिपोर्टिंग’ किंवा ‘डीटरमिनेशन लिमिट’ खाली असलेला ‘सेन्सॉर्ड’ अहवाल आहे. वास्तविक ‘कॉन्सन्ट्रेशन’ 24 ppb आहे, १० ppb आहे, २ ppb आहे किंवा नमूना तयारी अथवा रासायनिक विश्लेषणादरम्यान इतर पदार्थांमुळे येणाऱ्या अडथळ्यामुळे Au (सोने) योग्य रीतीने प्राप्त झाले नाही, यापैकी काय घडले हे फक्त ‘<25 ppb’ या चिन्हावरून कळत नाही. म्हणून बारा आयडेंटीकल सेन्सॉर्ड अहवालावरून संपूर्ण डंपमधून सोन्याची उपलब्धता असण्याची शक्यतेविषयी अंतिम निर्णय घेणे वैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत सावधपणेच केले पाहिजे.

गोव्यातील दुय्यम सोने एकसमान पसरलेले नाही

आमच्या संशोधनातील अत्यंत महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की दुय्यम सोने घाऊक स्वरूपात मिळणाऱ्या लोहखनिजामध्ये एकजीनसी स्वरूपात पसरलेले नाही. ते विशिष्ट माती किंवा खडकांमध्ये आढळणाऱ्या खनिजांचे त्यांच्या आकारानुसार किंवा गुणधर्मांनुसार केलेले वर्गीकरण किंवा सूक्ष्म मूल्यवर्धित कप्पे यामध्ये आढळू शकते.

आमच्या प्रयोगांमध्ये नमुने वाळवून चूर्ण करण्यात आले, पॅनिंगद्वारे ‘हेवी फ्रॅक्शन’ केंद्रित करण्यात आला, २- टेस्ला न्युओ डायमियम मॅग्नेट वापरून चुंबकीय वर्गीकरण करण्यात आले आणि नमुने २५०, १५०, १०६ व ५३ मायक्रोमीटर अशा कण-आकारांच्या अंशांमध्ये विभागण्यात आले. त्यानंतर ICP-OES/AES आणि SEM-EDX द्वारे परीक्षण केले गेले.

विशेष म्हणजे १५०,१०६ आणि ५३ मायक्रोमीटर फ्रॅक्शन्स मध्ये तुलनेने अधिक सोन्याचे प्रमाण नोंदविण्यात आले. हा निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचा आहे. जर 'सुवर्णयुक्त पदार्थ’ विशिष्ट फाईन फ्रॅक्शन मध्ये रोखलेले असेल तर हजारो किंवा लाखो टनांच्या डम्पमधून घेतलेल्या एका लहान, अवर्गीकृत एकत्रित द्रव नमुन्याचा परिणाम संपूर्ण डम्पचे खनिजशास्त्रीय वास्तविकता दर्शवेलच असे नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या विनाशकारी महापुराचं संकट अचानक नव्हतं; 5 महिन्यांपूर्वीच संशोधनातून मिळाला होता इशारा, प्रशासन गाफील का राहिलं?

India Under 19: गोव्याचा व्यंकट भारताच्या संघात कायम; ऑस्ट्रेलियाविरुद्ध 19 वर्षांखालील एकदिवसीय मालिकेसाठी निवड

Virat Khdapkar World Record: जिद्द, धैर्य आणि चिकाटी... गोव्याच्या 6 वर्षांच्या मुलाचा 'विराट' विक्रम, पायी गाठले केदारनाथ; 'इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

NHM Jobs Goa: आरोग्य खात्‍यात 127 कंत्राटी पदे भरणार; 18 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्‍याचे आवाहन

Goa Politics: "यापुढे पक्षांतर होणार नाही, याची हमी कोण देणार?" विजय सरदेसाईंचा काँग्रेसला अप्रत्यक्ष टोला

SCROLL FOR NEXT